Monday, 5 June 2017

कोकणातील उद्योगांच्या संधींना विचारांची जोड आवश्यक - डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई



      रत्नागिरी – कोकणात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. पण अभिमान आणि अहंकारामुळे या संधी नाहीशा होतात. विचारांची प्रक्रिया थांबते. प्रगती साधायची असेल, तर विचारांचा प्रवाह सुरू राहिला पाहिजे आणि विचारांचा हा वेग कृतीमध्ये आणला, तर यश मिळेल, असे प्रतिपादन मुंबईतील डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी केले.
      कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माळ नाका येथील हॉटेल सनस्टारमध्ये रविवारी (ता. ४ जून) झालेल्या या कॉन्फरन्समध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, डोंबिवली आणि ठाण्यातील सुमारे शंभर उद्योजक उपस्थित होते.
      मूळचे भांबेड (ता. लांजा) येथील रहिवासी असलेले डॉ. ठाकूरदेसाई न्यूरोसर्जन आहेत. देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी त्यांचा सतत दौरा सुरू असतो. आपल्या मूळ गावीही ते दर महिन्याला येऊन शेतीबागायतीची देखभाल करतात. आंब्याच्या ३६, तर फणसांच्या शंभर जातींची लागवड त्यांनी केली आहे. देशविदेशात फिरताना आलेल्या विविध अनुभवांमधून त्यांनी कोकणात फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांबाबत उपलब्ध असलेल्या विविध संधींचा आढावा घेतला. आंध्र प्रदेशातील फणस लागवड आणि प्रक्रियायुक्त पदार्थ, मलेशियातील सुकविलेले फणस, पक्षिदर्शन पर्यटन, प्राणिपर्यटन, वृक्ष पर्यटन, टाकाऊ म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या जुन्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, ऑर्किडची शेती, आंबा-काजूव्यतिरिक्त लागवडीबाबत कोणतीही स्पर्धा नसलेले कोकम, खिरणी, बिब्बा इत्यादी फळांचा उपयोग इत्यादी क्षेत्रात कोकणात उपलब्ध असलेल्या अनेक उद्योगांच्या संधीबाबत डॉ. ठाकूरदेसाई यांनी नेमकेपणाने मार्गदर्शन केले.
      ठाण्यातील सौ. गौरी खेर यांनी व्यवसायाकरिता आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी माहिती दिली. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संवाद, सादरीकरण, वक्तृत्वशैली, वाटाघाटींचे कौशल्य, व्यावसायिक शिष्टाचार, नेतृत्वशैली, ग्राहकसेवा, टीमवर्क, मानसिक लवचिकता आणि अविरत शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
  रत्नागिरी – केबीबीबीएफच्या बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना
गौरी खेर, सोबत (डावीकडून) गोविंद हर्डीकर, केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे
अध्यक्ष योगेश मुळ्ये, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई.
      पुण्यातील गोविंद हर्डीकर यांनी प्रक्रिया उद्योग आणि त्यासाठी ते तयार करीत असलेल्या विविध यंत्रसामग्रीविषयीची माहिती दिली. मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्री. हर्डीकर यांनी कोकम, जांभूळ आणि करवंदांविषयी कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुराष्ट्रीय प्रकल्पाकरिता तीन वर्षे काम केले. पुण्यात गेली सतरा वर्षे प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती ते करीत आहेत. या यंत्रसामग्रीच्या आधारे कोकणातील उत्पादनांवर कोणत्या आणि कशा प्रक्रिया करता येतील, याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कोकम सरबताची पावडर, कापे गरे, करवंद इत्यादी फळे आणि रस छोट्या प्रमाणात पॅकबंद करून त्याची विक्री केल्यास वाया जाणाऱ्या फळांचा उपयोग होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. नाचणीची इन्स्टंट आंबील तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उद्योगाचा एकेक विभाग घेऊन त्यावर निश्चित कालावधीचा कृती आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
      रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे. हा आत्मविश्वास अनुभवातून आणि निरीक्षणातून साध्य होतो, असे त्यांनी सांगितले. केबीबीएफ ग्लोबलचे प्रकाश गुण्ये, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. हिर्लेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
      केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष योगेश मुळ्ये यांनी परिषदेचे प्रास्तविक केले. यावेळी केबीबीएफचे उद्गाते मनोज कळके यांच्यासह ठाणे, डोंबिवली आणि पुणे विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



