Monday 14 September 2015

विनायक बापट पूजेसाठी पुरवितात 21 प्रकारची पत्री

पंधरा वर्षांचा उपक्रम – पर्यावरणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न


अगस्ती
रत्नागिरी – इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देतानाच येथील पर्यावरणप्रेमी विनायक बापट गणपतीच्या पूजेसाठी लागणारी 21 प्रकारची पत्री जमवून अनेकांना मागणीनुसार त्याचे वाटप करत आहेत. उत्सवापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील जंगलांमध्ये फिरून गोळा केलेली ही पाने ग्राहकांना पुरविण्याचा त्यांचा हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.
गणेशोत्सव आता अगदी काही तासांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी लगबग सुरू झाली आहे. चित्रशाळांमधून गणेशमूर्ती घरोघरी जाऊन पोहोचत आहेत. वेळात वेळ काढून घरे सजविली गेली असून पूजासाहित्य, सजावट आणि आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू आहे. या साहित्यामध्ये पत्रीला म्हणजे विविध झाडांच्या पानांना खूपच महत्त्व आहे. मधुमालती, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेरी, रुई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या 21 झाडांची पत्री गणपतीला वाहिली जाते. शहरात आणि ग्रामीण भागातही गणपतीचे पूजन करताना वाहिल्या जाणाऱ्या विविध वनौषधींची ही पाने अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे एक तर पत्री वाहिली जात नाही किंवा मिळतील तेवढ्याच झाडांची पाने वाहिली जातात.
अनेक झाडांची जोपासना करणारे रत्नागिरीचे पर्यावरणप्रेमी विनायक या साऱ्या वनौषधींची माहिती अनेकांना सांगत असत. त्यातूनच ही सारी पत्री जमवून देण्याची मागणी त्यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या एका परिचिताने केली. हाच धागा पकडून श्री. बापट यांनी विविध ठिकाणी फिरून पत्री जमवून ती अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचे ठरविले. सर्वच झाडांची त्यांना चांगलीच ओळख असल्याने ती झाडे मिळवून पत्री गोळा करण्यासाठी त्यांनी रत्नागिरी शहराच्या अनेक भागांसह पावस, कोळंबे, जयगड परिसरात भटकंती केली. जंगलांमधून ही झाडे शोधून काढली आणि पत्री जमविली. पहिल्या वर्षी दहा संच त्यांनी तयार केले. त्यापैकी केवळ चार संचांनाच मागणी आली. त्यानंतर मात्र हळूहळू दरवर्षी त्यांच्याकडे पत्रीची मागणी वाढू लागली. यावर्षी तर त्यांनी पाचशेहून अधिक संच तयार केले आहेत.
शमी
महिनाभर भटकंती करून पाने जमविणे, ती व्यवस्थित आणि ताजी राहण्यासाठी पाण्यात ठेवणे, वाया गेलेली पाने काढून टाकून त्यांची निगा राखणे, भाद्रपद महिना सुरू होताच एकवीस प्रकारच्या पत्रीचे संच तयार करणे अशी सर्व किचकट व्यवधाने श्री. बापट अत्यंत आनंदाने पार पाडतात आणि 40 रुपये एवढ्या अत्यंत अल्प मोबदल्यात ही पत्री मागणीनुसार उपलब्ध करून देतात. आरास आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती पाहिल्या, तर श्री. बापट आकारत असलेली किंमत अत्यंत नगण्यच वाटते. पत्रीच्या पिशव्या भरून त्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी श्री. बापट यांना कुटुंबीयांबरोबरच मित्रमंडळी आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथूनही त्यांचा एक स्नेही आवर्जून मुद्दाम उपस्थित राहतो. परस्परस्नेह वाढावा आणि पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, लोकांनी निसर्ग समजून घ्यावा, दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे लोकांनी संरक्षण करावे, हाच आपला प्रयत्न असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
(विनायक बापट यांचा संपर्क क्र. – 9423048991)
..................
विविध 21 प्रकारची पत्री एकत्रित करून ती बांधण्याचे काम श्री. बापट यांच्या घरी सुरू आहे.


Thursday 10 September 2015

मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत प्रथम

नवनिर्माण महाविद्यालय स्पर्धा : कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे प्रथम


दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना
शीला हेगशेट्ये
, सोबत प्राचार्य सुकुमार शिंदे, प्रा. टेकाळे.

