Saturday, 28 September 2019

सारे काही तेच ते आणि तेच ते!

चारच महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. राज्य विधानसभेची निवडणूक आता जाहीर झाली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी विधानसभेतील प्रतिनिधी या निवडणुकीतून निवडले जाणार आहेत. आपल्यालाच लोकांनी निवडून द्यावे, यासाठी उमेदवार तर केव्हापासूनच सज्ज आहेत. विधानसभेत जाण्यासाठी आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, याची खात्री पटविण्यासाठी प्रत्येक उमेदवार जंग जंग पछाडतो आहे. सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार गेल्या पाच वर्षांमध्ये आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर विरोधातील उमेदवार आणि त्यांचे पक्ष गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास कसा झाला नाही, हे सरकार कसे अयोग्य आहे, या सरकारने राज्याला किती मागे नेऊन ठेवले आहे, आम्ही सत्तेवर आलो, तर काय काय चांगले करणार आहोत, हे ओरडून ओरडून सांगत आहेत. अशा परस्परविरोधी प्रचारामुळे नेमके कोणाला निवडून द्यावे, याबाबत नेहमीप्रमाणेच मतदारांमध्ये संभमम आहे.
असा संभ्रम असताना कवी विंदा करंदीकर यांची कविता आठवते, ``तेच ते आणि तेच ते! सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते!! तेच ते!!`` रोजच्या जगण्यातील तोचतोपणा त्यांनी नेमकेपणाने कवितेत सांगितला आहे. त्यातील काही ओळी तर लोकशाहीचा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या काळात चपखल बसतात.
``संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे,
त्या स्वप्नाचे शिल्पकार, कवी थोडे कवडे मार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध.
नऊ धागे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग.
पुन्हा पुन्हा तेच भोग. आसक्तीचा तोच रोग.
तेच मंदिर तीच मूर्ती. तीच मुले तीच स्मूर्ती.
तेच ओठ तेच डोळे, तेच मुरके तेच चाळे.....
कारण जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते!!``
पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमधील प्रचार, आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर, पक्षांतराला दिलेले तत्त्वनिष्ठेचे स्वरूप, परस्पर विरोधी उमेदवारांकडून परस्परविरोधातील मांडले जाणारे मुद्दे पाहिले की, `तेच ते` कवितेची समर्पकता लक्षात येते. निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार आणि त्यांचे पक्ष म्हणजे स्वप्नाचे शिल्पकार असतात. ते विकासाचे जे काही चित्र उभे करतात, त्यामुळे मतदार हरखून जातात; पण थोड्याच काळात लक्षात येते की, पडद्यावरच्या त्या आभासी भूतचेष्टा होत्या. वेगवेगळे उमेदवार आपल्या सोयीचे पक्ष निवडतात. त्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगात न्हाऊन जातात. तो रंग काही रंगपंचमीतल्यासारखा धुऊन न जाणारा रंग नसतो. रातोरात किंवा अगदी दिवसभरातसुद्धा वरवरचा हा रंग धुतला जाऊ शकतो. लगेच दुसरा रंग फासता येतो. त्या रंगामागचा चेहरा तोच असतो. रंगले गेलेले हे उमेदवार मूर्तिपूजकही असतात. नव्या मंदिरात गेले, तरी आधीच्या मंदिरातील मूर्तीशी ते एकनिष्ठ असतात. ती एकनिष्ठा ते वारंवार जाहीरपणे सांगत असतात. त्यांचे भक्त नव्या मूर्तिपूजकाच्या भक्तिरसाने भिजून जातात. कारण त्यांना माहीत असते, ``जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते!!`` हे भक्त म्हणजे सर्वसामान्य मतदार असतात.
मुळातच लोकशाहीची प्रक्रिया सामान्य जनतेला कधी खऱ्या अर्थाने कळली नाही. आपण ज्यांना निवडून देतो, ते विकासाची कामे करण्यासाठी निवडले गेलेले असतात, याची जाणच मतदारांना नसते. ती होऊ नये, यासाठीच जणू लोकशाहीची प्रक्रिया सामान्यांना कळू दिली गेली नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. असे असले, तरी मतदानावर बहिष्कार टाकणे हा मात्र त्यावरचा  उपाय नक्कीच नाही. मतदान करणे एवढेच आपल्या हातात आहे. तेवढे करायला मात्र हवे. कारण ते  आपले कर्तव्य आहे. सर्वसामान्यांनी आपले कर्तव्य विसरायचे नसते!

- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २७ सप्टेंबर २०१९)

No comments:

Post a Comment