Wednesday, 8 January 2020

लांजा नगर पंचायतीतील सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे

साप्ताहिक `कोकण मीडिया`च्या 3 जानेवारी 2020 च्या अंकात ९ जानेवारी २०२० रोजी होणार असलेल्या लांजा नगर पंचायत निवडणुकीतील  प्रभागनिहाय उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ती यादी प्रसिद्ध करताना अनवधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढविणारे सहा उमेदवार अपक्ष असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उमेदवार असे आहेत -
प्रभाग 3 - मानसी मनोज कोपरे
पान 6 - अनिल सीताराम शिंदे
प्रभाग 10 - दाजी पितांबर गडहिरे
प्रभाग 12 - शमा यासिन थोडगे
प्रभाग 14 - रूपाली मुरलीधर निवळे
प्रभाग 15 - मारुती गोपाळ गुरव
या उमेदवारांच्या नावापुढे कंसात ते अपक्ष असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. वास्तविक ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याबद्दल दिलगीर आहोत. कृपया संबंधित उमेदवार आणि मतदारांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
लांजा नगर पंचायत निवडणूक सुधारित यादी



Saturday, 7 December 2019

तुरळ येथे १५ डिसेंबरला केबीबीएफची डिस्कनेक्ट टू कनेक्ट ग्लोबल मीट

रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांचा मेळावा येत्या १५ डिसेंबर रोजी तुरळ (ता. संगमेश्वर) येथील मामाचे गाव पर्यटक निवासस्थानी होणार आहे. डिस्कनेक्ट टू कनेक्ट अशी या मेळाव्याची संकल्पना आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक तसेच व्यावसायिक देवाणघेवाण करणे आणि त्यातून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही संस्था काम करते. रत्नागिरीत या संस्थेचे कार्य गेली तीन वर्षे सुरू असून जिल्ह्यातील व्यावसायिक ज्ञातिबांधवांच्या व्यवसाय-उद्योगाला चालना मिळावी, यासाठी व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधील कऱ्हाडे व्यवसायिक ज्ञातिबांधव मेळाव्यासाठी एकत्र येणार असून सर्वांना आपल्या व्यवसायाची माहिती सादर करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेचे विविध उपक्रम, त्यातून होणारे व्यावसायिक लाभ याची माहितीही यावेळी मिळेल.
नेहमीच्या व्यवसायापेक्षा व्यावसायिकांनी इतर व्यवसायांकडेही वळावे, या दृष्टिकोनातून डिस्कनेक्ट टू कनेक्ट या संकल्पनेवर यावर्षीचा मेळावा आधारलेला आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा रस्टिक हॉलिडे (मामाचा गाव, मु. पो. तुरळ, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. मेळाव्याचे मुख्य प्रायोजकत्व ठाण्यातील जोशी एन्टरप्रायझेस यांनी स्वीकारले असून पितांबरी प्रॉडक्टस सहप्रायोजक आहेत. पौरोहित्य ते आयटी क्षेत्रापर्यंत आणि घरगुती उद्योगांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत कोणताही व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ज्ञातिबांधवांना या ग्लोबल मीटमध्ये सहभागी होता येईल.
मीटसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या १० डिसेंबरपूर्वी सुहास ठाकूरदेसाई (९८२२२९८०८५९) किंवा प्रशांत पाध्ये (९४२२६३५०८४) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Saturday, 30 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी
दिवस दहावा (नाटक अकरावे आणि अंतिम) (२९ नोव्हेंबर २०१९)

............

५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी समारोप झाला. त्या दिवशी सादर झालेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचा हा परिचय...
...........

