देवरूख : करोनाच्या फेऱ्यामुळे माणसांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांवर आणि सणसमारंभांवर बंदी आलीच, पण यावर्षी देवाचा विवाहसुद्धा या फेऱ्यातून सुटला नाही.
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर म्हणजे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. आकाशाला भिडणाऱ्या डोंगररांगा, त्यातून कोसळणारा उंचच उंच धबधबा, घनदाट वनराई आणि त्याच वनराईत विसावलेली मार्लेश्वराची गुहा असा निसर्गाचा आविष्कार पाहायला नेहमीच पर्यटकांची गर्दी लोटते. दरवर्षी मकरसंक्रांतीला होणारा मार्लेश्वर आणि गिरीजादेवीचा विवाह म्हणजेच कल्याणविधी पाहायला आणि त्यामध्ये सहभागी व्हायला राज्यभरातील वऱ्हाडी दरवर्षी आवर्जून येतात. मानपानापासून ते मंगलाष्टकांपर्यंत माणसांचे लग्न होते, तसेच सारे विधी या समारंभात होतात. मोठी यात्रा भरते.
यावर्षी मात्र देवाच्या विवाह सोहळ्याला यायला वऱ्हाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या १४ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सारे धार्मिक विधी होणार असले, तरी करोनामुळे यात्रोत्सव मात्र रद्द करण्यात आला आहे. एसटीच्या जादा गाड्या सुटणार नाहीत. खासगी वाहनांवर आणि स्थानिक दुकानांवरही येत्या १३ ते १५ जानेवारी या काळात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच मार्लेश्वराचा विवाह सोहळा वऱ्हाड्यांशिवाय पार पडणार आहे.
१९७१ च्या युद्धात इंदिराजींची अभूतपूर्व मुत्सद्देगिरी : चारुदत्तबुवा आफळे रत्नागिरी : अमेरिका इंग्लंड अशा बलाढ्य देशांच्या दबावाकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी दाखविली. पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळविले. तेही अभूतपूर्व होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांनी येथे केले. रत्नागिरीत सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात समारोपाचे कीर्तन करताना आफळेबुवांनी १९७१ च्या युद्धात इंदिराजींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबरच पाकिस्तान अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन भाग पडले, तरी देश एकच होता. पश्चिम पाकिस्तान पंजाबी मुसलमानांचा तर पूर्व पाकिस्तान बंगाली मुस्लिमांचा होता. त्या दोघांचे कधीही पटले नाही. युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. १९६५ मध्ये झालेल्या युद्धात पराभव होऊनही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाली नव्हती. राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना राष्ट्रध्यक्षपदाची स्वप्ने बाळगणारे झुल्फिकार अली भुत्तो भारताविरुद्ध चिथावत होते. काहीतरी कुरापती काढून भारतावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानलाही त्यांना नामोहरम करायचे होते. त्यादरम्यान पूर्व पाकिस्तानमधील मुजीबुर रेहमान या नेत्याला निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. ते पश्चिोम पाकिस्तानच्या जिव्हारी लागले. या स्थितीत मुजीबुर रेहमान यांच्या मागण्या मान्य करण्याचा कांगावा करून चर्चेचा देखावा करण्यात आला. तेव्हाचा पाकिस्तानचा लष्करप्रमुख टिक्का खान याने अनन्वित अत्याचार केले. पंजाबचे मुसलमान बंगालच्या मुसलमानांना मारत होते, अशी विदारक स्थिती होती. टिक्काखान दररोज सात हजार माणसे माणसे मारत असे. यामुळे भयभीत झालेले सुमारे नऊ लाख निर्वासित दोन आठवड्यांत भारतात आश्रयाला आले. मुजीबुर रेहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. कणखरपणासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिराजींनी जुन्या सरकारांची कोणतीही चूक स्वतः केली नाही. तेव्हाचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्याशी इंदिराजींनी मसलत करून पाकिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. नौदल, वायुदल आणि लष्कराचा योग्य समन्वय साधून कराची बंदरात दारूगोळा आणि साधनसामग्री असलेली चार जहाजे नष्ट करण्यात भारतीय सैन्याला अभूतपूर्व यश मिळाले. कराची किनारा ताब्यात आल्यामुळे पाकिस्तानला मोठी दहशत बसली. त्याच वेळी पूर्व पाकिस्तानातील ढाक्यात भारतीय सेना गनिमी काव्याने मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आली. सुमारे आठ लाख भारतीय सैनिक त्या वेळी वेगवेगळ्या मोहिमांवर काम करत होते. पूर्व पाकिस्तानातील मुक्तीवाहिनीला पुरेसे पाठबळ दिले. त्यातून एक लाख पाकिस्तानी सैनिक शरणार्थी झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार पाकिस्तान आणि बांगलादेश अशी एका देशाची दोन देशांमध्ये विभागणी झाली. ज्या शेख मुजीबुर रेहमान यांना कपटाने पाकिस्तानने अटक करून १८ डिसेंबरला त्यांना फाशी देणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांनाच बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून १६ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदी बसविण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या. इंदिराजींच्या या शौर्याचे जाहीर अभिनंदन तेव्हाचे जनसंघाचे खासदार आणि विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी साक्षात दुर्गामाता अशा शब्दांत भर संसदेत केले, असे आफळेबुवांनी सांगितले. १९७१ नंतरही पाकिस्तानकडून सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यातूनच कारगिलसारखी प्रकरणे घडली आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान टपून बसला आहे. ज्या बांगलादेशला भारताने स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व निर्माण करून दिले, त्या बांगलादेशमधूनही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. लक्षावधी बांगलादेशी भारतात घुसले आहेत. आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना हुसकावून लावण्यासाठी एनआरसीसारखे जे कायदे तयार करण्यात आले, त्याविरोधात आपले मतदार कमी होतील या एकाच भीतीने विरोधकांनी रान उठविले आहे. खोटा प्रचार चालविला आहे. घुसखोरांना प्रतिष्ठित करून त्यांना सत्ता मिळवायची आहे. प्रत्येक भारतीयांनी याचा अभ्यास केला पाहिजे आणि देशाचे अस्तित्व, सुरक्षाव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन बुवांनी शेवटी केले. कीर्तनाच्या मध्यंतरात इतिहासविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या सार्थक संजय पुराणिक, श्रद्धा विजय क्षीरसागर आणि चंद्रशेखर नीलेश जोशी या विद्यार्थ्यांना पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना कीर्तनसंध्या परिवारातर्फे शाल, श्रीफळ आणि २१ हजारांची थैली देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक कल्याण निधीचे काम करणाऱ्या सौ. निंभोरकर आणि लव्ह जिहादमुळे पीडित झालेल्या मुलींचे पुनर्वसन तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नांदेड येथील शेतकऱ्यांच्या २० मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणाऱ्या सौ. शुभांगी आफळे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. पुढच्या वर्षी दोन जानेवारी ते सहा जानेवारी या काळात कीर्तनसंध्या महोत्सव होणार असून त्यामध्ये १९७१ पासून १९९९ पर्यंतचा भारतीय इतिहास हाताळण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
.....
