Wednesday, 8 January 2020

नवव्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला आज रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात प्रारंभ झाला.
 
  स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी यावर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. `योद्धा भारत` हा यावेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा यांच्या कीर्तनांनी आजपासून येत्या १२ जानेवारीपर्यंत हा महोत्सव रत्नागिरीत पार पडणार आहे.
   
रत्नागिरीत नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे उद्घाटन करताना हभप चारुदत्त बुवा आफळे आणि अन्य मान्यवर
पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, देसाई उद्योग समूहाचे विजय देसाई, माधव कुलकर्णी, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रकाश जोशी आणि हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कीर्तनसंध्या परिवाराचे प्रमुख अवधूत जोशी यांनी हभप आफळे बुवा यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

     महोत्सवात आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), परेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.

     कीर्तनसंध्या महोत्सवात इतिहास जागवला जाणार असून विद्यार्थ्यांकरिता आख्यानातील इतिहास विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.







(या व्यतिरिक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ कोकण मीडियाच्या फेसबुक पेजवर ऐकायला/पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.)



No comments:

Post a Comment