पूर्वायुष्यातील आठवणींनी व्याकुळ झालेला संध्यासमय

दिवेलागणीची वेळ, मेघा वेदपाठक - प्रसिद्ध समाजसेविका - हॉलमधल्या आरामखुर्चीत बसली आहे. ‘संसार है इक नदिया’ या गीताचे बोल ऐकू येत आहेत. त्या बोलांबरोबर मेघाचं मन मागे जातं - खूप खूप मागे. विचारात हरवलेल्या स्थितीत ती खिडकीपाशी जाऊन उभी राहते आणि अभावितपणे हाक मारते - श्रीऽऽ!
श्री!.... श्रीकांत गडकरी....! मेघा वेदपाठकचा पहिला जीवनसाथी. अवघ्या सहा महिन्यांचा संसार, नंतर घटस्फोट! दोघांचे रस्ते वेगवेगळे. मेघा समाजकार्यात रमली, श्री कविता आणि साहित्यात. मेघाचं समाजकार्य ‘एनजीओ’च्या माणसांबरोबर, श्रीची कविता साहित्यरसिकांबरोबर. मेघा काम करत असलेल्या संघटनेशी खूप माणसांचा संबंध. त्यातल्याच वेदपाठक नावाच्या कार्यकर्त्यासोबत तिचं लग्नही होतं. एक मुलगी होते त्यांना - श्वेता तिचं नाव.
वेदपाठकचा एका अपघातात मृत्यू होतो. मग मायलेकी दोघींचंच कुटुंब. तिकडे श्रीकांतचंही एकट्याचं आयुष्य सुरू आहे. मेघाला खूप उशिरा कळलं - श्रीबरोबर राहणारा त्याचा मुलगा शेखर हा दत्तकपुत्र असल्याचं. मधल्या काळात बरीच वर्षं संपर्कच नाही ना! कसा होणार? एकमेकांचा सहवासच नको झालेला!
मेघा आणि श्री.....! श्रीच्या कवितेनं त्यांना एकत्र आणलं. मग भेटीगाठी. प्रेमाचे धागे जुळतात. रोज सायंकाळी भेटण्याचं संकेतस्थळ पक्कं होतं. तिच्या भेटीसाठी आतुरलेला श्री संकेतस्थळी जाऊन बसतो. तिची वाट पाहत. तिचं उशिरानं येणं. संघटनेचं काम आटोपून येतं असते ती; पण त्या प्रतीक्षेतही श्रीला एक अनामिक आनंद मिळत असतो. अधूनमधून फिरायलाही जातात ती. पाण्यात पाय सोडून श्री बसलाय, ती मोकळ्या हवेत, गिरक्या घेत निसर्गाचा सहवास अनुभवतेय.....! छान चाललेलं असतं सगळं.
पण तिला होणारा उशीर ठरलेलाच. रोजचाच. इतका की ‘वाट बघून भेटण्याची हुरहुर संपली की ती येणार’ असं श्रीला वाटू लागतं. लग्नाआधीचेच हे दिवस. त्याला असं वाटतं, ही भविष्यातल्या घटनांची चाहूल तर नव्हे? एकदा तर ती बोलून जाते - आपले रस्ते वेगळे, आपण लग्नाच्या बंधनात न अडकणं बरं!
तरीही होतं. अगदी थोड्या दिवसांतच मागचा अंक नव्याने सुरू होतो. त्यानं सायंकाळी फिरायला जाण्याचं ठरवावं, तिनं उशिरा यावं. त्यानं मित्रमंडळींसोबत पिकनिकला जायचं नक्की करावं, तिनं संघटनेच्या सभेचं कारण पुढे करत नकार द्यावा. रोज रोज संध्याकाळी फिरण्यात, आइस्क्रीम खाण्यात तिला रस नाही. अन् इतरांची घरं सावरताना आपला संसार मोडतोय याची श्रीला चिंता वाटतेय. त्याची कविता निखळ आनंद देणारी, तिची समाजसेवा मनाला समाधान देणारी, निःस्वार्थ; पण समाधान देणाऱ्या निःस्वार्थ समाजसेवेचाही एक कैफ असतो, एक धुंदी असते. त्यात मेघा हरवलीय. त्यातच संघटनेच्या कामानिमित्त वरचेवर घरी येणारा वेदपाठक.... त्याचं तर नाव नको श्रीला. शेवटी व्हायचं तेच...... घटस्फोट!
पंचवीस वर्षांपूर्वीचा तो पट मेघा आणि श्री या दोघांच्याही डोळ्यांपुढून वरचेवर सरकत असतो. अनेकवार येणाऱ्या ‘फ्लॅशबॅक’मधून. श्रीचा मुलगा शेखर नि मेघाची मुलगी श्वेता एकाच बँकेत नोकरीला. त्यांचे प्रेमसंबंध जुळतात. त्यांना एकमेकाच्या घरची परिस्थिती - म्हणजे त्या दोघांच्या अलग होण्यापुरतीच - ठाऊक होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मेघा नि श्रीला होत जाते. त्यांची संमतीही असते; पण मेघा नि श्री इतक्या वर्षांनी पुन्हा जवळ येत आहेत हेदेखील त्या मुलांना जाणवतं. आपलं नातं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा राहतो. इतकी वर्षं परस्परांमधून दूर राहिलेली ती दोघं - एकत्र आली पाहिजेत असं दोघांनाही मनोमन वाटत असतं.
शेखर हा श्रीचा दत्तकपुत्र. तो सात वर्षांचा असताना त्याच्या आजारी आईला श्रीनं आधार दिला. दोन वर्षांनी ती जग सोडून गेली. श्रीनं शेखरला दत्तक घेतलं होतं. संसार न थाटता सच्चेपणे राहून आपल्याला आधार देणाऱ्या श्रीबद्दल शेखरच्या मनात असणारा नितांत आदर नि सुस्वरूप श्वेताचं ताजं टवटवीत प्रेम यांच्या चिमटीत सापडलेला शेखर श्वेतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. विचारान्ती श्वेताही तसाच निर्णय घेते. घरी आलेल्या श्रीचं स्वागत करून आपला निर्णय त्यांना सांगते.
श्री आणि मेघानं समजावल्यावर शेखर नि श्वेता यांची नव्या जीवनातलं पहिलं पाऊल टाकण्याची तयारी होते. मेघाच्या आरामखुर्चीमागे तिचे हात हातात घेऊन उभा राहिलेला श्रीकांत - नव्हे, त्याचा आभासच तो...!
मेघा ‘फ्लॅशबॅक’मधून बाहेर येते. पडदा पडतो.
आभार सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचं हे कथानक. मनोहर सुर्वे यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. या नाटकाबरोबरच एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा समारोप झाला.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

Friday, 29 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ
दिवस नववा (नाटक दहावे) (२८ नोव्हेंबर २०१९)

............

