Saturday 13 June 2015

बँकिंग सेवांबाबत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी

झोनल मॅनेजर विनायक बुचे : कारवांची वाडी शाखेचा ग्राहक मेळावा
 कुवारबाव (ता. रत्नागिरी) – बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक मेळाव्यात बोलताना बँकेचे झोनल मॅनेजर विनायक बुचे. शेजारी (डावीकडून) उपसरपंच जीवन कोळवणकर, विवेक शेंडे, सरपंच सौ. मनाली नार्वेकर.
-------------------------------------------
रत्नागिरी – ``अद्ययावत बँकिंग सेवांच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी आहे. बँकेने युवा, महिला, नोकरदार, व्यावसायिक आणि सेवानिवृत्तीधारक अशा समाजाच्या सर्वच घटकांमधील ग्राहकांचे हित नेहमीच जपले असून ग्राहकांनीही या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा``, असे आवाहन बँकेचे रत्नागिरी विभागाचे झोनल मॅनेजर विनायक बुचे यांनी केले.
शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
बँकेच्या कारवांची वाडी शाखेतर्फे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायत सभागृहात आज (ता. 13) ग्राहक मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच सौ. मनाली नार्वेकर, उपसरपंच जीवन कोळवणकर, बँकेचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांनी प्रास्ताविक केले. मार्गदर्शनपर भाषणात श्री. बुचे पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. बँकेच्या रत्नागिरी विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून त्यामध्ये बँकेच्या 90 शाखा आहेत. विभागात 137 एटीएम असून 35 शाखांमध्ये ईगॅलरी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 16 कार्यान्वित झाल्या आहेत. या सर्व सुविधा स्थानिकांबरोबरच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खूपच उपयुक्त ठरत आहेत. तरुणांना उद्योगव्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनासाठी दोन मोफत प्रशिक्षण केंद्रे विभागात आहेत. त्याचा लाभ उद्योजकतावाढीसाठी नक्कीच होईल.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री. शेंडे
बँकेच्या विपणन विभागाचे विनय जामदार, विक्रम पुरोहित, योगेंद्र निमकर आणि मनीष वर्मा यांनी बँकेच्या विविध ग्राहकसेवांची माहिती दिली. महिला बचत गटाचे अनुदान आणि कर्जाबाबतचे बदललेले नियम तसेच केंद्र शासनाच्या तीन सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती श्री. जामदार यांनी दिली. बचत गटांविषयीचे सुधारित नियम महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसे उपयुक्त आहेत, हे त्यांनी पटवून दिले. बचत गटांना अऩुदान देण्याची पूर्वीची पद्धत बदलून आता गटांनी घेतलेल्या व्याजाची ठरावीक रक्कम अनुदान म्हणून गटांना देण्याचे नवे धोरण आहे. गटांचा नियमितपणा, बचत, अंतर्गत कर्जवितरण, परतफेड, अद्ययावत लेखे या पूर्वीच्या पाच सूत्रांच्या जोडीला सदस्यांच्या आरोग्याची काळजी, शिक्षणाविषयीची जागरूकता, सदस्यांचा सहभाग, शासकीय
विनय जामदार
योजनांमध्ये सहभाग आणि सदस्यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना या नव्या पाच सूत्रांच्या आधारे गटांचे मूल्यांकन केले जाते. स्थापनेनंतर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षाने आणि तीन वर्षांनी टप्प्याटप्प्याने याच दशसूत्रीच्या आधारे मूल्यांकन करून पन्नास हजार ते दहा लाखापर्यंतचे कर्ज कसे मिळू शकते, याचा ऊहापोह त्यांनी केला. पहिल्या तीन महिन्यांच्या मूल्यांकनानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळणाऱया पंधरा हजाराच्या अनुदानाची माहितीही त्यांनी दिली. जीवन सुरक्षा, जीवनज्योती आणि अटल पेन्शन योजनांची त्यांनी ओळख करून दिली.
विक्रम पुरोहित
विक्रम पुरोहित यांनी विविध कर्ज योजनांची माहिती दिली. सर्वांत कमी म्हणजे 9.95 टक्के व्याजाची गृहकर्ज योजना, वाहन कर्ज, तारण कर्ज आणि व्यवसाय कर्जाच्या योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. जागा घेणे आणि घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. नोकरदार, व्यवसायिक आणि सेवानिवृत्तिधारकांनाही कर्ज मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक कर्जाच्या सुलभ अटी, महिला आणि व्यावसायिकांसाछी उपलब्ध असलेल्या कर्जांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले.
सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजनांची माहिती श्री. निमकर यांनी
योगेंद्र निमकर
दिली. सुकन्या योजना दहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी असून ती मुलीच्या एकविसाव्या वर्षी परिपक्व होते. सुकन्या आणि पीपीएफ या दोन्ही योजनांमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, असे त्यांनी सांगितले.
ई-गॅलरी, महिला, युवक, पगारदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विमा संरक्षण लाभांची माहिती श्री. वर्मा यांनी दिली. इन्स्टंट मनी ट्रान्स्फर योजनेतून बँकेत खाते किंवा एटीएम नसलेल्या ग्राहकाला पैसे कसे पाठवता येतात, याविषयीचा माहितीपट त्यांनी दाखविला. ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.

