Monday 5 June 2017

कोकणातील उद्योगांच्या संधींना विचारांची जोड आवश्यक - डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई



      रत्नागिरी – कोकणात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. पण अभिमान आणि अहंकारामुळे या संधी नाहीशा होतात. विचारांची प्रक्रिया थांबते. प्रगती साधायची असेल, तर विचारांचा प्रवाह सुरू राहिला पाहिजे आणि विचारांचा हा वेग कृतीमध्ये आणला, तर यश मिळेल, असे प्रतिपादन मुंबईतील डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी केले.
      कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माळ नाका येथील हॉटेल सनस्टारमध्ये रविवारी (ता. ४ जून) झालेल्या या कॉन्फरन्समध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, डोंबिवली आणि ठाण्यातील सुमारे शंभर उद्योजक उपस्थित होते.
      मूळचे भांबेड (ता. लांजा) येथील रहिवासी असलेले डॉ. ठाकूरदेसाई न्यूरोसर्जन आहेत. देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी त्यांचा सतत दौरा सुरू असतो. आपल्या मूळ गावीही ते दर महिन्याला येऊन शेतीबागायतीची देखभाल करतात. आंब्याच्या ३६, तर फणसांच्या शंभर जातींची लागवड त्यांनी केली आहे. देशविदेशात फिरताना आलेल्या विविध अनुभवांमधून त्यांनी कोकणात फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांबाबत उपलब्ध असलेल्या विविध संधींचा आढावा घेतला. आंध्र प्रदेशातील फणस लागवड आणि प्रक्रियायुक्त पदार्थ, मलेशियातील सुकविलेले फणस, पक्षिदर्शन पर्यटन, प्राणिपर्यटन, वृक्ष पर्यटन, टाकाऊ म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या जुन्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, ऑर्किडची शेती, आंबा-काजूव्यतिरिक्त लागवडीबाबत कोणतीही स्पर्धा नसलेले कोकम, खिरणी, बिब्बा इत्यादी फळांचा उपयोग इत्यादी क्षेत्रात कोकणात उपलब्ध असलेल्या अनेक उद्योगांच्या संधीबाबत डॉ. ठाकूरदेसाई यांनी नेमकेपणाने मार्गदर्शन केले.
      ठाण्यातील सौ. गौरी खेर यांनी व्यवसायाकरिता आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी माहिती दिली. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संवाद, सादरीकरण, वक्तृत्वशैली, वाटाघाटींचे कौशल्य, व्यावसायिक शिष्टाचार, नेतृत्वशैली, ग्राहकसेवा, टीमवर्क, मानसिक लवचिकता आणि अविरत शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
  रत्नागिरी – केबीबीबीएफच्या बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना
गौरी खेर, सोबत (डावीकडून) गोविंद हर्डीकर, केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे
अध्यक्ष योगेश मुळ्ये, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई.
      पुण्यातील गोविंद हर्डीकर यांनी प्रक्रिया उद्योग आणि त्यासाठी ते तयार करीत असलेल्या विविध यंत्रसामग्रीविषयीची माहिती दिली. मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्री. हर्डीकर यांनी कोकम, जांभूळ आणि करवंदांविषयी कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुराष्ट्रीय प्रकल्पाकरिता तीन वर्षे काम केले. पुण्यात गेली सतरा वर्षे प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती ते करीत आहेत. या यंत्रसामग्रीच्या आधारे कोकणातील उत्पादनांवर कोणत्या आणि कशा प्रक्रिया करता येतील, याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कोकम सरबताची पावडर, कापे गरे, करवंद इत्यादी फळे आणि रस छोट्या प्रमाणात पॅकबंद करून त्याची विक्री केल्यास वाया जाणाऱ्या फळांचा उपयोग होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. नाचणीची इन्स्टंट आंबील तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उद्योगाचा एकेक विभाग घेऊन त्यावर निश्चित कालावधीचा कृती आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
      रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे. हा आत्मविश्वास अनुभवातून आणि निरीक्षणातून साध्य होतो, असे त्यांनी सांगितले. केबीबीएफ ग्लोबलचे प्रकाश गुण्ये, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. हिर्लेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
      केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष योगेश मुळ्ये यांनी परिषदेचे प्रास्तविक केले. यावेळी केबीबीएफचे उद्गाते मनोज कळके यांच्यासह ठाणे, डोंबिवली आणि पुणे विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



1 comment:

  1. atyant mahaitipurn batami vachayala milali,dhanyavad!

    ReplyDelete