Sunday 5 June 2016

सचोटीचा व्यवसाय करणे म्हणजे देशसेवाच – रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरी - कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन
करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी,
शेजारी उमेश आंबर्डेकर, मनोज कळके, रवींद्र प्रभुदेसाई, रुची महाजनी
रत्नागिरी : गरजूंना रोजगार देणे आणि सर्व कर भरून केला जाणारा व्यवसाय म्हणजे देशसेवाच आहे, असे मत पितांबरी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे रत्नागिरीत आज (ता. ५) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या पहिल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये व्यवसायाच्या अभिनव कल्पना या विषयावर ते बोलत होते. पितांबरी उद्योगाचा प्रारंभ आणि विकासाची माहिती देतानाच घरोघरी वापरल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची उदाहरणे देऊन ते म्हणाले की, ग्राहकाच्या मनावर राज्य करेल, तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जग जिंकेल. व्यवसाय करून इच्छिणाऱ्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपल्यातील क्षमता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. संगणक आणि इतर यंत्रसामग्री नव्हे, तर व्यवसायातील माणसेच धंदा करतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसांची किंमत जाणून घ्यायला हवी. व्यवसाय म्हणजे फायदा हेच मनात ठसवून उद्योजकीय मानसिकता विकसित केली पाहिजे. आपल्या व्यवसायाची विशिष्ट ओळख निर्माण करून आपला ग्राहक आपण शोधला, तर व्यवसाय करणे कठीण नाही. इनोव्हेशन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही फायदेशीर व्यवसायाची त्रिसूत्री आहे. व्यक्तिगत जीवनात ध्यानधारणा आणि ब्रह्मविद्येसारखी मन शांत ठेवायला मदत करणारी साधनाही दररोज करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्योगाचे अर्थ आणि आणि नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी म्हणाले की, वाढ होत असेल, तरच कोणताही व्यवसाय टिकतो. व्यवसायात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. व्यवसाय वाढवायचा असेल, तर स्वस्तात भांडवल उपलब्ध करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. प्राप्तिकर किंवा रिटर्न्स भरण्याची वेळ येऊ नये, ही मानसिकता आधी बदलली पाहिजे. रिटर्न्स भरले असतील, तर बँकांकडून कर्ज सुलभतेने मिळू शकते. तरच भांडवल उभे राहू शकते. व्यवसाय वाढवायचा असेल, तर तो प्रोप्रायटरी न ठेवता प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीपर्यंत विस्तारित करून कंपनीचे भागधारक वाढविले पाहिजेत. आगामी काळात चलनी व्यवहार बंद होऊन ऑनलाइन व्यवहार वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन छोट्यात छोट्या व्यावसायिकांनीसुद्धा आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांना तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यामागील भूमिका श्री. महाजनी यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, योगाचा प्रसार झाला, तर लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील. अधिक स्वास्थ्यपूर्ण आहार घेतील. त्यात वाढ झाली, तर शरीराला अपायकारक फसफसणाऱ्या पेयांसारख्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय कमी होऊन ताज्या फळांच्या रसाची मागणी वाढण्यात परिवर्तित होईल.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमविषयी ठाण्याचे मनोज कळके यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, काठियावाडी, पालनपुरी आणि मारवाडी लोकांनी आपल्या ज्ञातीच्या माध्यमातून एकमेकांना साह्य करून व्यवसाय वाढविला. पोलाद उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी पारशी जमातीसाठी १८८४ साली स्थापन केलेल्या मंडळाचा एवढा विस्तार झाला, की मुंबईतील कोणीही पारशी व्यक्ती आजही घरासाठी कर्ज घेत नाही. पारशी जमातीकडूनच त्यांना घरासाठी कर्ज मिळते. अशा जमातींकडून प्रेरणा घेऊनच केबीबीएफची स्थापना करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, बेळगावनंतर कोकणात या फोरमचा विस्तार होत आहे. संपर्क वाढावा आणि त्यातून व्यवसाय वाढीस लागावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्समध्ये आपले विचार
व्यक्त करताना रवींद्र प्रभुदेसाई. शेजारी रुची महाजनी,
नरेंद्र महाजनी, मनोज कळके
कॉन्फरन्सला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० उद्योजकांनी नोंदणी केली. यापुढे दर महिन्याला कॉन्फरन्सची बैठक रत्नागिरीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यात फोरमची शाखा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

योगेश मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत पाध्ये यांनी आभार मानले.

