Friday 10 January 2020

कीर्तनसंध्या २०२० दिवस तिसरा – राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम म्हणजे लालबहादूर शास्त्री - हभप आफळे बुवा

कीर्तनसंध्या २०२० दिवस तिसरा –

राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम म्हणजे लालबहादूर शास्त्री
हभप आफळे बुवा यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम होते. शेती आणि संरक्षण या देशाच्या अत्यावश्यक बाबींकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिल्यामुळे या दोन्ही बाबतीत देश नेहमीच आघाडीवर राहिला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी येथे केले.
कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात `योद्धा भारत` या आख्यान विषयावर तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनात त्यांनी लालबहादूर शास्त्री यांची कारकीर्द आणि १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या पहिल्या युद्धाचा इतिहास कथन केला.
पूर्वरंगात बुवांनी राम का गुनगान करिये हे हिंदी भजन निरूपणासाठी घेतले. राज्याभिषेक होण्याच्या पूर्वसंध्येला दशरथ राजाकडे भरताला राज्याभिषेक करण्याची आणि रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवण्याची मागणी ऐकल्यानंतरचा प्रसंग बुवांनी ऐकविला. रामाने त्या प्रसंगात आईची आणि वडिलांची दोघांचीही समजूत काढली. भद्रता आणि सभ्यतेचे दर्शन रामाच्या वर्तणुकीतून दिसून येते. दशरथाची तेव्हाची मानसिकता स्पष्ट करण्यासाठी बुवांनी किर्लोस्करांच्या `रामराज्य वियोग` या नाटकातील `सोडूनी मज राम राय जाय जरी वनी` हे नाट्यगीत गायले.
एकवचनी आणि निःस्वार्थी रामाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले जाते. तेच गुण लालबहादूर शास्त्री यांच्यामध्ये होते हे पटवून देणारी लहानपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतची विविध उदाहरणे बुवांनी सांगितली. वडिलांचे निधन झाल्यानंतर लालबहाद्दूरना मुलांच्या शिकवण्या घेऊन शिक्षण घ्यावे लागले. या काळात घरभाडे भरण्याएवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी एक धनवान व्यक्ती महिना ५० पैसे द्यायला तयार होती. पण त्यांनी घरभाड्याएवढे केवळ पंचवीस पैसे त्यांच्याकडून घेतले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे वेतन साठ रुपये होते. काही गरजेसाठी त्यांना पैशांची गरज लागली, तेव्हा त्यांनी पत्नी सौ. ललिता यांच्याकडे पैसे मागितले. पत्नीने घरखर्चातून वाचवलेले पैसे लालबहादूर यांना दिले. एवढे पैसे घरातून बाजूला काढून ठेवता येतात, याचा अर्थ आपला पगार पाच रुपये जास्त आहे, असे समजून त्यांनी सरकारला आपला पगार रुपयांवरून ५५ रुपये कमी करायला लावला निःस्वार्थी आणि साधेपणा हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. लग्नाच्यावेळी त्याकाळी हुंड्याची प्रथा पाळावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी तेव्हा हुंड्यात चरखा आणि कापूस मागितला. पुढच्या आयुष्यातही आपले कुटुंब पूर्णपणे साधेपणाने कसे राहील, याकडे त्यांचा कटाक्ष होता. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांची मुले शहरी बससेवेच्या बसमधून प्रवास करत असत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ओढले गेले. त्यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक निष्कामेश्वर मिश्रा यांची मोठी मदत झाली. देशप्रेमाचे धडे गुरुजींनी लालबहादूर शास्त्रींना दिले. पुढच्या काळात ते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विश्वासू सहकारी बनले. जमीन सुधारणेसारखा महत्त्वाचा कायदा आणण्यापूर्वी देशभरातील शेतकरी कुळांना न्याय देणारा पूर्णपणे निष्पक्ष अहवाल शास्त्रीजींनी दिला. पुढच्या काळात त्यांनी दिलेली जय किसान हा नारा त्यांनी आधीच अमलात आणला होता ‌
