रत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर
महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे यांचा कोकण
इतिहास परिषदेने दुहेरी सन्मान केला आहे. त्यांच्या पुस्तकाला परिषदेने पुरस्कार जाहीर
केला असून या महिनाअखेरीला होणाऱ्या परिषदेच्या अधिवेशऩातील एका सत्राचे अध्यक्षपदही
त्यांना देण्यात आले आहे.
कोकणविषयक आणि कोकणातील इतिहास संशोधकांना
चालना देण्यासाठई २०१० साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रा.
कांबळे यांनी पुढाकार घेऊन परिषदेचे पहिले अधिवेशन रत्नागिरी २०११ साली भरविले.
त्यानंतर ठाणे, गोवा, रायगड, शहापूर आणि ठाणे येथे अधिवेशने भरविण्यात आली.
परिषदेचे सातवे अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी वैभववाडी येथे भरणार आहे. परिषदेतर्फे
संशोधनकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरातील संधोथनात्मक लेखनाला पुरस्कार
देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. कांबळे यांच्या मराठ्यांच्या
इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या पुस्तकाची निवड करण्यात आली असून
वैभववाडीतील अधिवेशनात तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात
प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीन सत्रांमध्ये इतिहासविषयक चर्चा होणार
असून त्यापैकी मध्ययुगीन चर्चासत्राचे अध्यक्षपद प्रा. आर. एच. कांबळे भूषविणार
आहेत.
प्रा. डॉ. कांबळे यांनी आतापर्यंत राज्य,
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३० परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत.
त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या ३४ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई
विद्यापीठाकरिता स्थानिक इतिहास या विद्याशाखेत त्यांनी ८ संशोधन प्रकल्प सादर
केले असून एका प्रकल्पाला विद्यापीठाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठांकरिता त्यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली
आहेत. इतिहासविषयक विविध चर्चासत्रे, व्याख्यानमालांमध्येही त्यांनी भाग घेतला
असून शोधनिबंधांचे संपादन आणि प्रकाशनही केले आहे. मोडीलिपी प्रशिक्षण, दुर्ग अभ्यास
आदी वर्गांचे आयोजनही त्यांनी केले असून इतिहास या ज्ञानशाखेत आपला वेगळा ठसा उमटवला
आहे.
कोकण इतिहास परिषदेने त्यांच्या कार्याची
उचित दखल घेऊन पुस्तकाला पुरस्कार आणि एका चर्चासत्राचे अध्यक्षपद देऊन केलेल्या दुहेरी
सन्मानाबद्दल डॉ. कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.