`सभ्य` जगाच्या जखडणाऱ्या सीमारेषा प्रभावी रीतीनं दाखवणारं नाटक

५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील दहावे नाटक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. धुआँनावाचे हे नाटक गणेशगुळे इथल्या अजिंक्यतारा थिएटर्सने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
...............
मुंबापुरीतल्या एका लहानशा रस्त्याचा पदपथ. रस्त्याशेजारच्या मोठ्या रुग्णालयाच्या तळाशी उभी राहिलेली मुंबई स्टाइलची घरं. कोपऱ्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहाचं संकुल.या संकुलाबाहेरच्या बाकड्यावर रघू नावाच्या एका फटीचर माणसाचं वास्तव्य. बाजूचं घर नीटनेटकं, त्यात राहते सुमन - शरीरविक्रय करून पोट भरणारी स्त्री. अलीकडेच मुंबईत येऊन सायकलवरून चहा-विडी-सिगारेट विकणारा मनोहर या स्वच्छतागृहासमोरची थोडीशी मोकळी जागा पाहून तिथं आपलं सायकलवरचं स्टॉल थाटतो. सुरुवातीला गस्तीवरचे पोलीस त्याला दमदाटी करतात. त्यांना चहा देऊन हळूहळू नवखा मनोहर हप्ताही द्यायला सरावतो.



एके दिवशी एक वेडी रस्त्यापलीकडच्या कचरा कुंडीत वाकून काहीतरी शोधू लागते. सापडलं! कुंडीत पडलेलं एक नवजात अर्भक ती बाहेर काढते. मेरी बच्ची! मेरी बच्ची!!म्हणत त्या बाळाला पोटाशी धरते. इतका वेळ शांत बसलेला रघू एकदम उठून ते मूल हिसकावून घेऊ लागतो. झटापट होते. मनोहर-सुमन मध्ये पडतात; पण रघू बाळ घेऊन निसटतो. वेडी निघून जाते.



दिवस जात असतात. शरीरविक्रय करणारी असली, तरी सुमन नावाप्रमाणेच मनाने चांगली आहे. सच्च्या दिलाची आहे. मनोहरचा शांत स्वभाव, मार्यादशील वागणं तिला आवडतं. तसं ती त्याला एकदा सांगतेदेखील. मनोहर माळकरी, सायकलच्या बास्केटवर विठोबाचं चित्र लावलेलं, कपाळावर टिळा. वर्तणूक स्वच्छ. बोलणं आर्जवी. सुमनच्या हातात चहाचा कप देताना होणारा तिचा निसटता स्पर्शही टाळणारा माणूस. घरी त्याची आजारी पत्नी. किती वर्षं अंथरुणाला खिळलेली. रोज सकाळी सायकल घेऊन यायचं, चहा सिगारेटी विकायच्या.. सायंकाळी उशिरा घरी जाऊन बायकोची शुश्रुषा करायची. असं बरीच वर्षं चाललं.

इकडे पळवून नेलेल्या मुलीला रघू लहानाचं मोठं करतो नि तिला भीक मागायला शिकवतो. आणखी पैसे गोळा करम्हणून त्या सहा-सात वर्षांच्या मुलीला मारझोड करतो. हे बघून संतापलेली सुमन त्या मुलीला आपल्याकडे ठेवण्याचं ठरवते. तिला मायेनं जवळ घेते. ती मुलगी-काजल-सुखावते.



दरम्यान, मनोहरच्या आजारी पत्नीचा ग्रंथ आटोपतो. तिचं दिवसकार्य झाल्यावर मनोहर पुन्हा सायकल घेऊन येतो. सुमन त्याची विचारपूस करते. आपली कर्मकहाणीही त्याला सांगते. अल्लड वयात एक मुलगा आवडायचा तिला. आईवेगळी पोर. बाप म्हणवणाऱ्या एकानं तिला वाढवलेलं. मोठी होता-होताच पैसे घेऊन कुणाशी तरी लग्न करून देतो. नवरा चार दिवस संसार करतो. संसार कसला? हनिमूनही नव्हे-निव्वळ उपभोग. मग तिला गुंगीचं औषध देऊन चार दिवस बेशुद्धीत ठेवतो. शुद्धीवर आल्यावर तिला समजतं-आपलं गर्भाशय काढून टाकलंय. मग काय? एकामागोमाग रोज येणारे लांडगे...!

