Tuesday 5 May 2015

बाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती नको – प्रा. प्रकाश नाईक



रत्नागिरी - ``डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती करण्याऐवजी डोळसपणे त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांना पर्याय नाही``, असे प्रतिपादन प्रा. प्रकाश नाईक यांनी येथे केले.
येथील आंबेडकरवाडीत आंबेडकर आणि बुद्ध जयंतीनमित्त आज (ता. 4 मे) आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ``भगवान बुद्धाने वास्तववादी तत्त्वज्ञान मांडले. करुणेवर, विज्ञाननिष्ठेवर आधारलेल्या त्यांच्या विचारांना बाबासाहेबांनी पुढे नेले. आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी काम केले नाही, तर शेतकरी, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला सर्वच उपेक्षित घटकांसाठी क्रांतिकारी काम केले. आजच्या विषमतावादी व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांचे विचार आवश्यक आहेत. संघर्षाची तयारी ठेवून प्रत्येक युवकाने बाबासाहेबांच्या विचारदिशेने वाटचाल करावी. त्यात आपल्या देशाचे कल्याण आहे.``
यावेळी कृष्णा जाधव, सुनील आंबुलकर यांची भाषणे झाली. स्वागत आणि प्रास्तविक किशोर कांबळे यांनी केले. विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. समारंभाला धर्माजी कांबळे, नीलेश कांबळे, प्रफुल्ला मोहिते, राकेश कांबळे, सचिन जाधव, व्ही. डी. जाधव यांच्यासह तरुण आणि महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday 2 May 2015

राजापूर तालुक्यात आढळली आणखी काही पाषाणखोद शिल्पे



प्रागैतिहासिक संस्कृतीच्या पाऊलखुणांबाबत संशोधन आवश्यक


 (प्रमोद कोनकर)
रत्नागिरी – कोकणातल्या पर्यटनस्थळांचा परिचय देशीविदेशी पर्यटकांना करून देण्यासाठी रत्नागिरीत तीन दिवसांचा पर्यटन महोत्सव सुरू झाला आहे. त्याचा आस्वाद घेतानाच पर्यटकांना प्रागैतिहासिक संस्कृतीच्या आणखी काही पाऊलखुणा धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड यांच्या प्रयत्नातून खुल्या झाल्या आहेत. या दोघा निसर्गप्रेमींना राजापूर तालुक्यात आणखी काही कातळशिल्पे आढळली असून ती सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे.
      `कोकणातील पक्षी` या पुस्तकाचे लेखक सुधीर श्रीकांत रिसबूड भ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहेत. कोकणात निसर्गाचा वेध घेण्यासाठी त्यांचा ठिकठिकाणी वावर असतो. त्यातूनच त्यांनी कोकणातल्या पक्ष्यांविषयीही माहिती त्यांच्या पुस्तकात संकलित केली आहे. त्यांचे राजापूरचे मित्र धनंजय मराठे यांच्याकडून नुकतीच त्यांना राजापूर तालुक्यात कातळात खोदलेल्या काही आकृत्या दिसल्याची माहिती मिळाली. राजापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर माळरानावर कातळात ही शिल्पे होती. आठ दिवसांपूर्वी नेपाळमध्ये भूकंप झाला, त्यादिवशी त्या दोघांनी त्या स्थळाला भेट दिली. शिल्पांचे आकार स्पष्ट होण्यासाठी तेथे खुणा केल्या. त्यामधून लज्जागौरी, काही प्राणी, पक्षी, दिशादर्शक शिल्पे आणि भौमितिक रचना स्पष्ट झाल्या. एकीकडून पाहिल्यास जहाज तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. एक हजार चौरस फुटाच्या परिसरात सुमारे एकतीस शिल्पे आढळली. जिल्ह्यात यापूर्वी निवळी, रामरोड-गणपतीपुळे (ता. रत्नागिरी), पडवे, देवीहसोळ, उपळे, बारसूचा सडा (ता. राजापूर) येथेही अशी पाषाणशिल्पे आढळली आहेत. (राजापूर तालुक्यातील शिल्पांचा उल्लेख प्रभाकर मराठे यांच्या `राजापूरचा इतिहास` या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात आला आहे.) त्यांचा अभ्यास श्री. रिसबूड यांनी केला आहे. त्याआधारे राजापूर तालुक्यात नुकतीच सापडलेली शिल्पे पाहता पुरातन काळी दिशादर्शक साखळी म्हणून ही शिल्पे कोरली गेली असावीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून याबाबत संशोधनाची गरज व्यक्त केली आहे.
राजापूर तालुक्यात नुकत्याच आढळलेल्या या शिल्पांविषयीची माहिती सुधीर रिसबूड (9422372020) किंवा धनंजय मराठे (9423297736) यांच्याशी संपर्क साधल्यास मिळू शकेल. जिल्ह्यात महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांनी या शिल्पांना भेट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
.................................................


धनगराकडून माहिती
धनंजय मराठे यांना त्या गावातील एका धनगराने कातळात खोदलेल्या काही आकृत्या दिसल्याची माहिती दिली. श्री. मराठे यांनी त्याचा मागोवा घेतला. निसर्गप्रेमी श्री. रिसबूड यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर त्या दोघांनी त्या ठिकाणाला भेट देऊन शिल्पांच्या भोवती साफसफाई केली. निसर्गप्रेमी असलेले जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना याबाबत सांगितल्यावर त्यांनीही तेथे जाऊन पाहणी केली आणि हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
.................................................
 
अभ्यासकांचा दुजोरा
राजापूर तालुक्यातील या पाषाणशिल्पांबाबत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे रवींद्र लाड आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रा. डॉ. सचिन जोशी यांना श्री. रिसबूड आणि श्री. मराठे यांनी माहिती दिली. शिल्पांचा तपशील सांगितल्यानंतर या दोघा अभ्यासकांनी शिल्पे पुरातन असल्याचा दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, त्या भागात कोणे एके काळी संस्कृती नांदत होती, याचा तो पुरावा आहे. वर्णनावरून ही शिल्पे मोंहेंजोदडो किंवा हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वीची म्हणजे तीन हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
-       राजापूरजवळ नव्याने आढळलेले पाषाणशिल्प

-       नव्याने आढळलेले पाषाणशिल्प

बारसू (ता. राजापूर) येथील शिल्प

उपळे (ता. राजापूर) येथील शिल्प

निवळी (ता. रत्नागिरी) येथील पाषाणखोद शिल्प