Saturday 9 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प दुसरे


हिंदवी स्वराज्याला नानासाहेब पेशव्यांनी लावली प्रशासकीय शिस्त



चारुदत्त आफळे : दुसऱ्या दिवशी पाच हजार श्रोत्यांची गर्दी

रत्नागिरी : ``हिंदवी स्वराज्याचा कारभार पुण्यात नेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी भविष्याचा विचार करून पुण्याचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला. शहर वसविण्यासाठी कष्टकरी व सेवेकरी दहा ज्ञातीतील लोकांना कर माफ केला. मुळा, मुठा नद्यांचे ९० टक्के पाणी शेतकऱ्यांसाठी पुरविले जाईल, अशी व्यवस्था केली.. कात्रजच्या जलाशयात मोठे हौद बांधून दगडी नळ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला. नानांच्या दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्तही मिळाली``, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवातील दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पाच हजार श्रोते उपस्थित होते. या वेळी बुवांना हर्षल काटदरे, प्रसाद करंबेळकर, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.
श्री. आफळे यांनी पूर्वरंगामध्ये `आपुलिया हिता जो जागता, धन्य मातापिता तयाचिया` हा अभंग निरूपणाला घेतला. भगवद्गीतेमधील कर्मयोग, सावतामाळीची कथा सांगितली. मंत्रपुष्पांजली म्हणजे सर्व हिंदूंचे राष्ट्रगीत आहे. नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथांनी मिळून दहा श्लोकांचे स्तोत्र तयार केले आहे. ते सर्व पंथांनी म्हणावे. हिंदू म्हणून एकत्र येण्याचा हा प्रयत्न असून हे सर्व एकत्र असल्याची भावना निर्माण होण्यासाठी हे स्तोत्र म्हणावे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ``बाजीरावांनंतर पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न होता. छत्रपती शाहूंनी या पदासाठी इच्छुक असलेल्या काही जणांची पारख करून अखेर बाजीरावांचे बंधू नानासाहेब यांना अठराव्या वर्षी हे पद दिले. त्यांनी वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक युद्धे जिंकली आणि प्रशासकीय घडी नीट बसवली. पहिल्या चार वर्षांतच बुंदेलखंडामध्ये समेट घडवला. त्यासाठी बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर याची मदत घेतली. एका बाजूला पोर्तुगीजांचा धोका व दुसरीकडे सावनूरचा नबाब कोल्हापूरवर चाल करून येणार होता. त्यावेळी तुळाजी आंग्रेंच्या आरमाराने हिंदवी स्वराज्याविरोधात बंड पुकारल्याने नानासाहेबांनी क्षणभर इंग्रजांशी हातमिळवणी केली. नंतर नानांनी नवीन आरमार उभारून ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. निधनापूर्वी छत्रपती शाहूंनी नानासाहेब पेशव्यांना बोलावून वंशपरंपरागत पेशवाई देतो, असे कागद करवून घेतल्याचे सांगितले. मात्र नानांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदवी स्वराज्याच्या गादीवर भोसले वंशच असावा,  असे निक्षून सांगितले. त्यानुसार नानांनी ताराराणीचा नातू दुसरा राजाराम याला गादीवर बसवले. शाहूंच्या सांगण्यानुसार स्वराज्याची सर्व कागदपत्रे, दरबार पुण्यात नेला. परंतु अंतिम शिक्कामोर्तब सातारच्या गादीकडेच राहील, अशी व्यवस्था केली. पुण्यामध्ये पर्वतीवर नानांनी देवदेवेश्वर संस्थानात पंचायतन स्थापन केले. त्यातील एका कोनाड्यात शाहूंच्या पादुका पूजनासाठी ठेवल्या होत्या. यावरूनच त्यांची शाहूनिष्ठा दिसून येते.``
माणसांची पारख नानासाहेब सुरेख करत होते. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेही त्यातीलच एक. हिंदवी स्वराज्याचे मुख्यालय पुण्यात नेले. मराठशाहीचे अधिकार माळवा ते बंगाल आणि चित्रदुर्ग, दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात असल्याने तिथले लोक कामानिमित्त पुण्यात यायचे. त्यातून पुण्याची लोकसंख्या वाढणार होती. याकरिता सेवेकऱ्यांच्या दहा ज्ञातींचा कर माफ केला. शहर सुशोभीकरणामध्ये नानांनी विशेष लक्ष दिले. गणेश हे पेशव्यांच्या आराध्य दैवत. त्यामुळे थेऊरच्या गणपतीला पेशव्यांची सुवर्णतुला केली जायची. नानासाहेबांची तीन वेळा तुला झाली आणि त्यातील मोहरा दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आल्या. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीनंतर नानांनी कारभारासाठी गणेशमहाल, गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा अशी नावे दिली. बावनखणी हे विविध प्रांतांमधली कलाकारांचे दालन होते. त्यावेळी बैठकांमध्ये एखाद्या सरदार, प्रेक्षकाला नाकारण्याचा अधिकार या कलावंतांना होता. दुर्दैवाने कलावंतीणी देहविक्रय करतात, असा गैरसमज समाजात पसरवला गेला, अशी खंत आफळेबुवांनी व्यक्त केली.
``बुंदेलखंड, बंगालच्या लोकांनी आम्ही पेशव्यांना कर का द्यायचा अशी बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नानांनी खरमरीत पत्र लिहून त्यांना ठणकावले, तुमच्या प्रांताच्या संरक्षणासाठी मराठ्यांच्या फौजा येतात. तुमची सुरक्षा आम्ही करतो, त्यासाठी हा कर दिला पाहिजे. हा कर हिंदवी स्वराज्यासाठीच वापरला जातो. आजही भारतामध्ये अशी दुहीची भाषा केली जाते. नागालँड, मिझोराम आदी राज्ये "आमचा दिल्लीशी काय संबंध?" असे विचारतात. अहिंदूंची संख्या वाढल्यानंतर भारताने हजारो वर्षे अन्याय पाहिला आहे. पुन्हा असे घडू नये यासाठी हिंदूंनी आता जागे झाले पाहिजे. इंग्रजांनी ब्राह्मण आणि इतर हिंदूंमध्ये फूट पाडली, तेव्हाच त्यांना राज्य करता आले. मात्र आज हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज आहे,`` असे मतही श्री. आफळे यांनी व्यक्त केले.

................................................................

`झोंपाळ्यावरच्या गीते`च्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात


कवी अनंतततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या `झोंपाळ्यावरची गीता` या भगवद्गीतेच्या ओवीबद्ध मराठी श्लोकसंग्रहाचा आफळेबुवांनी पूर्वरंगात आवर्जून उल्लेख केला. झोपाळ्यावर बसून सहज गुणगुणाव्यात आणि त्या गुणगुणताना गीतेचा अर्थ समजावा, अशी या गीतेची रचना आहे. सुबोध मराठीमध्ये लिहिलेले हे श्लोक ओव्यांप्रमाणे पाठ कराव्या आणि गीतेविषयीची गोडी वाढविण्याकरिता या झोंपाळ्यावरची गीतेच्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात, असे, त्यांनी सूचित केले. तसेच झोंपाळ्यावरच्या गीतेमधील कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील
कर्माहूनी जरी । वरचढ बुद्धी  । कर्म करीं आधीं । सांगसी कां ?
नको घोटाळून  । घेऊं देवा मशीं  । सांग हृषीकेशी  । एक कांहीं  ।।
कर्मयोग्या कर्म  । सांख्यियांना ज्ञान  । दोन्हीही प्रमाण  । कृष्ण बोले  ।।
कर्म न केल्यानें  । कर्मशून्यता न  । कर्म टाकील्यानं  । ज्ञान नाही  ।।
कर्म केल्यावीण  । सांग राहे कोणे? घडवीती गुण  । कर्म लोकीं  ।।
कर्म टाकल्यानें  । देहही चालेना  । म्हणूनी अर्जुना  । करावें तें  ।।
स्वधर्म म्हणोनी  । कर्म तें करावें  । परी नसूं द्यावें  । फलीं मन  ।।
या ओव्या त्यांनी गाऊन दाखविल्या.

(`झोंपाळ्यावरची गीता` हे पुस्तक रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे सत्त्वश्री प्रकाशनने अलीकडेच पुनर्मुद्रित केले आहे.)