Saturday 4 June 2016

कऱ्हाडे बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला प्रतिसाद

रत्नागिरी : उद्या (दि. ५ जून) रत्नागिरीत होत असलेल्या पहिल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुमारे शंभर उद्योजकांनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या बिझिनेस फोरमतर्फे पहिली कॉन्फरन्स रविवारी रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी, प्रशांत पाध्ये इत्यादी व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. त्याकरिता सशुल्क नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवसाय या विषयासाठी अशा तऱ्हेची परिषद भरविणे गरजेचे होते. परिषदेत ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी (उद्योगाचे अर्थ आणि नियोजन), मनोज कळके (केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे) आणि पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई (व्यवसायाच्या अभिनव कल्पना) यांची व्याख्याने होणार असल्याने व्याससायिक मार्गदर्शनाची गरज पूर्ण होणार आहे. नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी ही परिषद मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा नोंदणी केलेल्या उद्योजकांनी व्यक्त केली.
       दरम्यान, उद्याच्या कॉन्फरन्सची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये इच्छुक उद्योजकांनी उद्याही नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.....................
संपर्क १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९
२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९
३) रुची महाजनी ९८८११५९३२०
४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४                  

Thursday 2 June 2016

रत्नागिरीचे जाणीव फौंडेशन घेणार एक गाव दत्तक

रत्नागिरी : येथील जाणीव फौंडेशनतर्फे तालुक्यातील एक गाव दत्तक घेऊन ते सुजलाम् सुफलाम् करण्यात येणार आहे. या गावात शैक्षणिक, पर्यावरण उपक्रम, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याकरिता गावाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून इच्छुक गावांनी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जाणीव संस्थेने केले आहे.
जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे, सचिव नीलेश मुळ्ये, उमेश महामुनी, संजय शिंदे, अमित येदरे, सुशील जाधव, प्राजक्ता मुळे यांनी आज (दि. २ जून) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गेल्या पाच वर्षांपासून जाणीव रक्तदात्यांची यादी तयार करून रक्तदानास सहकार्य करत आहे. करबुडे-बौद्धवाडी (ता. रत्नागिरी) येथील शाळेवर ४ लाख खर्च करून कायापालट केला आहे.
दोन वर्षांपूर्वी दत्तक गाव घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. याकरिता आम्ही मदत करावी, अशी गावांची अपेक्षा होती. पण लोकांचा सहभाग मिळत नव्हता. त्यामुळेच या योजनेसाठी इच्छुक गावांचे प्रस्ताव मागवले आहेत. यात ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा आहे. या उपक्रमात लागणारा निधी हितचिंतकांकडून मिळणार असून कार्यक्रमातून निधी गोळा केला जाईल, असे श्री. गर्दे यांनी सांगितले.
या उपक्रमात सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग हवा. गावात शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातील. स्वच्छता, वृक्षारोपण, गाव रोगमुक्त करणे, मुलांकडून गावाचा प्रकल्प करणे, संगणक साक्षरता, महिला बचत गट स्थापना, आरोग्य शिबिरे, शाळेला भौतिक सुविधा, सौरदीप दिले जातील. एकंदरीत स्वच्छ, सुंदर हरित ग्राम करण्यासाठी प्रयत्न राहील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत. गावांचे प्रस्ताव आल्यानंतर छाननी करून निवडक गावांची पाहणी केली जाईल. त्यातून एक गाव निवडण्यात येईल. त्यानंतर कामाला सुरवात केली जाईल. साधारण तीन ते पाच वर्षे गावात उपक्रम राबवले जाणार आहेत.
प्रस्ताव पाठवण्याकरिता ग्रामपंचायतीचा अर्ज, सदस्य, तलाठी आदींची नावे, गावाची थोडक्यात माहिती, भौगोलिक स्थिती, शाळेची माहिती, साध्या कागदावर सरपंचांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. हे प्रस्ताव १) महेश गर्दे, विहार वैभव, टिळक आळी नाका, रत्नागिरी, (९४२२००३१२८) २) नीलेश मुळ्ये, अ‍ॅपेक्स हॉलिडे, शिवाजीनगर, रत्नागिरी, (८५५४८५४१११) ३) उमेश महामुनी, श्रावणी ग्राफिक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी (८१८००३२४२४) यांच्याकडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................