काजलला सांभाळायचं ठरवणंही सोपं नसतं. फार मोठा सौदा करावा लागतो. सुमनच्या शरीराकडे लाळ घोटत पाहणाऱ्या रघूला पाहिजे ते देण्याचा नि वर पैसेही हप्ता म्हणून देण्याचा! पण काजलचं आपल्यासारखं व्हायला नको. तिला तू घेऊन जा,’ असं सुमन मनोहरला विनवते... आपल्यासारख्या बाईकडे तिला ठेवलं तर तिला तिच्या पायावर उभं करता येणार नाही. उद्या तिचा अज्ञात बाप, भाऊच गिऱ्हाईक म्हणून तिच्यासमोर उभा राहिला तर? ‘तू तिला ने-तिला शिकव, तिचा बाप हो!

खूप विचार करून मनोहर सुमनच्या घराची पायरी चढतो. खरं तर सुमनला त्यानं आपलाही स्वीकार करावा असं वाटत असतं; पण मनोहरला ते अवघड वाटतं. काजलला मात्र तो घेऊन जातो.

त्या दिवसापासून सुमनचं वागणं बदलतं. ती नखरेलपणाला सोडचिठ्ठी देते. तोंड आणि ओठ रंगवून गजरा माळून खोलीबाहेरच्या बाकड्यावर पाय पसरून बसणारी सुमन, कुलीन स्त्रीसारखी साधी साडी नेसून, वेणीफणी करून वावरू लागते.

एकदा काजलला भेटायला सुमन नवा फ्रॉक घेऊन जाते. काजल खूश होते. इतक्यात मनोहर येतो. रात्रीची वेळ. त्याला हे आवडत नाही. बाहेरून लोकांचं स्पेशलबोलणं ऐकू येतं. सुमन जाते. लोकांच्या असल्या बोलण्याला तोंड देण्याची मनोहरची तयारी होत नाही.

काही दिवस जातात. रघू पैशाच्या लोभाने नेहमीच सोबत करायला सुमनसाठी एका उतारवयातल्या माणसाचं स्थळआणतो. तो श्रीमंत वृद्ध मोटार घेऊन येण्याची वेळ जवळ येऊन ठेपते. पूर्वीसारखा साजशृंगार करून तयार झालेली सुमन सायकलजवळ उभ्या असलेल्या मनोहरचा निरोप घेते. अजूनही तो आपल्याला स्वीकारेल अशा आशेनं ...!

पण सुमनचं जग आणि आणि आपलं जग यातली सीमारेषा मनोहरला जखडून ठेवते. ... पुन्हा कधीच ती त्याला भेटणार नसते...!

धुआँ’ ...! क्षणभरातच विरून जाणारा धूर; पण तेवढ्यात बरंच काही बदलूनही जातो तो. गणेशगुळे इथल्या अजिंक्यतारा थिएटर्सनं हे नाटक प्रभावी रीतीने सादर केलं. मनोहरची भूमिका आणि दिग्दर्शन होतं दशरथ रांगणकरांचं. सर्वच कलावंतांची कामं जिथल्या तिथं. मुंबईच्या झोपडपट्टीतल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रघूचं पात्र अजय अनंत पानगले यांनी हुबेहूब साकारलंय नि मध्यवर्ती सुमनची भूमिका पूजा जोशी या कलावतीनं दाद द्यायलाच पाहिजे अशी कमालीच्या ताकदीनं रंगवलीय.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

Thursday, 28 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड जागेचं दुखणं


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड जागेचं दुखणं
दिवस आठवा (नाटक नववे) (२७ नोव्हेंबर २०१९)

............

