Tuesday 3 November 2015

रत्नागिरीत २८-२९ नोव्हेंबरला राष्ट्रीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा



रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र व भारताचे पहिले बुद्धिबळ चँपियन (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त फिडे मानांकन खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा नोव्हेंबरच्या अखेरीस रत्नागिरीत होणार आहे. चेसमन रत्नागिरी संस्थेने याचे आयोजन केले असून यात सव्वा लाखाची बक्षीसे दिली जाणार आहेत. यामध्ये ग्रँडमास्टरसह अन्य नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
नाचणे-पॉवरहाऊस येथील दैवज्ञ भवन येथे २८ व २९ नोव्हेंबरला स्पर्धा होईल. नावनोंदणीसाठी २४ नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. चेसमन आणि सप्रे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सप्रे यांचे सुपुत्र मोहन, कन्या सौ. शुभांगी पोळ, जावई प्रबोध पोळ, फिडे मानांकनाचे भारत चौगुले, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अनिल राजे, चेसमनचे पदाधिकारी दिलीप टिकेकर, चैतन्य भिडे, सचिन देसाई आदी उपस्थित होते.
पुण्यातील दिलीप नवरे यांनी चेसमनच्या मदतीने सप्रे स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या वर्षी जिल्हास्तरीय, गेल्यावर्षी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेतली. यंदा प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. यातील सर्व बक्षिसे सप्रे यांच्या पत्नी श्रीमती सुधा यांनी ती प्रायोजित केली आहेत.
(कै.) सप्रे हे भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ चँपियन, बाँबे चँपियन, महाराष्ट्र चँपियन होते. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले. सलग चाळीस वर्षे बुद्धिबळाचे सदर ते वृत्तपत्रात लिहीत होते. लहानपणी आजोबांकडून ते शिकले. महाराष्ट्रासह भारतात बुद्धिबळ प्रसारासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने घेण्यात येणार आहेत.
माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या दिवशी सकाळच्या टप्प्यात ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याचा २२ जणांशी एकाचवेळी प्रदर्शनीय सामना रंगला. लांज्यातील अक्षय खेर या विद्यार्थ्याने त्याच्याशी सामन्यात बरोबरी करण्यात यश मिळवले. अन्य खेळाडूंमध्ये सुहास कामतेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, मुक्ताई देसाई, सिद्धांत सावंत, नेहा मुळ्ये, श्रेयस विद्वांस, सोहम रुमडे, अक्षय खेर, अनंत गोखले, प्राची मयेकर, सौरभ देवळे, विनायक पेठे, अ‍ॅड. विनय गांधी, वल्लभ महाबळ, अलंकार कांबळे, अभिषेक आखाडे, अनीश पंडीत, हर्ष मंत्रवाडी, सायली qशदे, विराज आठल्ये आणि शीतल देवरूखकर यांचा समावेश होता.
त्यानंतर अभिजितने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, रत्नागिरीत चांगले बुद्धिबळपटू आहेत. मात्र भरपूर मेहनत, कष्ट व विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याशिवाय अव्वल खेळाडू होता येणार नाही. मी १५ व्या वर्षी ग्रँडमास्टर होतो. पण आपल्याकडे दहा वर्षानंतर खेळायला सुरवात होते. त्यामुळे शाळेतही बुद्धिबळाचा प्रसार झाला पाहिजे. अव्वल बुद्धिबळपटू होण्यात शॉर्टकट नाही, भरपूर मेहनत हवी. खेळाडू घडण्यासाठी सातत्याने उपक्रम व्हायला हवेत. चेस अ‍ॅकॅडमी स्थापन करून त्याद्वारे हे काम करता येईल.

------------------
बक्षिसे
                                          
एक ते वीस क्रमांकांसाठी बक्षिसे व चषक दिला जाईल. ७, , ११, १३, १५ वर्षांखालील गटात प्रथम तीन पारितोषिके देण्यात येतील. खुल्या गटातील बक्षिसे अशी : १- २५ हजार, २-१७ हजार, ३- १० हजार, ४- ८ हजार, ५- ७ हजार, ६- ६ हजार, ७- ५ हजार, ८- ४ हजार, ९- ३ हजार, १०- २ हजार, ११ ते १५ प्रत्येकी १५०० रुपये, १६ ते २० प्रत्येकी १ हजार रुपये.