Wednesday 1 June 2016

रत्नागिरीत रविवारी कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स



रत्नागिरी : नव्याने स्थापन झालेल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे येत्या रविवारी (ता. ५) रत्नागिरी पहिली कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
       उपजीविकेसाठी नोकरीचा पारंपरिक पर्याय न स्वीकारता व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी बिझिनेस फोरम स्थापन केला आहे. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत वाढणारी स्पर्धा, वेळोवेळी बदलणाऱ्या कायद्यांचे फायदेतोटे, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर खुली होणारी नवनवीन दालने यांची माहिती होण्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. फोरममार्फत पहिली बिझिनेस क़ॉन्फरन्स येत्या रविवारी (ता. ५ जून) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
       सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये उद्योगाचे अर्थ आणि नियोजन (ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी), केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे (मनोज कळके) आणि व्यवसायाच्या अभिनव कल्पना (पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई) यांची व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर चर्चासत्र आणि शंकासमाधान होईल.
       कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी प्रत्येकी २०० रुपये शुल्क असलेल्या दिवसभराच्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी किंवा प्रशांत पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...........................
संपर्क – १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९
२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९
३) रुची महाजनी – ९८८११५९३२०
४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४


Friday 27 May 2016

कोकण रेल्वेचा हमसफर सप्ताह सुरू

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनएडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कालपासून (ता. २६) हमसफर सप्ताह सुरू केला आहे.  कोकण रेल्वेनेही हा सप्ताह साजरा करायला सुरवात केली आहे. काल स्वच्छता दिवस तर आज सत्कार दिवस साजरा करण्यात आला.

राज्यराणी एक्स्प्रेसमधील प्रवाशांशी
संवाद साधताना विभागीय रेल्वे
व्यवस्थापक बाळासाहेब निकम
एनडीए सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या लोकहिताच्या विविध कामांची माहिती जनतेला देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रत्येक खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लपासून हमसफर सप्ताह राबविण्याची सूचना भारतीय रेल्वेला केली. हा सप्ताह २६ मे रोजी सुरू झाला असून तो १ जूनपर्यंत चालणार आहे. प्रत्येक दिवस वेगवेगळ्या उपक्रमांसाठी साजरा केला जात आहे. हमसफर सप्ताह साजरा करण्यासाठी रत्नागिरीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व २८ स्थानकांचे पालकत्व वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. त्यांच्यामार्फत संपूर्ण विभागात काल आणि आज स्वच्छता आणि सत्कार दिवसाच्या निमित्ताने अभियान राबविण्यात आले. श्री. निकम यांनी काल स्वतः संगमेश्वर, आरवली, सावर्डे, कामथे आणि चिपळूण या स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली. आवश्यक तेथे स्वच्छता करण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेस संगमेश्वर स्थानकात आली असता तेथे श्री. निकम यांनी प्रवाशांशी संवाद साधला. गाडीतील एका डब्यातील अस्वच्छ स्वच्छतागृह आणि तुंबलेल्या बेसिनकडे प्रवाशांनी त्यांचे लक्ष वेधले. त्याची त्वरित देखल घेऊन गाडी रत्नागिरी स्थानकावर आल्यानंतर स्वच्छता करण्यात आली. याच पद्धतीने रत्नागिरी विभागातील सर्व स्थानके, मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
स्थानकावरील उपाहारगृहांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि योग्य दरपत्रक लावले आहे का, याची पाहणी आजच्या सत्कार दिवसाच्या निमित्ताने करण्यात आली. रेल्वेच्या पॅन्ट्री कारच्या पाहणीचाही त्यामध्ये समावेश होता. उपाहारगृहांमध्ये तसेच गाडीत प्रवाशांना दर्जेदार पदार्थ दिले जात आहेत का, हेही तपासण्यात आले. याच पद्धतीने उद्यापासून (ता. २८) सेवा दिवस, सतर्कता दिवस, सामंजस्य दिवस, संयोजन दिवस आणि संचार दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.

.............

रेल्वेस्थानकांवरील स्वच्छता करताना रेल्वेचे कर्मचारी

-    रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली.

Monday 23 May 2016

डम्पिंग ग्राउंड नव्हे, पर्यटनस्थळ

डम्पिंग ग्राउंड म्हणजे दुर्गंधी आणि कचऱ्याची बजबजपुरी असेच चित्र डोळ्यांसमोर येते. कमी-अधिक प्रमाणात सर्वच शहरांची अशीच स्थिती आहे; मात्र याच कचऱ्याच्या आगाराचे रूपांतर एका पर्यटनस्थळामध्ये करायचे ठरवून वेंगुर्ले नगरपालिकेने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
..............................................................................