कीर्तनसंध्याच्या व्यासपीठावर सत्कार झालेल्या माजी सैनिकांसमवेत निवृत्त ले. ज. राजेंद्र निंभोरकर, हभप चारुदत्तबुवा आफळे
………
पाचव्या दिवशी बुवांनी सादर केलेली भजने, गाणी, आरती आदींचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर... https://youtu.be/-iUyjVMcVqo
...........
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या उपक्रमाच्या पाचव्या दिवशी (१२ जानेवारी २०२०) राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी १९७१च्या युद्धात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची गाथा उलगडली. त्यातील काही अंश पाहा पुढील लिंकवरील व्हिडिओत... https://youtu.be/jMGYFMRvq_I
काश्मीरविषयीचे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा
निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे मत रत्नागिरी : काश्मीरला देशातला दुसरा देश म्हणून मान्यता देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारतीय इतिहासातला सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हे कलम रद्द केल्यामुळे देशभरात काश्मीरसह देशभरात शांतता प्रस्थापित व्हायला मदत होईल, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी येथे व्यक्त केले.
कीर्तनसंध्या महोत्सवात अखेरच्या दिवशी खास निमंत्रित म्हणून बोलताना निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर.
रत्नागिरीत पाच दिवस सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या वेळी श्री. निंभोरकर यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. परमविशिष्ट सेवापदकासह लष्करातील अनेक पदके मिळविणारे आणि युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांसाठी मदत केंद्राचे संचालन करणारे श्री. निंभोरकर यांचा सत्कार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते झाला, तर श्री. निंभोरकर यांच्या हस्ते विविध पदांवरून निवृत्त झालेल्या अकरा माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. निंभोरकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन व्हायला नकार देणाऱ्या काश्मीर संस्थानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मीरवर ताबा मिळविण्यासाठी पाकिस्तानी टोकाची क्रूरता केली. काश्मी रचा प्रश्नन राष्ट्रसंघाकडे गेला नसता, तर आठ हजार भारतीय सैनिकांचा नाहक बळी गेला नसता. काश्मीरच्या सीमेवर सातत्याने पाकिस्तानच्या कारवाया सुरू होत्या. नव्वदच्या दशकामध्ये अत्यंत पाकिस्तानने नागरी वेशात काश्मीरमध्ये सैनिक पाठविले आणि तो भाग गिळंकृत करायचा प्रयत्न केला. १९९० मध्ये तर आकाशवाणीसारख्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना ठार मारून काश्मिरी पंडितांना दहशतीखाली आणले. त्यामुळे रातोरात साडेचार ते पाच लाख काश्मिरी पंडितांना परागंदा व्हावे लागले. त्यांच्या बायकामुलींवर अनन्वित अत्याचार झाले. या प्रश्नावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या एकाच व्यक्तीने तेव्हा आवाज उठवला होता. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरमध्ये ३७० कलमामुळे देशातला दुसरा देश असे स्वरूप प्राप्त झाले होते. काश्मीरमधील कोणीही व्यक्ती भारताच्या इतर भागात जमीनजागा घेऊ शकते. मात्र उर्वरित देशातील कोणीही काश्मीरमध्ये जागा घेऊ शकत नव्हते. काश्मीरचे नेते गुलाम नबी आझाद महाराष्ट्रातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून गेले. पण भारतातील कोणीही नेता काश्मीरमधून निवडणूक लढवू शकत नसे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ३७० कलम रद्द झाल्यामुळे मदतच झाली आहे. पुढच्या दहा वर्षांमध्ये भारतातील इतर कोणत्याही राज्यात सारखाच काश्मीर हा सर्वसामान्य प्रदेश होईल, यात शंका नाही, असा विश्वास श्री. निंभोरकर यांनी व्यक्त केला. छातीत बॉम्बचा तुकडा घुसल्यामुळे जवळून पाहिलेला मृत्यू, त्यातून झालेला पुनर्जन्म, अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात झालेल्या भूस्खलनानंतर एका छोट्या मुलीसह ३५ जणांना वाचविणारा पण अखेरच्या प्रयत्नात स्वतः दरीत कोसळून मरण पावलेला त्रिलोचन सिंग असे विविध प्रसंग श्री. निंभोरकर यांनी जिवंत केले. तत्पूर्वी हॉटेल मथुरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. निंभोरकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा अत्यंत योग्य असून त्याच्या विरोधात उमटणारे पडसाद अतिशय दुर्दैवी आहेत. कारण कायद्याची माहिती न घेता आंदोलने केली जात आहेत. हा कायदा अत्यंत पारदर्शी आहे. वेळोवेळी या कायद्यात सुधारणा झाली असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. त्यामध्ये काहीही गैर नाही, असे श्री. निंभोरकर यांनी सांगितले. नागरिकांनी या