Sunday 12 January 2020

कीर्तनसंध्या २०२० दिवस चौथा – देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला

कीर्तनसंध्या २०२० दिवस चौथा –

देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला  - हभप चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : भारताच्या इतिहासातील स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.
रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवात `योद्धा भारत` या आख्यानविषयावर सुरू असलेल्या कीर्तनमालिकेच्या चौथ्या दिवशी आफळेबुवांनी शास्त्रीजींच्या १९६५ सालच्या भारत-पाक युद्धातील भूमिकेविषयी माहिती दिली. पूर्वरंगात रामायणकाळात हनुमंताने केलेल लंका दहन आणि त्यानिमित्ताने तेथील लंकेच्या लष्करसज्जतेची माहिती घेऊन येण्याचे काम केले होते. तो एक प्रकारे सर्जिकल स्ट्राइकचा भाग होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६५ साली शास्त्रीजींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्वप्रथम सर्जिकल स्ट्राइकचा वापर केला होता, असे बुवांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर भारताचा होत असलेला विकास पाकिस्तानला पाहवत नव्हता. त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने काश्मीरमधील १५ ते २५ वयोगटातील मुलांना शिक्षण देऊन सुमारे ३० हजार मुजाहिद तयार केले. त्यांच्यामार्फत भारतात वेगवेगळ्या दहा ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या दिमतील पॅटन रणगाडा होता. स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्या मदतीकरिता भारतीय सैन्याने केलेली कामगिरी आणि काश्मीरमध्ये लुटालूट, अत्याचार करणार्याि अफगाणी टोळ्यांना हुसकावून लावल्यामुळे पाकिस्तानला तो पराभव जिव्हारी लागला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी पाकिस्तान काश्मीर स्वतंत्र करण्याच्या हेतूने पाकिस्तानने १९६५ साली कारगिल ते अखनूर भागात दहा ठिकाणी एकाच वेळी हल्ले केले. त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले. त्यातील राजा नावाची चौकी लेफ्टनंट कर्नल खन्ना आणि परमवीरचक्र विजेते अब्दुल हमीद यांच्या हवाई कारवाईमुळे भारताने ताब्यात घेतले. अत्यंत शक्तिशाली असलेले पॅटन रणगाडे निकामी करण्याचे काम अब्दुल हमीद, रणजित सिंग, आयुब खान, वसंत चव्हाण, अर्जुन सिंग, किलर बंधू अशा भारतीय सैन्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी केले. पाकिस्तानकडे असलेल्या अमेरिकन सॅबरजेट विमानाच्या तुलनेत छोटी आणि कमी क्षमतेची हंटर आणि नेट विमाने वापरून ही कारवाई करण्यात आली. मात्र भारतीय सैन्याची ताकद तोकडी होती. अशावेळी शास्त्रीजींनी तसेच तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यूहरचना आखली आणि थेट हल्ला करून बर्की आणि लाहोर ही पाकिस्तानची महत्त्वाची लष्करी ठाणी ताब्यात घेतली. बर्कीचे लष्करी ठाणे ताब्यात घेण्यापूर्वी पाकिस्तानचा निरीक्षण मनोरा उद्ध्वस्त करण्याचे काम श्रीकांत रेगे या मराठी लष्करी अधिकाऱ्याने केले होते. याशिवाय गुरुबक्ष सिंग, हरबक्ष सिंग, ब्रिगेडियर त्यागराज, रामसिंग अशा कित्येक लष्करी अधिकाऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता पाकिस्तानला नामोहरम केले. कराची आणि इस्लामाबाद ही पाकिस्तानची महत्त्वाची ठिकाणे भारतीय लष्कराच्या टप्प्यात आहेत, असा इशारा पाकिस्तानला देण्यात भारत यशस्वी झाला. मात्र पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघाकडे गेल्यामुळे २३ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी झाली. त्यानंतर ताश्कंदमध्ये उभयपक्षी करार करायचे ठरले. पाकिस्तान आणि भारताने ताब्यात घेतलेली एकमेकांची महत्त्वाची ठाणी एकमेकांना परत करण्याचा तह ताश्कंदमध्ये करावा लागला. तो करण्यासाठी भारतीय पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री ताश्कंदमध्ये निघण्यापूर्वी स्वा. सावरकर यांनी त्यांना ताश्कंदला जाऊ नका, अशा इशारा दिला होता. विजेत्या देशाच्या प्रमुखाने आपला देश सोडून इतर देशात तहासाठी गेल्यानंतर त्याचा घात होतो, हा इतिहास लक्षात घेऊन सावकरांनी तो सल्ला तेव्हा दिला होता. मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे शास्त्रीजींना तेथे जावे लागले. सर्व करार झाल्यानंतर १० जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर शास्त्रीजींच्या ताश्कंदमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. युद्धबंदी झाल्यानंतर ताशकंद करार होईपर्यंतच्या काळात देशभरात अंतर्गत भागात दंगल उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण करण्याची कल्पनाही सावरकरांनी दिली होती. त्यानुसार ती यंत्रणा राबविण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संघाच्या माध्यमातून सुमारे सव्वा महिना ही जबाबदारी चोखपणे सांभाळली. त्यामुळे त्या अशांततेच्या काळात देशभरात एकही दंगल झाली नाही, याचा आफळेबुवांनी आवर्जून उल्लेख केला.
इतिहासातून धडा घेताना प्रत्येक भारतीयाने संभाव्य महायुद्धाची छाया लक्षात घेऊन अत्यंत सतर्क आणि सज्ज झाले पाहिजे. डिसास्टर मॅनेजमेंट, नर्सिंग, शारीरिक कसरतींचा सराव, उपासना इत्यादींच्या माध्यमातून तरुणांनी सज्ज झाले पाहिजे. २०२४ च्या सुमारास भारत जगातील सर्वांत बलशाली राष्ट्र होणार असल्याची भविष्यवाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज झाले पाहिजे, असे आवाहनही आफळे बुवांनी केले.
कीर्तनाच्या मध्यंतरात मैत्रेयी किरण मालशे, वेद भूपेंद्र जोगळेकर आणि वीणा योगेश काळे या तीन विद्यार्थ्यांना त्यांनी इतिहासावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल गौरविण्यात आले. पावस येथे अनसूया आनंदी वृद्धाश्रम चालविणारे डॉक्टर गायत्री आणि गजानन फडके दांपत्य तसेच गतिमंद मुलांची आशादीप ही संस्था चालविणारे दिलीप रेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते शिवरायांची आरती कीर्तनाच्या शेवटी करण्यात आली.
..........
पावस येथे अनसूया आनंदी वृद्धाश्रम चालविणारे
डॉक्टर गायत्री आणि गजानन फडके दांपत्याचा
विशेष सन्मान करताना हभप चारुदत्तबुवा आफळे

गतिमंद मुलांची आशादीप ही संस्था चालविणारे दिलीप रेडकर
यांचाही सन्मान कीर्तनसंध्या परिवारातर्फे हभप आफळेबुवांनी केला.
.............................................................

                        कीर्तनसंध्या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी (११ जानेवारी २०२०) राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी १९६५च्या युद्धात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची गाथा उलगडली. (निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर चौथ्या दिवशी सपत्नीक कीर्तनाला उपस्थित होते. समारोपावेळी त्यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली.

चौथ्या दिवशी बुवांनी सादर केलेली गाणी, देवीचा गोंधळ, आरती आदींचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर...
https://youtu.be/X23aWPlvuIs

No comments:

Post a Comment