समारंभाचे स्वागत ग्रामविकास अधिकारी श्री कांबळे यांनी केले. मेळाव्याला कुवारबाव
मनीष वर्मा
परिसरातील महिला, नोकरदार, व्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......................
शंभर ग्रामस्थांना विमा संरक्षण
      कुवारबाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शंभर नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांचे अर्ज आणि विमा रक्कम बँक ऑफ इंडियाच्या कारवांची वाडी शाखेत भरली जाईल, अशी माहिती यावेळी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली.
सरपंच सौ. मनाली नार्वेकर यांनी झोनल मॅनेजर विनायक बुचे यांचा सत्कार केला.

मेळाव्याला उपस्थित नागरिक.



Friday 5 June 2015

राज्यातील शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजाराचे पीककर्ज द्यावे

रत्नागिरी तालुका `आप`ची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी – दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि नापिकीने त्रस्त झालेल्या कोकणासह राज्यभरातील शेतकऱ्यांना एकरी किमान पंचवीस हजार रुपयांचे पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव मुळातच तोकड्या असलेल्या हमीभावापेक्षाही कमी होते. गाईच्या दुधाचा दर लिटरला सोळा रुपयांपर्यंत घसरला आहे. आपच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील संवाद यात्रेत दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली साडेचार हजार रुपयांची तुटपुंजी मदतही अजून मिळालेली नाही. आता पावसाळा सुरू होणार असून शेतकरी नव्या अपेक्षेने पेरणीस उत्सुक असला, तरी कोसळत्या बाजारभावाने तो हतबल झाला आहे. तसेच पेरणीचा खर्चही त्याच्या आवाक्याबाहेर झाला आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. याआधीचे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून त्यांना तातडीने एकरी पंचवीस हजाराचे नवे पीककर्ज उपलब्ध करून देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आपचे रत्नागिरी तालुका संयोजक जुबेर काझी, उपसंयोजक रवींद्र कोकरे, सचिव अमोल माने, छात्र युवा संघर्ष समितीचे कोकण संयोजक नीलेश आखाडे यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना सादर केले.


Tuesday 2 June 2015

रत्नागिरी तालुका `आप`च्या संयोजकपदी जुबेर काझी

रत्नागिरी – आम आदमी पार्टीच्या रत्नागिरी तालुका समितीची फेररचना करण्यात आली असून तालुका संयोजकपदी जुबेर काझी यांची निवड करण्यात आली. कोकण विभाग सचिव दानिश बक्षी आणि छात्र युवा संघर्ष समितीचे कोकण संयोजक नीलेश आखाडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

बैठकीत लोकसभा निवडणुकीपासून प्रचलित असलेल्या सर्व समित्या रद्द करण्यात आल्या. संघटनात्मक बदलांनंतर आगामी स्थानिक निवडणुका आपने स्वतंत्रपणे लढवाव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटनेचे काम जोमाने सुरू असल्याची माहिती यावेळी श्री. आखाडे यांनी दिली. शहरातील विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी रवींद्र कोकरे (उपसंयोजक), अमोल माने (सचिव) यांचीही तालुका कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. उर्वरित समिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका संयोजक श्री. काझी यांनी सांगितले. रत्नागिरी शहरासाठी काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.