रत्नागिरी – येथील नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा) हिने, तर कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

गेल्या ४ सप्टेंबर २०१५ रोजी नवनिर्माण महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. राज्यस्तरीय महाविद्यालयीन, तर जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा), द्वितीय - श्रेयस सनगरे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय - पद्मश्री वालावडे (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - विवेक चित्ते (एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके कॉलेज, नाशिक), श्रुती भिंगार्डे (एसीएस कॉलेज, लांजा). सांघिक चषक - एसीएस कॉलेज, लांजा.
कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - अश्विनी कांबळे (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), द्वितीय - कोमल रावराणे (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय- शलाका वारेकर (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - तैबा रफिक बोरकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), गौरी रहाटे (साडवली, ज्यु. कॉलेज), सांघिक चषक – नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी.
विजेत्यांना रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य सुकुमार शिंदे, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. रत्नागिरीसह सातारा, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्पर्धकांचा त्यात समावेश होता.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविधांगी वाचन करून आपल्या ज्ञानात वाढ केली पाहिजे. वक्तृत्व कलाही महत्त्वाची आहे. वाचन करून त्यावर चिंतनातून आपली मते तयार केली, तर वक्तृत्वाला झळाळी प्राप्त होते.
माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये म्हणाले, समाजातील चुकीच्या गोष्टींवर वक्त्यांनी बोलून समाजाचे प्रबोधन करावे. अभ्यासाला महत्त्व देऊन विधायक गोष्टींच्या निर्मितीसाठी विद्यार्थीदशेतूनच सक्रिय व्हावे.
स्पर्धेसाठी प्रमोद कोनकर, प्रा. नामदेव कुंभार, सौ. स्नेहा साखळकर, डॉ. आशा जगदाळे, प्रा. राजशेखर दवणे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन टेकाळे यांनी आभार मानले.
.............
मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, प्राचार्या सुकुमार शिंदे, संचालिका सीमा हेगशेट्ये, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये, परीक्षक प्रमोद कोनकर, राजशेखर दवणे,  प्रा. आशा जगदाळे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई आदी.
................................


Monday 7 September 2015

`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन

कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे पुस्तकाची निर्मिती


  मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी लिहिलेल्या `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे नुकतेच औरंगाबाद येथे प्रकाशन झाले.  पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध उपायांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांची जलविषयक परिषद औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी डॉ. चितळे यांचे अभीष्टचिंतनही करण्यात आले. या समारंभातच `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे प्रकाशन जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
       `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाची अक्षरजुळणी,  संकलन आणि संपादन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस या संस्थेने केले आहे. पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पुस्तक वितरण संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. रत्नागिरीत कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (9822255621) तसेच मॅजेस्टिक बुक हाऊस (पुढारी भवन, माळ नाका, रत्नागिरी) येथेही पुस्तक उपलब्ध होईल.
औरंगाबाद येथे `झेलू पाऊस ओंजळीत`चे प्रकाशन
----------------------------------------------


प्रकाशन समारंभानंतर जलवर्धिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलसाठवण
टाकीची पाहणी डॉ. चितळे यांनी केली. त्यांना माहिती देताना उल्हास परांजपे
......................................................................