व्यवस्थेचे तीन तेरा वाजविणाऱ्या परिस्थितीचं रंगमंचीय दर्शन

      एका जुनाट खोलीत मायलेकी बोलत बसल्यात. वेळ रात्र सुरू झाल्याची. एक प्रौढ मनुष्य आत येतो. बाई मुलगीला बाहेर पिटाळते. त्या दोघांचं काही बोलणं होतं. तेवढ्यात आणखी एक मनुष्य येतो. फरची टोपी, जाकिट, छत्री. मोठा रगेल नि रंगेल दिसतो हा! होय. सावकार आहे तो. तो आत येताच मुलीला एकटीला सोडून ती बाई नि पुरुष निघून जातात. सावकाश दरवाजा आतून लावून घेतो. जेमतेम चौदा-पंधरा वर्षांच्या त्या मुलीला आतल्या खोलीत नेतो आणि मग...!
      अवघड जागेचं दुखणं.रत्नागिरी तालुक्यातलं बसणी पंचक्रोशी ग्रंथालय आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी या दोन संस्थांनी नाट्यस्पर्धेत सादर केलेलं एक विचारप्रवर्तक नाटक. वेगवेगळ्या प्रसंगांत सगळी मिळून वीसेक पात्रं रंगमंचावर आणणाऱ्या या प्रयोगात दुर्गम आदिवासी पाड्यांमधलं सामाजिक जीवन उभं केलंय. विशेषतः महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भात. याचं लेखन केलंय हृषीकेश कोळी यांनी आणि दिग्दर्शन ओंकार पाटील यांनी.
      सबनीस बाई म्हणून पाड्यात ओळखल्या जाणाऱ्या एका तरुण समाजसेविकेनं पाड्यातल्या महिलांचं जीवन सुधारण्याचा निश्चय केलाय. ती रात्रीचे साक्षरता वर्ग चालवते. कंदिलाच्या उजेडात स्त्रिया मुळाक्षरं, जोडाक्षरं नि शब्दरचना शिकतात. बाहेरच्या जगाबद्दल खूप काही ठाऊक होतं त्यांना. आदिवासी असल्या तरी माणसंच ना त्या! त्यांना मेंदू आहेत, विचारक्षमता आहे. पार्वती नावाची महिला तर जरा जास्तच विचारक्षम दिसते. सबनीस बाई! देश स्वतंत्र झाला हे आता कळलं आम्हाला तुमच्याकडून. स्वातंत्र्य-बितंत्र्य शहरातल्या लोकांसाठीअसं म्हणून पाड्यातल्या एकूणच समाजजीवनाचं नेमकं वर्णन करते ती!
      इथं भरपूर दाट झाडी आहे. झुळझुळ वाहणारं पाणी आहे. आदिवासी कसं मुक्त जीवन जगताहेत अशी समजूत झाली शहरातल्या सिमेंटच्या खुराड्यांत अडकून पडलेल्यांची. या आदिवासींना आरोग्य सुविधा, शिक्षण मिळालं पाहिजे हे नियोजनकारांचं स्वप्न असतं; पण त्या पलीकडच्या आयुष्याची कल्पनाही मध्यमवर्गीय, स्वतःला नागरी सुसंस्कृत समजणाऱ्या समाजाला येणं कठीण.
      पाड्यात सावकाराचं राज्य. सावकार आणि त्याचा तो सुरुवातीला येऊन गेलेला हस्तक - पाठीवर कुबड आणि लंगडा पाय असलेल्या त्या हस्तकाचं नाव बाविस्कर. दोनच कर्मचारी असलेल्या गावातल्या चौकीतल्या पोलिसांना चणे खायला घालून हा बाविस्कर त्यांना टाचेखाली ठेवतो. त्याचं आगमन झालं, की साहेबाच्या खुर्चीत बसण्याचा मान त्याचा. पोलीस चौकीतल्या रेकॉर्ड रूममधली हवी ती फाइल शोधून एखादा कागद काढून फाडायला लावण्याएवढा त्याचा धाक. या सगळ्यात निर्ढावून गेलेला सोनावणे हा पोलीस सावकाराच्या विरोधात सबनीस बाई देत असलेली तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करतो. प्रामाणिक सेवेचं बक्षीसम्हणून या दूरच्या अडचणीच्या पाड्यात बदली झालेला हवालदार महाडिक यालाही या परिस्थितीची लागण होणं सुरू झालंय; पण त्याच्यातला माणूस अद्याप जिवंत आहे, संवेदनशीलता अगदीच झोपी गेली नाही; पण ही परिस्थिती बदलणार नाही हे उमजल्यानं आत्मविश्वास मात्र नाहीसा झालाय. आपले डोळे कायमचे बंद करू द्यायचे नसतील, तर तात्पुरते मिटावे लागतात,’ हा धडा तो शिकलाय.
      अशा वातावरणात पार्वतीला दिवस गेलेत. तिला मुलगा होणार या कल्पनेने तिचा नवरा किसन खूश आहे. तिचे लाड पुरवत आहे. मुलाचं नाव विजय ठेवायचं असं म्हणतोय. अन् मुलगी झाली तर नाव विजया ठेवायचं,’ असं पार्वतीनं सांगताच खवळून उठतोय. मुलीचा जन्म नको. मुलीला जन्म देणाऱ्या बाईला डाकीण ठरवून तिचा छळ केला जातो, अशा संस्कृतीत पुरता रुळून गेलाय हा किसन.
      एक दिवस आपला गर्भ लाथ मारून पाडायला आलेल्या नवऱ्याच्या डोक्यात धोंडा घालून पार्वती पोलीस चौकीत येते. तिथं एकटाच असलेला महाडिक भांबावून जातो. पार्वती तिथंच बाळाला जन्म देते. ते बाळ मुलगी असतं.
      आई होण्याची इच्छा पूर्ण झालीय. यापूर्वी तिला मुलगीच होणार या समजुतीनं गर्भातच तिचं बाळ दोन-तीनदा मारलं गेलंय इतक्यात किसन येतो. पार्वतीनं अंधारात दगड घातला तो किसनच्या बापाच्या डोक्यात. किसन आणखीच खवळलाय. परिस्थिती चिघळत जाते. पार्वतीला डाकीण ठरवलं जाणार हे स्पष्ट दिसतं. पुढे काय होणार याचा अंदाज आलेली पार्वती काळजावर दगड ठेवून आपल्या मुलीचा श्वास गुपचूप, कोणाला नकळत कायमचा बंद करते आणि डाकीणहोण्याच्या भवितव्यासाठी तयार होते.
      एव्हाना पोलीस चौकीत आलेली सबनीस बाई त्या नवजात मुलीला स्वतःसोबत न्यायला तयार होते; पण तुम्हाला गावाच्या वेशीबाहेर तरी जाता आलं पाहिजे ना,’ असं म्हणून महाडिक वास्तवाची जाणीव करून देतो.
इतक्यात गलका होतो. बाविस्कर गावकऱ्यांना घेऊन येतो. दोन पोलिसांना जुमानतो कोण? सोनावणेला ढकलून, महाडिकलाच लॉकअपमध्ये बंद करून ते सगळे मुलीचं कलेवर पोत्यात टाकून पार्वतीला घेऊन जातात. चणे खाऊन लाचार झालेल्या सोनावणेचे डोळे उघडतात; पण उशीर झालेला असतो!