देशावर १९६२ साली झालेल्या चीनच्या आक्रमणानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण देशाचे जनजीवन ढवळून निघेल अशी भीती वाटण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. हजरत बाल हे इस्लाम धर्मीयांचे श्रद्धास्थान श्रीनगरमध्ये आहे. महंमद पैगबंर यांचा पवित्र केस कडेकोट बंदोबस्तातही चोरीला गेल्याची बातमी २६ डिसेंबर १९६३ रोजी चोरीला गेल्यी बातमी आली‌. त्यानंतर आठच दिवसात ४ जानेवारी १९६४ रोजी तो केस पुन्हा मिळाल्याची बातमीही आली. तो त्याच ठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र अनेक मुस्लिम संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. तेथे कोणता तरी गोंधळ निर्माण झालेला असू शकतो, अशी शंका त्या संघटनांनी घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले. शास्त्रीजींनी ती परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. मुस्लिम मौलवींच्या पथकासह शास्त्रीजींनी हजरत बाल दर्ग्याला भेट दिली. मौलवींच्या साक्षीनंतर संपूर्ण देशातील अशांत प्रकरण निवळले. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना नेहरूंचा उत्तराधिकारी असे म्हटले जाऊ लागले.
पंडित नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी निधन झाल्यानंतर शास्त्रीजींची २ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदी निवड झाली. त्यादरम्याने देशात अभूतपूर्व अन्नधान्य टंचाई निर्माण झाली. तेव्हा परदेशातून धान्य मागवायच्याऐवजी देशातच धान्याची व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार करून शास्त्रीजींनी दर सोमवारी उपास करून राहिलेले धान्य वाचविण्याचे आवाहन देशवासीयांना केले. शास्त्रीजींच्या शब्दाला तेव्हा एवढे महत्त्व होते की नागरिकांनी दर सोमवारी काहीही न खाता उपास केला आणि त्यातून संकलित झालेले धान्य पुढे तीन वर्षांच्या टंचाईच्या काळात देशाला उपयोगी ठरले. या काळात एकदाही भारताला अन्नधान्य आयात करावे लागले नाही. शेतीबरोबरच शास्त्रीजींनी देशाच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. . संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली. पाकिस्तानने अमेरिकेकडून तेव्हाचा प्रगत असा पॅटन रणगाडा खरेदी केला होता. मात्र शास्त्रीजींनी असे रणगाडे घेण्याऐवजी शस्त्रास्त्रे तयार करण्याचे तंत्रज्ञान, प्रगत यंत्रे देशात तयार व्हावीत, या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांना अमेरिका, रशियात पाठविले होते. सैन्याला अधिक अधिकार दिले. देशाची आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका स्वातंत्र्यानंतर भारतात प्रथमच अमलात आली होती. आवश्यक तेथे रस्ते, वैमानिकांची प्रशिक्षण, हॅण्डग्रेनेड तयार करणे, लष्कराच्या रेल्वेलाइन तयार करणे, आगीतून धावण्याचा आणि काम करण्याचा सैनिकांना सराव करून देणे अशा कामावर संरक्षणाच्या बाबतीत भारताने भर दिला. भारतीय सैन्यदल प्रगत होत असताना जानेवारी १९६५ मध्ये पाकिस्तानने कच्छचे रण भागात भारतावर पहिले आक्रमण केले. भारताकडे तेव्हा असलेल्या तुलनेने कमी क्षमतेच्या शस्त्रास्त्रांच्या आधारे ते आक्रमण परतवून लावले. भारताचे ९३, तर पाकिस्तानचे १५० अधिकारी त्या युद्धात मारले गेले.
अन्नधान्याच्या दृष्टीने भारत स्वयंपूर्ण व्हावा आणि संरक्षणाच्या बाबतीतही देशाची ताकद वाढावी यासाठी शास्त्रीय केलेले प्रयत्न हेच त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या फलित म्हणता येईल, असे आपले आफळेबुवांनी सांगितले.
कीर्तनाच्या मध्यंतरात आर्या संदीप मुळ्ये, हर्षवर्धन विद्याधर ताम्हनकर आणि शुभानन उमेश आंबर्डेकर या तीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल गौरविण्यात आले.
..........