Friday, 26 May 2017

मुंबईच्या अनाथालयातील मुलींचे रत्नागिरीत निवासी शिबिर



      रत्नागिरी : अनाथ आणि निराधारांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानतर्फे येत्या २ ते ५ जून या कालावधीत रत्नागिरीत निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील अनाथाश्रमातील मुली या शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरी जि्ल्ह्याचा परिचय करून घेणार आहेत.
                अंकुर प्रतिष्ठान ही अनाथालयातील वंचित मुलांकरिता काम करणारी सामाजिक संघटना आहे. विविध अभिनव उपक्रमांद्वारे अनाथ मुलांच्या संपूर्ण विकासासाठी संस्था कार्यरत आहे. अनाथ मुलांमधील सुप्त कौशल्याचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी संस्था काम करते. अनाथाश्रमासारख्या काहीशा बंदिस्त वातावरणात राहिलेल्या या मुलांचा बाहेरील जगाशी परिचय करून देण्याचाही संस्थेचा प्रयत्न असतो.
      याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील अनाथाश्रमातील मुलींसह २५ जणांचा गट चार दिवसांच्या मुक्कामासाठी येत्या २ जून रोजी रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यांच्या चार दिवसांच्या निवासाची व्यवस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने मुलींच्या वसतिगृहात केली आहे.
      पहिल्या दिवशी दुपारी हा गट देवधर डेअरीला भेट देईल. सायंकाळी त्यांच्यासाठी सर्पमित्र विनोद वायंगणकर सापांविषयीची माहिती देणार आहेत. दुसऱ्या दिवशी (ता. ३) मुलींना जयगडमार्गे फेरीबोटीतून हेदवीतील गणेश मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर मंदिर, आरेवारे समुद्रकिनाऱ्याची सफर घडविली जाणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत गणेशगुळे, कोळंबे, देवराई, रेल्वेचा पानवळ पूल परिसरात निसर्गपरिक्रमा घडविली जाईल. सायंकाळी कार्ले येथे नौकेची सफर या मुली करतील. रात्री प्रा. विवेक भिडे यांच्या आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुलींना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे, यासाठी अखेरच्या दिवशी एका गावाची सफर घडविली जाणार आहे.
      या कार्यक्रमांमध्ये सोयीनुसार रत्नागिरीवासीयांनाही होता येऊ शकेल. त्याकरिता या शिबिराचे संयोजक प्रा. अवधूत आपटे (८४१२०१८११२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..........
अधिक माहितीसाठी –

Wednesday, 15 February 2017

कोकणाला पेलणार का दळणवळणाचे जाळे?



कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्गाची चाचपणी, रत्नागिरीत सुरू होण्याची शक्यता असलेली विमानसेवा आणि दृष्टिपथात आलेली सुलभ आणि जलद जलवाहतुकीची योजना प्रत्यक्षात आली, तर येत्या दोन-तीन वर्षांत कोकणात सर्व तऱ्हेच्या दळणवळणाचे मोठेच जाळे निर्माण होणार आहे. त्याचा स्थानिक कोकणवासीयांच्या विकासाच्या दृष्टीने फायदा उचलला जाणार का आणि एकंदरीतच कोकणाला दळणवळणाचे हे जाळे पेलणार का, हा प्रश्न आहे.
...................
महाराष्ट्र टाइम्समधील या संपूर्ण लेखासाठी पाहा खालील लिंक - 



Monday, 6 February 2017

जैतापूरची संधी



केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वादग्रस्त ठरला असला, तरी तो आता आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पाविरोधात अखेरपर्यंत लढा देण्याचा स्थानिकांचा निर्धार आणि त्यांना शिवसेनेचा पाठिंबाही कायम आहे. काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष मात्र प्रकल्पाचे समर्थन एवढ्याच भूमिकेत वावरत आहेत. प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा फायदा स्थानिकांना करून देण्याकडे त्यांचे लक्ष गेलेले नाही.
.........................