     मुंबईतील देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा विषय बरेच दिवस धुमसत आहे. मुंबईप्रमाणेच बहुतेक सर्वच शहरांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासून टाकले आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर, त्यामुळे शहरांवर पडणारा अतिरिक्त ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये कचरा ही सर्वांत मोठी समस्या आहे.
सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट्स तयार केल्या जातात.
शहरात दररोज तयार होणाऱ्या टनावारी कचऱ्याचे करायचे काय, जागेअभावी तो साठवायचा किंवा टाकायचा कोठे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याचे उपाय शोधून काढण्यात नगर प्रशासन अयशस्वी ठरते. मग शहरात कचऱ्याचे ढीग साठतात. डम्पिंग ग्राऊंडही भरून गेले, तर कचरा जाळून टाकण्याचा सोपा मार्ग सर्वत्रच अवलंबिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. नागरिकांचा संतापही अनावर होतो. मोर्चे निघतात. थातूरमातूर उत्तरे दिली जातात. मोर्चेकऱ्यांचे समाधान होते. पुन्हा अगदी दुसऱ्या दिवशीपासून नागरिक आणि पालिका प्रशासनही कचऱ्याच्या आपल्या "जबाबदाऱ्या" आदल्या दिवशीप्रमाणेच पुढे पार पाडतात. शहरे मोठी असतील, तर त्या प्रमाणात डम्पिंग ग्राऊंडची संख्या वाढते आणि त्या त्या भागातील नागरिकांना त्याच प्रमाणात त्रास सोसावा लागतो. कचऱ्याची ही समस्या सोडविण्यासाठी बायोगॅस आणि खतनिर्मितीचे प्रकल्प राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकांना विविध योजनांमधून अनुदान दिले जाते. प्रकल्प मोठ्या उत्साहात सुरू होतात. मात्र अल्पावधीतच ते अडगळीत जातात. कमीअधिक प्रमाणात सर्वच शहरांमध्ये हेच चित्र दिसते.
 डम्पिंग ग्राऊंडवर पर्यटकांसाठी उभारली जात असलेली झोपडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरही सहा महिन्यांपूर्वी कचऱ्याच्या या समस्येला अपवाद नव्हते. कोकणातील आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने मासळी आणि त्यापासून उद्भवणाऱ्या कचऱ्याचीही समस्या शहराला भेडसावत होती. अशा या शहराचा अक्षरशः आठ-दहा महिन्यांत कायापालट झाला आहे. केवळ कोकण आणि राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिले स्वच्छ शहर असा नावलौकिक वेंगुर्ले शहराने मिळविला आहे. पालिकेचे तडफदार मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना त्यांच्या तेथील कारकिर्दीच्या अवघ्या दहा महिन्यांत राज्य शासनाचे तीन पुरस्कार मिळाले. हागंदारीमुक्त शहराचा पुरस्कार २ ऑक्टोबर २०१५ रोजी, स्वच्छ शहर पुरस्कार यावर्षीच्या ३ फेब्रुवारीला, तर उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार याच वर्षी २० एप्रिल रोजी त्यांना मिळाला. एकाच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन वेळा गौरव होणारा हा एकमेव अधिकारी असावा.
अर्थात अशा पुरस्कारांवर यश मोजता येणार नाही, हे खरे आहे. कारण कोकणातील बहुतेक सर्वच पालिकांना स्वच्छतेचे पुरस्कार गेल्या पंधरा-वीस वर्षांत मिळाले. मात्र त्यांची स्वच्छता त्या पुरस्कारापुरतीच राहिली. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो प्रत्यक्ष मिळेपर्यंतच्या अवधीतच शहरे पुन्हा बकाल झाली. वेंगुर्ल्याच्या बाबतीत मात्र सध्या तरी तसे म्हणता येणार नाही. कारण उत्स्फूर्त लोकसहभाग, जागरूक प्रशासन आणि योग्य व्यवस्थापनामुळे कोकणातील या छोट्याशा शहराने देशातील प्लास्टिकमुक्त आणि कचरा व्यवस्थापनाबाबत देशात आदर्श ठरणारे शहर असा लौकिक प्राप्त केला आहे. डम्पिंग ग्राऊंडचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने वेंगुर्ले पालिकेने पावले उचलली आहेत, एवढे नमूद केले, तरी पालिकेच्या लौकिकाचे वेगळे प्रमाण देण्याची गरज नाही.
दोन-तीन वर्षे कृषी अधिकारी, तेवढाच काळ पोलिस अधिकारी आणि पाच-सहा वर्षे दापोली आणि औसा येथील पालिका मुख्याधिकारी म्हणून काम केलेले रामदास कोकरे गेल्या वर्षी जूनमध्ये वेंगुर्ल्यात दाखल झाले. आधीच्या सर्वच अनुभवाचा पुरेपूर वापर करून त्यांनी स्वच्छ आणि मुख्यत्वे प्लास्टिकमुक्त शहराचा ध्यास घेतला. देशभरातील विविध शहरांचा अभ्यास केला आणि स्वच्छतेसाठी चतुःसूत्री तयार केली. ओला कचरा, सुका कचरा, धातू आणि प्लास्टिकचा कचरा नागरिकांकडून वर्गीकरण करून संकलित करण्याची ही चतुःसूत्री शहरात कठोरपणे राबविली गेली. असे वर्गीकरण करून कचरा संकलन करणारी ही देशातील पहिली पालिका आहे. हे सर्व राबविताना कचरा टाकणाऱ्यांना आणि जाळणाऱ्यांना वचक बसावा म्हणून ५०० रुपये दंड आकारला जातो आणि तो वसूल केला जातो. याबद्दल अनेकांनी टीका केली. अडचणी आणल्या. रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याचे नाकारणाऱ्या एका नागरिकाच्या घरासमोरील कचऱ्यात सापडलेल्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवरून त्याचा गुन्हा उघड केला आणि त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. शहरात हागंदारीमुक्ती राबविताना तर अनेकदा सूचना देऊनही त्यांचे पालन न करणाऱ्यांची ढोलताशांच्या गजरात गांधीगिरीने मिरवणूक अर्थात धिंड काढली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना काही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांची बदली करण्याचे प्रयत्नही काही असंतुष्टांकडून झाले. मात्र श्री. कोकरे यांची भूमिका स्वच्छ भारत अभियानाशी सुसंगतच असल्याने ते प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. श्री. कोकरे जोमाने काम करतच राहिले.
निश्चित दिशेने स्वच्छता अभियान राबविले जात असल्याची खात्री पटल्यानंतर युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया इत्यादींनी या उपक्रमाकरिता कचराकुंड्या देण्यापासून फलक उभारणीपर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक हातभार लावला. मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासनाचा झपाटा पाहून नागरिकांनीही स्वतः उत्स्फूर्तपणे शहरात काही ठिकाणी कचरापेट्यांची उभारणी केली. पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणती गाडी कोठे आहे, याची दररोज नोंद केली जाते. दररोज देखरेख ठेवली जाते. परिणामी कोठेही गफलत होत नाही. अशा पद्धतीने दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. शहरात दररोज दीड ते दोन टन ओला, तर सुमारे साडेचार टन सुका कचरा संकलित होतो. प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दररोज सुमारे ५० किलो असते. ओल्या कचऱ्यापासून वीज आणि बायोगॅसची निर्मिती केली जाते. ब्रिकेट आणि शेगडीकरिता गोळे तयार करून कागद आणि पालापाचोळ्याच्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. वेंगुर्ल्यात काजूप्रक्रिया प्रकल्पांची संख्या मोठी आहे. या प्रकल्पांना बॉयलरसाठी लाकूड आणि इतर इंधन मोठ्या प्रमाणावर लागते. त्यांच्यासाठी सुक्या कचऱ्यापासून तयार केलेल्या ब्रिकेट उपयुक्त ठरत आहेत. प्लास्टिक कचरा बारीक करून तो रस्त्यावरच्या डांबरात वापरला जातो. पहिला प्लास्टिकचा रस्ता वेंगुर्ले पालिकेनेच दोन महिन्यांपूर्वी तयार केला आहे आणि आता ती नियमित प्रक्रिया झाली आहे. मात्र ती निरंतर चालू राहण्याची शक्यता वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे प्लास्टिकमुक्तीच्या निर्धारामुळे नागरिकही प्लास्टिकऐवजी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर आणि आग्रह करू लागले आहेत. परिणामी प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण खूपच घटले आहे. बायोगॅस, वीज, ब्रिकेट, गोळे, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी विविध यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यासाठी आलेला सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च नागरी विकासाच्या विविध योजनांमधून केंद्र आणि राज्य सरकारकडून पालिकेने सातत्याने पाठपुरावा करून मिळविला आहे. याशिवाय तूर्त तरी प्रक्रिया करता येत नाही, अशा काच आणि धातूच्या बाटल्या रिसायकलिंगसाठी विकल्या जातात. त्यांच्या विक्रीतून आलेला निधी पुन्हा याच प्रकल्पाच्या आवश्यक बाबींसाठी खर्च केला जातो.
या सर्व प्रक्रिया पालिकेच्या सहा एकर डम्पिंग ग्राऊंडवर केल्या जातात. अगदी सात-आठ महिन्यांपूर्वी या ग्राऊंडच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे जिणे नकोसे झाले होते. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्यावर रोजच विविध प्रक्रिया होत असल्याने डम्पिंग ग्राऊंडवर कचराच शिल्लक राहत नाही. या मोकळ्या जागेचे पर्यटनस्थळ म्हणून रूपांतर करण्याची योजना आता आकाराला येत आहे. ग्राऊंडच्या काही भागात सोनचाफ्याची झाडे लावली आहेत. यथावकाश स्थानिक पर्यावरणाशी निगडित झाडांची लागवड केली जाणार असून कोकणाची जैवविविधता पाहण्यासाठी लोक या पर्यटनस्थळाला आवर्जून भेट देतील, अशी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. डम्पिंग ग्राऊंडचे पर्यटनस्थळात रूपांतर करणारीसुद्धा वेंगुर्ले ही पहिलीच पालिका ठरणार आहे.