`झेलू पाऊस ओंजळीत`ची झलक













Thursday 3 September 2015

`गीतारहस्य` ग्रंथाच्या उपयुक्ततेची तोंडओळख

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाच्या शताब्दीच्या निमित्ताने रत्नागिरीत दोन दिवसांचे चर्चासत्र 1 आणि 2 ऑगस्टला पार पडले. सांगोपांग चर्चा करण्याचा संयोजकांचा विचार असला, तरी प्रत्यक्षात केवळ तोंडओळखच झाली. आजच्या स्थितीत ग्रंथाची उपयुक्तता किती आहे, याबाबत फारच थोडे मुद्दे मांडले गेले. तरीही वैचारिक ग्रंथावर अशी चर्चा होणेही आवश्यक होतेच.
....................
बीजभाषण करताना डॉ. सदानंद मोरे. सोबत प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये,
प्रकाश (बापू) काणे, अॅड. मिलिंद पिलणकर
लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या `गीतारहस्य’ या ग्रंथाची छापील आवृत्ती प्रसिद्ध झाली, त्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरीत नुकतेच दोन दिवसांचे एक चर्चासत्र पार पडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभाग आणि गीता मंडळाने चर्चासत्राचे आयोजन केले होते. ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देण्यासाठी चर्चासत्र आयोजित केल्याचे संयोजकांचे म्हणणे असले, तरी ग्रंथाचा विषय आणि आवाका पाहता सांगोपांग परिचयासाठी महिनाभराचा काळसुद्धा अपुराच ठरेल. तरीही या ग्रंथावर चर्चा करणारे कार्यक्रम फारसे कोठे झाले नाहीत. त्यामुळे लोकमान्यांच्या जन्मभूमीत त्यांनी जन्माला घातलेल्या वैचारिक ग्रंथाविषयीचे चर्चासत्र आयोजित करून मोठे औचित्य साधले गेले.
घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चर्चासत्राचे बीजभाषण केले. त्यांनी साहित्यिक मूल्य या दृष्टिकोनातून गीतारहस्याची थोरवी सांगितली. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या लेखी काव्याला साहित्यप्रकार म्हणून मान्यता नव्हती. सुमारे सातशे ते आठशे वर्षे मराठीत ओव्या, अभंग इत्यादी प्रकारचे काव्यच लिहिले गेले. गद्य साहित्य लिहितानाही वैचारिक परिशीलन, अन्य भाषांमधील साहित्याचे संदर्भ, तुलनात्मक विचार मांडणाऱ्या साहित्यालाच मान्यता होती. हे सर्व निकष गीतारहस्याने पूर्ण केले. न्या. रानडे यांनी मुंबई विद्यापीठात मराठी भाषेला मान्यता मिळविण्यासाठी जे प्रयत्न केले, तेव्हा गीतारहस्याला साहित्य म्हणून मिळालेली मान्यता उपयुक्त ठरली. मराठीतील पहिली पद्यात्मक दीर्घ रचना म्हणजे बाराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर आधारित होती, तर मराठीतील पहिले गद्य वाङ्मय ठरलेला विसाव्या शतकात लिहिला गेलेला गीतारहस्य ग्रंथही गीतेवरच आधारित होता, हेही श्री. मोरे यांनी स्पष्ट केले. हा ग्रंथ गीतेवरचे भाष्य करणारा असला, तरी भारताच्या पारतंत्र्याविरुद्ध मराठी समाजाला कार्यप्रवण करण्याचा टिळकांचा अंतःस्थ हेतू होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या वैचारिक विकासातला`गीतारहस्य’  हा फार मोठा टप्पा असल्याचे साहित्य संमेलनाध्यक्षांनी सांगितले. आगरकरांसारखे विद्वान पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे नीतिशास्त्र मांडत असताना टिळकांनी मात्र गीतेच्या आधारे भारतीय नीतिशास्त्र श्रेष्ठ असल्याचे वारंवार ठामपणे सांगितले. गीता म्हणजे निवृत्ती सांगणारा नव्हे, तर कार्यप्रवण करणारा ग्रंथ आहे, हेच टिळकांनी पटवून दिले. त्या काळात एकाच वेळी टिळकांना गीतेतील कर्मसंन्यासाचा पारंपरिक विचार मांडणारे, पाश्चात्त्य विचारांचा पुरस्कार करणारे आणि पारंपरिक विचार कालबाह्य झाल्याचे सांगणारे अशा तिहेरी विचारसरणीचा प्रतिकार करून वेगळा विचार मांडायचा होता. तो टिळकांनी मांडला. म्हणूनच आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या तत्त्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ आजच्या काळातही उपयुक्त असल्याचे डॉ. मोरे म्हणाले.
डॉ. मोरे यांच्या बीजभाषणाने ग्रंथाविषयीचे कुतूहल वाढविले, मात्र दोन दिवसांतल्या सहापैकी एखाददुसऱ्या वक्त्यानेच सामाजिक आणि राजकीय स्थितीविषयी ग्रंथात काय सांगितले आहे, य़ाचे काही उल्लेख केले. उर्वरित वक्त्यांनी ग्रंथातील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरच अधिक भर दिला. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये यांनी `लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य` या विषय़ावरचा आपला निबंध सादर केला. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मेळ साधूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. तेच गीतेचे रहस्य असून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना लोकमान्यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे मत त्यांनी मांडले. