रत्नागिरी - राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाला प्रतिसाद
म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने रत्नागिरीवासीयांसाठी फेरोसिमेंटच्या
जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.
श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच
तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोकण पाटबंधारे विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात
१६ मार्च रोजी जलजागृती सप्ताह सुरू झाला. या सप्ताहानिमित्ताने मुंबईतील
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांना सिंधुदुर्गच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. फेरोसिमेंट
तंत्रज्ञानाच्या आधारे पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती जलवर्धिनीने विकसित केल्या
आहेत. कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि
पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे.
कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही त्या
नमुन्याच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती परांजपे यांनी
तेथे दिली.
तेथील मेळाव्यात उपस्थित झालेले मुद्दे, शासनाने पाणी साठविण्यासाठी केलेले
सहभागाचे आवाहन आणि कोकणवासीयांची गरज लक्षात घेऊन जलवर्धिनीतर्फे गरजूंना मदतीचा
हात देण्याचे श्री. परांजपे यांनी जाहीर केले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात
जलसाठवण टाक्या बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. गरजू शेतकऱ्यांकरिता जमिनीवरील
दहा हजार लिटरपर्यंतची क्षमता असलेल्या साठवण टाक्या बांधल्या जातील. शेतकऱ्यांनी
पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून
श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी
साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले
जाईल.
इच्छुक शेतकरी तसेच संस्थांनी ९८२०७८८०६१ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क
साधावा, असे आवाहन श्री. परांजपे यांनी केले आहे.
जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
.........................
No comments:
Post a Comment