Thursday 22 October 2015

कुरतडे येथे शुक्रवारपासून भरणार आठवडा बाजार



महिला बचत गटांच्या उत्पादनांना हमखास बाजारपेठ उपलब्ध


रत्नागिरी : तालुक्यातील कुरतडे येथे येत्या शुक्रवारपासून (ता. २३ ऑक्टोबर) आठवडा बाजार भरणार आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांची सोय होणार असून प्रामुख्याने महिला बचत गटांच्या उत्पादनांना जवळच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
ग्रामस्थांच्या वेळेची आणि आर्थिक बचत व्हावी, तसेच ताजा, दर्जेदार माल उपलब्ध व्हावा,  यासाठी कुरतडे येथे आठवडा बाजार भरवावा, अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण पालवकर यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. परिसरातील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर कुरतडे ग्रामपंचायतीने आठवडा बाजार सुरू करण्याचा ठराव मंजूर केला. त्याची अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून होणार आहे.
या आठवडा बाजाराचा लाभ कुरतडे गावासह डुगवे, आगवे, हरचिरी, चांदोर, तोणदे, हातीस इत्यादी गावांना होणार आहे. या सर्व गावांना कुरतडे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावांमधील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनाही होणार आहे. या सर्व गावांमध्ये शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमधून महिलांचे अनेक बचत गट स्थापन झाले आहेत. या गटांनी विविध उत्पादने तयार केली आहेत. त्यांना आपली उत्पादने जवळच्या चांदेराईतील आठवडा बाजारात किंवा रत्नागिरी आणि इतरत्र विक्रीसाठी न्यावी लागत होती. त्यामुळे नफ्याच्या प्रमाणात घट होत होती. आता गावातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने बचत गटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत होणार आहे.
कुरतडे येथील आंब्रे यांच्या दुकानाजवळच्या विस्तीर्ण माळावर आठवडा बाजार भरणार असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...........................
(संपर्क – नारायण पालवकर – 9403614782)

No comments:

Post a Comment