 रत्नागिरी – हिंदू राष्ट्र सेनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे
हभप चारुदत्तबुवा आफळे यांचा त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल
 शुभानन उमेश आंबर्डेकर याला गौरविण्यात आले.

......................

कीर्तनसंध्या उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी (१० जानेवारी २०२०) राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी सादर केलेले अभंग/श्लोक/पोवाडे/गाणी, इत्यादींचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर


https://youtu.be/j8PWoRjYOBI

कीर्तनसंध्या २०२० दिवस दुसरा – राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्राध्यापकांचा पुढाकार नाही - चारुदत्त बुवा आफळे

कीर्तनसंध्या २०२० दिवस दुसरा –


राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्राध्यापकांचा पुढाकार नाही
हभप चारुदत्त बुवा आफळे यांची खंत
रत्नागिरी : देशद्रोहाची भावना शिकवणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये प्राध्यापकांचा कोणताही पुढाकार नसतो. कोणतेही प्रयत्न नसतात, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.
येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कीर्तनात आफळे बुवांनी निरूपणासाठी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील दीनानाथ हा राम कोदंडधारी हा श्लोक घेतला होता. त्याचे निरूपण करताना रामायण काळात राक्षसांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींनी राज्याच्या रक्षणासाठी राज्यकर्त्यांचे कसे प्रबोधन केले होते, याचा आढावा बुवांनी घेतला. ते म्हणाले की त्याकाळी गुरुस्थानी असलेल्या हट्टाग्रही ऋषीमुनींनी कडक आणि कर्मठ निर्बंध सांभाळून उपासना करत असतानाच रामासारख्या त्याकाळच्या नव्या नेतृत्वाला सबळ करणे, रणांगणावर उभे करणे यासारखे कार्य केले. त्यामुळे ऋषींची आध्यात्मिक सिद्धता कोठेही कमी झाली नाही. सध्याच्या विद्यापीठांमध्ये देशद्रोहाची भावना शिकविण्याचे प्रयत्न दहा-दहा वर्षे सुरू आहेत. त्याचे समर्थन करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचे काम वक्ते करत आहेत. पण या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांकडे वक्ते भरपूर आहेत. पण चांगला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी तसे प्रवक्तेच नाहीत. याचा परिणाम देशाला भोगावे लागत आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तिकेच्या विरोधात रत्नागिरीत गुरुवारी (दि. ९ जानेवारी) रत्नागिरीत स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी कोणतीही भक्तमंडळे किंवा उपासना मंडळे सावरकरांचा अपमान करणार्यां्च्या विरोधात निषेध करण्यासाठी फलक घेऊन आली नाहीत. अशाच भक्त मंडळांच्या सद्गुरूचा वाढदिवस असेल तर ८० हजार लोक जमतील, पण राष्ट्रीय अवमानाचा विरोध करण्यासाठी आठशेसुद्धा लोक जमत नाहीत. देशाबद्दल आस्था नसल्याचेच हे लक्षण आहे. त्यामुळेच भारताचा अवमान होत आहे, असेही आफळे बुवा म्हणाले.
