Saturday 19 December 2015

चेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम



प्रशिक्षकांची गरज : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यात हजार शाळांमध्ये राबवणार

रत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांतील पन्नास हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्याचे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरीत चेसमेन संघटनेतर्फे हा उपक्रम तीन वर्षे सुरू असून आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षकांची गरज आहे. याकरिता लवकरच ट्रेन द ट्रेनर्सद्वारे इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी   पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे आदी उपस्थित होते. बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक ङ्कायदे आहेत. बुद्धिबळ हा ङ्कक्त युद्धतंत्रावर आधारलेला एक खेळ नसून ती एक कला आहे व त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. विशेषतः लहान वयात बुद्धिबळाचे धडे गिरवल्यास मुलांना   संयम व एकाग्रता वाढवण्यास, निर्णयक्षमता व चुकलेल्या निर्णयांची स्वतः जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती,       लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात.
युरोप खंडातील अनेक देशांमध्ये बुद्धिबळ हा शालेय अभ्यासक्रमातला एक अनिवार्य विषय आहे. या धर्तीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने महाराष्ट्रात चेस इन स्कूल हा प्रोजेक्ट राबविला आहे. शालेय मुलांना बुद्धिबळाची तोंडओळख व प्राथमिक धडे देणे, त्यांच्या स्पर्धा भरविणे, बुद्धिबळ खेळण्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी चेस इन स्कूलला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. प्रथम वर्षात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मागील वर्षी राज्यातील २३५ शाळा व १२,५०० विद्यार्थी सहभागी झाले. २२ जिल्ह्यांमधील शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात एक हजार शाळांमध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उद्दिष्ट आहे. पहिली तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यंदाच्या वर्षापासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनरपदाची धुरा सांभाळली आहे.
रत्नागिरी जिल्हा पहिल्यापासून चेस इन स्कूलमध्ये सहभागी आहे. जीजीपीएस आणि (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सलग तीन वर्षे हा प्रकल्प राबवण्यात आला. या शैक्षणिक वर्षातही या शाळांमध्ये सुरू आहे. याशिवाय सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये दोन वर्षे प्रकल्प राबवला. जिल्ह्यात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी चेसमेनला बुद्धिबळ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळाचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. येत्या २६-२७ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये ट्रेन द ट्रेनर्समधून प्रशिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय पातळीवर बुद्धिबळ कसे शिकवावे, चेस इन स्कूलचा ३२ सत्रांचा अभ्यासक्रम, परीक्षा, शालेय स्पर्धा आदींची माहिती यात दिली जाते.
बुद्धिबळाची तोंडओळख, बुद्धिबळाचा मनोरंजक इतिहास, प्राथमिक धडे दिले जातात. किमान दहा व्यक्तींनी चेसमेन संस्थेशी संपर्क साधून प्रशिक्षण घेतल्यास हा प्रकल्प अधिक जोमाने राबवता येणार आहे. क्रीडा शिक्षकांनाही यात भाग घेता येईल. नव्या वर्षात आणखी तीन शाळांमध्ये उपक्रम सुरू होणार आहे.
चेस इन स्कूल उपक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्यासह परीक्षा, स्पर्धा भरवण्याचा समावेश आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे विशेष लक्ष या उपक्रमाकडे आहे. तसेच निरीक्षकही शाळांना भेट देऊन पाहणी करतात. त्याचे अहवाल केले जातात. ना नङ्का ना तोटा या तत्त्वार संघटना हे उपक्रम राबवत असून शाळांनी यात सहभागी व्हावे,  असे आवाहन चेसमेन संस्थेने केले आहे.