Wednesday 27 May 2015

`कोकण मीडिया कन्सल्टन्सी`च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी – येथील कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसच्या रत्नागिरी संपर्क कार्यालयाचे मंगळवारी (ता. 26) उद्घाटन झाले. साहित्यिक डॉ. दिलीप पाखरे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि डॉ. उमेश केळकर यांनी उद्घाटन केले.
कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याच्या उद्देशाने कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस संस्थेची नुकतीच खेडशी (ता. रत्नागिरी) येथे स्थापना झाली. या संस्थेचे रत्नागिरी संपर्क कार्यालय मारुती मंदिर येथे डॉ. उमेश केळकर यांच्या दवाखान्याजवळ सुरू झाले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येतात. प्रसिद्धीपत्रके, निवेदने, कार्यक्रमांच्या बातम्या, प्रासंगिक लेख तयार करून देताना त्या लिहिणे सर्वांनाच जमतेच, असे नाही. परिणामी माध्यमांच्या या युगात देशविदेशातील बातम्या सहज उपलब्ध होत असताना आजूबाजूच्या परिसरातल्या छोट्याशा पण महत्त्वाच्या घटनाही दुर्लक्षित राहतात. अनेकदा महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहतो. अशा स्थितीत संस्था आणि व्यक्तींना मदत करणे आणि त्या बातम्या, छायाचित्रे वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविणे असे संस्थेच्या कार्याचे स्वरूप आहे. याशिवाय माध्यमविषयक अन्य सेवाही पुरविल्या जाणार आहेत. एडीझेड नाइन्टीवन या मोबाइल जाहिरात अॅपविषयीची माहितीही यावेळी देण्यात आली.
कोकणातील गावे आणि शहरांचा विकास होत असताना माध्यमविषयक सुरू झालेली ही सेवा तसेच एडीझेड नाइन्टीवन ही नव्या युगातील जाहिरात सेवाही निश्चितच उपयुक्त असल्याचे मत डॉ. पाखरे, डॉ. केळकर आणि श्री. कोकजे यांनी यावेळी व्यक्त केले.

      समारंभाला संचालक प्रमोद कोनकर, एडीझेड नाइन्टीवनचे ओंकार अभ्यंकर, उमेश आंबर्डेकर इत्यादी उपस्थित होते.
कोकण मीडियाविषयी बोलताना डॉ. दिलीप पाखरे

रत्नागिरी – कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी एडीझेड नाइन्टीवनचे उमेश आंबर्डेकर, डॉ. उमेश केळकर, अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, डॉ. दिलीप पाखरे, ओंकार अभ्यंकर

...........................

संपर्क कार्यालयाचा पत्ता –
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
हॅवेल्स गॅलरी, साईकृपा अपार्टमेंट,
श्री धन्वंतरी आयुर्वेदनजीक, स्वा. सावरकर नाट्यगृहाजवळ,
नाचणे रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी-415612



Tuesday 12 May 2015

जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्रवारी वर्धापनदिन



रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा दुसरा वर्धापनदन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. ग्रामस्थांना एकत्रितरीत्या उपासना करता यावी, यासाठी बांधलेल्या या मंदिराच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालवकरवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
कुरतडे गावातील महिला दर शुक्रवारी संतोषीमातेची पूजा करत असत. गावातील सर्व महिलांना एकत्रित पूजा आणि व्रतवैकल्ये करता यावीत, तसेच ग्रामस्थांनाही उपसना करता यावी, यासाठी कुरतडे गावाच्या पालवकरवाडीतील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन संतोषीमातेचे छोटेसे मंदिर बांधले. दोन वर्षांपूर्वी या मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा झाला.  तेव्हा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनीही पुढाकार घेऊन निधी संकलित केला. कुरतडे दशक्रोशीत संतोषीमातेचे मंदिर नसल्याने या मंदिराचा भक्तांना लाभ झाला. मंदिरात दैनंदिन पूजाआरती केली जाते. जीर्णोद्धारानंतर गेली दोन वर्षे वर्धापनदिन साजरा केला जातो. गावातून संतोषीमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जोगवा मागितला जातो. त्यामधून उत्सवाचा खर्च केला जातो. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ, विशेष कामगिरी बजावलेले ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
यावर्षीचा वर्धापनदिन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. सकाळी आठ वाजता विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती-महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी पालखी मिरवणूक, भजन, रात्री आठ वाजत मान्यवरांचा सत्कार केला जाईल. रात्री साडेदहा वाजता लांजा येथील मांडवकरवाडीतील बहुरंगी नमन सादर केले जाईल. विलास पालवकर, महेश पालवकर, विजय पालवकर, रामचंद्र पालवकर, गोपाळ पालवकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक नारायण पालवकर यांनी केले आहे.




प्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन – 9403614782