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी टिळकांच्या आयुष्यातील विविध टप्पे, त्यांनी केलेला अभ्यास, चिंतन आणि लेखनाविषयीचे पुरावे दिले. टिळकांची भाषणे, सामाजिक उपक्रम आणि राजकीय चळवळींचा मागोवाही श्री. शिधये यांनी घेतला. गीतेचे तत्त्वज्ञानच त्यांना वेळोवेळी अंगीकारल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती आणि भोगवादामुळे निर्माण होणारा संदेह दूर करण्यासाठी टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. `आद्य शंकराचार्य आणि टिळक` या विषयावरील निबंध प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी सादर केला. त्यामध्ये त्यांनी आद्यशंकराचार्य आणि टिळक यांच्यामधील साम्य आणि भेद स्पष्ट केले. त्या दोघांच्या गीतेविषयीच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे मानले जात असले, तरी प्रत्यक्षात गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दोघांच्याही भूमिका परस्परपूरकच आहेत. गीतेचा व्यावहारिक उपयोग टिळकांनी सांगितला, जो आजही कर्माला म्हणजेच कार्य करत राहण्याला प्रवृत्त करतो, असे त्यांनी सांगितले. अखेरच्या सत्रात डॉ. कल्याण काळे यांनी `कर्मविपाक आणि कर्मयोग` या विषयावरचा निबंध सादर केला. भारतीय लोक अजूनही पूर्वजन्माशी आणि आपल्या कर्माशी संबंध लावतात. यातील वस्तुस्थितीचा अभ्यास टिळकांनी गीता, महाभारत, मनुस्मृती आणि वेदवाङ्मयाचा शोध घेऊन केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. पापपुण्याच्या कल्पना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, कर्माचे फळ इत्यादींची माहिती देऊन सविस्तर विवेचन त्यांनी केले.
दुसऱ्या दिवशी चिपळूण येथील संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी अभ्यासक म्हणून लोकमान्य टिळकांची जगाला कशी ओळख होती, याबाबतच्या निबंधाचे वाचन केले. भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्यातांबोळ्यांचे पुढारी मानले जाणारे लोकमान्य टिळक जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना तसेच संस्कृत पंडितांना वेदवाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ओळखत होते, असे त्यांनी सांगितले. अनेक लेखकांची मते उद्धृत करून त्यांनी टिळकांच्या अभ्यासू वृत्तीचा आढावा घेतला. पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय वाङ्मयातील वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा इत्यादींचाही टिळकांनी सखोल अभ्यास केला. बौद्ध आणि जैन धर्मांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला. एवढ्या चिंतनाचा त्यांना मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्य लिहिताना उपयोग झाला. तेथे त्यांनी फ्रेंच, जर्मन, पाली भाषांचा आणि त्या त्या भाषांमधील मिल, स्पेन्सर, कान्ट, ग्रीन इत्यादी तत्त्ववेत्त्यांच्या चारशेहून अधिक पुस्तकांचा अभ्यास केला. गीतारहस्य हा ग्रंथ उत्तम अभ्यास कसा करावा, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे, असेही श्री. चितळे यांनी सांगितले. ``भगवद्गीतेसाठी टिळकांनी संसारशास्त्र हा सुंदर शब्द प्रथम वापरला```, असा संदर्भ देत श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील कर्मयोगशास्त्राविषयी विवेचन केले. त्या म्हणाल्या, ``योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निर्णय घेण्यासाठी गीता उपयुक्त ठरते. गीता हे नीतिशास्त्र आणि कोणत्या प्रसंगी कसे वागावे, हे सांगणारे व्यवहारशास्त्र आहे, असे टिळकांनी सांगितले. आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. कर्माचे फळ केव्हा आणि कसे मिळेल, हे सांगणे अवघड असते.`` पौराणिक आणि आधुनिक काळातील कथा आणि प्रसंग सांगून आपले मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट केले. श्रीमती बिवलकर यांचे बंधू कणकवलीचे डॉ. विद्याधर करंदीकर यांनी `गीतारहस्यातील पुरुषार्थ विचार आणि वर्णाश्रमविचार` या विषयावरचा आपला निबंध विविध उदाहरणांसह सादर केला. निवृत्ती हाच गीतेचा संदेश असल्याचे मानले गेल्याने प्रवृत्तीकडे कल असलेल्या, पुरुषार्थी, पराक्रमी समाजाची निर्मिती झाली नाही. त्यामुळेच भारत पारतंत्र्यात ढकलला गेला, अशी त्यांची खंत होती. तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेता थेट शब्दांत गीतारहस्यामध्ये ती खंत आली नसली, तरी ती जाणवावी अशा अनेक जागा गीतारहस्यात असल्याचे डॉ. करंदीकर यांनी स्पष्ट केले.
       समारोप समारंभात पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी, शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असलेल्या आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची अधिक गरज असल्याचे मत मांडले. ``शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, औद्योगिक प्रश्नांबाबत पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे. मात्र ज्ञानाच्या अभिवृद्धीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत, असे टिळकांनी म्हटले होते. त्यांचे ते विधान आजही खरे आहे. त्यामुळे आजचा समाज कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करील, म्हणून वाट पाहतात. बोगस महाराज आणि भोंदू साधू गल्लोगल्ली निर्माण होत आहेत. समाज त्यांच्या भजनी लागत आहे. खरा ईश्वर लोकांनी ओळखलाच नाही. अशा स्थितीत समाजात शिस्त आणि जबाबदारीचा अभाव जाणवतो. यावेळी वर्तमानात जगा, सतत कार्यरत राहा, असा संदेश देणाऱ्या लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या अभ्यासाची आणि अनुकरणाची खरी गरज आहे``, असे त्यांनी सांगितले. हा ग्रंथ निवृत्तीचा नव्हे, तर सतत कार्यरत राहण्याचा संदेश देत असल्याने तो निवृत्तीच्या काळात नव्हे, तर तरुणांनी वाचायचा हा ग्रंथ आहे, हे श्री. सोमण यांचे मत पटल्याचे चर्चासत्राला उपस्थित असलेल्या मोजक्या तरुणींनी व्यक्त केले. राजकीय पक्षांचे पुढारी, सामाजिक संस्था, संघटनांनी या चर्चासत्राकडे फारसे लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती जाणवली.


-    प्रमोद कोनकर, रत्नागिरी