Sunday 13 December 2015

शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहेब पुरंदरे



रत्नागिरीत आर्ट सर्कलचा पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान


रत्नागिरी : ``परदेशातील लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा नव्हे सर्वच गोष्टींचा अभिमान असतो; मात्र आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अत्तरासारखा वापर करतो; पण त्यांचे रक्त आपल्या शरीरात भिनले पाहिजे. शिवचरित्र हे एका व्यक्तीचे चरित्र नव्हे राष्ट्रनिर्मितीची गाथा आहे. आज त्याची नितांत गरज आहे. चौऱ्याण्णवाव्या वर्षीही मला ते जास्तीत जास्त लोकांर्पंत पोहोचवायचे आहे', असे प्रतिपादन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
आपल्यालाही महाराजांचा यथार्थ सन्मान वाटला पाहिजे. मी इतिहासकार, विद्वान, पंडित नाही. बालवर्गात इतिहास शिकवणारा साधा शिक्षक आहे. महाराजांचे सर्वांत जास्त प्रेम कोकणावर होते. त्यामुळेच सुकळवाड (मालवण, सिंधुदुर्ग) येथे जीजी उपरकरांच्या मदतीने शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. मे २०१६ पर्यंत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
आर्ट सर्कल आणि पुण्याच्या आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित पुलोत्सवास रत्नागिरीत शनिवारपासून (ता. १२ डिसेंबर) स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. त्यावेळी पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान केल्यावर प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. डॉ. सागर देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आर्ट सर्कलचे डॉ. रवींद्र गोंधळेकर यांनी बाबासाहेबांना मानपत्र सुपूर्द केले. लेखक अनिल दांडेकर यांनी लिहिलेल्या या मानपत्राची त्यांच्याच आवाजातील ध्वनीफित ऐकवण्यात आली. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी प्रास्ताविक व सौ. पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले. स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रचंड गर्दीमध्ये हा कार्यक्रम झाला.
श्री. पुरंदरे म्हणाले, "बकिंगहॅम पॅलेसमध्ये १९७८च्या दसऱ्याला गेलो असता तिथल्या तलवारीची आपट्याची पाने ठेवून पूजा करून मुजरा केला. ज्युली हॉर्लंड या तिथल्या वस्तुपाल युवतीने माझ्याकडून सर्व माहिती घेतली. इंग्रजांना स्वतःच्या देशाचा प्रचंड अभिमान असतो. आपल्याकडे बोलण्यात अस्मिता भरपूर आहे; पण कृतीत दिसत नाही. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळली नाही, हा तर सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असे महाराज सांगत. त्यामुळे सद्यस्थितीतही वेळ पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे."
श्री. पुरंदरे यांनी पुलंविषयी अनेक विनोदी आठवणी सांगितल्या. विद्यार्थी सहायक समितीच्या मदतीसाठी आयोजित राजमाता या एकपात्री प्रयोगावेळी दाखवलेली शिस्त, गप्पांमधील अनेक किस्से त्यांनी ऐकवले. एका व्यक्तीने तुम्ही देशपांडे म्हणजे देशस्थ की कायस्थ असे विचारता पुलंनी सांगितले त्रयस्थ असे सांगितले. असे काही किस्से ऐकवले. स्वा. सावरकर, ज्ञानेश्वरीचेही काही संदर्भ सांगितले.
ते म्हणाले, "१० खंडांतील शिवचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर १९५८ मध्ये पु. ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. मुंबई-दिल्ली प्रवासामध्ये हे चरित्र वाचून काढले आणि तिथून पुढे पुलंचा व माझा परिचय झाला. पुल तथा भाई व सुनीताबाई या शिस्तबद्ध दांपत्याशी परिचय वाढत गेला. एकदा इंग्लडच्या दौऱ्यावर जाताना पुलंनी मला तिथली सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बँक पाहण्यास सांगितले. पुलंची निरीक्षणशक्ती प्रभावी होती. विनोदी स्थायीभावामुळे त्यांचा विनोद उच्च दर्जाचा होता, उथळ नव्हता. ते सहज सोपा विनोद करायचे. एकदा सिंहगडावर आम्ही पायी गेलो. गडावर ते बसले आणि मला म्हणाले, आमच्या घरी संदेश पाठवा, आम्ही किल्ल्यावर सुखरूप पोहोचलो.

कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्त
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमाकरिता स्वा. सावरकर नाट्यगृहात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता शहरातील रसिकांसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार कार्यक्रम ६.५९ ला सुरू झाला आणि ६.१९ वाजता बाबासाहेबांची मुलाखत सुरू झाली. याबद्दल बाबासाहेब आणि डॉ. देशपांडे यांनी आर्ट सर्कलचे विशेष कौतुक केले.


Friday 11 December 2015

खवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू




वेंगुर्ले – तालुक्यातील खवणे येथील खवणेश्वर आणि म्हापण येथील श्री देवी सातेरीमातेचा वार्षिक जत्रोत्सव आज (ता. ११ डिसेंबर १०१५) मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा असा खवणेश्वराचा नावलौकिक सर्वदूर आहे. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्र किनारपट्टीवर जाताना वाटेत श्री देव  खवणेश्वराचे भव्य दिव्य मंदिर आहे. खवणे किनारपट्टीवर फिरायला जाणारे-येणारे पर्यटक किंवा अन्य लोक खवणेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. खवणेश्वोराचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. रात्री पालखी सोहळा पाहण्यास व फटाक्यांची आतषबाजी बघण्यासाठी अलोट भक्तांची गर्दी लोटते.
खवणेश्वराची बहीण म्हापण येथील श्री देवी सातेरी आपल्या भावाला भेटण्यासाठी पालखीतून ढोलताशांच्या गजरात आज खवणेश्वराच्या वार्षिक जत्रोत्सवादिवशी सायंकाळी उशिरा मंदिराच्या परिसरात अंगणात येते. ती खवणेश्वराचा जत्रोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री देवी सातेरीमातेची पालखी रात्रभर श्री देव खवणेश्वोच्या मंदिराच्या अंगणात ठेवली जाते. तेथेच रात्री दशावतारी नाटक सादर केले जाते. खवणे गावातील महिला पालखीत स्थानापन्न झालेल्या श्री सातेरीदेवीची ओटी भरतात. भक्तमंडळी देवीचे दर्शन घेतात.
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सातेरीदेवीची पालखी खवणे गावातून ढोलताशांच्या गजरात पुन्हा म्हापण येथील श्री देवी सातेरीदेवीच्या मंदिरात  जाते. हाही सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो.

(आबा खवणेकर – ९४२३८३२८८६)