Saturday, 21 September 2019

नाणार, नारायण आणि युतीचीच चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात महाजनादेश यात्रेद्वारे दौरा केल्यानंतर नारायण राणे आणि नाणारचा रिफायनरी प्रकल्प आणि त्याच मुद्द्यांच्या आधारे आगामी निवडणुकीत युती होणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत झाले. सिंधुदुर्गातील सभेपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झालेले खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी त्यांचे स्वागत केले. राणे यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांची कणकवलीची सभा संपून ते कणकवलीतून रत्नागिरीकडे रवाना झाल्यानंतर पत्रकारांनी नारायण राणे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यामुळे आपला भाजप प्रवेश नक्की आहे, असा विश्वानस राणेंनी व्यक्त केला. कणकवलीतून निघालेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे मोठ्या उत्साहात झाले. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे दिली. राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. विरोध झाल्याने प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र  प्रकल्पाला असलेले समर्थन लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार केला जाईल, असे त्यांनी तेथे सांगितले. रत्नागिरीतील भाषणातही त्यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचा पुनरुच्चार केला. रिफायनरीमुळे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राणेंनी कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे केलेले स्वागत आणि नाणारबाबतचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाजनादेश यात्रेतील दोन मुद्दे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. नारायण राणे यांना भाजपने प्रवेश दिला, तर भाजपशी युती करणार नसल्याचे काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. स्वतःचा पक्ष असूनही ते भाजपचे उमेदवार म्हणून राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे ते पुढे-मागे भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ होतीच. मात्र शिवसेनेच्या धोरणामुळे हा प्रवेश लांबणीवर पडत होता, असे सांगितले जात होते. आता राणे यांनीच आपला भाजपप्रवेश नक्की असल्याचे सांगितले आहे. नाणार येथील रिफायनरीचा विषयही तसाच आहे. रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आंदोलने केली. परिणामी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ केली. त्यानंतर युती जाहीर झाली. आता पुन्हा एकदा नाणारचा विषय पुढे आला आहे. मात्र अलीकडे शिवसेनेचे धोरण मवाळ झाले आहे का, याबाबतही चर्चा आहे. अन्य पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना छेडले असता ते म्हणाले होते की, युती असली, तरी पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा निर्णय आहे. अलीकडेच कोकण दौरा करून गेलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना ठाण्यात नाणारबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकांचा प्रकल्पाला विरोध नसेल तर आमचाही विरोध नाही. शिवसेना कोठेही विकासाच्या आड नाही.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर त्यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या चित्राविषयी चर्चा होण्यापेक्षाही नाणारविषयीचे त्यांचे वक्तव्य आणि राणेंची भूमिका, त्यावरून युती होईल की तुटेल, याविषयीचीच चर्चा अधिक आहे. जणू काही कोकणाचा विकास युतीवरच अवलंबून आहे!
- प्रमोद कोनकर
- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २० सप्टेंबर २०१९)



No comments:

Post a Comment