Sunday, 10 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव – पुष्प चौथे



माधवराव पेशव्यांची मुत्सद्देगिरी मराठशाहीच्या हिताची – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : माधवराव पेशवे मुत्सद्दी होते. अल्पायुष्यात त्यांनी त्यांच्या या स्वभावाची चुणूक दाखवली. इंग्रजाने सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने व्यापारी कंपनीचा माल ठेवण्यासाठी वसई, साष्टीमध्ये किल्ले बांधण्याची परवानगी मागितली. पण माधवरावांनी इंग्लंडमध्ये आम्हालाही दोन किल्ले बांधण्यास जागा द्यावी, ती मिळाली की आम्हीसुद्धा परवानगी देऊ, असे सांगून इंग्रजाची बोळवण केली. माधवराव असेपर्यंत आपल्याला येथे हातपाय पसरता येणार नाहीत, याची इंग्रजांना कल्पना आली, असे सांगत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी पेशवाईची महती सांगितली.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या परिवार आयोजित कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. पानिपताच्या दुसऱ्या लढाईतील विजय आणि माधवराव पेशव्यांचे गुणवर्णन त्यांनी केले.
उत्तररंगामध्ये ते म्हणाले, पानिपतातील पहिल्या माघारीचा पराभव नानासाहेब पेशव्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांचे अवघ्या ५० दिवसांनी निधन झाले. त्यांच्या जागी १६ वर्षांच्या माधवराव पेशव्यांची निवड झाली. काका राघोबा (रघुनाथराव) याचा कारस्थानी, अंतःस्थ स्वभावामुळे त्यांच्याऐवजी माधवरावांना qशदे, तुकोजी होळकर, रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस यांची भक्कम साथ मिळाली. मात्र राज्यकारभाराऐवजी अध्यात्माकडे वळलेल्या कोवळ्या वयातील माधवरावांची रामशास्त्रींनी कानउघाडणी केली. निस्पृहतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रामशास्त्रींनी कलावंतीण, घरकाम करणाऱ्या बायका, नोकर विकण्याची प्रथा सर्वप्रथम बंद केली.
श्री. आफळे यांनी सांगितले, वीस वर्षांचा माधवराव कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर राघोबाने पैठण लुटले. त्यादरम्यान पुणे लुटणाऱ्या निजामाला मदत करणारा माधवरावांचा मामा त्र्यंबक रास्ते याला ५० लाखांचा दंड रामशास्त्रींनी ठोठावला. त्यावेळी आईने दंड करू नको नाही तर मी घर सोडून जाईन व पुन्हा कधीही भेटणार नाही अशी माधवरावांना शपथ घातली. पण माधवराव न्यायाच्या बाजूने उभे राहिले. त्यांची आई गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडला व त्या नाशिकला गेल्या. त्यानंतर या दोघांची कधीही भेट झाली नाही.
माधवरावांबाबतचा एक किस्सा सांगितना आफळे म्हणाले, पेशव्यांच्या परवानगीने इंग्रजांनी बंदरात उभ्या केलेल्या बोटींवरील माल विसाजी लेले यांनी लुटला मात्र स्वराज्याच्या तिजोरीत न भरता तो स्वतःसाठी ठेवला. त्या प्रकरणात न्यायदानावेळी न्यायासमोर पेशव्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे रामशास्त्रींनी बजावले. त्याचा गैरअर्थ घेऊन राघोबाने रामशास्त्रींना माधवरावांसमोर उभे केले. पण माझे विधान बदलणार नाही, असे सांगितल्यानंतर माधवरावांनीही रामशास्त्रींना मोत्यांची माळ व खंजीर दिला व माझ्याबाबतीतही असाच न्याय करा, असे सांगितले.
पानिपतावरील पहिल्या लढाईत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आठ वर्षांनी ५५ हजारांची मराठी फौज पानिपतावर गेली. क्षय झाल्यामुळे माधवरावांना मात्र मोहिमेवर जाता आले नाही पण त्यांनी उत्तरक्रिया म्हणजे उत्तर दिशेला पानिपतावर मारल्या गेलेल्या मराठ्यांचे श्राद्ध न करता विजय मिळवून उत्तरक्रिया करा, असा आदेश दिला. या लढाईत मराठे विजयी झाले. यावर स्वा. सावरकरांनी उत्तरक्रिया हे नाटक लिहिले आहे. लढाईनंतर थेऊरच्या गणेशासमोर माधवरावांनी प्राण सोडला. तत्पूर्वी राघोबादादांनी पेशवाईचा हिस्सा मागितला व माधवरावांनी पेशवाई हे स्वराज्य आहे, वाटणीची गोष्ट नव्हे असे सांगितले. पण हिंदवी स्वराज्यात राघोबाचा अडथळा येऊ नये म्हणून थोडी तरतूद करून दिली. तरीही नंतर राघोबादादांनी पेशवेपदावर बसलेला माधवरावांचा भाऊ नारायणाचा बळी घेतला, असे श्री. आफळे यांनी सांगितले. अन्यायासी राजा न करी जरी दंड संत तुकारामांचा अभंग, तेजोनिधी लोहगोल हे नाट्यपद सुरेख झाले.