`कीर्तनसंध्या` महोत्सवात दुसऱ्या दिवशी योद्धा भारत या आख्यानविषयाच्या अनुषंगाने बुवांनी कीर्तनाच्या उत्तररंगात १९६२ साली चीनविरुद्धच्या लढाईत भारताला पत्कराव्या नामुष्कीजनक पराभवाचे विश्लेषण केले. लेफ्टनंट जनरल कौल यांनी लिहिलेले `अनटोल्ड स्टोरी`, श्याम चव्हाण यांचे `वॉलोंग` अशा पुस्तकांचा आधार घेऊन आफळेबुवांनी १९६२ सालचे युद्ध श्रोत्यांसमोर उभे केले. भारतीय बुद्धधर्माचा चीनमध्ये झालेला प्रसार हे कारण पुढे करून चीनने भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. `हिंदी-चिनी भाई भाई` म्हणून या संबंधांचा उल्लेख तेव्हा करण्यात आला. शांततेचा पुरस्कार करणारे चीन आणि जपानसारखे देश स्वतः मात्र नवनव्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होत होते. भारत त्याबाबतीत मागे होता. अशा स्थितीत शांततेचा अग्रदूत होण्याच्या स्वप्नरंजनात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रमून गेले होते. त्यामुळे चीनकडून होणाऱ्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सेन, थापर इत्यादी तेव्हाचे लष्करप्रमुख नेहरूंना या कारवायांची माहिती देत. मात्र भारतीय सैन्याची धास्ती जगाला वाटू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला नेहरूंकडून सैन्याला दिला जात होता. याच स्थितीची गैरफायदा घेऊन चीनने भारताचा तिबेट हा प्रांत जिंकून घेतला. मात्र मैत्री आणि बंधुभावाच्या नात्याचा उल्लेख करत भारताने साधा निषेधही तेव्हा व्यक्त केला नाही. तिबेटला जोडणारा रस्ता बांधायला चीनने १९५५ साली सुरुवात केली, १९५७ साली त्याचे उद्घाटन झाले. त्याद्वारे आणि तोफा दारूगोळा भारताच्या सीमेपर्यंत आणणे शक्य व्हावे, यासाठी हा रस्ता बांधला गेला होता, हे स्पष्ट होते. ज्या भागात गवतही उगवत नाही त्या तिबेटचा आग्रह का धरावा, असे निवेदन तेव्हा नेहरूंनी संसदेत केले होते. चीनने रस्ता बांधल्याने अतिक्रमण झाले, मात्र चीनकडून आक्रमण होईल असे वाटत नाही, असेही नेहरूंचे म्हणणे होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुढच्या पाच वर्षांनी २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सैन्याने सर्व सामर्थ्यानिशी भारतावर जबरदस्त आक्रमण केले. भारताची १२ ठाणी अवघ्या चार दिवसात जिंकून घेतली. नेफा प्रांत चीनने गिळंकृत केला. अपुरा आणि जुना शस्त्रसाठा तसेच अपुऱ्या साधनसामग्रीमुळे भारतीय सैन्याला चीनच्या सैन्याशी लढता आले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेऊन चीनने ‌दोन महिन्यांच्या युद्धानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. मात्र तरीही लडाखचा बारा हजार चौरस मैलांचा प्रदेश चीनला द्यावा लागला, असे प्रतिपादन आपले बुवांनी केले.
चीनविरुद्ध १९६२ साली झालेल्या युद्धाच्या काळात सेनाधिकारी होशियार सिंग, सुभेदार जोगिंदर सिंग, शैतान सिंग, गुरखा पलटणीचे मेजर धन सिंग थापा, श्याम चव्हाण, विमान चालवत असताना शत्रुपक्षाची गोळी मांडीत लागल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही चीनचा ६०० बॉम्बगोळ्यांचा बॉम्बचा साठा नष्ट करणारे वैमानिक टकले, मेल्यानंतर आपल्या शरीराचा भार मशीनगनवर नेमका कसा राहील, याची काळजी घेऊन मरताना चीनचे एक हजार सैनिक मारणारे गोविंद कांबळे अशा सैनिकांच्या पराक्रमाची कहाणी आफळेबुवांनी ओघवत्या शैलीत, सुमधुर आणि शौर्यप्रधान गीतांच्या साथीने विशद केली.
कीर्तनाच्या पहिल्या दिवशीच्या निरूपणावर इतिहासावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या आदित्य महेश दामले, वेदांग महेंद्र पाटणकर आणि प्रथमेश उत्तम घाटे या विद्यार्थ्यांना आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन समारंभात गौरविण्यात आले.