................
`झोंपाळ्यावरची गीता` या पुस्तकाविषयी निरूपण करताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा

 

Thursday 7 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प पहिले




कीर्तनसंध्या महोत्सवात कीर्तन करताना चारूदत्त आफळेबुवा. शेजारी साथसंगत करणारे कलाकार. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)

बाजीरावाचे शौर्य, पराक्रम कितीतरी पटीने मोठे



आफळेबुवा : शृंगाराला अतिमहत्त्व नको, सर्वच्या सर्व ४० लढाया जिंकले

रत्नागिरी : "बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये काही चुकीचे दाखले दिले आहेत. ते इतिहासाला पटणारे नाही. २० वर्षाच्या पेशवे कालखंडात बाजीरावाने ४० लढाया केल्या व सर्व जिंकल्या. अशा वेळी शृंगाराला ङ्कारसा वेळच नव्हता. त्यामुळे बाजीरावाचे शौर्य कितीतरी पटीने मोठे आहे. मात्र चित्रपटात शृंगाराला महत्त्व देऊन तो चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. बाजीरावाचे शौर्य दाखवण्यासाठी एखादा अ‍ॅनिमेशनपट केल्यास त्यात अगदी तारीखवार ते कोठे होते, किती लढाया झाल्या आणि मराठशाहीचा दबदबा देशभर नेण्यात बाजीरावाचे योगदान मांडता येईल. मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाच्या पराक्रमाचे महत्त्व कमी होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे", असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये ६ ते १० जानेवारी २०१६ या कालावधीत चारुदत्तबुवा आफळे यांची कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे. या मालेतील पहिले पुष्प गुंफताना बुवांनी बाजीराव पेशव्यांविषयी सांगितले. ते "बुंदेलखंडामध्ये महम्मदशहा बंगशने हल्ला केल्यावर छत्रसाल राजाने बाजीरावास बोलावले. जैतापूरच्या किल्ल्याला दोन महिने वेढा देऊन बाजीरावाने बंगशला बाहेर येण्यास भाग पाडले. विजय झाल्यावर छत्रसालने त्याची कन्या मस्तानी-बाजीरावाचा विवाह करून दिला. बाजीरावांनी गोqवदपंत खेर (बुंदेले) यांना सेनापती म्हणून बुंदेलखंडात ठेवले. ब्राह्मणांमध्ये दुसरा विवाह मान्य नाही, छत्रसाल व मुस्लिम राणीच्या विवाहानंतर मस्तानीचा जन्म झाला असल्याने तिचा बाजीरावाशी विवाह मान्य नव्हता. मात्र नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी तत्कालीन राजेशाहीमध्ये असे अनेक विवाह करून संरक्षण केले जायचे. उत्तरेतील कोणत्याही राज्यात मस्तानीचा उल्लेख सकल सौभाग्यवती मस्तानी असा केला जात असल्याचा इतिहास आहे."
पेशव्यांनी शाहू महाराजांना प्रमाण मानले होते. त्यांच्या मुद्रेवरून हे सिद्ध होते. शाहू गादीच्या संरक्षणासाठी व त्यांना हर्ष देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ही मुद्रा होती. भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली शौर्य दाखवायला आणि प्राण द्यायला मराठे, ब्राह्मण, मुस्लिम आणि अठरापगड जातीतील लोक होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. सन १६३० मध्ये शिवरायांचा जन्म, १६४५ मध्ये स्वराज्याची घोषणा आणि १६८० मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्य सांभाळले. त्यानंतर संभाजी महाराजांनी १० वर्षे, राजाराम महाराजांनी १५ वर्षे, ताराबाईंनी सन १७१० पर्यंत स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यानंतर १८१० पर्यंत शंभर वर्षे पेशवाईने शिवरायांचे राज्य अखंड भारतात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीपुत्र शाहूंच्या हिंदवी राज्यात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट हे पहिले पेशवे झाले. त्यानंतर अवघ्या २१ व्या वर्षी बाजीराव तथा राऊ हे पेशवे झाले. बंडासाठी तयार असलेल्या कान्होजी आंग्रेंना त्यांनी मराठी राज्यात घेतले, असे बुवांनी सांगितले.