पाने वाहण्यापेक्षा बेलाची झाडे लावा
श्री. आफळे यांनी शरण हनुमंता या अभंगाने पूर्वरंग सुरू केला. हनुमंतांची नवविधा भक्ती वर्णन केली. आपण अमराठी प्रांतात गेलो की तिथली भाषा लगेच शिकतो पण अन्य भाषिक मातृभाषेला विसरत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृत व मराठीची जोपासना केली पाहिजे. परिस्थितीनुसार पद्धती बदलायला हव्यात. पूर्वी अकरा लाख बेलपत्रे वाहत असत. आता झाडे तोडली गेली. पर्यावरणाची हानी झाली. म्हणून आता बेलाची पाने वाहण्याऐवजी अकरा बेलाची झाडे लावायला हवीत, हेच खरे पूजन होय, असा समाजोपयोगी संदेश श्री. आफळेबुवांनी दिला.
धोतर, सदरा हा हिंदूचा पारंपरिक वेष आहे. इंग्रजांनी भारतात पँट, शर्टचा प्रचार केला. आपण ते विसरलो. किमान आपल्या धार्मिक सणावेळी qकवा उत्सवामध्ये पारंपरिक वेष परिधान करा व संस्कृती जपण्यास हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतिहासाचा चुकीचा अर्थ नको, समग्र अभ्यास करावा – चारुदत्त आफळे




रत्नागिरी : पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध असलेल्या मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे भाषांतर, संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी कोट्यवधी कागदपत्रे जाळली तरी आज चार कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे हा प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे समजते. त्यातून हिंहदवी स्वराज्याचा खरा इतिहास कळणार आहे. काही वेळा एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात आणि एखाद्या व्यक्तीचे कार्य पुढे येत नाही. याकरिता शाळांमध्ये शिक्षकांनी इतिहास शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना खरा इतिहास सांगावा, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९ जानेवारी २०१६) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कीर्तनसंध्या परिवाराचे अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून ऐतिहासिक विषयांवरील कीर्तने आयोजित करून जनजागरण करणारा कीर्तनसंध्या परिवार हा महाराष्ट्रातील एकमेव गट म्हणावा लागेल. कारण उत्सवापुरती मर्यादित असलेली कीर्तने सभागृहातून यंदा क्रीडा संकुलापर्यंत आली. यावरून रत्नागिरीकरांचे कीर्तनावरील प्रेम दिसून येते. याकरिता रत्नागिरीतील सर्वच वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिल्याबद्दल श्री. आफळे यांनी विशेष आभार मानले. या बातम्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही पोहोचल्या असून तिथले श्रोते माझ्याकडे विचारणा करतात, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या दप्तरातील सव्वा कोटी कागदपत्रांचे भाषांतर झाले आहे. त्यातून खरा इतिहास उलगडतो आहे. मात्र उर्वरित पत्रांचे भाषांतर व संशोधनासाठी युवकांनी पुढे यावे. इतिहासात चांगले करिअर करता येईल. मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी किल्ले qजकल्यानंतर कोट्यवधीची कागदपत्रे जाळून टाकली होती. त्यातूनही अनेकांनी ही कागदपत्रे जपून ठेवली. आता रासायनिक प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे कळत असल्याने कागदांविषयी सत्य माहिती मिळते. शाळेमध्येही इतिहास शिबिरे घेऊन खरा इतिहास सांगण्याचे काम शिक्षकांनी करावे. एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात.
ते म्हणाले, कीर्तन म्हणजे मंदिरामध्ये जन्मोत्सव कार्यक्रमावेळी केले जाते. पण त्यावेळी जन्मोत्सवाचाच विषय असतो. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील दडलेले क्षण बाहेर काढण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. मात्र कीर्तनसंध्याने येथे जाणीवपूर्वक केलेला हा महोत्सव भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.