..........

कीर्तनसंध्या महोत्सवात प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल
आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट स्वीकारणारे विद्यार्थी. 
......


दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाचा काही अंश ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/te8Z6g_f20k
.......

https://youtu.be/m544QQIrlDo
.......
https://youtu.be/07cMa1SCF28


Thursday 9 January 2020

कीर्तनसंध्या २०२० दिवस पहिला - ... तर पाकव्याप्त काश्मीर निर्माणच झाला नसता : चारुदत्तबुवा आफळे




रत्नागिरी :
‘तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे,’ असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी मांडले.

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. आठ जानेवारी २०२० रोजी या महोत्सवाचा प्रारंभ झाला. ‘योद्धा भारत’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर कारगिल युद्धापर्यंतच्या काळातील योद्ध्यांचा पराक्रम आफळेबुवा या कीर्तनातून उलगडणार आहेत. पहिल्या दिवशी चारुदत्तबुवांनी स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्मीरमधील युद्धाची गाथा उलगडली.


‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ हा अभंग त्यांनी पूर्वरंगासाठी घेतला होता. त्याचे निरूपण करताना ते म्हणाले, ‘देशभरातील राजे श्रीरामाच्या राज्याभिषेकाला आले होते. त्यामुळे इतर कोणत्याही भारतीय राजापेक्षा रामाचा राज्याभिषेक सोहळा वेगळा होता. म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. नंतरच्या काळात सज्जनांनी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही. अल्लाउद्दीन खिलजी भारताच्या दिशेने निघाला होता. एक लाखाहून अधिक फौज आपल्या पाठोपाठ येणार असल्याची अफवा त्याने पसरवली होती. वस्तुस्थिती तशी नव्हती. खिलजीने उठवलेल्या अफवेच्या विरुद्धचा प्रचार तेव्हाच्या आध्यात्मिक योग्यतेच्या व्यक्तींनी केला असता, तर मुघल साम्राज्य भारतात निर्माण झालेच नसते. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर केलेल्या पहिल्या आक्रमणापासून शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंतच्या काळात तत्कालीन ऋषिमुनींनी समाजाला सावध केले असते, तर हे आक्रमण झाले नसते. सुमारे चारशे वर्षे भारताला पारतंत्र्यात घालवावी लागली नसती.’

‘आजही भारताच्या सुरक्षिततेकडेही लक्ष दिले पाहिजे,’ असे सांगून ते म्हणाले, ‘क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर विमानतळापासून क्रिकेटपटूंची शोभायात्रा निघते; पण १९९९ साली कारगिल युद्ध जिंकल्यानंतर ते जिंकणाऱ्या जवानांची शोभायात्रा काढायचे कोणालाही सुचले नाही. देशाच्या सुरक्षेपेक्षा खेळाची करमणूक आपल्याला जास्त महत्त्वाची वाटते.’

उत्तररंगात बुवांनी काश्मीर प्रश्न कसा निर्माण झाला याविषयी निरूपण केले. ते म्हणाले, ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी देशातील ५६० संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार नव्हती. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे प्रयत्न करून संस्थानांना भारतात विलीन व्हायला भाग पाडले; मात्र जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार झाली नाहीत. काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी तर स्वातंत्र्यापाठोपाठ आलेला २२ ऑक्टोबर १९४७चा दसरा स्वतंत्र राज्याचा पहिला शाही दसरा म्हणून साजरा करायचे ठरवले. त्याच दिवशी अफगाणी टोळ्यांनी श्रीनगरकडे कूच केल्याची माहिती त्यांना मिळाली. अफगाणी टोळ्यांनी मुजफ्फराबाद, बारामुल्ला भाग काबीज करून तेथील स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले, खून पाडले. अशा स्थितीत काश्मीरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर काश्मीरच्या राजांनी भारताकडे मदतीची याचना केली. त्यानुसार काही अटींवर काश्मीरला लष्करी मदत करायला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राजी झाले. त्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला आणि अवघ्या ४८ तासांत तुटपुंज्या सामग्रीसह भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दाखल झाले.’

‘देश नुकताच स्वतंत्र झाला असल्याने अनेक ब्रिटिश अधिकारीही भारतीय सैन्यात होते; मात्र त्यांचे धोरण पाकधार्जिणे असल्याने त्यांनी काश्मीरला मदत करण्याच्या पथकामध्ये ब्रिटिश सैन्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. अत्यंत भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये राजेंद्रसिंह, सोमनाथ शर्मा, दिवाणसिंग असे भारतीय लष्कराचे अनेक मोहरे कामी आले. त्यांच्या अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र, महावीर चक्र आणि शौर्यपदक देण्यात आले. महाराष्ट्रातील रामा राघोबा राणे यांनी जीव रणगाड्याखाली स्वतःला बांधून घेऊन शत्रूने पेरलेले तब्बल ६०हून अधिक भूसुरुंग निकामी केले. तेव्हा केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. हा गौरव हयात असताना मिळण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतीय सैन्याकडे मोजकीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा होता, तसेच सैनिकांची संख्याही अपुरी होती. तरीही, मोठ्या संख्येने आलेल्या अफगाण टोळीवाल्यांनी पादाक्रांत केलेला काश्मीरचा दोन-तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्यक असलेले पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्मीरच्या ताब्यात आला असता,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.

