Sunday, 21 February 2016

राजवाडीच्या शेतकऱ्यांचा स्वामीनाथन यंच्या हस्ते गौरव

                  भारतातील शेतकरी असुरक्षित – स्वामीनाथन

सिंधुदुर्गनगरी - शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. शेतकर्‍यांना उत्पन्न मिळाले नाही तर शेतकरी काम कसा करणार? शेतकर्‍याला त्याने उत्पादीत केलेल्या मालाला हमी मिळाली पाहिजे. बाजारमूल्य मिळाले पाहिजे. सध्या शेतकरी असुरक्षित आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुटण्यासाठी आपण सादर केलेला अहवाल केंद्र शासनाने स्वीकारला पाहिजे, असे मत हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले. किर्लोस (सिंधुदुर्ग) येथील सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानतर्फे नुकत्याच (ता. १८ फेब्रुवारी) झालेल्या सिंधु अॅग्रो फेस्ट व प्रदर्शन या कार्यक्रमातील चर्चासत्रात बोलत होते. या समारंभात राजवाडीच्या ग्रामस्थांचा सत्कार डॉ. स्वामीनाथन यांच्या हस्ते झाला.
      श्री. स्वामिनाथन यांना देशातील पहिला 'भारत कृषी रत्न' पुरस्कार ब्रिगेडिअर सुधीर सावंत,  मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, तसेच भारत रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी कुलगुरु रविप्रकाश दाणी, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. योगेश नेरकर, डॉ. चक्रवर्ती, अँड. राजेंद्र कोरडे, एस. आर. देवकर, माजी आमदार राजन तेली, डॉ. विलास सावंत आदी उपस्थित होते.  स्वामिनाथन पुढे म्हणाले,  महाराष्ट्र व केरळमधील शेतकर्‍यांची स्थिती मला ज्ञात आहे. महाराष्ट्रामधील आत्महत्या ही भीषण समस्या आहे. पूर्वी शास्त्रज्ञ शेतकर्‍यांकडे जात नव्हते. परंतु आता बदल झाला आहे. १९४२ मध्ये झालेली क्रांती शेतकर्‍यांना प्राधान्य दिल्यामुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. रमेश ठाकरे म्हणाले, जगातील ९0 देशांनी डॉक्टरेट दिलेल्या व १९६६-६७ मध्ये भारताच्या हरितक्रांतीचे जनक असलेल्या डॉ. स्वामिनाथन यांचे पाय सिंधुदुर्गात लागल्याने कोकणसाठी हा सोन्याचा दिवस आहे. डॉ. स्वामिनाथन हे शेतकर्‍यांचे देव आहेत, असेही ठाकरे म्हणाले. ३६ वर्षानंतर स्वामिनाथन कोकणात आले आहेत. त्यांचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा ठरेल, असा विश्‍वास कुलगुरु डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

.........................
संगमेश्वर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील राजवाडी  गावातील ग्रामस्थ प्रयोगशील म्हणून ओळखले जातात. जलव्यवस्थापन, शेती, बचत गटासह विविध उपक्रमांमध्ये या गावाने स्वतःचे असे वैशिष्ट्य निर्माण केले आहे. या संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरव झाला. त्याच वृत्तांत.
Wednesday, 17 February 2016