-     प्रमोद कोनकर
pramodkonkar@yahoo.com
.............................................................................................................................................
डम्पिंग ग्राऊंडवर साकारलेले क्रीडांगण.



भारतात संस्कृतकडे दुर्लक्ष ही गंभीर बाब : दिनेश कामत

रत्नागिरी : भारतात संस्कृतबद्दल अज्ञान व जगभरात संस्कृतची जाण आहे. संस्कृतमधील असंख्य ग्रंथ आज परदेशांमध्ये आहेत. सुमारे ४०० विद्यापीठांमध्ये संस्कृत अनिवार्य केले आहे. पण भारतातच संस्कृतकडे दुर्लक्ष केले जाते. ही गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अ. भा. संघटनमंत्री दिनेश कामत यांनी व्यक्त केले.
संस्कृत भारतीतर्फे येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची आज (दि. २३ मे) सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जो संस्कृत जाणतो, त्याच्यासाठी अन्य भाषा शिकणे कठीण नाही. संस्कृतशिवाय अन्य भाषांना अस्तित्त्व नाही. संस्कृत वगळून भारत म्हणजे इंडिया आहे. देशात ३२ ठिकाणी संस्कृतचे वर्ग सुरू आहेत. संस्कृत भारती देशात जोमाने काम करत आहे. सर्व शास्त्रे, विद्यांचे ज्ञानभांडार संस्कृतमध्ये आहे.
सांगता समारंभास उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे संस्कृत अध्ययनाचा परिपूर्ण प्रस्ताव देण्याची सूचना संस्कृत भारतीला केली. लहान वयात संस्कृतचे संस्कार झाले तर उच्चारणासाठी फायदा होईल. पुढील वर्षी संस्कृत संभाषण वर्गात नक्की प्रवेश घेऊ, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅवड. विलास पाटणे यांनी सांगितले की, संस्थेच्या परदेशी भाषा केंद्रातही संस्कृतचे वर्ग सुरू करू. यातून संस्कृतप्रेमींची संख्या वाढेल. परदेशी भाषा शिकण्यासह संस्कृतचाही अभ्यास होईल.
कोकण प्रांत मंत्री चिन्मय आमशेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्कार भारतीच्या कार्याचा आढावा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी घेतला. वर्गाधिकारी श्री. शेवडे यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीत तीन प्रकारचे वर्ग घेण्यात आले. कोकण प्रांतातून १२५ हून अधिक शिबिरार्थींनी यात भाग घेतला. रुमानियाचा मोइझ आयोनट या तरुणासह सॉफ्टवेअर डेव्हलपर अर्जुन व्यास आणि ७५ वर्षीय निवृत्त शिक्षणाधिकारी डॉ. शिवणेकर यांचाही त्या समावेश होता. पूर्णपणे संस्कृत निवेदन आणि भाषणांनी वातावरण संस्कृतमय झाले. या कार्यक्रमाला सुजाण रत्नागिरीकरांची उपस्थिती लाभली.
...........