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

Wednesday, 27 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘रेस्ट हाउस’


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. रेस्ट हाउस
दिवस सातवा (२६ नोव्हेंबर २०१९)
............
 न विझणाऱ्या सूडाग्नीचे रहस्यमय नाटक

५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील आठवे नाटक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. रेस्ट हाउसनावाचे हे नाटक नाणीज येथील महाकाली रंगविहार या संस्थेने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
..........
      नाणीजच्या महाकाली रंगविहार या संस्थेनं रंगमंचावर आणलेलं रेस्ट हाउसहे नाटक रमेश कीर यांनी लिहिलं होतं आणि दीपक कीर यांनी दिग्दर्शित केलं होतं. या नाटकात शेवटी पाच मिनिटं प्रवेशणाऱ्या माळ्यासह पाच पात्रं होती.

      पडदा उघडतो तेव्हा प्रेक्षकांना दर्शन घडतं एका घराच्या दर्शनी भागाचं आणि त्यापुढील अंगणाचं. ते घर म्हणजे जवळजवळ सदैव बंद असणारं एक रेस्ट हाउसआहे. त्याच्या आवाराभोवती नेटकं लाकडी पट्ट्यांचं कुंपण, त्याच्या मध्यभागी लाकडाचंच फाटक, कडेला फुलझाडं, फाटकाबाहेरच्या रस्त्यापलीकडे दूरवर दिसतं एक रान आणि त्यातल्या गर्द झाडीतून मान उंचावून उभा राहणारा डोंगराचा एक उंच सुळका. रात्रीची वेळ, मंद प्रकाश, बराच वेळ कुणीच दिसत नाही. रातकिड्यांची किरकिर, अधून कुत्र्यांचं भुंकणं-रडणं आणि जवळपास कुठे तरी असलेल्या डांबरी सडकेवरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे अंधारी शांतता चिरत जाणारे आवाज.

      बहुधा तिथं कुणाची फारशी ये-जा नसावी असं दिसतंय या वातावरणावरून. पाच-सात मिनिटं अशीच गेल्यावर कुठूनसं एक जोडपं येतं.


      प्रौढत्वाकडे निघालेल्या त्या जोडप्याची गाडी बंद पडलीय नि रात्रीचा मुक्काम या रेस्ट हाउसमध्ये करावा या विचारानं ते फाटक उघडून आत आलं. या त्यातल्या पुरुषानं बऱ्याच हाका मारल्यावर रेस्ट हाउसच्या दरवाजाचा भयानक कर्रऽऽ आवाज करत तो उघडून एक टक्कल पडलेला, वाकलेला म्हातारा बाहेर येतो. त्याचं नाव रामू. चौकीदार दिसतोय. जोडप्याशी ओळख होते. अभिजित आणि उर्मिला. रामू त्यांचं स्वागत करतो. त्यांना अंगणात खुर्च्या मांडून देतो आणि त्यांच्यासाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था करतो. अभीला तर खूपच आवडतो हा पाहुणचार, आणि उर्मीही रोजच्यापेक्षा चार घास जास्त जेवते. थोडं सांबार शिल्लक असतं; पण ते सकाळला होईलअसं अभीने म्हणताच रामू चमत्कारिक स्वरात सकाळी?’ असं उद्गारतो.

      तिथून सुरू होतं एक रहस्यमय कथानक. त्या दोघांना अंगणात सोडून रामू जवळपास जातो, गप्पा मारता मारता अभिदेखील एकटाच बंगल्याच्या आवारात फेरफटका मारण्यास जातो. उर्मी एकटीच उरते अंगणात. एवढ्यात फाटकाबाहेरच्या वाटेवर धूर येऊ लागतो. त्यापाठोपाठ हळूहळू पुढे सरकत येते एक बाई. पिवळंजर्द नऊवारी लुगडं, केस मोकळे सोडलेले. फाटकातून आत येते. उर्मीच्या मागे बाजूला थोडीशी रेंगाळते आणि सावकाशी चालत रेस्ट हाउसच्या उघड्या दारातून आत शिरते. उर्मीला अस्वस्थ वाटतं. कित्येक क्षण ती घुसमटते, तिला ओरडताही येत नाही. भयंकर घाबरते ती. इतक्यात अभी येतो, तिची अवस्था पाहून तिला आत नेऊन सोडतो आणि पुन्हा बाहेर येतो. थोड्याच वेळात ऐकू येते एक किंकाळी!

