Monday 16 November 2015

अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

 
   रत्नागिरी : दाभोळ  (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यावर्षीचा विभागीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरीत येत्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीला पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ही घोषणा केली.
      सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार दिले जातात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १२ मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत यावर्षीच्याराज्यस्तरीय आणि विभागीय पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार कोकण विभागीय पुरस्कारासाठी १७ प्रस्ताव आले होते. निवड समितीने त्यामधून अण्णा शिरगावकर यांच्या नावाची शिफारस केली होती. प्रतिष्ठानने ती स्वीकारली असून श्री. शिरगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
        प्रतिष्ठानच्या पुणे येथील कृषी व सहकार व्यासपीठातर्फे कथा जोतिबा सावित्रीची या विषयावर राज्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लीलाधर मोहन कूड (शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर आणि विश्वनाथ बिले (चिपळूण) यांना अनुक्रमे द्वितीय (७५० रु.), तृतीय (५०० रु.) आणि उत्तेजनार्थ (३०० रु.) या रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहेत.
        प्रतिष्ठानने गेल्या ऑगस्टमध्ये गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्ताने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, अण्णा शिरगावकर यांना तसेच शिक्षकांना द्यावयाच्या पुरस्कारांचे वितरण असे कार्यक्रम २५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार असल्याचे श्री. लिमये यांनी सांगितले.



        
    
      

Friday 13 November 2015

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत अभिषेक तेलंग यांचे गायन



        रत्नागिरी : खल्वायनची सलग २१७ वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १४ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. या सभेत सांगलीचे युवा गायक अभिषेक तेलंग यांचे गायन होणार आहे. ही सभा रत्नागिरीतील संगीतप्रेमी कै. संजय मुळ्ये स्मृती मैफल म्हणून होणार आहे.
     
अभिषेक तेलंग यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांची आई सौ. अंजली तेलंग यांच्याकडे झाले. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. हृषिकेश बोडस यांच्याकडे चालू आहे. गझल व सुगम संगीताचे शिक्षण पराग जोशी यांच्याकडे चालू आहे.
तेलंग यांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. सह्याद्री वाहिनी, आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अनेक स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत. अखिल भारतीय आकाशवाणी केंद्राच्या स्पर्धेत त्यांनी उपशास्त्रीय व सुगम स्पर्धेत प्रथम  क्रमांक मिळवला आहे. कोल्हापूर युवा महोत्सव, चित्रपट गीत स्पर्धांतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ई टीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे
सर्व रसिक श्रोत्यांनी तेलंग यांच्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे १५ वाङ्मयीन पुरस्कार जाहीर



मुंबईत २२ नोव्हेंबरला पंधराव्या साहित्य साहित्य संमेलनात वितरण




रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फेत कोकणातील साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या १५ विविध वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा पुरस्कार समितीचे निमंत्रक आणि कोमसापचे विश्वस्त अरुण नेरूरकर यांनी रत्नागिरीत शुक्रवारी (ता. १३ ) केली. या पुरस्कारांचे वितरण मुंबईत दादर येथे राजा शिवछत्रपती विद्यालयात पंधराव्या कोकण मराठी साहित्य संमेलात २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमांकाच्या विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.
पुरस्कार असे : (वाङ्मय प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव या क्रमाने)
कादंबरी - र. वा. दिघे स्मृती पुरस्कार- अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव)
कादंबरी- वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार- प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या)
कथासंग्रह- वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार- स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न)
कथासंग्रह- विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार- मनीष पाटील (माह्यावाल्या गोष्टी)
कविता वाङ्मय - आरती प्रभू स्मृती पुरस्कार- शशिकांत तिरोडकर (शशीबिंब)
कवितासंग्रह- वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार- रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठ्यावर)
चरित्र आत्मचरित्र- धनंजय कीर स्मृती पुरस्कार मोहन गोरे- (आनंदयात्रा)
चरित्र आत्मचरित्र श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार डॉ. भगवान कुलकर्णी- (ऑनरेबली अ‍ॅक्वीटेट)
ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार नीला सत्यनारायण- (टाकीचे घाव)
ललित गद्य- सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार- रेखा नार्वेकर (आनंदतरंग)
बालवाङ्मय- प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार- डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै असाही एक लोकनेता)
संकीर्ण वाङ्मय- वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार- डॉ. गोपीनाथ सारंग (झाकोळलेले प्राचीन कोकण)
संकीर्ण वाङमय- अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार- डॉ. विद्या जोशी (आरोग्यासाठी मनाचे श्लोक)
दृकश्राव्य कला, सिनेमा- भाई भगत स्मृती पुरस्कार -दिवाकर गंधे (चित्रगंध)
नाटक एकांकिका- रमेश कीर पुरस्कार- विनोद पितळे (बाय द वे)
समीक्षा ग्रंथ प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कारासाठी योग्य पुस्तक आलेले नाही.
----------













