Monday, 4 April 2016

संस्कृतपंडित दा. गो. जोशी यांचे निधन

रत्नागिरी : येथील विख्यात संस्कृत पंडित दामोदर गोपाळ जोशी (वय ९९) यांचे रविवारी (ता. ३ एप्रिल) रात्री राहत्या घरी निधन झाले. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. आज सकाळी चर्मालय अमरधाम येथे जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. जोशी यांचा संस्कृत, पाली, मोडी भाषांचा सखोल अभ्यास होता. ते मूळचे बेळगावजवळील कोवाड गावचे. इचलकरंजी येथील पाठशाळेत सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर त्यांनी काव्यतीर्थ ही पदवी संपादन केली. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी ३२ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे ते शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत होते. संस्कृत पाठशाळेमध्येही ते अनेक काळ अध्यापन करत होते. त्यांनी वाई येथे तीन वर्षे धर्मकोशाचे उपसंपादक म्हणून काम केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या समितीत ते कार्यरत होते. काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ते सतत व्यासंगरत होते. उत्तरायुष्यात त्यांनी श्रीमद्शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे मराठीत भाषांतर सुंदर हस्ताक्षरात लिहिले. ते आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाने दा. गो. जोशी यांचा संस्कृत विद्वान म्हणून सत्कार केला होता. २०१३ मध्ये कोजागिरी पौर्णिमेला सांगलीच्या पु. ना. गाडगीळ शाखेनेनेही संस्कृत विद्वान म्हणून मानपत्र देऊन सत्कार केला होता.
कै. जोशी यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, चार विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Sunday, 3 April 2016

पर्यावरण आणि पर्यटन विकास साधणारा गिधाड संवर्धन प्रकल्प



दिसायला किळसवाणा तरीही स्वभावाने खूपच शांत असलेला आणि सध्या दुर्मिळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड.  या पक्ष्याचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत आहे. सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री याने गिधाडांची संख्या नेसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

      श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेण, भापट परिसरातून वर पाहिले तर आकाशात घिरट्या घालणारा पक्ष्यांचा थवा नजरेत येतो. तो पक्षी म्हणजे गिधाड.  म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले आहे. या चिरगाव-बागेची वाडी येथील ३२.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात सातवीण, आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची सुमारे २५ घरटी पाहायला मिळतात. घरट्याच्या आसपास २०-२२ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३५-४० गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी १३ वर्षापासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
        पक्षीमित्र व  सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की भारत देशातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. २००० ते २००४ मध्ये चिरगाव येथे पांढ-या पाठीच्या गिधाडांच्या वसाहतीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची दोन घरटी आढळली. आजमितीस या गिधाडांच्या घरट्यांची संख्या 24 झाली आहे तर या जातीची एकूण गिधाडांची संख्या १५० पर्यंत पोहोचलेली दिसून येते. ही संख्या आणि इथले जंगल वाढवण्यात इथल्या ग्रामस्थांनी व विशेषत तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले आहेत. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या विणीच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. पूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली ढोरटाकी बंद केल्यामुळे त्यांना मृत जनावरे मिळत नव्हती. येथील संवर्धनाचे वैशिष्ट्य म्हणजे या गिधाडांना बंदिस्त न करता त्यांना निसर्गात विहरू दिले जाते. त्यांना त्यांचे खाद्य नैसर्गिक पद्धतीने भक्षण करण्यास दिल्यामुळे हा बदल दिसून आला आहे असेही मेस्त्री यांनी सांगितले.
        
गेली तेरा वर्षे नियमितपणे या गिधाडांना अन्न पुरविण्याचे काम सिस्केप संस्थेने केले आहे. २०० किलोमीटरच्या अंतरात कोठेही जनावर मृत झाले तर सिस्केप संस्थेला याची कल्पना दिली जाते. सिस्केप संस्थेचे सदस्य या मृत जनावरांची रीतसर परवानगी घेत वाहतूक करून चिरगाव येथील नव्याने निर्माण केलेल्या ढोरटाकीवर गिधाडांसाठी टाकली जातात. यात स्थानिक ग्रामस्थांची मदतही होते. गिधाडांना अन्न पुरविण्याच्या कामी संस्थेने अनेक दात्यांकडून तर कधी स्वतःच्या खिशाला चाट देऊन गिधाडांसाठी जिवापाड मेहनत घेतली. लाखो रुपये याकरिता प्रेमसागर मेस्त्री यांनी पैसे जमविले आणि संपविले.
         चिरगावच्या ग्रामस्थांनी सिस्केपच्या या उपक्रमाला पहिल्यापासून साथ दिली. या गावातील ही देवरहाटी म्हणजे देवराई काही प्रमाणात त्यांनी जपली परंतु गावाशेजारील भागातील इतर ग्रामस्थांनी त्यांची जमीन वृक्षतोड करणाऱ्यांना दिल्याने आजूबाजूचे पठारावरील जंगल कमी झालेले दिसते. पण वाढत्या गिधाडांमुळे चिरगाव जगाच्या नकाशात ठळक दिसेल म्हणून आता सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
       चिरगावचे माजी सरपंच किशोर घुलघुले यांनी सांगितले की सागर मेस्त्री यांनी सांगितल्यावर आम्हाला कळले की हा गिधाड पक्षी आहे म्हणून. आम्हाला या पक्ष्याविषयी काहीच माहिती नव्हती. पण याचे पर्यावरणाला मिळणारे साह्य ऐकून आम्हीदेखील सागर मेस्त्री यांना सहकार्य करण्याचे ठरविले. सागर मेस्त्री यांना इथे राहण्यासाठी आमच्या गावकीची खोलीदेखील दिली होती. या ठिकाणी येऊन त्यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांच्या कामात माझा मुलगादेखील नोंदी ठेवायचा. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी या कामात संस्थेला खूप मदत केली असल्याची माहिती घुलघुले यांनी व मुंबईला असणारे राजेश बारे यांनी सांगितली.
          गिधाडांना बंदिस्त जाळीत न ठेवता नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या विणीच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविण्याचा हा उपक्रम सध्या देशातील पहिला उपक्रम ठरत आहे. या गिधाडांच्या संख्येत होणारी वाढ तेथील पर्यावरणाचा समतोल राखला जातोय हे निश्चित. त्यामुळे आता हा समतोल पुढे कितीतरी वर्षे तसाच राखला पाहिजे. भविष्यात या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहिती केंद्राची स्थापना होणार असून जैवविविधतेसंबंधी पर्यटनातून या गावाचा विकास करण्याचा सिस्केप संस्थेचा विचार आहे. महिलांकडे न्याहारी व भोजन व्यवस्था देऊन त्यांच्या बचत गटाला बळकटी देण्याच्या दृष्टीने संस्था एक पाऊल पुढे टाकणार असून यात  विविध महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून कागदी व कापडी पिशव्यांचा उद्योग देऊन पर्यावरण रक्षक बनविण्याचे कामही संस्था करणार आहे. देश-विदेशातून या कामाची पाहणी करण्यासाठी यातील अभ्यासक येत  असतात. त्यांच्या येण्याचा फायदा येथील ग्रामस्थांना कसा होईल याचाही विचार संस्था करीत आहे. गावातील बारा महिने वाहणाऱ्या अखंड झऱ्याचा उपयोग करून येथील स्वावलंबन बळकट केले जाणार आहे.
प्रेमसागर मेस्त्री यांच्या बरोबर ठाणे येथील पर्यावरणअभ्यासक सुहास जावडेकर यांनीही काम करण्याचे ठरविले आहे. या गिधाड संवर्धन प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन प्रेमसागर मेस्त्री यांनी केले आहे.
.........
संपर्क - प्रेमसागर मेस्त्री - 9657864290