कायद्याची माहिती करून घ्यावी. समजून घ्यावी. कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देणार नाही असे हा कायदा म्हणत नाही तर नियमावलीत बसत असतील त्या सर्वांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. त्यामुळे त्यांना स्वतःची ओळख निर्माण होणार आहे. यापूर्वीही अदनान सामी, तस्लिमा नसरीन अशा अनेक पाकिस्तानी, बांग्लादेशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर सर्वांत उत्तम संरक्षणमंत्री होते, असा आवर्जून उल्लेख करून ते म्हणाले की, शस्त्रास्त्रांच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून राहिले, तर अनेकदा महागड्या दराने ती विकत घ्यावी लागतात. आपण शस्त्रसज्ज असले पाहिजे आणि ही शस्त्रे आपल्या देशात तयार झाली पाहिजेत, यासाठी मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत पर्रीकर यांनी प्रयत्न केले. त्यांच्या काळात त्यांनी संरक्षण खात्याचे सुमारे १७ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर केले होते. त्यामुळे लष्कर अधिक भक्कम झाले. बोफोर्स तोफा आणि राफेल विमाने चांगली आहेत, यात शंका नाही. तेव्हा राफेल विमान आपल्या ताफ्यात असते, तर वायुदलाचा आपला सैनिक अभिनंदनवर पाकिस्तानात उतरण्याची वेळ आली नसती. तो तेथे पराक्रम गाजवून परत येऊ शकला असता. या विमानांच्या खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाही, असे सांगून ते म्हणाले ते म्हणाले की हा व्यवहार मुळात २००७ साली ठरला होता. त्यानंतर १३ वर्षे निघून गेल्यामुळे खर्च कमी-जास्त होऊ शकतो. पण तेव्हाच्या पॅकेजपेक्षा अधिक विमाने आपण फ्रान्सकडून घेतली आहेत, असेही ते म्हणाले. तिन्ही सैन्यदलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स या पदाची निर्मिती झाल्यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय साधणे शक्य होणार आहे. कारगिलच्या युद्धाच्या वेळी लष्कराच्या मदतीला वायुदल गेले असते तर सुमारे चारशे सैनिकांचा जीव वाचला असता. अशावेळी तीनही सैन्यदलांचा समन्वयक उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
............
कीर्तनसंध्या उपक्रमाच्या नवव्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी `योद्धा भारत` या विषयावरील कीर्तने रंगवली. समारोपाच्या दिवशी (१२ जानेवारी २०२०) निवृत्त ले. ज. राजेंद्र निंभोरकर यांचे भाषण रत्नागिरीकरांना ऐकता आले. कलम ३७०ची पार्श्वभूमी, ते काढून टाकल्याची उपयुक्तता, नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दलचे गैरसमज आदींबद्दल त्यांनी भाष्य केले. प्रत्यक्ष युद्धातील त्यांचे थरारक अनुभवही त्यांच्या तोंडून ऐकता आले. निबंध कानिटकर यांनी त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून बोलते केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचा ऑडिओ ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/zHuj9J0vu94
...................................
देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला - हभप चारुदत्तबुवा आफळे रत्नागिरी : भारताच्या इतिहासातील स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले. रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवात `योद्धा भारत` या आख्यानविषयावर सुरू असलेल्या कीर्तनमालिकेच्या चौथ्या दिवशी आफळेबुवांनी शास्त्रीजींच्या १९६५ सालच्या भारत-पाक युद्धातील भूमिकेविषयी माहिती दिली. पूर्वरंगात रामायणकाळात हनुमंताने केलेल लंका दहन आणि त्यानिमित्ताने तेथील लंकेच्या लष्करसज्जतेची माहिती घेऊन येण्याचे काम केले होते. तो एक प्रकारे सर्जिकल स्ट्राइकचा भाग होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६५ साली शास्त्रीजींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्वप्रथम सर्जिकल स्ट्राइकचा वापर केला होता, असे बुवांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर भारताचा होत असलेला विकास पाकिस्तानला पाहवत नव्हता. त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने काश्मीरमधील १५ ते २५ वयोगटातील मुलांना शिक्षण देऊन सुमारे ३० हजार मुजाहिद तयार केले. त्यांच्यामार्फत भारतात वेगवेगळ्या दहा ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या दिमतील पॅटन रणगाडा होता. स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्या मदतीकरिता भारतीय सैन्याने केलेली कामगिरी आणि काश्मीरमध्ये लुटालूट, अत्याचार करणार्याि अफगाणी टोळ्यांना हुसकावून लावल्यामुळे पाकिस्तानला तो पराभव जिव्हारी लागला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी पाकिस्तान काश्मीर स्वतंत्र करण्याच्या हेतूने पाकिस्तानने १९६५ साली कारगिल ते अखनूर भागात दहा ठिकाणी एकाच वेळी हल्ले केले. त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले. त्यातील राजा नावाची चौकी लेफ्टनंट कर्नल खन्ना आणि परमवीरचक्र विजेते अब्दुल हमीद यांच्या हवाई कारवाईमुळे भारताने ताब्यात घेतले. अत्यंत शक्तिशाली असलेले पॅटन रणगाडे निकामी करण्याचे काम अब्दुल हमीद, रणजित सिंग, आयुब खान, वसंत चव्हाण, अर्जुन सिंग, किलर बंधू अशा भारतीय सैन्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी केले. पाकिस्तानकडे असलेल्या अमेरिकन सॅबरजेट विमानाच्या तुलनेत छोटी आणि कमी क्षमतेची हंटर आणि नेट विमाने वापरून ही कारवाई करण्यात आली. मात्र भारतीय सैन्याची ताकद तोकडी होती. अशावेळी शास्त्रीजींनी तसेच तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यूहरचना आखली आणि थेट हल्ला करून बर्की आणि लाहोर ही पाकिस्तानची महत्त्वाची लष्करी ठाणी ताब्यात घेतली. बर्कीचे लष्करी ठाणे ताब्यात घेण्यापूर्वी पाकिस्तानचा निरीक्षण मनोरा उद्ध्वस्त करण्याचे काम श्रीकांत रेगे या मराठी लष्करी अधिकाऱ्याने केले होते. याशिवाय गुरुबक्ष सिंग, हरबक्ष सिंग, ब्रिगेडियर त्यागराज, रामसिंग अशा कित्येक लष्करी अधिकाऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता पाकिस्तानला नामोहरम केले. कराची आणि इस्लामाबाद ही पाकिस्तानची महत्त्वाची ठिकाणे भारतीय लष्कराच्या टप्प्यात आहेत, असा इशारा पाकिस्तानला देण्यात भारत यशस्वी झाला. मात्र पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघाकडे गेल्यामुळे २३ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी झाली. त्यानंतर ताश्कंदमध्ये उभयपक्षी करार करायचे ठरले. पाकिस्तान आणि भारताने ताब्यात घेतलेली एकमेकांची महत्त्वाची ठाणी एकमेकांना परत करण्याचा तह ताश्कंदमध्ये करावा लागला. तो करण्यासाठी भारतीय पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री ताश्कंदमध्ये निघण्यापूर्वी स्वा. सावरकर यांनी त्यांना ताश्कंदला जाऊ नका, अशा इशारा दिला होता. विजेत्या देशाच्या प्रमुखाने आपला देश सोडून इतर देशात तहासाठी गेल्यानंतर त्याचा घात होतो, हा इतिहास लक्षात घेऊन सावकरांनी तो सल्ला तेव्हा दिला होता. मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे शास्त्रीजींना तेथे जावे लागले. सर्व करार झाल्यानंतर १० जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर शास्त्रीजींच्या ताश्कंदमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. युद्धबंदी झाल्यानंतर ताशकंद करार होईपर्यंतच्या काळात देशभरात अंतर्गत भागात दंगल उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण करण्याची कल्पनाही सावरकरांनी दिली होती. त्यानुसार ती यंत्रणा राबविण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संघाच्या माध्यमातून सुमारे सव्वा महिना ही जबाबदारी चोखपणे सांभाळली. त्यामुळे त्या अशांततेच्या काळात देशभरात एकही दंगल झाली नाही, याचा आफळेबुवांनी आवर्जून उल्लेख केला. इतिहासातून धडा घेताना प्रत्येक भारतीयाने संभाव्य महायुद्धाची छाया लक्षात घेऊन अत्यंत सतर्क आणि सज्ज झाले पाहिजे. डिसास्टर मॅनेजमेंट, नर्सिंग, शारीरिक कसरतींचा सराव, उपासना इत्यादींच्या माध्यमातून तरुणांनी सज्ज झाले पाहिजे. २०२४ च्या सुमारास भारत जगातील सर्वांत बलशाली राष्ट्र होणार असल्याची भविष्यवाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज झाले पाहिजे, असे आवाहनही आफळे बुवांनी केले. कीर्तनाच्या मध्यंतरात मैत्रेयी किरण मालशे, वेद भूपेंद्र जोगळेकर आणि वीणा योगेश काळे या तीन विद्यार्थ्यांना त्यांनी इतिहासावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल गौरविण्यात आले. पावस येथे अनसूया आनंदी वृद्धाश्रम चालविणारे डॉक्टर गायत्री आणि गजानन फडके दांपत्य तसेच गतिमंद मुलांची आशादीप ही संस्था चालविणारे दिलीप रेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते शिवरायांची आरती कीर्तनाच्या शेवटी करण्यात आली.
..........
पावस येथे अनसूया आनंदी वृद्धाश्रम चालविणारे डॉक्टर गायत्री आणि गजानन फडके दांपत्याचा विशेष सन्मान करताना हभप चारुदत्तबुवा आफळे
गतिमंद मुलांची आशादीप ही संस्था चालविणारे दिलीप रेडकर यांचाही सन्मान कीर्तनसंध्या परिवारातर्फे हभप आफळेबुवांनी केला.
कीर्तनसंध्या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी (११ जानेवारी २०२०) राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी १९६५च्या युद्धात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची गाथा उलगडली. (निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर चौथ्या दिवशी सपत्नीक कीर्तनाला उपस्थित होते. समारोपावेळी त्यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली.
