Monday, 19 October 2015

रत्नागिरीत प्रतितुळजापूर उभारणीसाठी लागेल तेवढा निधी उभारू – दिलीप बाईंग




रत्नागिरी : ``महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची श्री तुळजाभवानीचे मंदिर क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत मी नक्की करेन. त्यासाठी मंदिरे उभारणारे गुजरातमधील कारागिर आणू. मराठा बिझनेस फोरमचे सर्व सभासद आर्थिक योगदान देतील. लागेल तेवढा निधी उभा करू. प्रशस्त जागेत तुळजापूरच्या मंदिरासारखेच मंदिर उभारण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा. पुढील वर्धापनदिनापूर्वी मंदिराचे काम सुरू झाले पाहिजे``, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक दिलीप बार्इंग यांनी केले.
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने
उद्घाटन करताना उद्योजक दिलीप बार्इंग. (डावीकडून) दिवाकर साळवी,
 उल्हास घोसाळकर, सुरेशराव सुर्वे व संतोष तावडे.
साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आठव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बार्इंग यांनी प्रतितुळजापूरची घोषणा केली आणि सर्व मराठा ज्ञातिबांधवांनी जल्लोष केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, माजी आमदार अप्पा साळवी, कार्याध्यक्ष दिवाकर साळवी, सल्लागार सतीश साळवी आणि ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि या वेळी श्री. बार्इंग यांचा सत्कार करण्यात आला. वर्धापनदिनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्ञातिबांधवांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी श्री. बार्इंग म्हणाले, ``तुळजापूरच्या मंदिरात मी व्हीआयपी म्हणून जात होतो पण बाहेर येताना ताटकळत वाट पाहणारे भाविक पाहिल्यानंतर मी दोन वर्षात गेलो नाही. रत्नागिरीत प्रतितुळजापूर उभारल्यास लाखो भाविकांना येथे दर्शन घेता येईल. जिल्ह्यातील मंडळांचे मराठा फेडरेशन स्थापन व्हावे. त्यातून युवकांना संधी मिळेल. मराठा बिझनेस फोरमद्वारे नवोदितांना प्रोत्साहन देत आहोत. रत्नागिरीतही काम सुरू झाले आहे.``
क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन करताना
 उद्योजक दिलीप बार्इंग. सोबत डावीकडून सतीश साळवी, अप्पा साळवी,
 सुरेशराव सुर्वे, उल्हास घोसाळकर व दिवाकर साळवी.
अध्यक्ष सुर्वे यांनी सांगितले की, मराठा महासंघातर्फे पुढील महिन्यात मराठा मंडळाचे राज्यस्तरीय फेडरेशन स्थापण्यात येणार आहे. त्यात आपलेही मंडळ सहभागी होणार आहे. रत्नागिरीत मंडळातर्फे मराठा विचार मंच स्थापन करणार असून यात दरमहा एक व्यक्ती अभ्यासपूर्ण व्याख्यान देईल. त्यातून ज्ञातिबांधवांना फायदा होईल. तुळजाभवानीचे मंदिर व मराठा भवनासाठी शहर परिसरातील खोतांनी एक एकर जमीन दिल्यास लवकरात लवकर उभारणी सुरू होईल.
अप्पा साळवी म्हणाले, हे मंडळ असले तरी लवकरच त्याचे महामंडळ व्हावे. मराठा ज्ञातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना पुढे आणावे.
श्री. घोसाळकर यांनीही मार्गदर्शन करून बार्इंग यांचे व क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्य विस्तारित असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरीजवळची गावे मराठ्यांनी राखून ठेवली असून जास्तीत जास्त बांधवांनी या मंडळात सहभागी होऊन मंडळाला बळ द्यावे, असे आवाहन केले.
सौ. राजलक्ष्मी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. दिवाकर साळवी यांनी आभार मानले.
-----------
स्मरणिकेचे कौतुक

  क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आठव्या वर्धापन दिनानिमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेचे संकलन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसने केले होते. मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगररचनाकार सुरेशराव सुर्वे यांनी स्मरणिकेचे कौतुक केले. संकलन आणि सुबक मुद्रणासह स्मरणिका चांगली झाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
 ..................................................................................................................................
 
 
मराठा मंडळाच्या वर्धापनदिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.