Wednesday, 28 October 2015

राणी लक्ष्मीबाईची जयंती थाटात साजरी करणार



कोट-कोलधे ग्रामस्थांचा निर्णय :  १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे विविध कार्यक्रम

लांजा :  लांजा तालुक्यातच माहेर आणि सासर असलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १७१ वी जयंती कोट येथे राणीच्या सासरच्या गावी थाटात साजरी करण्यात येणार आहे. कोट आणि राणीचे माहेरघर असलेल्या कोलधे येथील ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जयंतीच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर या जयंतीदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
      ब्रिटिशांविरुद्धच्या १८५७ सालच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीने महत्त्वाची भूमिका निभावल्याचा इतिहास आहे. `मेरी झाँसी नही दूंगी` ही तिची स्फूर्तिदायी घोषणा क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरली. राणीने १८५८ साली ब्रिटिश सैन्याविरोधात ११ दिवस लढाई केली. या लढाईचा साक्षीदार असलेले ब्रिटिश सेनानी आणि कर्तबगार राजकारणी सर ह्यू रोज यांनी सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती असे राणीचे वर्णन केले होते. मनकर्णिका तांबे असे नाव असलेल्या या राणीचे मूळ गाव कोलधे (ता. लांजा) येथे, तर कोट (ता. लांजा) येथील नेवाळकरांकडे तिचे सासर होते. विवाहानंतर राणीचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर असे झाले. विवाहानंतर ती झाशी येथे राहायला गेली, तरी ती तिच्या सासर-माहेरी तसेच रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवतीच्या दर्शनासाठी आल्याचे उल्लेख आढळतात. कोकणवासीयांना आणि प्रामुख्याने लांजा तालुक्याला राणीचा अभिमान आहे.
     
तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबर २०१५ रोजी राणीची जयंती प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे झालेल्या बैठकीला उपसरपंच कृष्णा आगरे, दिनकर नेवाळकर, मिलिंद पाध्ये, दिलीप मेस्त्री, संतोष मांडवकर, प्रभाकर रेवाळे, शांताराम सुर्वे, नंदकुमार नेवाळकर,
अॅड. विलास कुवळेकर, प्रफुल्ल सप्रे, डॉ. अशोक शहाणे, वसंत थोरात, सूर्यकांत सरदेसाई, वसंत देसाई, अविनाश बागाव, सुधीर तांबे, वसंत घडशी, संतोष तांबे, दत्तभूषण पराडकर, विजय कुरूप, प्रसन्न दीक्षित, जितेंद्र खानविलकर, दत्ताराम गोरुले इत्यादी राणीचे स्थानिक वंशज, माहेरच्या कोलधे येथील ग्रामस्थ, तालुक्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. बैठकीत समारंभाचा तपशील ठरविण्यात आला. त्यानुसार जयंतीदिवशी राणीची ऐतिहासिक आणि कौटुंबिक माहिती असणारे अभ्यासक, त्यांच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात विचारांचे आदानप्रदान होईल. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी राणीच्या आठवणी जपण्यासाठी कोट येथे स्मारक उभारून गावाची पर्यटनस्थळ म्हणून नोंद करण्यास मान्यता दिली होती. त्याबाबतही यावेळी चर्चा होईल. दुपारी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होईल.
राणी लक्ष्मीबाईच्या जयंतीसाठी कोट येथे उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
 

No comments:

Post a Comment