ते म्हणाले, "इतिहास संशोधनात शासनाच्या निकषांप्रमाणे पत्रव्यवहाराला जास्त महत्त्व आहे. बखरी दुय्यम मानल्या आहेत. कारण त्या अनेक वर्षांनंतर मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेल्या असतात व त्यात काही दंतकथाही असू शकतात. पण या इतिहासाची धार बोथट करूनच समाजाला इतिहास सांगितला जातो. ब्राह्मणांनी जो इतिहास लिहिला तो सत्य घटनेवरच लिहिला. त्यात कोणत्या जाती-धर्माच्या लोकांवर आसूड ओढलेला नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे, हे मान्य करायला हवे."
श्री. आफळेबुवा म्हणाले, "तत्कालीन दिल्लीच्या सत्ताधीशाने मराठशाहीला दक्षिणेतील सहा सुभ्यांचा भाग महसूल वसुलीसाठी दिला होता. माळवा, गुजरात, वऱ्हाड प्रांतापासून कर्नाटकपर्यंतच्या विस्तीर्ण भागात मराठेच वसुली करू शकतात, हे दिल्लीपतीला माहिती होते. दिल्लीचे तख्त कायम नाही, हे शाहूंना माहिती होते. यामुळे आपले सैन्य बळकट करण्यासाठी त्यांनी बाजीरावाला त्यांनी तुला सैन्यात काय बदल हवा असे विचारले. पायदळ, हत्ती, तोफखाना बाजूला ठेवून केवळ १५ हजार घोडदळ बाजीरावाने मागितले. यामुळे सरळ सैन्याची एवढी ताकद वाढविताना दिल्लीच्या मुळावर घाव घालण्याचा दृष्टीकोन ठेवला. दिल्लीला पोहोचायला जेथे चार महिने लागायचे तेथे बाजीराव २८ दिवसांत जायचे. बाजीराव वर्षातले १० महिने स्वारीवरच असायचे. गुजरात, माळव्यामध्ये तीन वर्षे वसुलीसाठी बरीच खटपट केली. पण चौथ्या वर्षी मराठा सरदार गेला की लगेच वसुली होऊ लागली. बाजीरावाने तलवारीचे तिखट पाणी दाखवले. आपला दबदबा निर्माण केला. बाजीरावाकरिता शाहूंनी शनिवारवाडा उभारण्यास सांगितला."
जागतिक युद्धामध्ये आशिया खंडातील दोन लढायांना स्थान आहे. एक शिवरायांची प्रतापगडावरची लढाई आणि दुसरी १७२७ ला पालखेडमध्ये झालेली बाजीराव आणि निजामाची लढाई. सैनिकी प्रशिक्षणात या दोन्ही लढायांना स्थान आहे. निजामाने माळवा, गुजरात, वऱ्हाडातील सैन्याला मराठशाहीविरुद्ध बंड करायला सांगितले. बाजीराव त्या मिटवायला निघाला की आपण हल्ला चढवू असा निजामाचा इरादा होता. बाजीरावाने निजामाला नामोहरम केले. निजाम  अहमदनगरपर्यंत आला. तो शिरूरवरून पुण्यात हल्ला करणार होता. पण तत्पूर्वीच औरंगाबादला निजामाचा कबिला होता त्याच ठिकाणी बाजीराव सैन्यानिशी उभा ठाकला. त्यामुळे निजाम तोफखाना नगरलाच ठेवून तातडीने औरंगाबादला निघाला. नगर-औरंगाबादच्या मध्ये पालखेड येथे तोफगोळ्यांचा भडीमार करून निजामाला हरवल्याचे श्री. आफळे यांनी सांगितले.
श्री. आफळे यांनी पूर्वरंगात संत तुकारामांचा "आपुललिया हिता जो" हा अभंग निरूपणाला घेतला. आज आयडॉल म्हणून प्रचंड श्रीमंत व्यक्तीचे नाव घेतले जाते. पण त्यापेक्षा बाबा आमटे हे आयडॉल असतील तर देशाचे भवितव्य नक्कीच चांगले घडेल, असे सांगत आफळेबुवांनी खड्या आवाजात गायलेली घडवायाला राष्ट्र नवे, पद्मनाभा नारायणा, काय अंगकांती वर्णावी, खणखणती भाले तलवार या पदांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिला.


कीर्तनाच्या शेवटी आरतीसाठी उभे राहिलेले श्रोते. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)