‘युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन काश्मीरने भारतात विलीन व्हायला संमती दिली होती. ती लक्षात घेता आता जो भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तोच तेव्हाचा एक-तृतीयांश भाग तेव्हाच भारतातच विलीन झाला असता. तो पाकिस्तानला मिळू शकला नसता. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेव्हाच्या लष्कराने केलेली कामगिरी अप्रतिम होती; मात्र त्याच वेळी पंडित नेहरूंनी भारत-पाक प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषदेत नेला. त्यानंतर जानेवारी एकूण १९४८च्या जानेवारीत युद्धबंदी झाली आणि ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर ७०वर्षांहून अधिक काळ भारताला भेडसावत आहे,’ असे आफळेबुवा म्हणाले.

भारतीय सैन्याने काश्मीरमधील उरी, स्कार्डू, जोझिला खिंड, नौशेरा, राजौरी, लेह, लडाख, शाल टँक, हाजीपीर खिंड इत्यादी भागात गाजविलेल्या शौर्याची गाथा आफळेबुवांनी ओघवत्या शैलीने विविध गीते सादर करून सांगितली. त्या वीरांच्या गाथेच्या बुवांनी केलेल्या वीररसपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित समुदायाच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.

आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
 
रत्नागिरीत नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे उद्घाटन करताना हभप चारुदत्तबुवा आफळे आणि अन्य मान्यवर
पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, देसाई उद्योग समूहाचे विजय देसाई, माधव कुलकर्णी, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रकाश जोशी आणि ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कीर्तनसंध्या परिवाराचे प्रमुख अवधूत जोशी यांनी हभप आफळे बुवा यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा
विद्यार्थ्यांना दररोजच्या आख्यानातील इतिहास विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(पहिल्या दिवशीचे काही व्हिडिओ सोबत देत आहोत...)














(या व्यतिरिक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ कोकण मीडियाच्या फेसबुक पेजवर ऐकायला/पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.)

Wednesday 8 January 2020

नवव्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला आज रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात प्रारंभ झाला.
 
  स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी यावर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. `योद्धा भारत` हा यावेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा यांच्या कीर्तनांनी आजपासून येत्या १२ जानेवारीपर्यंत हा महोत्सव रत्नागिरीत पार पडणार आहे.
   
रत्नागिरीत नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे उद्घाटन करताना हभप चारुदत्त बुवा आफळे आणि अन्य मान्यवर
पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, देसाई उद्योग समूहाचे विजय देसाई, माधव कुलकर्णी, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रकाश जोशी आणि हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कीर्तनसंध्या परिवाराचे प्रमुख अवधूत जोशी यांनी हभप आफळे बुवा यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

     महोत्सवात आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), परेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.

     कीर्तनसंध्या महोत्सवात इतिहास जागवला जाणार असून विद्यार्थ्यांकरिता आख्यानातील इतिहास विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.







(या व्यतिरिक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ कोकण मीडियाच्या फेसबुक पेजवर ऐकायला/पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.)



लांजा नगर पंचायतीतील सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे

साप्ताहिक `कोकण मीडिया`च्या 3 जानेवारी 2020 च्या अंकात ९ जानेवारी २०२० रोजी होणार असलेल्या लांजा नगर पंचायत निवडणुकीतील  प्रभागनिहाय उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ती यादी प्रसिद्ध करताना अनवधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढविणारे सहा उमेदवार अपक्ष असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उमेदवार असे आहेत -
प्रभाग 3 - मानसी मनोज कोपरे
पान 6 - अनिल सीताराम शिंदे
प्रभाग 10 - दाजी पितांबर गडहिरे
प्रभाग 12 - शमा यासिन थोडगे
प्रभाग 14 - रूपाली मुरलीधर निवळे
प्रभाग 15 - मारुती गोपाळ गुरव
या उमेदवारांच्या नावापुढे कंसात ते अपक्ष असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. वास्तविक ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याबद्दल दिलगीर आहोत. कृपया संबंधित उमेदवार आणि मतदारांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
लांजा नगर पंचायत निवडणूक सुधारित यादी



Saturday 7 December 2019

तुरळ येथे १५ डिसेंबरला केबीबीएफची डिस्कनेक्ट टू कनेक्ट ग्लोबल मीट

रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांचा मेळावा येत्या १५ डिसेंबर रोजी तुरळ (ता. संगमेश्वर) येथील मामाचे गाव पर्यटक निवासस्थानी होणार आहे. डिस्कनेक्ट टू कनेक्ट अशी या मेळाव्याची संकल्पना आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक तसेच व्यावसायिक देवाणघेवाण करणे आणि त्यातून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही संस्था काम करते. रत्नागिरीत या संस्थेचे कार्य गेली तीन वर्षे सुरू असून जिल्ह्यातील व्यावसायिक ज्ञातिबांधवांच्या व्यवसाय-उद्योगाला चालना मिळावी, यासाठी व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधील कऱ्हाडे व्यवसायिक ज्ञातिबांधव मेळाव्यासाठी एकत्र येणार असून सर्वांना आपल्या व्यवसायाची माहिती सादर करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेचे विविध उपक्रम, त्यातून होणारे व्यावसायिक लाभ याची माहितीही यावेळी मिळेल.
नेहमीच्या व्यवसायापेक्षा व्यावसायिकांनी इतर व्यवसायांकडेही वळावे, या दृष्टिकोनातून डिस्कनेक्ट टू कनेक्ट या संकल्पनेवर यावर्षीचा मेळावा आधारलेला आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा रस्टिक हॉलिडे (मामाचा गाव, मु. पो. तुरळ, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. मेळाव्याचे मुख्य प्रायोजकत्व ठाण्यातील जोशी एन्टरप्रायझेस यांनी स्वीकारले असून पितांबरी प्रॉडक्टस सहप्रायोजक आहेत. पौरोहित्य ते आयटी क्षेत्रापर्यंत आणि घरगुती उद्योगांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत कोणताही व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ज्ञातिबांधवांना या ग्लोबल मीटमध्ये सहभागी होता येईल.
मीटसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या १० डिसेंबरपूर्वी सुहास ठाकूरदेसाई (९८२२२९८०८५९) किंवा प्रशांत पाध्ये (९४२२६३५०८४) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Saturday 30 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी
दिवस दहावा (नाटक अकरावे आणि अंतिम) (२९ नोव्हेंबर २०१९)

............

५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी समारोप झाला. त्या दिवशी सादर झालेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचा हा परिचय...
...........