गिधाड संवर्धनासाठी रायगडमध्ये रविवारी सायकल फेरी महाड - गिधाड पक्षांचे निसर्गातील अनन्यसाधारण महत्व ओळखून भारत सरकारने आणि इतर जागतिक संस्थांनी गिधाडाच्या संवर्धनासाठी देशांतर्गत विविध प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले. परंतु गिधाडांच्या ढासळत्या अधिवासाचा विचार केला जात नाही तसेच त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्याबाबत जनजागृतीसाठी येत्या रविवारी (ता. २१ फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यात सायकल फेरी काढली जाणार आहे.
सध्या पर्यावरणाच्या ढासळत्या स्वरूपाचा विचार करता अनेक पक्षी व प्राण्यांच्या प्रजातीवर संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शिवाय आजमितीसही प्राण्यांची चोराटी शिकार सुरूच आहे. खेड येथील गेल्या महिन्यात खवले मांजरांच्या खवल्यांच्या तस्करीचे उदाहरण समोर येते. तब्बल तीन पोती खवल्यांचा साठा जप्त करण्यात  आला. अशा अनेक धोक्यात आलेल्या प्रजातींविषयी प्रशासन व सामाजिक संस्थांबरोबर चर्चा करून कोणतेही ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न दिसत नाही. एकंदरीतच वन्य जीव आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम  होत आहे. गिधाड हाही असाच एक दुर्मिळ होत जाणारा पक्षी आहे. गिधाड म्हणजे मृत जनावरांवर उपजीविका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण येथील "सह्याद्री निसर्ग मित्र" तसेच महाड येथील "सह्याद्री मित्र" आणि "सिस्केप" या संस्थांच्या माध्यमातून गेल्या दशकात गिधाडांच्या वसतीस्थानांच्या नोंदींचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. आज गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची पाळी येते आणि त्यामुळे पहिल्याच वर्षात उडालेली व मोठी झालेली ही पिल्ले भुकेपोटी खाली पडतात. नंतर अन्नाच्या शोधार्थ त्याच परिसरात फिरत बसतात. गेल्या महिन्यामध्ये महाड परिसरात असेच एक गिधाडाचे पिल्लू सव या गावी शेतकरी संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या नजरेस पडले. पुढे सिस्केपच्या कार्यकर्त्यांनी तसेच महाड विभागीय वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला खाद्य देऊन मग नाणेमाची येथे ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीपणे सोडण्यात आले. हे एक पिल्लू हाती लागले, तरी बाकीच्या पिल्लांचे काय झाले असेल, हा प्रश्न बाकी राहतो. इतर ठिकाणी गावांमध्ये चौकशीअंती गिधाडे उडताना पाहिल्याचे व शेताच्या बांधावर बघितल्याचे सांगितले गेले. मात्र संपर्काअभावी त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहचू शकली नाही.
याच शंकेचा आधार घेऊन संस्थेने महाड ते गोरेगाव, लोणेरे परिसरातील गावांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम गिधाड संवर्धन जनजागृती अभियानातून करण्याचे ठरविले आहे. सिस्केप महाड, सह्याद्री मित्र महाड, म्हसळे वन खाते आणि स्थानिक पत्रकारांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे अशा प्रकारचा "गिधाड संवर्धन प्रकल्प" गेल्या दीड दशकापासून यशस्वीपणे राबविला जात आहे. तेथील वाढत्या गिधाडांच्या संख्येमुळे श्रीवर्धन, म्हसळा परिसरात आजमितीस हमखास गिधाडे आकाशात विहरताना दिसत आहेत. त्यामुळे गिधाड संवर्धनाच्या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
याच अभियानांतर्गत महाड ते गोरेगाव, लोणेरेपर्यंतच्या सर्व गावांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयीच्या संवर्धनाची जबाबदारी व जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी सायकल फेरी काढली जाणार आहे. "सायकल वापरा  व प्रदूषण टाळा" असा संदेशही लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.  या अभियानंतर्गत महाड विभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार, महाडमधील रंगसुगंधसारख्या सामाजिक संस्था,  त्या त्या गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व तरुण व महिला मंडळ अभियानात सहभागी होणार आहेत.
    या सायकल फेरीची सुरुवात २१ फेब्रुवारी २०१६ रोजी  सकाळी आठ वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकापासून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चवदार तळे, दासगाव, वीर, टेमपाले, लोणेरे, गोरेगाव पोलीस ठाणे या मार्गाने जाणाऱ्या या फेरीचा समारोप वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता होईल.
अधिक माहितीसाठी प्रेमसागर मेस्त्री (९६५७८६४२९०) किंवा योगेश गुरव (८८८८२३२३८३) यांच्याशी संपर्क साधावा.

Thursday, 11 February 2016

स्मार्ट एज्युकेशन च्या स्काॅलरशीप परिक्षेत रत्नागिरी च्या गोगटे काॅलेज चे विद्यार्थी चमकले

.रत्नागिरी:- स्मार्ट एज्युकेशन सातारा यांचे वतीने दरवर्षी घेण्यात येणा-या बारावी सायन्स मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्याची स्काॅलरशीप परिक्षा घेण्यात येते यंदाही माहे डिसेंबर 2015 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली या मध्ये सुमारे 6500 विद्यार्थी बसले होते या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम 10 विद्यार्थ्यांना रू 11 हजार ते रू 500/- स्काॅलरशीप देण्यात येते यंदाच्या परिक्षेत रत्नागिरी च्या गोगटे काॅलेज चे बारावी सायन्स मधील आदित्य कोळेकर व स्नेहा चव्हाण यांनी स्काॅलरशीप मिळवून पुन्हा एकदा कोकण चे नाव उज्ज्वल केले आहे
सदर स्काॅलरशीप वितरण गोगटे काॅलेज चे प्राचार्य डाॅ किशोर सुखटणकर यांचे हस्ते तर उपप्राचार्य डाॅ श्रीकृष्ण जोशीं, शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दामले तसेच स्मार्ट एज्युकेशन रत्नागिरी विभाग प्रमुख शकील गवाणकर व समन्वय क मानस अभ्यंकर यांचे उपस्थितित देण्यात आली.
रत्नागिरी त या उपक्रमाला विद्यार्थी व पालकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  बोर्डासारखा निकाल बोर्डाच्या निकाला आधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अजून किती अभ्यास करावा लागेल याचा अंदाज येतो त्यामुळे बोर्डाच्या परिक्षेत टक्केवारी वाढविण्यासाठी ते फारच उपयुक्त असल्याचे मत अनेक विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले.