.........................
रत्नागिरी : चेसमन संस्थेतर्फे आयोजित प्रदर्शनीय
सामन्यात खेळताना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे

Add caption

Wednesday 28 October 2015

राणी लक्ष्मीबाईची जयंती थाटात साजरी करणार



कोट-कोलधे ग्रामस्थांचा निर्णय :  १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे विविध कार्यक्रम

लांजा :  लांजा तालुक्यातच माहेर आणि सासर असलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १७१ वी जयंती कोट येथे राणीच्या सासरच्या गावी थाटात साजरी करण्यात येणार आहे. कोट आणि राणीचे माहेरघर असलेल्या कोलधे येथील ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जयंतीच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर या जयंतीदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
      ब्रिटिशांविरुद्धच्या १८५७ सालच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीने महत्त्वाची भूमिका निभावल्याचा इतिहास आहे. `मेरी झाँसी नही दूंगी` ही तिची स्फूर्तिदायी घोषणा क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरली. राणीने १८५८ साली ब्रिटिश सैन्याविरोधात ११ दिवस लढाई केली. या लढाईचा साक्षीदार असलेले ब्रिटिश सेनानी आणि कर्तबगार राजकारणी सर ह्यू रोज यांनी सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती असे राणीचे वर्णन केले होते. मनकर्णिका तांबे असे नाव असलेल्या या राणीचे मूळ गाव कोलधे (ता. लांजा) येथे, तर कोट (ता. लांजा) येथील नेवाळकरांकडे तिचे सासर होते. विवाहानंतर राणीचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर असे झाले. विवाहानंतर ती झाशी येथे राहायला गेली, तरी ती तिच्या सासर-माहेरी तसेच रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवतीच्या दर्शनासाठी आल्याचे उल्लेख आढळतात. कोकणवासीयांना आणि प्रामुख्याने लांजा तालुक्याला राणीचा अभिमान आहे.
     
तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबर २०१५ रोजी राणीची जयंती प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे झालेल्या बैठकीला उपसरपंच कृष्णा आगरे, दिनकर नेवाळकर, मिलिंद पाध्ये, दिलीप मेस्त्री, संतोष मांडवकर, प्रभाकर रेवाळे, शांताराम सुर्वे, नंदकुमार नेवाळकर,
अॅड. विलास कुवळेकर, प्रफुल्ल सप्रे, डॉ. अशोक शहाणे, वसंत थोरात, सूर्यकांत सरदेसाई, वसंत देसाई, अविनाश बागाव, सुधीर तांबे, वसंत घडशी, संतोष तांबे, दत्तभूषण पराडकर, विजय कुरूप, प्रसन्न दीक्षित, जितेंद्र खानविलकर, दत्ताराम गोरुले इत्यादी राणीचे स्थानिक वंशज, माहेरच्या कोलधे येथील ग्रामस्थ, तालुक्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. बैठकीत समारंभाचा तपशील ठरविण्यात आला. त्यानुसार जयंतीदिवशी राणीची ऐतिहासिक आणि कौटुंबिक माहिती असणारे अभ्यासक, त्यांच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात विचारांचे आदानप्रदान होईल. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी राणीच्या आठवणी जपण्यासाठी कोट येथे स्मारक उभारून गावाची पर्यटनस्थळ म्हणून नोंद करण्यास मान्यता दिली होती. त्याबाबतही यावेळी चर्चा होईल. दुपारी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होईल.
राणी लक्ष्मीबाईच्या जयंतीसाठी कोट येथे उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
 

Thursday 22 October 2015

कुरतडे येथे शुक्रवारपासून भरणार आठवडा बाजार



महिला बचत गटांच्या उत्पादनांना हमखास बाजारपेठ उपलब्ध


रत्नागिरी : तालुक्यातील कुरतडे येथे येत्या शुक्रवारपासून (ता. २३ ऑक्टोबर) आठवडा बाजार भरणार आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांची सोय होणार असून प्रामुख्याने महिला बचत गटांच्या उत्पादनांना जवळच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
ग्रामस्थांच्या वेळेची आणि आर्थिक बचत व्हावी, तसेच ताजा, दर्जेदार माल उपलब्ध व्हावा,  यासाठी कुरतडे येथे आठवडा बाजार भरवावा, अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण पालवकर यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. परिसरातील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर कुरतडे ग्रामपंचायतीने आठवडा बाजार सुरू करण्याचा ठराव मंजूर केला. त्याची अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून होणार आहे.
या आठवडा बाजाराचा लाभ कुरतडे गावासह डुगवे, आगवे, हरचिरी, चांदोर, तोणदे, हातीस इत्यादी गावांना होणार आहे. या सर्व गावांना कुरतडे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावांमधील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनाही होणार आहे. या सर्व गावांमध्ये शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमधून महिलांचे अनेक बचत गट स्थापन झाले आहेत. या गटांनी विविध उत्पादने तयार केली आहेत. त्यांना आपली उत्पादने जवळच्या चांदेराईतील आठवडा बाजारात किंवा रत्नागिरी आणि इतरत्र विक्रीसाठी न्यावी लागत होती. त्यामुळे नफ्याच्या प्रमाणात घट होत होती. आता गावातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने बचत गटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत होणार आहे.
कुरतडे येथील आंब्रे यांच्या दुकानाजवळच्या विस्तीर्ण माळावर आठवडा बाजार भरणार असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...........................
(संपर्क – नारायण पालवकर – 9403614782)