Thursday 9 January 2020

कीर्तनसंध्या २०२० दिवस पहिला - ... तर पाकव्याप्त काश्मीर निर्माणच झाला नसता : चारुदत्तबुवा आफळे




रत्नागिरी :
‘तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे,’ असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी मांडले.

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. आठ जानेवारी २०२० रोजी या महोत्सवाचा प्रारंभ झाला. ‘योद्धा भारत’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर कारगिल युद्धापर्यंतच्या काळातील योद्ध्यांचा पराक्रम आफळेबुवा या कीर्तनातून उलगडणार आहेत. पहिल्या दिवशी चारुदत्तबुवांनी स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्मीरमधील युद्धाची गाथा उलगडली.


‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ हा अभंग त्यांनी पूर्वरंगासाठी घेतला होता. त्याचे निरूपण करताना ते म्हणाले, ‘देशभरातील राजे श्रीरामाच्या राज्याभिषेकाला आले होते. त्यामुळे इतर कोणत्याही भारतीय राजापेक्षा रामाचा राज्याभिषेक सोहळा वेगळा होता. म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. नंतरच्या काळात सज्जनांनी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही. अल्लाउद्दीन खिलजी भारताच्या दिशेने निघाला होता. एक लाखाहून अधिक फौज आपल्या पाठोपाठ येणार असल्याची अफवा त्याने पसरवली होती. वस्तुस्थिती तशी नव्हती. खिलजीने उठवलेल्या अफवेच्या विरुद्धचा प्रचार तेव्हाच्या आध्यात्मिक योग्यतेच्या व्यक्तींनी केला असता, तर मुघल साम्राज्य भारतात निर्माण झालेच नसते. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर केलेल्या पहिल्या आक्रमणापासून शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंतच्या काळात तत्कालीन ऋषिमुनींनी समाजाला सावध केले असते, तर हे आक्रमण झाले नसते. सुमारे चारशे वर्षे भारताला पारतंत्र्यात घालवावी लागली नसती.’

‘आजही भारताच्या सुरक्षिततेकडेही लक्ष दिले पाहिजे,’ असे सांगून ते म्हणाले, ‘क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर विमानतळापासून क्रिकेटपटूंची शोभायात्रा निघते; पण १९९९ साली कारगिल युद्ध जिंकल्यानंतर ते जिंकणाऱ्या जवानांची शोभायात्रा काढायचे कोणालाही सुचले नाही. देशाच्या सुरक्षेपेक्षा खेळाची करमणूक आपल्याला जास्त महत्त्वाची वाटते.’

उत्तररंगात बुवांनी काश्मीर प्रश्न कसा निर्माण झाला याविषयी निरूपण केले. ते म्हणाले, ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी देशातील ५६० संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार नव्हती. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे प्रयत्न करून संस्थानांना भारतात विलीन व्हायला भाग पाडले; मात्र जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार झाली नाहीत. काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी तर स्वातंत्र्यापाठोपाठ आलेला २२ ऑक्टोबर १९४७चा दसरा स्वतंत्र राज्याचा पहिला शाही दसरा म्हणून साजरा करायचे ठरवले. त्याच दिवशी अफगाणी टोळ्यांनी श्रीनगरकडे कूच केल्याची माहिती त्यांना मिळाली. अफगाणी टोळ्यांनी मुजफ्फराबाद, बारामुल्ला भाग काबीज करून तेथील स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले, खून पाडले. अशा स्थितीत काश्मीरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर काश्मीरच्या राजांनी भारताकडे मदतीची याचना केली. त्यानुसार काही अटींवर काश्मीरला लष्करी मदत करायला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राजी झाले. त्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला आणि अवघ्या ४८ तासांत तुटपुंज्या सामग्रीसह भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दाखल झाले.’

‘देश नुकताच स्वतंत्र झाला असल्याने अनेक ब्रिटिश अधिकारीही भारतीय सैन्यात होते; मात्र त्यांचे धोरण पाकधार्जिणे असल्याने त्यांनी काश्मीरला मदत करण्याच्या पथकामध्ये ब्रिटिश सैन्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. अत्यंत भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये राजेंद्रसिंह, सोमनाथ शर्मा, दिवाणसिंग असे भारतीय लष्कराचे अनेक मोहरे कामी आले. त्यांच्या अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र, महावीर चक्र आणि शौर्यपदक देण्यात आले. महाराष्ट्रातील रामा राघोबा राणे यांनी जीव रणगाड्याखाली स्वतःला बांधून घेऊन शत्रूने पेरलेले तब्बल ६०हून अधिक भूसुरुंग निकामी केले. तेव्हा केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. हा गौरव हयात असताना मिळण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतीय सैन्याकडे मोजकीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा होता, तसेच सैनिकांची संख्याही अपुरी होती. तरीही, मोठ्या संख्येने आलेल्या अफगाण टोळीवाल्यांनी पादाक्रांत केलेला काश्मीरचा दोन-तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्यक असलेले पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्मीरच्या ताब्यात आला असता,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.

‘युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन काश्मीरने भारतात विलीन व्हायला संमती दिली होती. ती लक्षात घेता आता जो भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तोच तेव्हाचा एक-तृतीयांश भाग तेव्हाच भारतातच विलीन झाला असता. तो पाकिस्तानला मिळू शकला नसता. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेव्हाच्या लष्कराने केलेली कामगिरी अप्रतिम होती; मात्र त्याच वेळी पंडित नेहरूंनी भारत-पाक प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषदेत नेला. त्यानंतर जानेवारी एकूण १९४८च्या जानेवारीत युद्धबंदी झाली आणि ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर ७०वर्षांहून अधिक काळ भारताला भेडसावत आहे,’ असे आफळेबुवा म्हणाले.

भारतीय सैन्याने काश्मीरमधील उरी, स्कार्डू, जोझिला खिंड, नौशेरा, राजौरी, लेह, लडाख, शाल टँक, हाजीपीर खिंड इत्यादी भागात गाजविलेल्या शौर्याची गाथा आफळेबुवांनी ओघवत्या शैलीने विविध गीते सादर करून सांगितली. त्या वीरांच्या गाथेच्या बुवांनी केलेल्या वीररसपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित समुदायाच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.

आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
 
रत्नागिरीत नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे उद्घाटन करताना हभप चारुदत्तबुवा आफळे आणि अन्य मान्यवर
पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, देसाई उद्योग समूहाचे विजय देसाई, माधव कुलकर्णी, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रकाश जोशी आणि ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कीर्तनसंध्या परिवाराचे प्रमुख अवधूत जोशी यांनी हभप आफळे बुवा यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा
विद्यार्थ्यांना दररोजच्या आख्यानातील इतिहास विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(पहिल्या दिवशीचे काही व्हिडिओ सोबत देत आहोत...)














(या व्यतिरिक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ कोकण मीडियाच्या फेसबुक पेजवर ऐकायला/पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.)

No comments:

Post a Comment