Saturday, 9 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव पुष्प तिसरे



पानिपतावर सतत मराठशाहीचा विजयच, पण

रत्नागिरी : पानिपतची पहिली लढाई वर्षभर चालली. प्रत्येक लढाईत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव पेशवे व सहकाऱ्यांनी अहमदशहा अब्दालीवर विजय मिळवला. मात्र दिल्लीकडे कूच करताना अंतिम अडीच तासांत सेनेला पराभव पत्करावा लागला. यात ७० हजार सेना, यात्रेकरू गेले. पण वर्षभरात अब्दालीची दीड लाखांची सेना मराठशाहीने गारद केली. एका बाजूला पराभव झाला तरी दुसरीकडे हिंदवी स्वराज्याचा विजयही झाला होता, हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्या आयोजित कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. या वेळी प्रसाद करंबेळकर (तबला), हर्षल काटदरे (ऑर्गन), राजा केळकर (पखवाज, ढोलकी) आणि महेश सरदेसाई (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.
पानिपतच्या पहिल्या लढाईचा सविस्तर रणसंग्राम बुवांनी उलगडला. ते म्हणाले, पानिपतामध्ये मराठशाहीचा पराभव झाला असला तरीही अखेरच्या दिवशी मकरसंक्रांतीला सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत मराठी सैन्याने अब्दालीवर विजयच मिळवला होता. अब्दालीने पराभव होणार या भीतीने सैन्याला पंजाबकडून इराणकडे जाण्यास सांगितले होते. इकडे सदाशिवरावभाऊंनी गारद्यांच्या सूचनेनुसार विशिष्ट व्यूहरचना करून सेनेची अंडाकृती रचना करून दक्षिणेकडे कूच केले. पण हत्तीवर बसलेल्या विश्वासराव पेशव्याला गोळी लागल्याने मराठी सैन्यात गोंधळ उडाला. शिस्त न पाळणे आणि गारद्यांनी सुचविलेल्या रणनीतीवरील अविश्वासामुळे मराठी सरदारांनी सहकार्य न केल्याने अडीच तासात सत्तर हजार सेना संपली. मात्र एक वर्षाच्या काळात अब्दालीचे दीड लाख फौज मराठी सैन्याने संपवली होती. त्यामुळे एका बाजूला पराभव झाला तरी हिंदवी स्वराज्याचा विजयही विसरून चालणार नाही.
तत्पूर्वीच्या लढाईत रघुनाथराव तथा राघोभरारी पेशव्याने पराक्रम करून अटकेपर्यंत भगवा फडकावला. अब्दालीच्या सैन्याला मागे रेटले. नजीबखान, कुतुबशहाने दत्ताजी शिंशदेला क्रूरपणे मारले. पण त्याचा वचपा मराठी फौजेने पानिपतावरील लढाईपूर्वी कुंजपुरा किल्ला घेऊन कुतुबशहाला संपवले. हा किल्ला घेतला तरी फौज दोन महिने तीर्थयात्रा करत राहिली. त्यावेळी सदाशिवराव पेशवे दिल्ली गाठू या असे सांगत होते. पण वेळेचा उपयोग केला नाही.
पूर्वरंगामध्ये देव बसे जिचे चित्ती या अभंगावर त्यांनी निरूपण केले. ते म्हणाले, अलीकडे महिलांचे संस्कारांकडे दुर्लक्ष होत असून महिला उपासनेपासून दूर गेल्या आहेत. त्यांच्या वेशाबाबतही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने सामूहिक उपासनेसह एकत्र राहणे, जेवणे आवश्यक आहे. अलीकडे समुपदेशन नसल्याने कोणताही वेश परिधान केला जातो. यामुळे मुलींवरही अन्या होतो. नको तितक्या मोकळ्या वागण्याने प्रश्न निर्माण होतात. मुलींचा वेष मनावर परिणाम करत असल्याने तो चांगलाच असावा. मुलगा व मुलीला सर्वच बाबतीत समान न्याय न देता मुलीला काचेप्रमाणे संरक्षण देण्याची गरज आहे. स्त्रिया, पुरुष व युवक, युवतींचे संघटन हवे. उपासनेची शक्ती व शक्तीची उपासना गरजेची आहे. कुटुंबामध्येही ती व्हावी.