नीला सत्यनारायण

डॉ. भगवान कुलकर्णी

Thursday 12 November 2015

सच्चिदानंद शेवडे उलगडणार राणी लक्ष्मीबाईचा इतिहास



कोट येथे १९ ला जयंती : विविध कार्यक्रमांचे आयोजन

लांजा :  झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १७१ वी जयंती येत्या १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे थाटात साजरी केली जाणार आहे. यावेळी इतिहास आणि क्रांतिकारकांविषयीचे गाढे अभ्यासक  डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते राणी लक्ष्मीबाईचा वेधक इतिहास उलगडणार आहेत.

झाशीच्या राणीचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे आणि भागरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ रोजी जन्म झालेल्या मनकर्णिका ऊर्फ मनूताईने लहानपणीच नानासाहेब पेशवे, रावसाहेब यांच्यासह तत्कालीन युद्धकलेसाठी आवश्यक असलेले तलवार, दांडपट्टा, बंदुक चालवणे, घोडदौड असे शिक्षण घेतले. झाशी संस्थानचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला आणि तिला झाशीची राणी असे संबोधले जाऊ लागले. त्यांना झालेल्या पुत्राचे अवघ्या तिसऱ्या महिन्यात निधन झाले. त्या धक्क्याने अल्पावधीत त्यांच्या पतीचेही निधन झाल्याने राणीकडे झाशीच्या राज्याची जबाबदारी आली. राणीने कर्तबगारीने राज्याचे रक्षण केले, मात्र ब्रिटिशांच्या आक्रमणापुढे तिचा निभाव लागू शकला नाही. भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या म्हणजे १८५७ च्या संग्रामात झाशीच्या राणीने मोठा पराक्रम गाजविला. तिच्या या पराक्रमाची आठवण म्हणून लांजा तालुक्यात स्मारक उभारण्याचे ठरवून कोट आणि कोलधे येथील ग्रामस्थांनी समिती स्थापन केली आहे. या समितीतर्फे येत्या १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे राणीच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे राणीचा संघर्ष आणि तिने दिलेल्या लढ्याचा संघर्षमय इतिहास उलगडून सांगणार आहेत. त्यांच्या व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे.
      दरम्यान, जयंतीच्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात राणीचे स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चासत्र होणार आहे. राणीची ऐतिहासिक आणि कौटुंबिक माहिती असणारे अभ्यासक, त्यांच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्वांना यावेळी निमंत्रित करण्यात आले आहे.
जयंतीच्या या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच कृष्णा आगरे, दिनकर नेवाळकर, अॅड. विलास कुवळेकर इत्यादींचा समावेश असलेल्या राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

Wednesday 11 November 2015

खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल कल्याणी पांडे रंगविणार




रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल मुंबईतील गायिका कल्याणी पांडे-साळुंके रंगवणार आहेत. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी ५ वाजता ही मैफल गुरुकृपा कार्यालयात होईल.
सौ. कल्याणी पांडे-साळुंके एमए (संगीत) असून प्राथमिक शिक्षण वडील कै. पुरुषोत्तम पांडे यांच्याकडे आणि त्यानंतर कै. पं. वसंतराव कुलकर्णी (आग्रा घराणे) यांच्याकडे झाले. कै. डॉ. अशोक रानडे यांच्याकडे सलग १८ वर्षे त्यांनी गायनाचे धडे घेतले. सध्या पं. अरुण कशाळकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण चालू आहे. कै. डॉ. सरला भिडे आणि सौ. मीनाक्षी मुडबिद्री यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
सौ. साळुंके यांना साजन मिलाप, मेरिट स्कॉलरशिप अशा स्कॉलरशिप मिळाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र टाइम्सचा २०१३ चा कोहिनूर म.टा. पुरस्कार अजंठा या चित्रपटासाठी मिळाला आहे. साम मराठी, दूरदर्शन, झी मराठी, ई टीव्ही, सह्याद्री इत्यादी दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. भारत व भारताबाहेरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अनेक नाटके, चित्रपटासांठी त्यांनी पार्श्वगायन केले. त्यांची व्हर्टिकल नोट नावाची स्वत:ची संगीत संस्था आहे.
खल्वायनच्या दिवाळी पाडवा मैफलीत त्यांना तबलासाथ प्रसाद करंबेळकर व हार्मोनियमसाथ अनंत जोशी करणार आहेत. कार्यक्रमाची प्रवेशिका ५० रुपये असून कार्यक्रमाआधी १ तास ती कार्यक्रमस्थळी उपलब्ध होईल. मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.