Tuesday, 7 June 2016

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चाकरमान्याने मुंबईतून फोन करून सोडविली समस्या

सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीला आता खरोखरीच तडा जाणार काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपला एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर कागदपत्रे आणि अर्जविनंत्या करून करून सामान्य माणूस थकून जातो. पण आता यापुढे हे कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत. समस्या तितकीच महत्त्वाची असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांना एक फोन करून ही समस्या सोडविता येऊ शकेल. सेवानिवृत्तीनंतर मुंबईत राहायला गेलेल्या प्रभाकर महाजन या रत्नागिरीच्या चाकरमान्याने ६ जून २०१६ रोजी हा अनुभव घेतला. राज्य शासनाच्या फोन इन लोकशाही दिनाच्या नव्या उपक्रमामुळे हे शक्य झाले.
शासनाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांबरोबरच ज्या नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क साधून निवेदन स्वीकारण्याचा आणि शक्य असेल, तर त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ जून दुपारी १ ते ३ या वेळेत झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात फोनद्वारे निवेदने स्वीकारण्यात आली. या फोन इन लोकशाही दिनाची माहिती मिळताच सर्वप्रथम मुंबईतून प्रभाकर महाजन यांनी १०७७ या टोलफ्री क्रमांकावर फोन केला. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हा फोन स्वीकारला आणि श्री. महाजन यांची कैफियत ऐकून घेतली. श्री. महाजन भूविकास बँकेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांना अद्याप सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचा प्रश्न सोडविला गेला नाही. त्यामुळे त्यांनी फोन इन लोकशाही दिनाचा आधार घेतला. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीशी संबंधित असणाऱ्या सहकारी संस्था उपनिबंधक श्रीमती बी. एस. माळी यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर श्री. महाजन यांचे प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती माळी यांना दिल्या.
फोन इन लोकशाही दिनातील दुसरा फोन पुर्ये तर्फ देवळे (ता. संगमेश्वर) येथील दत्ताराम ठाकर यांनी केला होता. ग्रामपंचायतीने नियमबाह्य घरपट्टी आकारल्याचे त्यांचे म्हणणे होते. श्री. ठाकर यांनी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती ऐकून घेतली आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अखत्यारीतील ही तक्रार असल्याने त्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांना त्याची माहिती दिली आणि या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.
        रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशावेळी फोन इन लोकशाही दिनाचा पर्याय उपलब्ध झाल्याने लोकशाही दिनाला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकानी समाधान व्यक्त केले. यापुढेही फोन इन लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
       अन्य शासकीय योजनेप्रमाणेच फोन इन लोकशाही दिनाची तक्रार चांगली आहे. मात्र नेहमीच्या लोकशाही दिनात तक्रार एका महिन्यात निकाली काढण्याचे बंधन आहे. तसे फोन इन लोकशाही दिनाच्या तक्रारीला बंधन आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. फोन इन लोकशाही दिनही महिन्यातून एकदाच होणार आहे. त्याच दिवशी ठरलेल्या वेळेत फोन स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे फोनवरून तक्रार करूनही त्याचे निवारण झाले नाही, तर कोणाकडे आणि केव्हा संपर्क साधायचा, याबाबत स्पष्टीकरण नाही. ते झाले, तरच योजना यशस्वी होऊ शकेल.
      
-    प्रमोद कोनकर

pramodkonkar@yahoo.com

No comments:

Post a Comment