Friday 29 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ
दिवस नववा (नाटक दहावे) (२८ नोव्हेंबर २०१९)

............

`सभ्य` जगाच्या जखडणाऱ्या सीमारेषा प्रभावी रीतीनं दाखवणारं नाटक

५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील दहावे नाटक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. धुआँनावाचे हे नाटक गणेशगुळे इथल्या अजिंक्यतारा थिएटर्सने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
...............
मुंबापुरीतल्या एका लहानशा रस्त्याचा पदपथ. रस्त्याशेजारच्या मोठ्या रुग्णालयाच्या तळाशी उभी राहिलेली मुंबई स्टाइलची घरं. कोपऱ्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहाचं संकुल.या संकुलाबाहेरच्या बाकड्यावर रघू नावाच्या एका फटीचर माणसाचं वास्तव्य. बाजूचं घर नीटनेटकं, त्यात राहते सुमन - शरीरविक्रय करून पोट भरणारी स्त्री. अलीकडेच मुंबईत येऊन सायकलवरून चहा-विडी-सिगारेट विकणारा मनोहर या स्वच्छतागृहासमोरची थोडीशी मोकळी जागा पाहून तिथं आपलं सायकलवरचं स्टॉल थाटतो. सुरुवातीला गस्तीवरचे पोलीस त्याला दमदाटी करतात. त्यांना चहा देऊन हळूहळू नवखा मनोहर हप्ताही द्यायला सरावतो.



एके दिवशी एक वेडी रस्त्यापलीकडच्या कचरा कुंडीत वाकून काहीतरी शोधू लागते. सापडलं! कुंडीत पडलेलं एक नवजात अर्भक ती बाहेर काढते. मेरी बच्ची! मेरी बच्ची!!म्हणत त्या बाळाला पोटाशी धरते. इतका वेळ शांत बसलेला रघू एकदम उठून ते मूल हिसकावून घेऊ लागतो. झटापट होते. मनोहर-सुमन मध्ये पडतात; पण रघू बाळ घेऊन निसटतो. वेडी निघून जाते.



दिवस जात असतात. शरीरविक्रय करणारी असली, तरी सुमन नावाप्रमाणेच मनाने चांगली आहे. सच्च्या दिलाची आहे. मनोहरचा शांत स्वभाव, मार्यादशील वागणं तिला आवडतं. तसं ती त्याला एकदा सांगतेदेखील. मनोहर माळकरी, सायकलच्या बास्केटवर विठोबाचं चित्र लावलेलं, कपाळावर टिळा. वर्तणूक स्वच्छ. बोलणं आर्जवी. सुमनच्या हातात चहाचा कप देताना होणारा तिचा निसटता स्पर्शही टाळणारा माणूस. घरी त्याची आजारी पत्नी. किती वर्षं अंथरुणाला खिळलेली. रोज सकाळी सायकल घेऊन यायचं, चहा सिगारेटी विकायच्या.. सायंकाळी उशिरा घरी जाऊन बायकोची शुश्रुषा करायची. असं बरीच वर्षं चाललं.

इकडे पळवून नेलेल्या मुलीला रघू लहानाचं मोठं करतो नि तिला भीक मागायला शिकवतो. आणखी पैसे गोळा करम्हणून त्या सहा-सात वर्षांच्या मुलीला मारझोड करतो. हे बघून संतापलेली सुमन त्या मुलीला आपल्याकडे ठेवण्याचं ठरवते. तिला मायेनं जवळ घेते. ती मुलगी-काजल-सुखावते.