Tuesday, 31 January 2017

सीएस फाउंडेशनच्या परीक्षेत अचीव्हर्स अॅकॅडमीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण




अदिती रायकर
रत्नागिरी - येथील अचीव्हर्स अॅकॅडमीमध्ये कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी मार्गदर्शन घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सी. एस. फाउंडेशन या परीक्षेत यश मिळाले आहे.
      ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येते. या परीक्षेत अदिती रायकर, उन्नती वैद्य आणि स्वप्नील सांडीम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, रोहन फळणीकर आणि सौ. शिवानी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
                दरम्यान, अचीव्हर्स कॅडमीतर्फे कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी मार्गदर्शनाची तिसरी बॅच नुकतीच सुरू झाली आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्लासचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी mugdha118@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कॅडमीच्या संचालिका सीएस
उन्मती वैद्य
मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.
(संपर्कासाठी दूरध्वनी क्र. ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०)
स्वप्नील सांडीम

Monday, 23 January 2017

कोकण इतिहास परिषदेकडून आर. एच. कांबळे यांचा दुहेरी सन्मान


      रत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे यांचा कोकण इतिहास परिषदेने दुहेरी सन्मान केला आहे. त्यांच्या पुस्तकाला परिषदेने पुरस्कार जाहीर केला असून या महिनाअखेरीला होणाऱ्या परिषदेच्या अधिवेशऩातील एका सत्राचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले आहे.
      कोकणविषयक आणि कोकणातील इतिहास संशोधकांना चालना देण्यासाठई २०१० साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रा. कांबळे यांनी पुढाकार घेऊन परिषदेचे पहिले अधिवेशन रत्नागिरी २०११ साली भरविले. त्यानंतर ठाणे, गोवा, रायगड, शहापूर आणि ठाणे येथे अधिवेशने भरविण्यात आली. परिषदेचे सातवे अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी वैभववाडी येथे भरणार आहे. परिषदेतर्फे संशोधनकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरातील संधोथनात्मक लेखनाला पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. कांबळे यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या पुस्तकाची निवड करण्यात आली असून वैभववाडीतील अधिवेशनात तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीन सत्रांमध्ये इतिहासविषयक चर्चा होणार असून त्यापैकी मध्ययुगीन चर्चासत्राचे अध्यक्षपद प्रा. आर. एच. कांबळे भूषविणार आहेत.
      प्रा. डॉ. कांबळे यांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३० परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या ३४ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठाकरिता स्थानिक इतिहास या विद्याशाखेत त्यांनी ८ संशोधन प्रकल्प सादर केले असून एका प्रकल्पाला विद्यापीठाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठांकरिता त्यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली आहेत. इतिहासविषयक विविध चर्चासत्रे, व्याख्यानमालांमध्येही त्यांनी भाग घेतला असून शोधनिबंधांचे संपादन आणि प्रकाशनही केले आहे. मोडीलिपी प्रशिक्षण, दुर्ग अभ्यास आदी वर्गांचे आयोजनही त्यांनी केले असून इतिहास या ज्ञानशाखेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
      कोकण इतिहास परिषदेने त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन पुस्तकाला पुरस्कार आणि एका चर्चासत्राचे अध्यक्षपद देऊन केलेल्या दुहेरी सन्मानाबद्दल डॉ. कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.

      

विकासाचे प्रशिक्षण




कोकण रेल्वेने रौप्यमहोत्सवाचा टप्पा गाठला, तरी कोकणाचा तितकासा औद्योगिक विकास झाला नाही. आता रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंटचा कारखाना कोकणात होऊ घातला आहे. त्याकरिता लागणारे सुटे भाग कोकणातच उपलब्ध व्हावेत, म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळेच कोकणाच्या उद्योगीकरणाला चालना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे म्हणायला वाव आहे.
................................
खालील लिंकवर अधिक वाचन करता येईल.