Friday 16 October 2015

कोकणाच्या ग्रामीण वास्तवाचे `पॅनोरमा`मधून दर्शन – अॅड. विलास कुवळेकर



वाचन प्रेरणा दिन : डॉ. शंकर कलवारी यांच्या पुस्तकाचे राजापूर येथे प्रकाशन

राजापूर : डॉ. शंकर कलवारी यांच्या पॅनोरमा`चे प्रकाशन करताना अ‍ॅड. विलास कुवळेकर.
 शेजारी मदन हजेरी, डॉ. श्रीकृष्ण जोशी, देवदत्त वालावलकर, डॉ. कलवारी, वासुदेव तुळसणकर
राजापूर : ‘‘डॉ. शंकर कलवारी यांनी लिहिलेले पॅनोरमा हे पुस्तक म्हणजे लेखणीची नजाकत असून या पुस्तकाच्या माध्यमातून कोकणचे निसर्गसंपन्न वैभव अनेक वाचकांद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे``, असे प्रतिपादन कवी अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले. डॉ. कलवारी यांच्या `पॅनोरमा` पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. हा कार्यक्रम येथील नगर वाचनालयाच्या सभागृहावाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्त साधून गुरुवारी (ता. 15 ऑक्टोबर) साजऱ्या करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रकाशन झाले. कार्यक्रमाला बालसाहित्यिक दन हजेरी, वासुदेव तुळसणकर, प्रमोद कोनकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. अभय अळवणी, हणमंत रायकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना अ‍ॅड. कुवळेकर यांनी डॉ. कलवारी यांच्या `व्हिजिट बॅग` या पहिल्या पुस्तकाचा संदर्भ देऊन `पॅनोरमा` पुस्तकही वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास व्यक्त केला. कोकणातील रग्ण,  त्यांची मानसिकता,  दैन्य करण कहाण्या आदींचे चित्रण असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
यावेळी पुस्तकाचे संपादक डॉ. जोशी यांनीही नोगत व्यक्त केले. पॅनोरमाच्या माध्यमातून कोकणाच्या इतिहासाची, कोकणी व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्याची पाने पुन्हा वाचकांना चाळण्याची संधी मिळणार असल्याचे त डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. श्री. वालावलकर यांनी डॉ. कलवारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा प्रस्ताविक स्पर्श प्रकाशनचे प्रकाशक तथा राजापूर नगर वाचनालयाचे कार्यवाह दन हजेरी यांनी केले. कार्यक्रमाची सूरूवात वसुंधरा मालपेकर यांनी सादर केलेल्या गणेश आराधनेने झाली. आभार सुहास ओळकर यांनी मानले.
...................

Sunday 4 October 2015

कोमसाप रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन १८ ऑक्टोबरला



संपर्क कार्यालयाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन येत्या १८ ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार असून त्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोमसापच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार असून साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असून कविसंमेलन, परिसंवादांचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या व्यासपीठाला नाटककार प्र. ल. मयेकर यांचे नाव दिले जाणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिक रामदास फुटाणे भूषविणार असून खासदार विनायक राऊत स्वागताध्यक्ष आहेत. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, साहित्यिक उर्मिला पवार, कवी अरुण म्हात्रे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. जिल्ह्यातील ५०० साहित्यिक, रसिक संमेलनात सहभागी होणार आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या
जिल्हा साहित्य संमेलनाच्या मानचिन्हाचे अनावरण
करताना आमदार उदय सामंत. शेजारी (डावीकडून)
चंद्रमोहन देसाई, गजानन पाटील, सुरेश खटावकर,
अरुण नेरूरकर आणि भास्करराव शेट्ये.
संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, त्यावेळी कोमसापचे विश्वस्त तथा माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, अरुण नेरूरकर, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, शाखाध्यक्ष चंद्रमोहन देसाई, जिल्हा समन्वयक गजानन तथा आबा पाटील, अभिजित गोडबोले यांच्यासह संमेलन समिती व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. दापोलीतील अशोक परांजपे यांनी तयार केलेल्या संमेलनाच्या मानचिन्हाचे अनावरण यावेळी उदय सामंत यांनी केले. यावेळी ते म्हणाले,  १९९० मध्ये रत्नागिरीत झालेल्या साहित्य संमेलनानंतर कोमसापची स्थापना ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केली. कोकणातील ही एकमेव मोठी साहित्यिक संस्था असून या संस्थेने यशस्वीपणे पंचवीस वर्षे पूर्ण केली, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मीही कोसापचा सभासद असून या नात्याने लागणारे सर्व सहकार्य करणार आहे.
संमेलनातील कार्यक्रम

सकाळी ८ ते ९ वाजता मारुती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य  दिंडी, १० वाजता उद्घाटन, दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा परिसंवाद (सहभाग - आनंद बोंद्रे (संगमेश्वरी), जॉनी रावत (आगरी), डॉ. सौ. निधी पटवर्धन (दालदी),  मिलिंद पेडणेकर (मालवणी), डॉ. बाळासाहेब लबडे (खारवी). दुपारी २ वाजता साहित्य आणि युवक परिसंवाद- अध्यक्ष डॉ. विद्याधर करंदीकर, सहभाग चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत. दुपारी ३ वाजता साहित्यातील कोकण, अध्यक्ष- उर्मिला पवार, डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रद्धा राणे, प्रा. वर्षा फाटक, दुपारी ४ वाजता कथावाचन - ज्येष्ठ नाटककार (कै.) प्र. ल. मयेकरांची कथा- सादरकर्ते श्रीकांत पाटील, कीर कला अकादमीचे कलाकार व मिलिंद पेडणेकर. ४.४५ वाजता कविसंमेलन अध्यक्ष अरुण म्हात्रे, निमंत्रित अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुसकर, अशोक बागवे व कोमसापचे शाखानिहाय प्रतिनिधी.
सायंकाळी ६ वाजता अध्यक्षीय समारोप साहित्यिक विश्वास पाटील.

कार्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित साहित्यिक, रसिक, पत्रकार