Monday 9 November 2015
Saturday 7 November 2015
रत्नागिरी नगर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शन सुरू
रत्नागिरी - येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर
वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (ता. ७ नोव्हेंबर) शिक्षणतज्ज्ञ,
माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केले. बच्चे कंपनी आणि मोठ्यांसाठी खास
प्रकाशित होणारे बहुतांशी दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दिवाळी अंकांची
शतकमहोत्सवी परंपरा महाराष्ट्राला आहे. शेकडो दिवाळी अंक मराठीत प्रकाशित होतात.
त्यातील बहुतांशी अंक उपलब्ध करून देण्याकडे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा
प्रयत्न असतो. यंदाच्या प्रदर्शनात ७० अंक आहेत. मासिक १५० रुपये वर्गणी आणि १५०
रुपये अनामत अशी ३०० रुपये सभासद नोंदणी भरून अंक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
बालवाचकांसाठीही खास दिवाळी अंक आहेत. अंक वाचनासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाणार
आहे.
उद्घाटनप्रसंगी
वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, कार्यवाह चंद्रशेखर
पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य मालती खवळे यांच्यासह वाचक प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरीतील
सुजाण वाचकांनी जास्तीत जास्त अंकांचा लाभ घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
Thursday 5 November 2015
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या दिवाळीच्या वस्तू
रत्नागिरीत ७ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन - कमांडर सिंग यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त हस्तकौशल्यातून वस्तूंच्या प्रदर्शनाचे
उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर
एस. एम. सिंग यांनी केले.
के.
प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे
उद्घाटन करताना
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर
एस. एम. सिंग. शेजारी मुख्याध्यापिका
सौ. अनुराधा ताटके, शेखर लेले, जयंत प्रभुदेसाई, सुमिता भावे आदी.
|
या कार्यक्रमास दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता
भावे, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य जयंत प्रभुदेसाई, व्यवस्थापक शेखर लेले, मुख्याध्यापिका सौ. अनुराधा ताटके, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
`एक्सलंट एक्झिबिशेन व्हेरी मोटिव्हेटिंग टू ऑल` असा अभिप्राय कमांडर सिंग यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी कष्टातून केलेली कलाकुसर आणि
हस्तकौशल्य, रांगोळी सुरेख असून शिक्षकांचे चांगले
प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी अभिप्रायात म्हटले
आहे.
उद्घाटनापूर्वी श्री. सिंग यांनी संपूर्ण शाळा पाहिली व शाळेत विद्यार्थ्यांना
कशा प्रकारे शिकवले जाते, याची माहिती
घेतली. ऐकणे आणि बोलण्यासाठी आधुनिक उपकरणांद्वारे कसे मार्गदर्शन केले जाते, याची माहिती मुख्याध्यापिका
सौ. ताटके यांनी दिली.
फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून त्यांनी प्रदर्शनाचे
उद्घाटन केले, त्यावेळी बालदोस्तांनी बँड वाजवून श्री. सिंग यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रदर्शनातील
प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी हस्तांदोलन केले, विद्यार्थ्यांचे नाव विचारून आपुलकीचा
संवाद साधला.
हे प्रदर्शन ७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८
या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाकरिता माजी विद्यार्थ्यांचेही योगदान मिळत आहे. दीपावलीकरिता विविध वस्तू मांडण्यात आल्या आहेत. ग्रीटिंग्ज, उटणे, रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदील यासह बालदोस्तांना किल्ले सजवण्यासाठी मातीपासून केलेले छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आहेत. लाकडी वस्तू, लाकडी शो पीस, पॉट पेटिंग, कापडी पिशव्या, लहान मुलांचे कपडे, हातरुमाल, मॅक्रोमीचे शोपीस, फ्लॉवरपॉट अशा वस्तू ठेवल्या आहेत
प्रदर्शनात
विद्यार्थिनीशी संवाद साधताना कमांडर
सिंग.
|
प्रदर्शनात
कापडी वस्तू पाहताना कमांडर सिंग. सोबत मान्यवर.
|
Subscribe to:
Posts (Atom)