Wednesday, 17 February 2016

गिधाड संवर्धनासाठी रायगडमध्ये रविवारी सायकल फेरी महाड - गिधाड पक्षांचे निसर्गातील अनन्यसाधारण महत्व ओळखून भारत सरकारने आणि इतर जागतिक संस्थांनी गिधाडाच्या संवर्धनासाठी देशांतर्गत विविध प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले. परंतु गिधाडांच्या ढासळत्या अधिवासाचा विचार केला जात नाही तसेच त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्याबाबत जनजागृतीसाठी येत्या रविवारी (ता. २१ फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यात सायकल फेरी काढली जाणार आहे.
सध्या पर्यावरणाच्या ढासळत्या स्वरूपाचा विचार करता अनेक पक्षी व प्राण्यांच्या प्रजातीवर संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शिवाय आजमितीसही प्राण्यांची चोराटी शिकार सुरूच आहे. खेड येथील गेल्या महिन्यात खवले मांजरांच्या खवल्यांच्या तस्करीचे उदाहरण समोर येते. तब्बल तीन पोती खवल्यांचा साठा जप्त करण्यात  आला. अशा अनेक धोक्यात आलेल्या प्रजातींविषयी प्रशासन व सामाजिक संस्थांबरोबर चर्चा करून कोणतेही ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न दिसत नाही. एकंदरीतच वन्य जीव आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम  होत आहे. गिधाड हाही असाच एक दुर्मिळ होत जाणारा पक्षी आहे. गिधाड म्हणजे मृत जनावरांवर उपजीविका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण येथील "सह्याद्री निसर्ग मित्र" तसेच महाड येथील "सह्याद्री मित्र" आणि "सिस्केप" या संस्थांच्या माध्यमातून गेल्या दशकात गिधाडांच्या वसतीस्थानांच्या नोंदींचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. आज गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची पाळी येते आणि त्यामुळे पहिल्याच वर्षात उडालेली व मोठी झालेली ही पिल्ले भुकेपोटी खाली पडतात. नंतर अन्नाच्या शोधार्थ त्याच परिसरात फिरत बसतात. गेल्या महिन्यामध्ये महाड परिसरात असेच एक गिधाडाचे पिल्लू सव या गावी शेतकरी संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या नजरेस पडले. पुढे सिस्केपच्या कार्यकर्त्यांनी तसेच महाड विभागीय वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला खाद्य देऊन मग नाणेमाची येथे ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीपणे सोडण्यात आले. हे एक पिल्लू हाती लागले, तरी बाकीच्या पिल्लांचे काय झाले असेल, हा प्रश्न बाकी राहतो. इतर ठिकाणी गावांमध्ये चौकशीअंती गिधाडे उडताना पाहिल्याचे व शेताच्या बांधावर बघितल्याचे सांगितले गेले. मात्र संपर्काअभावी त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहचू शकली नाही.
याच शंकेचा आधार घेऊन संस्थेने महाड ते गोरेगाव, लोणेरे परिसरातील गावांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम गिधाड संवर्धन जनजागृती अभियानातून करण्याचे ठरविले आहे. सिस्केप महाड, सह्याद्री मित्र महाड, म्हसळे वन खाते आणि स्थानिक पत्रकारांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे अशा प्रकारचा "गिधाड संवर्धन प्रकल्प" गेल्या दीड दशकापासून यशस्वीपणे राबविला जात आहे. तेथील वाढत्या गिधाडांच्या संख्येमुळे श्रीवर्धन, म्हसळा परिसरात आजमितीस हमखास गिधाडे आकाशात विहरताना दिसत आहेत. त्यामुळे गिधाड संवर्धनाच्या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
याच अभियानांतर्गत महाड ते गोरेगाव, लोणेरेपर्यंतच्या सर्व गावांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयीच्या संवर्धनाची जबाबदारी व जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी सायकल फेरी काढली जाणार आहे. "सायकल वापरा  व प्रदूषण टाळा" असा संदेशही लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.  या अभियानंतर्गत महाड विभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार, महाडमधील रंगसुगंधसारख्या सामाजिक संस्था,  त्या त्या गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व तरुण व महिला मंडळ अभियानात सहभागी होणार आहेत.
    या सायकल फेरीची सुरुवात २१ फेब्रुवारी २०१६ रोजी  सकाळी आठ वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकापासून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चवदार तळे, दासगाव, वीर, टेमपाले, लोणेरे, गोरेगाव पोलीस ठाणे या मार्गाने जाणाऱ्या या फेरीचा समारोप वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता होईल.
अधिक माहितीसाठी प्रेमसागर मेस्त्री (९६५७८६४२९०) किंवा योगेश गुरव (८८८८२३२३८३) यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a comment