      मध्यंतरानंतर पडदा उघडतो तेव्हा अवस्थ अभी त्या गूढ म्हाताऱ्याला या सगळ्याबद्दल विचारत असतो. खोदूनखोदून विचारल्यावर रामू बऱ्याच वर्षांपूर्वीची एक हकीकत सांगतो. त्याची चारचौघींत उठून दिसणारी पत्नी याच रेस्ट हाउसमध्ये गावातल्या एका चांडाळचौकडीच्या वासनेची शिकार बनलेली असते. त्या दूरवर दिसणाऱ्या सुळक्यावरून झोकून देऊन तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं असतं. अंगावर काटा आणणारी ही कहाणी ऐकवून रामू पडवीत झोपतो. अभी आत न जाता अंगणातल्या खुर्चीतच ताणून देतो.

      थोड्याच वेळात पुन्हा तीयेते मघासारखीच, धुराच्या लोटा मागोमाग. सावकाश पावलं टाकत अभीच्या मागे येऊन उभी राहते. तिच्या सुस्वरूप चेहऱ्यावर हळूहळू कठोर भाव उमटू लागतात. आपल्या सुकुमार हातांची नाजूक बोटं ती अभीच्या गळ्याभोवती आवळते. तिचा चेहरा भयानक बनतो. अभी धडपडतो, तडफडतो आणि शांत होतो. पिवळंधम्मक लुगडं नेसण्यानं नववधूसारखी दिसणारी ती स्त्री आता कमालीची क्रूर भासत असते. भेसूर विकट हास्य करते आणि निघून जाते.

      पहाटेच रामू ओरडतो नि धडपडत उठतो. उर्मी बाहेर येते. नवरा निजलेला. रामू तिचा निरोप घेऊन जातो. उर्मी आत जाते उजाडते.....! सूर्य बऱ्यापैकी वर आला असावा. माळी येतो. अंगणात निजलेल्या अभीला उठवू लागतो. अभीचा हात खाली येतो. निपचित. माळी समजतो. कुणी आहे का म्हणून हाका मारतो, तर उर्मी बाहेर येते. काय घडलंय, हे समजताच हंबरडा फोडते, विलाप करते.


      माळी सांगतो - गावातल्या नराधमांनी त्या स्त्रीवर अत्याचार केल्यावर त्या जोडप्यानं त्या सुळक्यावरून उड्या टाकून जीवन संपवलं. रोज ती दोघं इथं येतात. एकेक करून त्यांनी त्या नराधमांना नाहीसं केलं; पण तरीही त्यांचा सूडाग्नी शांत झाला नाही. इथं येणाऱ्या जोडप्यांपैकी पुरुषांना ते ठार करतात. हे रेस्ट हाउसशापित आहे...!

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)


Sunday, 24 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘एक्स्पायरी डेट’

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘एक्स्पायरी डेट’
दिवस सहावा (२३ नोव्हेंबर २०१९)

............

आपुली ‘एक्स्पायरी’ पाहिली म्यां डोळा!

अमेरिकेच्या एका प्रवासवर्णनात ‘पुलं’नी कोणा सहस्रबुद्धे नावाच्या मराठी कुटुंबाच्या अमेरिकेतल्या वास्तुशांतीचा प्रसंग वर्णन केलाय. सगळा कार्यक्रम आनंदात चाललेला असताना कुणाचा तरी फोन येतो. सौ. सहस्रबुद्धे फोन घेतात. पलीकडचा माणूस सांगत असतो, ‘तुम्ही नवं घर घेतलंय. आता तुमच्या थडग्याची जागाही बुक करून टाका.’ बाई गोऱ्या-मोऱ्या...!

‘एक्स्पायरी डेट’ या नाटकात असंच काहीसं पाहायला मिळतं; पण थडगंबिडगं म्हटलं म्हणून एकदम गंभीर व्हायचं कारण नाही. थडगं बुक करण्याच्याही पुढचं पाऊल टाकलेली खूप माणसं भेटतात या नाटकात. प्रथम ती आपल्या समोर येतात तीच मुळी कुणाची तरी ‘डेथ’ ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी. मस्त ‘डीजे’च्या तालावर बेभान होऊन नाचत असतात १५-२० तरुण. एका इमारतीपाशी आल्यावर हाका मारून-मारून नानांना बोलावतात. नानाही येऊन नाचू लागतात.

नाना – आपलं वय वीस मानणारे सत्तरीतले गृहस्थ. पत्नी प्रभा आणि ते दोघंच राहतात. मुलगा अजय अमेरिकेत. तो दररोज मोजून पाच मिनिटं फोनवर बोलतो आई-वडिलांशी. चार-चार वर्षं भारतात आला नाही म्हणून काय झालं? रोज व्हिडिओ कॉल करतो ना तो! कम्प्युटरच्या पडद्यावर आई-वडिलांना त्याचा नि आई-वडिलांचे त्याला चेहरे तर दिसतात! आणि त्याला वेळ तरी कुठं आहे भारतात यायला? जाम बिझी?

