Monday, 16 July 2018

छोट्या संधी शोधून त्या मोठ्या करणारे उद्योजक होतात – डॉ. श्रीधर ठाकूर

      रत्नागिरी : स्पर्धेच्या आजच्या युगात यशाच्या संधी खेचून आणाव्या लागतात. छोट्या संधी शोधून काढून त्या मोठ्या करणारेच यशस्वी उद्योजक बनतात. त्याकरिता कठोर परिश्रम आणि चांगला संपर्कही निर्माण करावा लागतो, असे प्रतिपादन मुंबईतील इन्फिगो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
रत्नागिरी : केबीबीएफच्या बैठकीत
मार्गदर्शन करताना मुंबईतील इन्फिगो कंपनीचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर.

     कऱ्हाडे  ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी (ता. १५ जुलै) झालेल्या व्यावसायिक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कऱ्हाडे ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक, व्यावसायिक देवाणघेवाण आणि त्यामधून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. ठाकूर यांनी उद्योजक आणि व्यावसायिक या संज्ञांमधील फरक स्पष्ट करून यशस्वी होण्याची कौशल्ये यावेळी विशद केली. ते म्हणाले की, एखादा उद्योग मनात जन्मावा लागतो. त्यावर बुद्धी विचार करते. त्यावर अचूक आणि योग्य कृती केली गेली, तर उद्योग यशस्वी होतो. अनेकदा अपयश आले, तरी जो त्यातून शिकून आपल्यामध्ये बदल घडवून आणतो, तोच यशस्वी होतो. एकदाच अपयश आले, तर त्यापासून परावृत्त होऊन त्याबाबतच्या तक्रारी करणारे व्यवसाय करू शकत नाहीत. ते नोकरीच करत राहतात. देशातील तसेच जगभरातील विविध ठिकाणच्या उद्योगांचे दाखले देऊन त्यांनी कोकणातील सोनचाफा, फणस, कोकम इत्यादी अनेक फळांची लागवड आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांमधील संधी उलगडून सांगितल्या. स्मिथ अँड नेफ्यू कंपनीचे व्यवस्थापक मंगेश प्रभुदेसाई यांनी देवरूख येथील बाळासाहेब पित्रे आणि विमलताई पित्रे यांनी उभारलेल्या अॅडलर-सुश्रुत या बहुराष्ट्रीय कंपनीच्या यशाचा प्रवास उलगडला. अनेकदा अपयश येऊनही कोकणासारख्या दुर्गम आणि मागास भागात तयार केलेले वैद्यकीय उपकरणांची निर्यात जगातील सर्वांत प्रगत देशात करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना कोणती दिव्ये करावी लागली तसेच नवी कोणती मानके त्यांनी तयार केली, याची यशोगाथा श्री. प्रभुदेसाई यांनी सांगितली.
केबीबीएफच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष अॅड. संदेश शहाणे यांनी रत्नागिरी शाखेच्या वाटचालीचा, तर केबीबीएफ ग्लोबलचे सचिव अमित शहाणे यांनी अन्य विविध शाखांचा आढावा घेतला. व्यावसायिकांसाठी लवकरच पतसंस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या जोशी एन्टरप्रायझेसचे कौस्तुभ कळके यांनी या मेळाव्याचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. मेळाव्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे तसेच कोल्हापूरमधील उद्योजक उपस्थित होते. सर्व प्रतिनिधींनी आपापल्या व्यवसायांविषयीची माहिती सांगितली. प्रातिनिधिक स्वरूपात प्रशांत पाध्ये, योगेश मुळ्ये, सुहास ठाकूरदेसाई, अभय खेर यांनी संघटनेविषय़ीचे अनुभव सांगितले.
.................

डॉ. ठाकूर यांचे संपूर्ण भाषण कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/PuYrKD0hgug