Thursday 7 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प पहिले




कीर्तनसंध्या महोत्सवात कीर्तन करताना चारूदत्त आफळेबुवा. शेजारी साथसंगत करणारे कलाकार. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)

बाजीरावाचे शौर्य, पराक्रम कितीतरी पटीने मोठे



आफळेबुवा : शृंगाराला अतिमहत्त्व नको, सर्वच्या सर्व ४० लढाया जिंकले

रत्नागिरी : "बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये काही चुकीचे दाखले दिले आहेत. ते इतिहासाला पटणारे नाही. २० वर्षाच्या पेशवे कालखंडात बाजीरावाने ४० लढाया केल्या व सर्व जिंकल्या. अशा वेळी शृंगाराला ङ्कारसा वेळच नव्हता. त्यामुळे बाजीरावाचे शौर्य कितीतरी पटीने मोठे आहे. मात्र चित्रपटात शृंगाराला महत्त्व देऊन तो चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. बाजीरावाचे शौर्य दाखवण्यासाठी एखादा अ‍ॅनिमेशनपट केल्यास त्यात अगदी तारीखवार ते कोठे होते, किती लढाया झाल्या आणि मराठशाहीचा दबदबा देशभर नेण्यात बाजीरावाचे योगदान मांडता येईल. मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाच्या पराक्रमाचे महत्त्व कमी होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे", असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये ६ ते १० जानेवारी २०१६ या कालावधीत चारुदत्तबुवा आफळे यांची कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे. या मालेतील पहिले पुष्प गुंफताना बुवांनी बाजीराव पेशव्यांविषयी सांगितले. ते "बुंदेलखंडामध्ये महम्मदशहा बंगशने हल्ला केल्यावर छत्रसाल राजाने बाजीरावास बोलावले. जैतापूरच्या किल्ल्याला दोन महिने वेढा देऊन बाजीरावाने बंगशला बाहेर येण्यास भाग पाडले. विजय झाल्यावर छत्रसालने त्याची कन्या मस्तानी-बाजीरावाचा विवाह करून दिला. बाजीरावांनी गोqवदपंत खेर (बुंदेले) यांना सेनापती म्हणून बुंदेलखंडात ठेवले. ब्राह्मणांमध्ये दुसरा विवाह मान्य नाही, छत्रसाल व मुस्लिम राणीच्या विवाहानंतर मस्तानीचा जन्म झाला असल्याने तिचा बाजीरावाशी विवाह मान्य नव्हता. मात्र नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी तत्कालीन राजेशाहीमध्ये असे अनेक विवाह करून संरक्षण केले जायचे. उत्तरेतील कोणत्याही राज्यात मस्तानीचा उल्लेख सकल सौभाग्यवती मस्तानी असा केला जात असल्याचा इतिहास आहे."
पेशव्यांनी शाहू महाराजांना प्रमाण मानले होते. त्यांच्या मुद्रेवरून हे सिद्ध होते. शाहू गादीच्या संरक्षणासाठी व त्यांना हर्ष देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ही मुद्रा होती. भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली शौर्य दाखवायला आणि प्राण द्यायला मराठे, ब्राह्मण, मुस्लिम आणि अठरापगड जातीतील लोक होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. सन १६३० मध्ये शिवरायांचा जन्म, १६४५ मध्ये स्वराज्याची घोषणा आणि १६८० मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्य सांभाळले. त्यानंतर संभाजी महाराजांनी १० वर्षे, राजाराम महाराजांनी १५ वर्षे, ताराबाईंनी सन १७१० पर्यंत स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यानंतर १८१० पर्यंत शंभर वर्षे पेशवाईने शिवरायांचे राज्य अखंड भारतात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीपुत्र शाहूंच्या हिंदवी राज्यात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट हे पहिले पेशवे झाले. त्यानंतर अवघ्या २१ व्या वर्षी बाजीराव तथा राऊ हे पेशवे झाले. बंडासाठी तयार असलेल्या कान्होजी आंग्रेंना त्यांनी मराठी राज्यात घेतले, असे बुवांनी सांगितले.
