Wednesday, 21 October 2015

फिनोलेक्स कामगार संघटनेची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद



अॅड. विलास पाटणे – स्नेहसंमेलनात अंध विद्यालयाच्या संगीत कार्यक्रमाने भरली रंगत


रत्नागिरी : एखाद्या कामगार संघटनेने सामाजिक भान ठेवणे ही फारच दुर्मिळ बाब आहे. म्हणूनच फिनोलेक्स कामगार संघटनेने स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अंध विद्यालयाच्या मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणे कौतुकास्पद आहे, असे उद्गार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी येथे काढले.
-    रत्नागिरी – फिनोलेक्स कामगार संघटनेच्या स्नेहसंमेलनात बोलताना
अॅड. विलास पाटणे. शेजारी (डावीकडून) योगेश सामंत, प्रतिभा सेनगुप्ता,
किशोर सुखटणकर, टी. के. काकडे.
संघटनेने खातू नाट्यगृहात आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी घराडी (ता. मंडणगड) येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या एच. आर. विभागाचे महाव्यवस्थापक टी. के. काकडे व्यासपीठावर होते. अॅड. पाटणे पुढे म्हणाले, ज्या संस्थेच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते अंध विद्यालय म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या भगिनींनी आपल्या माहेरची सर्व जागा विद्यालयासाठी दिली. अंधांच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले. मिशन म्हणून हे आदर्शवत आहे. जगभरातच अंधांची समस्या मोठी आहे. जगभरातल्या अंधांपैकी एकतृतीयांश अंध भारतात राहतात. अशाच अंधांपैकी बेनो झेपीन नावाची एक अंध विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि केंद्र शासनाच्या प्रशासनात ती आता कार्यरत आहे. तिच्यासारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्ती अंधांना नवीन प्रकाशवाटा निश्चितच दाखवतील.
स्नेहसंमेलनात अंध विद्यालयाविषयी माहिती देताना प्रतिभा सेनगुप्ता.  
प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनीही अंध विद्यालयाला आणि फिनोलेक्स कामगार संघटनेच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. कौटुंबिक स्नेहमेळावा जवळीक निर्माण करायला मदत करतो, असेही ते म्हणाले. अंध विद्यालयाचे कार्य ऐकल्यानंतर या विद्यालयाला फिनोलेक्स कंपनीही विद्यालयाला शक्य तेवढी मदत करील, असे आश्वासन फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक (एचआर) यांनी दिले आणि त्यांनी कामगार संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा विचार करता व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी यापुढे एकाच व्यासपीठावर येऊन काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका सेनगुप्ता यांनी तेरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या स्नेहज्योती अंध विद्यालयाचा धावता आढावा घेतला. सुरुवातीला केवळ ४ मुले असलेल्या या निवासी शाळेत आता ३० मुले आहेत. प्रारंभी एका घरात भरणारी ही शाळा आता लोकांच्या पाठिंब्यामुळे मोठी झाली असली, तरी मुले घरच्यासारखीच राहतात. त्यांना संगीत साधना दिली जाते आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्या जोरावर ते आपले आयुष्य सुखासमाधानाने जगू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्नेहसंमेलनात कामगार संघटनेचे कौतुक करताना टी. के. काकडे
संघटनेचे संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात २००२ साली स्थापन झालेल्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. छोटेमोठे सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, शाळांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देणे असे अनेक उपक्रम संघटनेने राबविले असून कंपनीनेही त्यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी प्रथमच स्नेहसंमेलनातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती दिली. अंध विद्यालय केवळ देणगी स्वीकारत नाही. कार्यक्रम सादर केल्यानंतर बिदागी म्हणून विद्यालयाकडून देणगी स्वीकारली जाते. हे धोरणच विचार करायला लावणारे वाटले, असे त्यांनी सांगितले. संघटना, कंपनीतील कॅटरर्स आणि विविध उद्योगांतर्फे ६१ हजाराचा निधी श्रीमती सेनगुप्ता यांच्याकडे अंध विद्यालयासाठी मदत म्हणून सुपूर्द करण्यात आला. याशिवाय आविष्कार मतिमंद शाळा आणि अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील मुलांनाही संघटनेतर्फे खाऊवाटप करण्यात आले.
यावेळी सदस्यांच्या विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तन्मय जाधव, अंकिता बापट (सातवी शिष्यवृत्ती), सुश्मिता पालकर, अमृता चांबले, नेहा झगडे, नम्रता चांबले (दहावी) आणि शाल्वी पाटील (बारावी) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. श्री. घारकर यांनी आभार मानले.
............................................

अंधांच्या कार्यक्रमाने सभागृह दणाणले

घराडी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या स्वरझंकार सांगीतिक कार्यक्रमाने सभागृह दणाणून सोडले. त्यामध्ये चित्रपट आणि नाट्यगीते, भक्तिगीते, लावणी, पथनाट्य, नृत्य अशा विविध प्रकारांचा समावेश होता. ओंकारस्वरूपा या गीताने मैफलीची सुरवात झाली. अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी ठेका धरला. वाजले की बारा या नटरंग चित्रपटातील लावणीला तर वन्समोआर मिळाला. विद्यार्थ्यांना राकेश सोळंकी, गणेश काकडे, मनीष व्याघ्रांबरे या संगीत शिक्षकांनी साथ दिली. मीरा भावे यांनी ओघवत्या शैलीत रसपूर्ण निवेदन केले.
...............................................
-    फिनोलेक्स कामगार संघटनेच्या स्नेहसंमेलनात स्वरझंकार सादर करताना घराडी (ता. मंडणगड) येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाचे विद्यार्थी