चौथ्या दिवशी बुवांनी सादर केलेली गाणी, देवीचा गोंधळ, आरती आदींचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर... https://youtu.be/X23aWPlvuIs
राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम म्हणजे लालबहादूर शास्त्री
हभप आफळे बुवा यांचे प्रतिपादन रत्नागिरी : देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम होते. शेती आणि संरक्षण या देशाच्या अत्यावश्यक बाबींकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिल्यामुळे या दोन्ही बाबतीत देश नेहमीच आघाडीवर राहिला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी येथे केले. कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात `योद्धा भारत` या आख्यान विषयावर तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनात त्यांनी लालबहादूर शास्त्री यांची कारकीर्द आणि १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या पहिल्या युद्धाचा इतिहास कथन केला. पूर्वरंगात बुवांनी राम का गुनगान करिये हे हिंदी भजन निरूपणासाठी घेतले. राज्याभिषेक होण्याच्या पूर्वसंध्येला दशरथ राजाकडे भरताला राज्याभिषेक करण्याची आणि रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवण्याची मागणी ऐकल्यानंतरचा प्रसंग बुवांनी ऐकविला. रामाने त्या प्रसंगात आईची आणि वडिलांची दोघांचीही समजूत काढली. भद्रता आणि सभ्यतेचे दर्शन रामाच्या वर्तणुकीतून दिसून येते. दशरथाची तेव्हाची मानसिकता स्पष्ट करण्यासाठी बुवांनी किर्लोस्करांच्या `रामराज्य वियोग` या नाटकातील `सोडूनी मज राम राय जाय जरी वनी` हे नाट्यगीत गायले. एकवचनी आणि निःस्वार्थी रामाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले जाते. तेच गुण लालबहादूर शास्त्री यांच्यामध्ये होते हे पटवून देणारी लहानपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतची विविध उदाहरणे बुवांनी सांगितली. वडिलांचे निधन झाल्यानंतर लालबहाद्दूरना मुलांच्या शिकवण्या घेऊन शिक्षण घ्यावे लागले. या काळात घरभाडे भरण्याएवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी एक धनवान व्यक्ती महिना ५० पैसे द्यायला तयार होती. पण त्यांनी घरभाड्याएवढे केवळ पंचवीस पैसे त्यांच्याकडून घेतले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे वेतन साठ रुपये होते. काही गरजेसाठी त्यांना पैशांची गरज लागली, तेव्हा त्यांनी पत्नी सौ. ललिता यांच्याकडे पैसे मागितले. पत्नीने घरखर्चातून वाचवलेले पैसे लालबहादूर यांना दिले. एवढे पैसे घरातून बाजूला काढून ठेवता येतात, याचा अर्थ आपला पगार पाच रुपये जास्त आहे, असे समजून त्यांनी सरकारला आपला पगार रुपयांवरून ५५ रुपये कमी करायला लावला निःस्वार्थी आणि साधेपणा हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. लग्नाच्यावेळी त्याकाळी हुंड्याची प्रथा पाळावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी तेव्हा हुंड्यात चरखा आणि कापूस मागितला. पुढच्या आयुष्यातही आपले कुटुंब पूर्णपणे साधेपणाने कसे राहील, याकडे त्यांचा कटाक्ष होता. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांची मुले शहरी बससेवेच्या बसमधून प्रवास करत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ओढले गेले. त्यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक निष्कामेश्वर मिश्रा यांची मोठी मदत झाली. देशप्रेमाचे धडे गुरुजींनी लालबहादूर शास्त्रींना दिले. पुढच्या काळात ते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विश्वासू सहकारी बनले. जमीन सुधारणेसारखा महत्त्वाचा कायदा आणण्यापूर्वी देशभरातील शेतकरी कुळांना न्याय देणारा पूर्णपणे निष्पक्ष अहवाल शास्त्रीजींनी दिला. पुढच्या काळात त्यांनी दिलेली जय किसान हा नारा त्यांनी आधीच अमलात आणला होता देशावर १९६२ साली झालेल्या चीनच्या आक्रमणानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण देशाचे जनजीवन ढवळून निघेल अशी भीती वाटण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. हजरत बाल हे इस्लाम धर्मीयांचे श्रद्धास्थान श्रीनगरमध्ये आहे. महंमद पैगबंर यांचा पवित्र केस कडेकोट बंदोबस्तातही चोरीला गेल्याची बातमी २६ डिसेंबर १९६३ रोजी चोरीला गेल्यी बातमी आली. त्यानंतर आठच दिवसात ४ जानेवारी १९६४ रोजी तो केस पुन्हा मिळाल्याची बातमीही आली. तो त्याच ठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र अनेक मुस्लिम संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. तेथे कोणता तरी गोंधळ निर्माण झालेला असू शकतो, अशी शंका त्या संघटनांनी घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले. शास्त्रीजींनी ती परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. मुस्लिम मौलवींच्या पथकासह शास्त्रीजींनी हजरत बाल दर्ग्याला भेट दिली. मौलवींच्या साक्षीनंतर संपूर्ण देशातील अशांत प्रकरण निवळले. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना नेहरूंचा उत्तराधिकारी असे म्हटले जाऊ लागले. पंडित नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी निधन झाल्यानंतर शास्त्रीजींची २ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदी निवड झाली. त्यादरम्याने देशात अभूतपूर्व अन्नधान्य टंचाई निर्माण झाली. तेव्हा परदेशातून धान्य मागवायच्याऐवजी देशातच धान्याची व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार करून शास्त्रीजींनी दर सोमवारी उपास करून राहिलेले धान्य वाचविण्याचे आवाहन देशवासीयांना केले. शास्त्रीजींच्या शब्दाला तेव्हा एवढे महत्त्व होते की नागरिकांनी दर सोमवारी काहीही न खाता उपास केला आणि त्यातून संकलित झालेले धान्य पुढे तीन वर्षांच्या टंचाईच्या काळात देशाला उपयोगी ठरले. या काळात एकदाही भारताला अन्नधान्य आयात करावे लागले नाही. शेतीबरोबरच शास्त्रीजींनी देशाच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. . संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली. पाकिस्तानने अमेरिकेकडून तेव्हाचा प्रगत असा पॅटन रणगाडा खरेदी केला होता. मात्र शास्त्रीजींनी असे रणगाडे घेण्याऐवजी शस्त्रास्त्रे तयार करण्याचे तंत्रज्ञान, प्रगत यंत्रे देशात तयार व्हावीत, या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांना अमेरिका, रशियात पाठविले होते. सैन्याला अधिक अधिकार दिले. देशाची आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका स्वातंत्र्यानंतर भारतात प्रथमच अमलात आली होती. आवश्यक तेथे रस्ते, वैमानिकांची प्रशिक्षण, हॅण्डग्रेनेड तयार करणे, लष्कराच्या रेल्वेलाइन तयार करणे, आगीतून धावण्याचा आणि काम करण्याचा सैनिकांना सराव करून देणे अशा कामावर संरक्षणाच्या बाबतीत भारताने भर दिला. भारतीय सैन्यदल प्रगत होत असताना जानेवारी १९६५ मध्ये पाकिस्तानने कच्छचे रण भागात भारतावर पहिले आक्रमण केले. भारताकडे तेव्हा असलेल्या तुलनेने कमी क्षमतेच्या शस्त्रास्त्रांच्या आधारे ते आक्रमण परतवून लावले. भारताचे ९३, तर पाकिस्तानचे १५० अधिकारी त्या युद्धात मारले गेले. अन्नधान्याच्या दृष्टीने भारत स्वयंपूर्ण व्हावा आणि संरक्षणाच्या बाबतीतही देशाची ताकद वाढावी यासाठी शास्त्रीय केलेले प्रयत्न हेच त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या फलित म्हणता येईल, असे आपले आफळेबुवांनी सांगितले. कीर्तनाच्या मध्यंतरात आर्या संदीप मुळ्ये, हर्षवर्धन विद्याधर ताम्हनकर आणि शुभानन उमेश आंबर्डेकर या तीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल गौरविण्यात आले.
..........
रत्नागिरी – हिंदू राष्ट्र सेनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे हभप चारुदत्तबुवा आफळे यांचा त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये विचारलेल्या
प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल शुभानन उमेश आंबर्डेकर याला गौरविण्यात आले. ...................... कीर्तनसंध्या उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी (१० जानेवारी २०२०) राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी सादर केलेले अभंग/श्लोक/पोवाडे/गाणी, इत्यादींचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर https://youtu.be/j8PWoRjYOBI
राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्राध्यापकांचा पुढाकार नाही
हभप चारुदत्त बुवा आफळे यांची खंत रत्नागिरी : देशद्रोहाची भावना शिकवणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये प्राध्यापकांचा कोणताही पुढाकार नसतो. कोणतेही प्रयत्न नसतात, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली. येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कीर्तनात आफळे बुवांनी निरूपणासाठी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील दीनानाथ हा राम कोदंडधारी हा श्लोक घेतला होता. त्याचे निरूपण करताना रामायण काळात राक्षसांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींनी राज्याच्या रक्षणासाठी राज्यकर्त्यांचे कसे प्रबोधन केले होते, याचा आढावा बुवांनी घेतला. ते म्हणाले की त्याकाळी गुरुस्थानी असलेल्या हट्टाग्रही ऋषीमुनींनी कडक आणि कर्मठ निर्बंध सांभाळून उपासना करत असतानाच रामासारख्या त्याकाळच्या नव्या नेतृत्वाला सबळ करणे, रणांगणावर उभे करणे यासारखे कार्य केले. त्यामुळे ऋषींची आध्यात्मिक सिद्धता कोठेही कमी झाली नाही. सध्याच्या विद्यापीठांमध्ये देशद्रोहाची भावना शिकविण्याचे प्रयत्न दहा-दहा वर्षे सुरू आहेत. त्याचे समर्थन करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचे काम वक्ते करत आहेत. पण या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांकडे वक्ते भरपूर आहेत. पण चांगला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी तसे प्रवक्तेच नाहीत. याचा परिणाम देशाला भोगावे लागत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तिकेच्या विरोधात रत्नागिरीत गुरुवारी (दि. ९ जानेवारी) रत्नागिरीत स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी कोणतीही भक्तमंडळे किंवा उपासना मंडळे सावरकरांचा अपमान करणार्यां्च्या विरोधात निषेध करण्यासाठी फलक घेऊन आली नाहीत. अशाच भक्त मंडळांच्या सद्गुरूचा वाढदिवस असेल तर ८० हजार लोक जमतील, पण राष्ट्रीय अवमानाचा विरोध करण्यासाठी आठशेसुद्धा लोक जमत नाहीत. देशाबद्दल आस्था नसल्याचेच हे लक्षण आहे. त्यामुळेच भारताचा अवमान होत आहे, असेही आफळे बुवा म्हणाले. `कीर्तनसंध्या` महोत्सवात दुसऱ्या दिवशी योद्धा भारत या आख्यानविषयाच्या अनुषंगाने बुवांनी कीर्तनाच्या उत्तररंगात १९६२ साली चीनविरुद्धच्या लढाईत भारताला पत्कराव्या नामुष्कीजनक पराभवाचे विश्लेषण केले. लेफ्टनंट