पूर्वायुष्यातील आठवणींनी व्याकुळ झालेला संध्यासमय

दिवेलागणीची वेळ, मेघा वेदपाठक - प्रसिद्ध समाजसेविका - हॉलमधल्या आरामखुर्चीत बसली आहे. ‘संसार है इक नदिया’ या गीताचे बोल ऐकू येत आहेत. त्या बोलांबरोबर मेघाचं मन मागे जातं - खूप खूप मागे. विचारात हरवलेल्या स्थितीत ती खिडकीपाशी जाऊन उभी राहते आणि अभावितपणे हाक मारते - श्रीऽऽ!
श्री!.... श्रीकांत गडकरी....! मेघा वेदपाठकचा पहिला जीवनसाथी. अवघ्या सहा महिन्यांचा संसार, नंतर घटस्फोट! दोघांचे रस्ते वेगवेगळे. मेघा समाजकार्यात रमली, श्री कविता आणि साहित्यात. मेघाचं समाजकार्य ‘एनजीओ’च्या माणसांबरोबर, श्रीची कविता साहित्यरसिकांबरोबर. मेघा काम करत असलेल्या संघटनेशी खूप माणसांचा संबंध. त्यातल्याच वेदपाठक नावाच्या कार्यकर्त्यासोबत तिचं लग्नही होतं. एक मुलगी होते त्यांना - श्वेता तिचं नाव.
वेदपाठकचा एका अपघातात मृत्यू होतो. मग मायलेकी दोघींचंच कुटुंब. तिकडे श्रीकांतचंही एकट्याचं आयुष्य सुरू आहे. मेघाला खूप उशिरा कळलं - श्रीबरोबर राहणारा त्याचा मुलगा शेखर हा दत्तकपुत्र असल्याचं. मधल्या काळात बरीच वर्षं संपर्कच नाही ना! कसा होणार? एकमेकांचा सहवासच नको झालेला!
मेघा आणि श्री.....! श्रीच्या कवितेनं त्यांना एकत्र आणलं. मग भेटीगाठी. प्रेमाचे धागे जुळतात. रोज सायंकाळी भेटण्याचं संकेतस्थळ पक्कं होतं. तिच्या भेटीसाठी आतुरलेला श्री संकेतस्थळी जाऊन बसतो. तिची वाट पाहत. तिचं उशिरानं येणं. संघटनेचं काम आटोपून येतं असते ती; पण त्या प्रतीक्षेतही श्रीला एक अनामिक आनंद मिळत असतो. अधूनमधून फिरायलाही जातात ती. पाण्यात पाय सोडून श्री बसलाय, ती मोकळ्या हवेत, गिरक्या घेत निसर्गाचा सहवास अनुभवतेय.....! छान चाललेलं असतं सगळं.
पण तिला होणारा उशीर ठरलेलाच. रोजचाच. इतका की ‘वाट बघून भेटण्याची हुरहुर संपली की ती येणार’ असं श्रीला वाटू लागतं. लग्नाआधीचेच हे दिवस. त्याला असं वाटतं, ही भविष्यातल्या घटनांची चाहूल तर नव्हे? एकदा तर ती बोलून जाते - आपले रस्ते वेगळे, आपण लग्नाच्या बंधनात न अडकणं बरं!
तरीही होतं. अगदी थोड्या दिवसांतच मागचा अंक नव्याने सुरू होतो. त्यानं सायंकाळी फिरायला जाण्याचं ठरवावं, तिनं उशिरा यावं. त्यानं मित्रमंडळींसोबत पिकनिकला जायचं नक्की करावं, तिनं संघटनेच्या सभेचं कारण पुढे करत नकार द्यावा. रोज रोज संध्याकाळी फिरण्यात, आइस्क्रीम खाण्यात तिला रस नाही. अन् इतरांची घरं सावरताना आपला संसार मोडतोय याची श्रीला चिंता वाटतेय. त्याची कविता निखळ आनंद देणारी, तिची समाजसेवा मनाला समाधान देणारी, निःस्वार्थ; पण समाधान देणाऱ्या निःस्वार्थ समाजसेवेचाही एक कैफ असतो, एक धुंदी असते. त्यात मेघा हरवलीय. त्यातच संघटनेच्या कामानिमित्त वरचेवर घरी येणारा वेदपाठक.... त्याचं तर नाव नको श्रीला. शेवटी व्हायचं तेच...... घटस्फोट!
पंचवीस वर्षांपूर्वीचा तो पट मेघा आणि श्री या दोघांच्याही डोळ्यांपुढून वरचेवर सरकत असतो. अनेकवार येणाऱ्या ‘फ्लॅशबॅक’मधून. श्रीचा मुलगा शेखर नि मेघाची मुलगी श्वेता एकाच बँकेत नोकरीला. त्यांचे प्रेमसंबंध जुळतात. त्यांना एकमेकाच्या घरची परिस्थिती - म्हणजे त्या दोघांच्या अलग होण्यापुरतीच - ठाऊक होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मेघा नि श्रीला होत जाते. त्यांची संमतीही असते; पण मेघा नि श्री इतक्या वर्षांनी पुन्हा जवळ येत आहेत हेदेखील त्या मुलांना जाणवतं. आपलं नातं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा राहतो. इतकी वर्षं परस्परांमधून दूर राहिलेली ती दोघं - एकत्र आली पाहिजेत असं दोघांनाही मनोमन वाटत असतं.
शेखर हा श्रीचा दत्तकपुत्र. तो सात वर्षांचा असताना त्याच्या आजारी आईला श्रीनं आधार दिला. दोन वर्षांनी ती जग सोडून गेली. श्रीनं शेखरला दत्तक घेतलं होतं. संसार न थाटता सच्चेपणे राहून आपल्याला आधार देणाऱ्या श्रीबद्दल शेखरच्या मनात असणारा नितांत आदर नि सुस्वरूप श्वेताचं ताजं टवटवीत प्रेम यांच्या चिमटीत सापडलेला शेखर श्वेतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. विचारान्ती श्वेताही तसाच निर्णय घेते. घरी आलेल्या श्रीचं स्वागत करून आपला निर्णय त्यांना सांगते.
श्री आणि मेघानं समजावल्यावर शेखर नि श्वेता यांची नव्या जीवनातलं पहिलं पाऊल टाकण्याची तयारी होते. मेघाच्या आरामखुर्चीमागे तिचे हात हातात घेऊन उभा राहिलेला श्रीकांत - नव्हे, त्याचा आभासच तो...!
मेघा ‘फ्लॅशबॅक’मधून बाहेर येते. पडदा पडतो.
आभार सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचं हे कथानक. मनोहर सुर्वे यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. या नाटकाबरोबरच एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा समारोप झाला.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)