Wednesday, 7 June 2017

मुंबईच्या माझे माहेर अनाथाश्रमातील मुलींनी रत्नागिरीत अनुभवले कौटुंबिक जीवन



        रत्नागिरी : मुंबईच्या अनाथाश्रमातील त्या मुली रत्नागिरीतील चार दिवसांच्या भ्रमंतीने भारावून गेल्या. निसर्गाचा जवळून परिचय होण्याबरोबरच त्यांनी कौटुंबिक जीवनही अनुभवले. मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीची सैर घडलेल्या या मुलींनी पुन्हा एकदा या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केला.
               
केळ्ये-मजगाव (ता. रत्नागिरी) माध्यमिक विद्यालयातल्या
आपल्याच वयाच्या मैत्रिणींमध्ये रंगून गेलेल्या
मुंबईतील माझे माहेर संस्थेच्या मुली.
अनाथ मुलांमधील सुप्त कौशल्यांचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी मुंबईतील अंकुर प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था काम करते. अनाथाश्रमात बंदिस्त वातावरणात राहिलेल्या मुलांना बाहेरील जगाशी परिचय करून देण्याकरिता मुंबईच्या काळाचौकीतील माझे माहेर अनाथाश्रमातील अकरा मुलींना प्रतिष्ठानतर्फे मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीत चार दिवसांची सहल आयोजित केली होती. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात त्यांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथेच शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वसतिगृहाचे रेक्टर महेश नाईक, अंकुरच्या व्यवस्थापकीय समितीचे डॉ. विद्याधर गोखले, प्रणव भोंदे, प्रा. अवधूत आपटे, यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.
त्यानंतरच्या चार दिवसांत या मुलींनी रत्नागिरी शहर आणि परिसराचा फेरफटका मारला. त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थान, भोके येथील देवधर डेअरी, कर्ला परिसरात रात्रीचा नौकाविहार, फेरीबोटीतून प्रवास करून जयगड, हेदवी, वेळणेश्वरचे दर्शन, बामणघळ, गणपतीपुळ्यातील प्राचीन कोकण, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत निसर्गदर्शन, कातळशिल्पे, प्रा. विवेक भिडे यांनी घडविलेली खगोलशास्त्राची सफर इत्यादींचा समावेश होता. मोकळ्या वातावरणात प्रथमच फिरणाऱ्या मुलींना वेगळाच आनंद मिळाला. रत्नागिरीच्या राष्ट्रसेविका समितीने आयोजित केलेल्या मातृहस्ते भोजनाच्या कार्यक्रमाने तर मुलींना गहिवरून आले. यावेळी मुलींनी नृत्य व गाणे सादर करून आपला आनंद व्यक्त केला. केळ्ये माध्यमिक शाळेतील मुलींशी परिचय आणि त्यांच्यासमवेत एक दिवस राहण्याचा कार्यक्रमही पार पडला. एकाच दिवसाच्या मैत्रीतही मुलींनी ती घरे आपलीशी केली.
                शिबिराच्या समारोपाला महेश नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, अंकुर प्रतिष्ठाने डॉ. विद्याधर गोखले उपस्थित होते. शिबिराविषयी सना मंडल आणि मनीषा या विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मते मांडली. मुंबईपासून दूर कोकणात खूप काही मिळाले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. खूपच वेगळा अनुभव मिळाला, अशी मते त्यांनी व्यक्त केली. अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने अदिती भट हिने रत्नागिरीतील सोयीबाबत आणि प्रा. अवधूत आपटे यांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा भोंदे यांनी केले.

.......




No comments:

Post a Comment