ते म्हणाले, "इतिहास संशोधनात शासनाच्या निकषांप्रमाणे पत्रव्यवहाराला जास्त महत्त्व आहे. बखरी दुय्यम मानल्या आहेत. कारण त्या अनेक वर्षांनंतर मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेल्या असतात व त्यात काही दंतकथाही असू शकतात. पण या इतिहासाची धार बोथट करूनच समाजाला इतिहास सांगितला जातो. ब्राह्मणांनी जो इतिहास लिहिला तो सत्य घटनेवरच लिहिला. त्यात कोणत्या जाती-धर्माच्या लोकांवर आसूड ओढलेला नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे, हे मान्य करायला हवे."
श्री. आफळेबुवा म्हणाले, "तत्कालीन दिल्लीच्या सत्ताधीशाने मराठशाहीला दक्षिणेतील सहा सुभ्यांचा भाग महसूल वसुलीसाठी दिला होता. माळवा, गुजरात, वऱ्हाड प्रांतापासून कर्नाटकपर्यंतच्या विस्तीर्ण भागात मराठेच वसुली करू शकतात, हे दिल्लीपतीला माहिती होते. दिल्लीचे तख्त कायम नाही, हे शाहूंना माहिती होते. यामुळे आपले सैन्य बळकट करण्यासाठी त्यांनी बाजीरावाला त्यांनी तुला सैन्यात काय बदल हवा असे विचारले. पायदळ, हत्ती, तोफखाना बाजूला ठेवून केवळ १५ हजार घोडदळ बाजीरावाने मागितले. यामुळे सरळ सैन्याची एवढी ताकद वाढविताना दिल्लीच्या मुळावर घाव घालण्याचा दृष्टीकोन ठेवला. दिल्लीला पोहोचायला जेथे चार महिने लागायचे तेथे बाजीराव २८ दिवसांत जायचे. बाजीराव वर्षातले १० महिने स्वारीवरच असायचे. गुजरात, माळव्यामध्ये तीन वर्षे वसुलीसाठी बरीच खटपट केली. पण चौथ्या वर्षी मराठा सरदार गेला की लगेच वसुली होऊ लागली. बाजीरावाने तलवारीचे तिखट पाणी दाखवले. आपला दबदबा निर्माण केला. बाजीरावाकरिता शाहूंनी शनिवारवाडा उभारण्यास सांगितला."
जागतिक युद्धामध्ये आशिया खंडातील दोन लढायांना स्थान आहे. एक शिवरायांची प्रतापगडावरची लढाई आणि दुसरी १७२७ ला पालखेडमध्ये झालेली बाजीराव आणि निजामाची लढाई. सैनिकी प्रशिक्षणात या दोन्ही लढायांना स्थान आहे. निजामाने माळवा, गुजरात, वऱ्हाडातील सैन्याला मराठशाहीविरुद्ध बंड करायला सांगितले. बाजीराव त्या मिटवायला निघाला की आपण हल्ला चढवू असा निजामाचा इरादा होता. बाजीरावाने निजामाला नामोहरम केले. निजाम  अहमदनगरपर्यंत आला. तो शिरूरवरून पुण्यात हल्ला करणार होता. पण तत्पूर्वीच औरंगाबादला निजामाचा कबिला होता त्याच ठिकाणी बाजीराव सैन्यानिशी उभा ठाकला. त्यामुळे निजाम तोफखाना नगरलाच ठेवून तातडीने औरंगाबादला निघाला. नगर-औरंगाबादच्या मध्ये पालखेड येथे तोफगोळ्यांचा भडीमार करून निजामाला हरवल्याचे श्री. आफळे यांनी सांगितले.
श्री. आफळे यांनी पूर्वरंगात संत तुकारामांचा "आपुललिया हिता जो" हा अभंग निरूपणाला घेतला. आज आयडॉल म्हणून प्रचंड श्रीमंत व्यक्तीचे नाव घेतले जाते. पण त्यापेक्षा बाबा आमटे हे आयडॉल असतील तर देशाचे भवितव्य नक्कीच चांगले घडेल, असे सांगत आफळेबुवांनी खड्या आवाजात गायलेली घडवायाला राष्ट्र नवे, पद्मनाभा नारायणा, काय अंगकांती वर्णावी, खणखणती भाले तलवार या पदांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिला.


कीर्तनाच्या शेवटी आरतीसाठी उभे राहिलेले श्रोते. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)

Wednesday 6 January 2016

रत्नागिरीत कीर्तनसंध्या सुरू


बहुचर्चित कीर्तनसंध्या आज (ता. ६) सायंकाळी रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू झाली. मराठशाहीची देशव्यापी झुंज हा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या पाच दिवसांच्या कीर्तनमालेचा विषय आहे. चार हजाराहून अधिक कीर्तनप्रेमी पहिल्या दिवशी उपस्थित होते.
शुभारंभाच्या या कीर्तनसंध्येची क्षणचित्रे








Wednesday 30 December 2015

रत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव

     चारुदत्त आफळे यांची कीर्तनमालिका


रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा यावर्षीचा कीर्तनसंध्या महोत्सव येत्या ६ ते १० जानेवारी या काळात रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.
              सत्य इतिहासाची ओळख करून देणारा, सामाजिक प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाय सांगणारा, लहान मुलांना संस्कारांचे महत्त्व पटवून देणारा आणि सर्व वयोगटातील माणसांना आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे महत्त्व समजावून सांगणारा बहुआयामी कीर्तन महोत्सव येथील कीर्तनसंध्या संस्था गेली पाच वर्षे आयोजित करत आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची ही कीर्तनमालिका उत्तरोत्तर रंगत जाते, असा अनुभव रसिकांनी घेतला आहे. कीर्तन महोत्सवातून समाजप्रबोधन केले जात असून त्याचे पहिले पुष्प २२ ते २४ जून २०१२ या काळात गुंफले गेले. त्यावेळी संभाजी महाराजांचे चरित्र असा विषय होता. या महोत्सवाला दररोज ६०० ते ७०० कीर्तनप्रेमी उपस्थित होते. पुढच्या वर्षी २२ ते २४ जानेवारी २०१३ या काळात सुभाषचंद्र बोस या विषयावरचा कीर्तन महोत्सवही रंगला. या महोत्सवाला दररोज १५०० ते १८०० रसिक श्रोते उपस्थित राहत होते. नंतरच्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१४ या काळात आफळेबुवांनी शिवचरित्र हे आख्यान सादर केले. दररोज किमान चार हजार श्रोत्यांची उपस्थिती या महोत्सवाला लाभली. गेल्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१५ या काळात स्वराज्याकडून साम्राज्याकडे या विषयावर झालेल्या कीर्तन महोत्सवात ५५०० कीर्तनप्रेमी दररोज उपस्थित राहत होते.
         पाचवा कीर्तन महोत्सव यावर्षी ६ ते १० जानेवारी २०१६ या काळात होणार आहे. यावर्षी शिर्के प्रशालेऐवजी आठवडा बाजाराजवळच्या प्रमोद महाजन क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे. वेळ सायंकाळी ६ ते १० अशीच आहे. यावर्षी मराठेशाहीची देशव्यापी झुंज असा विषय राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे उलगडणार आहेत. पानिपतच्या लढाया आणि १८५७ पर्यंतच्या काळाचा आढावा आफळेबुवा घेणार आहेत.
        आफळेबुवांना तबलासाथ कणकवलीचे प्रसाद करंबेळकर, ऑर्गनसाथ चिपळूणचे हर्षल काटदरे आणि पखवाजसाथ राजा केळकर करणार आहेत. एस. कुमार्स साऊंड सर्व्हिसेस आणि ओम साई मंडप डेकोरेटर्सचे बहुमोल सहकार्य कीर्तन महोत्सवला लाभणार आहे. कीर्तनसंध्येसाठी सर्व श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य आहे. देणगीदारांसाठी सन्मानिका उपलब्ध आहेत.
          गेल्या वर्षीच्या कीर्तनांच्या ऑडिओ सीडी तसेच अनंततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले आणि सत्त्वश्री प्रकाशनतर्फे पुनर्मुद्रित केलेले झोपाळ्यावरची गीता हे पुस्तक कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 या कीर्तनमहोत्सवाचा आस्वाद रत्नागिरीतील जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, उमेश आंबर्डेकर, गुरुप्रसाद जोशी आणि योगेश हळबे यांनी केले आहे.