रत्नागिरी : भारतीय प्रशासकीय सेवेसाठी
आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुण अलीकडे यश मिळविताना दिसत असले,
तरी कोकणातील तरुणांचा मात्र त्यामध्ये अभाव दिसतो. त्यांना स्पर्धा परीक्षांच्या
माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी भरपूर वाव आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी (ता. १२) येथे व्यक्त
केले.
|
रत्नागिरी – कबीर अॅकॅडमीतर्फे आयोजित
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात
बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा.
शेजारी संजीव कबीर आणि डॉ. धनाजी कदम
|
नवी दिल्लीतील करिअर क्वेस्ट आणि कबीर अॅकॅडमीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत सुरू केले आहे.
त्याविषयी तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या अनुभवाची माहिती विद्यार्थ्यांना
देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा मंडळ सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे अधिकारी डॉ. धनाजी कदम
यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी वन विभाग, त्यानंतर प्राप्तिकर विभाग आणि अखेर
प्रशासकीय सेवेत दाखल झालेले श्री. मिश्रा म्हणाले की, यूपीएससीसाठी दरवर्षी
सुमारे तीन लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा
दिल्यानंतर त्यापैकी २५ हजार मुले मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात आणि केवळ
८०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० जणांना शासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. अशा
कठीण पातळीवरच्या या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. मुळात
परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
परीक्षांचा दर्जा सतत उच्च राखण्यासाठी दरवर्षी परीक्षा पद्धतीत बदल होत असतो.
त्यामुळे सर्वांत प्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने अभ्यास केला पाहिजे.
अभ्यासक्रमामधून स्वतःच्या आवडीचा विषय कोणता, त्याचे अभ्याससाहित्य किती प्रमाणात
उपलब्ध आहे आणि त्या विषयात आपण अधिकाधिक गुण मिळवू शकतो का, याचा विचार करूनच
विषय निवडावा. अभ्याससाहित्यासाठी आता केवळ पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत नाही.
सिव्हिल सर्व्हिस आणि यूपीएससी पोर्टल या संकेतस्थळांसह इंटरनेटवर असंख्य पुस्तके
आणि माहितीचा खजिनाच उपलब्ध आहे. दैनिक ताज्या घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवतानाच
सर्व घडामोडींमधून भविष्याचा वेध घेऊनच अभ्यासाची तयार केली पाहिजे. त्याकरिता
हिंदू, क्रॉनिकलसारख्या नियतकालिकांचे नियमित वाचन आवश्यक आहे. गेल्या दहा
वर्षांचे पेपर्स पाहून परीक्षांचा कल लक्षात घेऊन अभ्यासाची दिशा ठरवायला हवी.
एखाद्या प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सकारात्मक ग्रुप डिस्कशनचा
चांगला उपयोग होतो. प्रत्येक विषयाचे पाच ते दहा महत्त्वाचे मुद्दे काढता आले
पाहिजेत. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे टप्पे ओलांडल्यानंतर मुलाखतीचा
महत्त्वाचा टप्पा येतो. मुलाखतीला सामोरे जाताना विकास, गरिबी, महिला आणि भारतीय
लोकशाहीच्या बाबतीत सकारात्मक उत्तरे दिली गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी
होण्यासाठी अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे, असे सांगून धनाजी कदम म्हणाले की, नागरी
सेवांना इतरही अनेक पर्याय आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. सर्वच स्पर्धा
परीक्षांसाठी ताज्या घटनांची केवळ माहिती असून उपयोगाची नाही. त्यावर विश्लेषण
करता आले पाहिजे. वृत्तपत्रांचे नियमित वाचन करताना अभ्यासक्रम, नकाशे आणि शब्दकोश
जवळ असायलाच हवा. दररोज किमान दहा नवे शब्द आपल्या शब्दकोशात जमा झाले पाहिजेत.
आपण प्रशासकीय सेवेत जाणार आहोत, हे लक्षात घेऊन वृत्तपत्रे आणि मुख्यत्वे राजकीय
बातम्या वाचताना एकाच बाजूने विचार करू नये. त्या त्या घटनांच्या विश्लेषणावर भर
दिला पाहिजे. अभ्यासाच्या वेळी लेखन, सादरीकरण आणि कौशल्यविकासासाठी
प्रारंभापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.
व्याख्यानांनंतरच्या
शंकासमाधानाच्या सत्रात श्री. मिश्रा आणि डॉ. कदम यांनी विषय कसा निवडावा, तयारी
कशी करावी, वृत्तपत्रे कशी वाचावीत, प्रत्यक्ष पेपर कसे लिहावेत आणि मुलाखत कशी
द्यावी, याविषयी सोदाहरण माहिती दिली.
कबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांनी अॅकॅडमीतर्फे सुरू होणार
असलेल्या सहा महिने ते दोन वर्षे कालावधीच्या तीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. एमपीएससी,
यूपीएससी, एसएससी, बँका तसेच अन्य शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांविषयीची
माहिती यावेळी देण्यात आली.
...........................
कबीर अॅकॅडमीचा संपर्क - (व्हॉट्स अप) - 0990840999