हल्ली जिकडे-तिकडे अशी बिझी माणसं दिसतातच. अमेरिकेत राहायला गेलेली पुष्कळ. शिवाय काळ बदललाय नाही का? काळ बदलला की माणसं बदलतात, माणसं बदलली की पद्धती बदलतात. म्हणून तर ‘मृत्यूचं सेलिब्रेशन’ करायला निघाले. त्याची सुरुवात तारीख निश्चितीनं. ही अफलातून आयडिया कुणाच्या डोक्यातून निघाली कुणास ठाऊक; पण मनुष्यजीवनाची अशी ‘एक्स्पायरी डेट’ ठरविणाऱ्या डॉक्टरची प्रॅक्टिस मात्र तुफान चालते. आतापर्यंत साडेतीन लाख माणसांची ‘एक्स्पायरी डेट’ अचूक काढून दिल्याचा दावा ठोकतो तो! साधे पेशंट तो बघतच नाही आताशा...! आणि त्याला दुसरं कसलं निदानही करता येईनासं झालंय.

परवा वय विसरून नाना त्या ‘डेथ सेलिब्रेशन’च्या मिरवणुकीत ‘डीजे’च्या तालावर नाचता नाचता घेरी येऊन पडले ना, तेव्हा या डॉक्टर महाशयांची त्रेधा उडाली; पण ‘एक्स्पायरी डेट’ ठरविण्यातली त्यांची ‘स्पेशालिटी’ बघून अजयने अमेरिकेतून त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करून नानांची ‘डेट’ ठरविण्यासाठी त्यांना पाठवलं.

नाना तसे जुन्या मताचे. प्रभा नानींनाही ही कल्पना आवडली, पटली; पण नानांना नाही; पण करतात काय? नाईलाजानं बसले डॉक्टरच्या पुढ्यात. डॉक्टरांनी भराभर आपली उपकरणं टेबलावर मांडली. पाच मिनिटांत संगणकातून नानांची ‘एक्स्पायरी डेट’ काढून दिली. झालं. पुढची सूत्रं भराभर हलू लागली. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या उत्साही राजूनं नानांच्या एक्स्पायरी सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात विशेष पुढाकार घेतला. देहावसानाची तारीख-वार लिहिलेली आकर्षक निमंत्रणपत्रिका छापून आणली. एका मल्टिनॅशनल क्राइंग कंपनीचे मॅनेजर येऊन भेटले. मनुश्य मेल्यावर नुसतंच रडण्याचं ‘ऑर्डिनरी’ आणि रडारडीपासून पिंडाला कावळा शिवण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर ‘सर्व्हिस प्रोव्हाइड’ करण्याचं ‘स्पेशल’ पॅकेज समजावून सांगितलं. मध्यमवर्गीयांना परवडणारं पॅकेज आहे का, विचारलं तर मॅनेजर युरोपियन स्टाइलच्या मराठीत म्हणतो कसा – मध्यमवर्गीय तसाही रोज मरतच असतो!

मग रडारड करण्याची रंगीत तालीम. ऑर्केस्ट्रातल्या गायकांना नि वादकांना तो मास्टर हातवारे करून मार्गदर्शन करतो ना, अगदी तश्शी! मॅनेजरनं नानांच्या मरण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ची पाहणी करून त्यांची आवडती आरामखुर्ची नक्की केली. एवढ्यात पाठीवर भली मोठी सॅक अडकवलेला अजय अमेरिकेतून येऊन थडकला. नानांसकट खुर्ची वर उचलून अलगद एक्स्पायर करण्याचा थोडा सराव करून झाला. मग मॅनेजरनं नाना-नानींना प्रायव्हसी मिळावी, यासाठी पाच मिनिटं सर्वांना बाहेर पिटाळलं.

पाचव्या मिनिटाला अजय आला, दोन मिनिटं, मग दीड मिनिट, अर्धं मिनिट, असं काउंटडाउन सुरू झालं. ‘झीरो’ला नाना आरामखुर्चीत निपचित. ऑर्केस्ट्रानं गळे काढले. प्रचंड रडारड. अजयनं शेवटची काही सेकंद असताना सेल्फीसुद्धा काढला होता. तो आईचं सांत्वन करू लागला, ‘कमॉन आई, तुझा नवरा मेलाय...!’ पुन्हा रडारड!

इतक्यात नाना जागे होतात. एकदम ओरडतात. नाना जिवंत आहेत हे पाहून सगळ्यांची पळापळ. नाना-नानी, अजय तिघेच उरतात. अजय प्रचंड अपसेट. ‘तुम्ही मेला होतात ना? परत मेलात तर सुट्टी काढून येता येणार नाही मला!’

चिडलेले नाना त्याला हाकलून देतात आणि वातावरणाचा ताण हलका करण्यासाठी प्रभा एक गाणं लावते नि ठेका धरून दोघं नाचू लागतात!

पाली इथल्या नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळानं सादर केलेलं हे नाटक लिहिलं होतं चैतन्य सरदेशपांडे यांनी. दिग्दर्शन होतं गणेश राऊत यांचं.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)