कीर्तन महोत्सवाची रविवारी सांगता
पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची रविवारी (ता. १०) दिमाखात सांगता होणार आहे. यामध्ये श्री. आफळेबुवा ४० दिवसांच्या सवाई माधवराव पेशव्याला बारभार्इंनी वीस वर्षे कसे सांभाळले हे सांगणार आहेत. महादजी शिंशदे, रामशास्त्री प्रभुणे, सखाराम बापू बोकील आणि नाना फडणवीस आदी १२ जणांनी हिंहदवी स्वराज्य राखले. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि घरभेद्यांचा सामना करत त्यांनी पेशवाईसाठी दिलेले अमूल्य योगदान बुवा उलगडणार आहेत.

देवरूख येथे कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन



रत्नागिरी : कोकणमराठी साहित्य परिषदेतर्फे देवरूख येथे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंसधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार युवकांचे युवा साहित्य संमेलन येत्या २४ जानेवारीला होणार आहे. कोमसापच्या देवरुख शाखेतर्फे या संमेलनाचे संयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये नमन, वगनाट्य, जाखडी, टिपरी नृत्य आदीकरिता लेखन, काव्य करणाèया कलाकारांना ग्रा मीण साहित्यिकांचा दर्जा वर्षभरात  मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात  माहिती देण्यात आली.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोहन बने, संमेलन प्रमुख युयुत्सु आर्ते, कोमसाप शाखाध्यक्ष दीपक लिंगायत, कार्यवाह प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मूळची देवरूखची आणि सध्या पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात शिकणारी अक्षता लिंलगायत हिची निवड केंद्रीय कार्यकारिणीने केली आहे. दहा जणांमधून तिची निवड झाली आहे. तिला यापूर्वी जिजाऊ पुरस्कार, कोमसापचा देवरूखभूषण पुरस्कार मिळाला आहे. संमेलनातील प्रत्येक कार्यक्रम वेळेत सुरू करण्याकडे कटाक्ष ठेवला जाणार आहे.
श्री. लिंगायत म्हणाले, कोमसापमध्ये युवकांसाठी कोकण युवा शक्ती विभाग सुरू करण्यात आला. त्याद्वारे दापोलीमध्ये पहिले युवा संमेलन झाले. आता कोकण विभागाचे संमेलन देवरुखात भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या आदल्या दिवशी २३ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल. त्यामध्ये नामवंत कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येईल. २४ ला संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. देवरूखमधील नवोदित ९ लेखक, कवींची पुस्तके यावेळी प्रकाशित केली जातील. ११ वाजता मुक्त काव्यकट्टा सुरू होईल. तो दिवसभर चालणार आहे. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र दिले जाईल. ११ वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अपंग मनाली जोशी हिची मुलाखत होईल. ११.३० वाजता आजची युवा पिढी संस्कारहीनतेच्या उंबरठ्यावर उभी आहे का? या विषयावर परिसंवाद होईल. १२.३० वाजता आजच्या शिक्षणाची जीवनाशी सांगड घालता येते का? ही महाचर्चा होईल.
दुपारी २.३० वाजता कथाकथन, ३ वाजता काव्यतुषारमध्ये तिन्ही जिल्ह्यांतील विजेत्यांच्या कवितांचे सादरीकरण व बक्षीसवितरण होईल. ३.३० वाजता काव्यतरंगमध्ये ज्येष्ठ कवी नायगावकर व बागवे कविता ऐकवतील. ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.
रोहन बने यांनी सांगितले की, देवरूख शहराने साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. कोमसापतर्फे युवकांना लिहिते करण्यासाठी हे संमेलन घेतले जात आहे. देवरूखमध्ये तब्बल १९ वर्षानंतर असे  मोठे सं मेलन होत आहे.
टिपरीनृत्य, नमन, जाखडीकरिता ग्रामीण भागातील कवी, लेखक लेखन करून लोककलेच्या रूपात सादरीकरण करत असतो. या कलाकारांना ग्रामीण साहित्यिकांचा दर्जा  मिळावा, याकरिता कोमसाप प्रयत्नशील आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक वाडी कोमसापला जोडली जाईल. केंद्रीय समितीशी चर्चा झाली असून वर्षभरात सर्वेक्षण करून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. सन २०१७ मध्ये या सर्व कलाकारांचे संमेलनही घेण्याचा विचार आहे, असे युयुत्सु आर्ते यांनी सांगितले.