Friday, 29 January 2016

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सव्वादोन वर्षांत - गडकरीरत्नागिरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण येत्या सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २९ जानेवारी २०१६) व्यक्त केली.
       
निवळी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करताना
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि अन्य मान्यवर.
रत्नागिरीजवळ निवळी येथे या महामार्गाच्या कशेडी ते लांजा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चौपदरीकरणाच्या या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी एक टक्का रक्कम खर्च करून हा महामार्ग हरित द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाण्यासाठी वनीकरण केले जाईल
, असेही श्री. गडकरी म्हणाले. सागरी महामार्गाला केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी याच समारंभात केली होती. तिची दखल घेऊन सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणाही श्री. गडकरी यांनी केली. या महामार्गासाठी भूसंपादन करताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांपेक्षाही अधिक मोबदला द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी समारंभात केली होती. त्याचा उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, "या महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ४० लाख ते एक कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे."
          रत्नागिरीकोल्हापूर आणि गुहागरकराड महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निवळी ते जयगड रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असेही श्री. गडकरी म्हणाले. जयगड येथे मेरीटाइम विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणादेखील त्यांनी केली.
          "विकास हा महामार्गातून होतो हे चांगले माहिती असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू करून कोकणासाठी विकासाचा महामार्ग खुला केला आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या १५-२० वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. मात्र आता चर्चेचे दिवस संपून कृतीचे दिवस सुरू झाले आहेत, हे नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आणि मंत्री झाल्यावर या महामार्गावरील १५ पुलांना तातडीने मान्यता दिली. आज या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही सुरू होत असल्याने हा महामार्ग भविष्यात विकासाचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली, त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १०२ पैकी ९९ गावांत भूसंपादन पूर्ण झाले असून संपूर्ण देशात महाराष्ट्र हे जमीन संपादनासाठी सर्वांत जास्त मोबदला देणारे राज्य आहे.
          नितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या कामास सुरुवातही झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट करण्याचे काम करतानाच नितीन गडकरी यांनी एक लाख कोटींची रस्त्यांची कामे एकट्या महाराष्ट्रात सुरू केली आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर असलेले "अमेरिका श्रीमंत आहे कारण येथील रस्ते चांगले आहेत" हे वाक्य गडकरी यांनी तंतोतंत अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
       अलीकडेच आम्ही बंदर विकासाचे नवे धोरण जाहीर केले, परंतु हे करताना केवळ बंदर विकासावरच लक्ष केंद्रित केले नसून पर्यटन व पर्यावरणपूरक विकासावर आमचा भर आहे. विशेषत: यामुळे कोकणासारख्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ज्या देशात समुद्रकिनाऱ्यांचा उत्तम पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विकास झाला आहे, तो भाग समृद्ध झालेला दिसतो. अशाच रीतीने कोकण किनारपट्टीचा विकास करणार आहोत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यानी यावेळी केंद्रीय पेटोलियम मंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की कोकणात ग्रीन रिफायनरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने तेथे पाच हजार एकरावर जंगल आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येणार असल्याने निसर्गाचे संवर्धन होणार आहे.
       पनवेल-महाड-पणजी असा ४७१ किलोमीटरचा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतून जातो. आज  ज्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले, ते ३ टप्पे असे - कशेडी खवटी ते परशुराम घाट (४३.८० कि.मी.), आरवली ते कांटे (४० कि.मी.) आणि कांटे ते वाकेड (५०.९० कि.मी.). या कामांसाठी सुमारे तीन हजार ५३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
       यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, खासदार हुसेन दलवाई, विनायक राऊत, अमर साबळे, आमदार हुस्नबानू खलिफे, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, आशीष शेलार, निरंजन डावखरे, संजय कदम, वैभव नाईक, प्रशांत ठाकूर त्याचप्रमाणे राजेंद्र महाडीक, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते.