रत्नागिरी : प्रख्यात नाटककार, लेखक प्र. ल. मयेकर यांच्या
पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने त्यांच्यावरील
लघुपट तयार केला आहे. दुर्गेश आखाडे यांची संकल्पना आणि पटकथा असलेल्या या
लघुपटाची निर्मिती श्रीकांत पाटील यांनी केली असून रत्नागिरीतील ज्येष्ठ
छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. रत्नागिरीत आज
(दि. २ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील आडिवरे-कोंभेवाडी हे
प्रभाकर लक्ष्मण मयेकर ऊर्फ प्र. ल. मयेकर यांचे मूळचे गाव. वडिलांच्या बेस्टमधील
नोकरीमुळे ते मुंबईत गेले. कालांतराने त्यांनाही बेस्टमध्ये नोकरी मिळाली. ती
सांभाळतच त्यांनी विपुल नाट्यलेखन केले. निवृत्तीनंतर सुमारे दहा वर्षे ते
रत्नागिरीत राहिले होते. त्या काळात त्यांचा रत्नागिरीतील अनेकांशी स्नेह
प्रस्थापित झाला. त्यापैकी पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी मयेकरांच्या निधनानंतर
त्यांच्या स्मृती जपण्यासाठी लघुपटाची संकल्पना मांडली. समर्थ रंगभूमीने ती उचलून
धरली आणि ४७ मिनिटांचा हा लघुपट निर्माण झाला. त्यामध्ये प्रलंची व्यावसायिक नाटके,
राज्य नाट्य स्पर्धेतील नाटके, एकांकिका, दूरचित्रवाणी मालिका, कथा, चित्रपट आणि
लघुपट इत्यादींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्या मुलाखती आणि भाषणांमधील काही
क्षण, रत्नगिरीतील कार्यक्रमातील दृश्ये, आडिवरे येथील त्यांचे घर, मयेकरांना
राज्य नाट्य स्पर्धेत पहिले यश मिळवून देणाऱ्या मा अस साबरिनचे दुर्मिळ छायचित्र, बेस्ट कला क्रीडा मंडळाने सादर केलेल्या
प्रयोगांची छायचित्रे, नाटक आणि चित्रपटांतील काही दृश्ये इत्यादींचाही समावेश
आहे. लघुपटाचे संकलन धीरज पार्सेकर यांनी केले असून ध्वनिमुद्रण रत्नागिरीतील उदयराज
सावंत यांनी, तर पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांनी केले आहे. सजावट विवेक वाडिये
यांचे असून अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि मयूरा जोशी
यांनी निवेदन केले आहे. श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी दिग्दर्शन केले
असून देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांनी निर्मितीसाठी साह्य केले आहे. लघुपटामध्ये
अभिनेता अरुण नलावडे, संजय मोने, चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, शीतल शुक्ल, माधवी जुवेकर, निर्माता कुमार सोहनी, प्रसाद कांबळी, नाट्यलेखक गंगाराम गवाणकर, पटकथाकार कांचन नायक,
चंद्रलेखा संस्थेच्या पद्मश्री मोहन वाघ, डॉ. रवी बापट, विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे, ध्वनिसंयोजक अविनाश
बोरकर, नेपथ्यकार प्रकाश मयेकर तसेच
श्रीकांत पाटील यांनीही मयेकरांसोबतचे अनुभव कथन केले आहेत.
लघुपटाच्या छायाचित्रणासाठी अत्याधुनिक
5 डी कॅमेरा वापरण्यात आला असून अजय बाष्टे यांनी उत्तम चित्रीकरण केले आहे.
......................
लघुपटनिर्मितीची समर्थ रंगभूमीची भूमिका
प्र. ल. मयेकर आणि समर्थ रंगभूमीचे अतिशय जवळच नाते होते. मयेकरांनी
राज्य नाट्य स्पर्धेसाठी २००७ मध्ये समर्थ रंगभूमीसाठी कुंतीप र्थिवा हे नाटक
लिहिले होते. त्याचबरोबर प्र. लं.च्या पाच एकांकिकांच्या पुस्तकाचे प्रकाशनही
समर्थ रंगभूमीने २००७ मध्ये केले होते.
प्र. ल. मयेकर यांचे १८ ऑगस्ट
२०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यानंतर प्र. लं.चे जवळचे मित्र पत्रकार दुर्गेश आखाडे
यांनी प्र. लं.वर लघुपट करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी घेतलेल्या प्र. लं.च्या
मुलाखती आणि विविध कार्यक्रमांची दृश्ये आखाडे यांनी संग्रहित केली होती. त्याचा
उपयोग करून घेऊन लघुपट करण्याचा निर्णय झाला. समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील आणि आखाडे
यांनी प्र. लं.च्या लघुपटावर काम करण्यास सप्टेंबर २०१५ मध्ये सुरुवात केली. लघुपटाची
संकल्पना आणि उपलब्ध असलेले प्र. लं.चे व्हिडिओ घेऊन अभिनेता अविनाश नारकर यांची
दुर्गेश आखाडे यांनी मुंबईत जाऊन भेट घेतली. नारकर यांना लघुपटाची संकल्पना आवडली.
लघुपटाची कथा आणि पटकथा आखाडे यांनी लिहिली.
त्यानंतर प्र. लं.सोबत काम केलेल्या कलाकारांचे संपर्क
क्रमांक मिळवण्यास सुरुवात केली. प्र. लं. ची मुलगी विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे आणि
मयेकरांचे स्नेही अविनाश बोरकर यांचे या कामात मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर
मयेकरांच्या लघुपटाची कथा तयार करण्यात आली. छायचित्रणाची जबाबदारी रत्नगिरीतील
नामवंत छायचित्रकार अजय बाष्टे यांनी उचलली. 5 डीसारखा अत्याधुनिक कॅमेरा त्यांनी
या लघुपटासाठी वापरला. लघुपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी
केले आहे. डिसेंबरमध्ये कलाकारांच्या डेटस घेऊन दोन दिवस मुंबईत चित्रीकरण करण्यात
आले. त्यानंतर जानेवारीत प्र. लं.चे मूळ गाव राजापूर तालुक्यातील आडिवरे कोंभेवाडीतील
त्यांचे जन्मघर आणि शाळेचे चित्रीकरण करण्यात आले. लघुपटाचे निवेदन दिग्गज अभिनेता
अविनाश नारकर आणि मूळची रत्नागिरीची आणि प्र. लं.च्या पाठिंब्याने मुंबईत जाऊन व्यावसयिक
रंगभूमीवर आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री मयूरा जोशी हिनेही केले आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये
लघुपटाचे निवेदन चित्रीत करण्यात आले. मे महिन्यात रत्नगिरीतील उदयराज सावंत
यांच्या एस. कुमार स्टुडिओमध्ये व्हॉइस ओव्हर ध्वनिमुद्रित करण्यात आला. नामवंत
निवेदक आणि अभिनेते प्रमोद पवार यांचा खणखणीत आवाज या लघुपटाला मिळाला आहे. व्हॉइस ओव्हरसाठी प्रमोद पवार खास रत्नागिरीत
आले होते.
लघुपटाचा सर्वांत महत्त्वाचा भाग
होता तो संकलनाचा. आज फायनल कट प्रो हे सॉफ्टवेअर मालिका आणि चित्रपटांसाठी
वापरतात. प्र. ल. लघुपटाची उंची वाढण्यासाठी त्या सॉफ्टवेअरमध्ये संकलन करण्याचा
निर्णय घेतला. हे सॉफ्टवेअर रत्नागिरीत उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये संकलन
करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. लघुपटाचे संकलन मुंबईत धीरज पार्सेकर यांनी
उत्तमरीत्या करून लघुपटाचा दर्जा उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. नाट्यलेखक
राजेश मयेकर आणि मनीष कदम यांचे संकलनासाठी मोलाचे योगदान लाभले. लघुपटाचे शीर्षक
आणि डीव्हीडी कव्हरची सजावट विवेक वाडिये यांनी अतिशय अप्रतिम केली आहे. लघुपटासाठी
देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांचे निर्मिती साह्य लाभले. या सर्वांच्या मेहनतीमधून
४७ मिनिटांचा प्र. ल. हा लघुपट जन्माला आला. रत्नागिरीतील कलाकारांनी व्यावसयिक
कलाकारांबरोबर काम करत लघुपट तयार करण्याचा हा यशस्वी प्रयत्न समर्थ रंगभूमीने
केला आहे. या लघुपटाच्या निमित्ताने प्र. ल. मयेकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न
नाटकाकाराचा इतिहास जगासमोर आला आहे. नव्या पिढीला प्र. लं.ची माहिती होणार आहे.
..............
संपर्कासाठी –
श्रीकांत पाटील - ९४२३०४९७०५
दुर्गेश आखाडे - ९४२२६३६९५०
अजय बाष्टे - ९९७५५५१६५५
No comments:
Post a Comment