जनरल कौल यांनी लिहिलेले `अनटोल्ड स्टोरी`, श्याम चव्हाण यांचे `वॉलोंग` अशा पुस्तकांचा आधार घेऊन आफळेबुवांनी १९६२ सालचे युद्ध श्रोत्यांसमोर उभे केले. भारतीय बुद्धधर्माचा चीनमध्ये झालेला प्रसार हे कारण पुढे करून चीनने भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. `हिंदी-चिनी भाई भाई` म्हणून या संबंधांचा उल्लेख तेव्हा करण्यात आला. शांततेचा पुरस्कार करणारे चीन आणि जपानसारखे देश स्वतः मात्र नवनव्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होत होते. भारत त्याबाबतीत मागे होता. अशा स्थितीत शांततेचा अग्रदूत होण्याच्या स्वप्नरंजनात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रमून गेले होते. त्यामुळे चीनकडून होणाऱ्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सेन, थापर इत्यादी तेव्हाचे लष्करप्रमुख नेहरूंना या कारवायांची माहिती देत. मात्र भारतीय सैन्याची धास्ती जगाला वाटू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला नेहरूंकडून सैन्याला दिला जात होता. याच स्थितीची गैरफायदा घेऊन चीनने भारताचा तिबेट हा प्रांत जिंकून घेतला. मात्र मैत्री आणि बंधुभावाच्या नात्याचा उल्लेख करत भारताने साधा निषेधही तेव्हा व्यक्त केला नाही. तिबेटला जोडणारा रस्ता बांधायला चीनने १९५५ साली सुरुवात केली, १९५७ साली त्याचे उद्घाटन झाले. त्याद्वारे आणि तोफा दारूगोळा भारताच्या सीमेपर्यंत आणणे शक्य व्हावे, यासाठी हा रस्ता बांधला गेला होता, हे स्पष्ट होते. ज्या भागात गवतही उगवत नाही त्या तिबेटचा आग्रह का धरावा, असे निवेदन तेव्हा नेहरूंनी संसदेत केले होते. चीनने रस्ता बांधल्याने अतिक्रमण झाले, मात्र चीनकडून आक्रमण होईल असे वाटत नाही, असेही नेहरूंचे म्हणणे होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुढच्या पाच वर्षांनी २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सैन्याने सर्व सामर्थ्यानिशी भारतावर जबरदस्त आक्रमण केले. भारताची १२ ठाणी अवघ्या चार दिवसात जिंकून घेतली. नेफा प्रांत चीनने गिळंकृत केला. अपुरा आणि जुना शस्त्रसाठा तसेच अपुऱ्या साधनसामग्रीमुळे भारतीय सैन्याला चीनच्या सैन्याशी लढता आले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेऊन चीनने दोन महिन्यांच्या युद्धानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. मात्र तरीही लडाखचा बारा हजार चौरस मैलांचा प्रदेश चीनला द्यावा लागला, असे प्रतिपादन आपले बुवांनी केले. चीनविरुद्ध १९६२ साली झालेल्या युद्धाच्या काळात सेनाधिकारी होशियार सिंग, सुभेदार जोगिंदर सिंग, शैतान सिंग, गुरखा पलटणीचे मेजर धन सिंग थापा, श्याम चव्हाण, विमान चालवत असताना शत्रुपक्षाची गोळी मांडीत लागल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही चीनचा ६०० बॉम्बगोळ्यांचा बॉम्बचा साठा नष्ट करणारे वैमानिक टकले, मेल्यानंतर आपल्या शरीराचा भार मशीनगनवर नेमका कसा राहील, याची काळजी घेऊन मरताना चीनचे एक हजार सैनिक मारणारे गोविंद कांबळे अशा सैनिकांच्या पराक्रमाची कहाणी आफळेबुवांनी ओघवत्या शैलीत, सुमधुर आणि शौर्यप्रधान गीतांच्या साथीने विशद केली. कीर्तनाच्या पहिल्या दिवशीच्या निरूपणावर इतिहासावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या आदित्य महेश दामले, वेदांग महेंद्र पाटणकर आणि प्रथमेश उत्तम घाटे या विद्यार्थ्यांना आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन समारंभात गौरविण्यात आले.
..........
कीर्तनसंध्या महोत्सवात प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल
रत्नागिरी : ‘तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे,’ असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी मांडले.
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. आठ जानेवारी २०२० रोजी या महोत्सवाचा प्रारंभ झाला. ‘योद्धा भारत’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर कारगिल युद्धापर्यंतच्या काळातील योद्ध्यांचा पराक्रम आफळेबुवा या कीर्तनातून उलगडणार आहेत. पहिल्या दिवशी चारुदत्तबुवांनी स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्मीरमधील युद्धाची गाथा उलगडली.
‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ हा अभंग त्यांनी पूर्वरंगासाठी घेतला होता. त्याचे निरूपण करताना ते म्हणाले, ‘देशभरातील राजे श्रीरामाच्या राज्याभिषेकाला आले होते. त्यामुळे इतर कोणत्याही भारतीय राजापेक्षा रामाचा राज्याभिषेक सोहळा वेगळा होता. म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. नंतरच्या काळात सज्जनांनी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही. अल्लाउद्दीन खिलजी भारताच्या दिशेने निघाला होता. एक लाखाहून अधिक फौज आपल्या पाठोपाठ येणार असल्याची अफवा त्याने पसरवली होती. वस्तुस्थिती तशी नव्हती. खिलजीने उठवलेल्या अफवेच्या विरुद्धचा प्रचार तेव्हाच्या आध्यात्मिक योग्यतेच्या व्यक्तींनी केला असता, तर मुघल साम्राज्य भारतात निर्माण झालेच नसते. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर केलेल्या पहिल्या आक्रमणापासून शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंतच्या काळात तत्कालीन ऋषिमुनींनी समाजाला सावध केले असते, तर हे आक्रमण झाले नसते. सुमारे चारशे वर्षे भारताला पारतंत्र्यात घालवावी लागली नसती.’
