Thursday, 5 May 2016

विवेकानंद केंद्रातर्फे रत्नागिरीत १३ मेपासून निवासी युवा सेवा शिबिर



                रत्नागिरी : कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रातर्फे १३ ते १५ मे या कालावधीत रत्नागिरीत निवासी युवा सेवा शिबिर होणार आहे. शिबिर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होईल. १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. 
    शिबिरात १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नावनोंदणी होईल. १३ ते १५ दरम्यान दररोज प्रातःस्मरण, सूर्यनमस्कार, योगासने, श्रमदान, बौद्धिक व्याख्यान व मंथन, गटचर्चा, खेळ, सायंप्रार्थना, आनंदमेळा असा दिनक्रम असेल. १६ ला सकाळी ८ वाजता सांगता होईल.
      शिबिरासंदर्भात आयोजक उमा जोशी यांनी सांगितले की,  विवेकानंद केंद्र ही एक सेवाभावी संस्था असून मुख्यतः शिक्षण, ग्रामविकास, योग, महिला व बालविकास या क्षेत्रात काम करते. तामिळनाडू,  ईशान्य आणि पूर्व भारतात केंद्राच्या अनेक शाळा आहेत. युवकांमध्ये देशाभिमान व सामाजिक जबाबदारी यांची जाणीव, जोपासना करण्यासाठी संस्थेचे काम चालते. मनुष्य निर्माण व राष्ट्रपुनरुत्थान हे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेचे हे राष्ट्रीय कार्य पुढे नेण्याचे काम संस्था करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत युवा सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
         शिबिरासाठी प्रवेशशुल्क २०० रुपये असून नावनोंदणीसाठी उमा जोशी (९४२१२३३८६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment