Friday, 20 November 2015

राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यावा



अॅड. विलास कुवळेकर – कोट येथे १८१ वी जयंती उत्साहात साजरी



कोट (ता. लांजा) : ``रणरागिणी झाशीच्या राणीचे स्मारक उभारण्यासाठी लोकांनी सरकारकडे मागणी करूच नये. `गाव करील ते राव काय करील` या उक्तीनुसार ग्रामस्थांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा. राणीने केलेल्या पराक्रमाच्या स्फूर्तीची ज्योत मनात निर्माण होणार असेल, तर चिरंतन स्मारक निर्माण होईल``, असे प्रतिपादन लांजा येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी येथे केले.
समारंभात बोलताना अॅड. विलास कुवळेकर.
राणी लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती काल (ता. १९) कोट या राणीच्या मूळ गावी समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिनकर नेवाळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सरपंच सौ. जयश्री भुवड, माजी सरपंच शांताराम सुर्वे, कृष्णा आगरे, प्रकाश घडशी, जिल्हा परिषद सदस्य सौ. स्वरूपा साळवी आदी उपस्थित होते. समारंभापूर्वी राणीच्या स्मारकाच्या नियोजित स्थळी प्रतिमेचे पूजन आणि पोवाड्यांचे गायन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात श्री. कुवळेकर पुढे म्हणाले, ``भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई म्हणजे तांबे किंवा नेवाळकर घराण्यापुरती मर्यादित नाही. सर्वांनाच तिच्या अनुवंशाचा वारसा आहे. अशा स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाला काळीमा फासण्याचे काम चालू आहे. अशा स्थितीत तिच्या पराक्रमापासून प्रेरणा देण्यासाठी तिचे उचित स्मारक उभारले गेले पाहिजे. मात्र त्यासाठी शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. चांगला विचार करून प्रेरणादायी स्मारक उभारावे. आज भारत स्वतंत्र झाल्याने आता ब्रिटिशांना हद्दपार करण्याची गरज राहिलेली नाही. मात्र भ्रष्टाचारासारख्या दुर्गुणांना हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेरणा देणारे स्मारक उभारले पाहिजे.``
माजी सरपंच आबा सुर्वे म्हणाले की, मेरी झाँसी नही दूंगी म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या गावात आपण राहत असल्याने आपल्याला तिचा अभिमान वाटला पाहिजे. तिचा इतिहास लहान मुलांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. प्रमोद कोनकर यांनी सांगितले की, राणीने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटविली. तिचे स्मारक उभारण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये. तिचे जिवंत स्मारक उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी ग्रामस्थांनीच आग्रह धरला पाहिजे.
      श्री. रानडे, रामचंद्र डाफळे आदींनीही यावेळी विचार व्यक्त केले. राजू नेवाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
-    कोट (ता. लांजा) - झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी दीपप्रज्वलन
करून जयंती समारंभाचे उद्घाटन करताना अॅड. विलास कुवळेकर. शेजारी अन्य मान्यवर.

Wednesday, 18 November 2015

कोट येथे गुरुवारी राणी लक्ष्मीबाई जयंती



लांजा :  सन १८५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती येत्या गुरुवारी (ता. १९ नोव्हेंबर) कोट येथे विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. झाशीच्या राणीचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यातच कोलधे आणि कोट येथे असून तेथील ग्रामस्थांनी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत राणीची जयंती साजरी केली जाणार आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या समारंभात सकाळी कोट येथे स्मारक उभारण्याबाबत तसेच राणीविषयीच्या आठवणी, वस्तूंचे जतन करण्याबाबत निमंत्रितांचे चर्चासत्र होणार आहे. दुपारच्या सत्रात इतिहास आणि क्रांतिकारकांविषयीचे गाढे अभ्यासक  डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.   
अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

Monday, 16 November 2015

अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

 
   रत्नागिरी : दाभोळ  (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यावर्षीचा विभागीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरीत येत्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीला पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ही घोषणा केली.
      सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार दिले जातात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १२ मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत यावर्षीच्याराज्यस्तरीय आणि विभागीय पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार कोकण विभागीय पुरस्कारासाठी १७ प्रस्ताव आले होते. निवड समितीने त्यामधून अण्णा शिरगावकर यांच्या नावाची शिफारस केली होती. प्रतिष्ठानने ती स्वीकारली असून श्री. शिरगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
        प्रतिष्ठानच्या पुणे येथील कृषी व सहकार व्यासपीठातर्फे कथा जोतिबा सावित्रीची या विषयावर राज्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लीलाधर मोहन कूड (शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर आणि विश्वनाथ बिले (चिपळूण) यांना अनुक्रमे द्वितीय (७५० रु.), तृतीय (५०० रु.) आणि उत्तेजनार्थ (३०० रु.) या रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहेत.
        प्रतिष्ठानने गेल्या ऑगस्टमध्ये गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्ताने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, अण्णा शिरगावकर यांना तसेच शिक्षकांना द्यावयाच्या पुरस्कारांचे वितरण असे कार्यक्रम २५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार असल्याचे श्री. लिमये यांनी सांगितले.



        
    
      

Friday, 13 November 2015

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत अभिषेक तेलंग यांचे गायन



        रत्नागिरी : खल्वायनची सलग २१७ वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १४ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. या सभेत सांगलीचे युवा गायक अभिषेक तेलंग यांचे गायन होणार आहे. ही सभा रत्नागिरीतील संगीतप्रेमी कै. संजय मुळ्ये स्मृती मैफल म्हणून होणार आहे.
     
अभिषेक तेलंग यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांची आई सौ. अंजली तेलंग यांच्याकडे झाले. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. हृषिकेश बोडस यांच्याकडे चालू आहे. गझल व सुगम संगीताचे शिक्षण पराग जोशी यांच्याकडे चालू आहे.
तेलंग यांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. सह्याद्री वाहिनी, आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अनेक स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत. अखिल भारतीय आकाशवाणी केंद्राच्या स्पर्धेत त्यांनी उपशास्त्रीय व सुगम स्पर्धेत प्रथम  क्रमांक मिळवला आहे. कोल्हापूर युवा महोत्सव, चित्रपट गीत स्पर्धांतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ई टीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे
सर्व रसिक श्रोत्यांनी तेलंग यांच्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनतर्फे करण्यात आले आहे.