‘आजही भारताच्या सुरक्षिततेकडेही लक्ष दिले पाहिजे,’ असे सांगून ते म्हणाले, ‘क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर विमानतळापासून क्रिकेटपटूंची शोभायात्रा निघते; पण १९९९ साली कारगिल युद्ध जिंकल्यानंतर ते जिंकणाऱ्या जवानांची शोभायात्रा काढायचे कोणालाही सुचले नाही. देशाच्या सुरक्षेपेक्षा खेळाची करमणूक आपल्याला जास्त महत्त्वाची वाटते.’
उत्तररंगात बुवांनी काश्मीर प्रश्न कसा निर्माण झाला याविषयी निरूपण केले. ते म्हणाले, ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी देशातील ५६० संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार नव्हती. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे प्रयत्न करून संस्थानांना भारतात विलीन व्हायला भाग पाडले; मात्र जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार झाली नाहीत. काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी तर स्वातंत्र्यापाठोपाठ आलेला २२ ऑक्टोबर १९४७चा दसरा स्वतंत्र राज्याचा पहिला शाही दसरा म्हणून साजरा करायचे ठरवले. त्याच दिवशी अफगाणी टोळ्यांनी श्रीनगरकडे कूच केल्याची माहिती त्यांना मिळाली. अफगाणी टोळ्यांनी मुजफ्फराबाद, बारामुल्ला भाग काबीज करून तेथील स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले, खून पाडले. अशा स्थितीत काश्मीरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर काश्मीरच्या राजांनी भारताकडे मदतीची याचना केली. त्यानुसार काही अटींवर काश्मीरला लष्करी मदत करायला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राजी झाले. त्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला आणि अवघ्या ४८ तासांत तुटपुंज्या सामग्रीसह भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दाखल झाले.’
‘देश नुकताच स्वतंत्र झाला असल्याने अनेक ब्रिटिश अधिकारीही भारतीय सैन्यात होते; मात्र त्यांचे धोरण पाकधार्जिणे असल्याने त्यांनी काश्मीरला मदत करण्याच्या पथकामध्ये ब्रिटिश सैन्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. अत्यंत भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये राजेंद्रसिंह, सोमनाथ शर्मा, दिवाणसिंग असे भारतीय लष्कराचे अनेक मोहरे कामी आले. त्यांच्या अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र, महावीर चक्र आणि शौर्यपदक देण्यात आले. महाराष्ट्रातील रामा राघोबा राणे यांनी जीव रणगाड्याखाली स्वतःला बांधून घेऊन शत्रूने पेरलेले तब्बल ६०हून अधिक भूसुरुंग निकामी केले. तेव्हा केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. हा गौरव हयात असताना मिळण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतीय सैन्याकडे मोजकीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा होता, तसेच सैनिकांची संख्याही अपुरी होती. तरीही, मोठ्या संख्येने आलेल्या अफगाण टोळीवाल्यांनी पादाक्रांत केलेला काश्मीरचा दोन-तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्यक असलेले पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्मीरच्या ताब्यात आला असता,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.
‘युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन काश्मीरने भारतात विलीन व्हायला संमती दिली होती. ती लक्षात घेता आता जो भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तोच तेव्हाचा एक-तृतीयांश भाग तेव्हाच भारतातच विलीन झाला असता. तो पाकिस्तानला मिळू शकला नसता. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेव्हाच्या लष्कराने केलेली कामगिरी अप्रतिम होती; मात्र त्याच वेळी पंडित नेहरूंनी भारत-पाक प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषदेत नेला. त्यानंतर जानेवारी एकूण १९४८च्या जानेवारीत युद्धबंदी झाली आणि ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर ७०वर्षांहून अधिक काळ भारताला भेडसावत आहे,’ असे आफळेबुवा म्हणाले.
भारतीय सैन्याने काश्मीरमधील उरी, स्कार्डू, जोझिला खिंड, नौशेरा, राजौरी, लेह, लडाख, शाल टँक, हाजीपीर खिंड इत्यादी भागात गाजविलेल्या शौर्याची गाथा आफळेबुवांनी ओघवत्या शैलीने विविध गीते सादर करून सांगितली. त्या वीरांच्या गाथेच्या बुवांनी केलेल्या वीररसपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित समुदायाच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.
आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरीत नवव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे उद्घाटन करताना हभप चारुदत्तबुवा आफळे आणि अन्य मान्यवर
पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, देसाई उद्योग समूहाचे विजय देसाई, माधव कुलकर्णी, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रकाश जोशी आणि ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कीर्तनसंध्या परिवाराचे प्रमुख अवधूत जोशी यांनी हभप आफळे बुवा यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा
विद्यार्थ्यांना दररोजच्या आख्यानातील इतिहास विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(पहिल्या दिवशीचे काही व्हिडिओ सोबत देत आहोत...)
(या व्यतिरिक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ कोकण मीडियाच्या फेसबुक पेजवर ऐकायला/पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.)