Friday, 25 March 2016

अपत्यहीनांसाठी नृसिंसहवाडीत होमिओपॅथिक उपचार शिबिर



दत्त देवस्थानतर्फे आयोजन  दोन दिवसांत पाच तज्ज्ञांची व्याख्याने

रत्नागिरी : नृसिंसहवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानातर्फे अपत्यहीनांसाठी दोन दिवसांचे होमिओपॅथिक वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येत्या २७ आणि २८ मार्च रोजी नृसिंहवाडी येथे होणाऱ्या या शिबिरात पाच विशेषज्ञांची व्याख्याने होणार आहेत. या शिबिराकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांनाही नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विवाहानंतर अनेक वर्षे अपत्यप्राप्ती झाली नाही, तर अनेक दांपत्ये दुःखी होतात. विविध औषधोपचार करूनही गुण येत नाही. होमिओपॅथीमध्ये स्त्रीपुरुषांच्या प्रजनन संस्थेवर उपचार करणारी अनेक औषधे आहेत. अचूक निदान आणि योग्य औषधोपचारानंतर अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकतो. तो आनंद मिळवून देण्याकरिता अपत्यहीनांसाठी नृसिंहवाडी देवस्थानातर्फे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात असाध्य आजार (डॉ. सुनील पटवर्धन, रत्नागिरी), मुलांचे शारीरिक, मानसिक आरोग्य (डॉ. सौ. माधवी ठाणेकर, सांगली), होमिओपॅथीचे अनुभवलेले चमत्कार डॉ. रोहित सेठ), होमिओपॅथीविषयीचे प्रश्न (डॉ. किशोर ठाणेकर, सांगली) यांची व्याख्याने आणि रुग्णांच्या शंकासमाधानाचा कार्यक्रम होणार आहे. शिबिराचे संयोजन कुडाळ येथील डॉ. प्रभूज होमिओपॅथीने केले आहे.
शिबिर नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानाच्या भक्त निवासातील बहिरंभटशास्त्री जेरे हॉलमध्ये २७ आणि २८ मार्च रोजी होणार आहे. त्याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांनाही घेता येईल. त्याकरिता ९१६८३८७२७९ या मोबाइल क्रमांकावर किंवा वासुदेव मेडिकल स्टोअर्स, जैन बस्तीच्या बाजूला, नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
................................................................................................

Saturday, 19 March 2016

कोकणात पावसाचे पाणी साठविण्यासाठी जलवर्धिनीचा मदतीचा हात



रत्नागिरी - राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने रत्नागिरीवासीयांसाठी फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोकण पाटबंधारे विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात १६ मार्च रोजी जलजागृती सप्ताह सुरू झाला. या सप्ताहानिमित्ताने मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती जलवर्धिनीने विकसित केल्या आहेत. कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही त्या नमुन्याच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती परांजपे यांनी तेथे दिली.
तेथील मेळाव्यात उपस्थित झालेले मुद्दे, शासनाने पाणी साठविण्यासाठी केलेले सहभागाचे आवाहन आणि कोकणवासीयांची गरज लक्षात घेऊन जलवर्धिनीतर्फे गरजूंना मदतीचा हात देण्याचे श्री. परांजपे यांनी जाहीर केले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठवण टाक्या बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. गरजू शेतकऱ्यांकरिता जमिनीवरील दहा हजार लिटरपर्यंतची क्षमता असलेल्या साठवण टाक्या बांधल्या जातील. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.
इच्छुक शेतकरी तसेच संस्थांनी ९८२०७८८०६१ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन श्री. परांजपे यांनी केले आहे. जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
.........................