दरम्यान, मनोहरच्या आजारी पत्नीचा ग्रंथ आटोपतो. तिचं दिवसकार्य झाल्यावर मनोहर पुन्हा सायकल घेऊन येतो. सुमन त्याची विचारपूस करते. आपली कर्मकहाणीही त्याला सांगते. अल्लड वयात एक मुलगा आवडायचा तिला. आईवेगळी पोर. बाप म्हणवणाऱ्या एकानं तिला वाढवलेलं. मोठी होता-होताच पैसे घेऊन कुणाशी तरी लग्न करून देतो. नवरा चार दिवस संसार करतो. संसार कसला? हनिमूनही नव्हे-निव्वळ उपभोग. मग तिला गुंगीचं औषध देऊन चार दिवस बेशुद्धीत ठेवतो. शुद्धीवर आल्यावर तिला समजतं-आपलं गर्भाशय काढून टाकलंय. मग काय? एकामागोमाग रोज येणारे लांडगे...!

काजलला सांभाळायचं ठरवणंही सोपं नसतं. फार मोठा सौदा करावा लागतो. सुमनच्या शरीराकडे लाळ घोटत पाहणाऱ्या रघूला पाहिजे ते देण्याचा नि वर पैसेही हप्ता म्हणून देण्याचा! पण काजलचं आपल्यासारखं व्हायला नको. तिला तू घेऊन जा,’ असं सुमन मनोहरला विनवते... आपल्यासारख्या बाईकडे तिला ठेवलं तर तिला तिच्या पायावर उभं करता येणार नाही. उद्या तिचा अज्ञात बाप, भाऊच गिऱ्हाईक म्हणून तिच्यासमोर उभा राहिला तर? ‘तू तिला ने-तिला शिकव, तिचा बाप हो!

खूप विचार करून मनोहर सुमनच्या घराची पायरी चढतो. खरं तर सुमनला त्यानं आपलाही स्वीकार करावा असं वाटत असतं; पण मनोहरला ते अवघड वाटतं. काजलला मात्र तो घेऊन जातो.

त्या दिवसापासून सुमनचं वागणं बदलतं. ती नखरेलपणाला सोडचिठ्ठी देते. तोंड आणि ओठ रंगवून गजरा माळून खोलीबाहेरच्या बाकड्यावर पाय पसरून बसणारी सुमन, कुलीन स्त्रीसारखी साधी साडी नेसून, वेणीफणी करून वावरू लागते.

एकदा काजलला भेटायला सुमन नवा फ्रॉक घेऊन जाते. काजल खूश होते. इतक्यात मनोहर येतो. रात्रीची वेळ. त्याला हे आवडत नाही. बाहेरून लोकांचं स्पेशलबोलणं ऐकू येतं. सुमन जाते. लोकांच्या असल्या बोलण्याला तोंड देण्याची मनोहरची तयारी होत नाही.

काही दिवस जातात. रघू पैशाच्या लोभाने नेहमीच सोबत करायला सुमनसाठी एका उतारवयातल्या माणसाचं स्थळआणतो. तो श्रीमंत वृद्ध मोटार घेऊन येण्याची वेळ जवळ येऊन ठेपते. पूर्वीसारखा साजशृंगार करून तयार झालेली सुमन सायकलजवळ उभ्या असलेल्या मनोहरचा निरोप घेते. अजूनही तो आपल्याला स्वीकारेल अशा आशेनं ...!

पण सुमनचं जग आणि आणि आपलं जग यातली सीमारेषा मनोहरला जखडून ठेवते. ... पुन्हा कधीच ती त्याला भेटणार नसते...!

धुआँ’ ...! क्षणभरातच विरून जाणारा धूर; पण तेवढ्यात बरंच काही बदलूनही जातो तो. गणेशगुळे इथल्या अजिंक्यतारा थिएटर्सनं हे नाटक प्रभावी रीतीने सादर केलं. मनोहरची भूमिका आणि दिग्दर्शन होतं दशरथ रांगणकरांचं. सर्वच कलावंतांची कामं जिथल्या तिथं. मुंबईच्या झोपडपट्टीतल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रघूचं पात्र अजय अनंत पानगले यांनी हुबेहूब साकारलंय नि मध्यवर्ती सुमनची भूमिका पूजा जोशी या कलावतीनं दाद द्यायलाच पाहिजे अशी कमालीच्या ताकदीनं रंगवलीय.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

No comments:

Post a Comment