Thursday 28 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड जागेचं दुखणं


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड जागेचं दुखणं
दिवस आठवा (नाटक नववे) (२७ नोव्हेंबर २०१९)

............

व्यवस्थेचे तीन तेरा वाजविणाऱ्या परिस्थितीचं रंगमंचीय दर्शन

      एका जुनाट खोलीत मायलेकी बोलत बसल्यात. वेळ रात्र सुरू झाल्याची. एक प्रौढ मनुष्य आत येतो. बाई मुलगीला बाहेर पिटाळते. त्या दोघांचं काही बोलणं होतं. तेवढ्यात आणखी एक मनुष्य येतो. फरची टोपी, जाकिट, छत्री. मोठा रगेल नि रंगेल दिसतो हा! होय. सावकार आहे तो. तो आत येताच मुलीला एकटीला सोडून ती बाई नि पुरुष निघून जातात. सावकाश दरवाजा आतून लावून घेतो. जेमतेम चौदा-पंधरा वर्षांच्या त्या मुलीला आतल्या खोलीत नेतो आणि मग...!
      अवघड जागेचं दुखणं.रत्नागिरी तालुक्यातलं बसणी पंचक्रोशी ग्रंथालय आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी या दोन संस्थांनी नाट्यस्पर्धेत सादर केलेलं एक विचारप्रवर्तक नाटक. वेगवेगळ्या प्रसंगांत सगळी मिळून वीसेक पात्रं रंगमंचावर आणणाऱ्या या प्रयोगात दुर्गम आदिवासी पाड्यांमधलं सामाजिक जीवन उभं केलंय. विशेषतः महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भात. याचं लेखन केलंय हृषीकेश कोळी यांनी आणि दिग्दर्शन ओंकार पाटील यांनी.
      सबनीस बाई म्हणून पाड्यात ओळखल्या जाणाऱ्या एका तरुण समाजसेविकेनं पाड्यातल्या महिलांचं जीवन सुधारण्याचा निश्चय केलाय. ती रात्रीचे साक्षरता वर्ग चालवते. कंदिलाच्या उजेडात स्त्रिया मुळाक्षरं, जोडाक्षरं नि शब्दरचना शिकतात. बाहेरच्या जगाबद्दल खूप काही ठाऊक होतं त्यांना. आदिवासी असल्या तरी माणसंच ना त्या! त्यांना मेंदू आहेत, विचारक्षमता आहे. पार्वती नावाची महिला तर जरा जास्तच विचारक्षम दिसते. सबनीस बाई! देश स्वतंत्र झाला हे आता कळलं आम्हाला तुमच्याकडून. स्वातंत्र्य-बितंत्र्य शहरातल्या लोकांसाठीअसं म्हणून पाड्यातल्या एकूणच समाजजीवनाचं नेमकं वर्णन करते ती!
      इथं भरपूर दाट झाडी आहे. झुळझुळ वाहणारं पाणी आहे. आदिवासी कसं मुक्त जीवन जगताहेत अशी समजूत झाली शहरातल्या सिमेंटच्या खुराड्यांत अडकून पडलेल्यांची. या आदिवासींना आरोग्य सुविधा, शिक्षण मिळालं पाहिजे हे नियोजनकारांचं स्वप्न असतं; पण त्या पलीकडच्या आयुष्याची कल्पनाही मध्यमवर्गीय, स्वतःला नागरी सुसंस्कृत समजणाऱ्या समाजाला येणं कठीण.
      पाड्यात सावकाराचं राज्य. सावकार आणि त्याचा तो सुरुवातीला येऊन गेलेला हस्तक - पाठीवर कुबड आणि लंगडा पाय असलेल्या त्या हस्तकाचं नाव बाविस्कर. दोनच कर्मचारी असलेल्या गावातल्या चौकीतल्या पोलिसांना चणे खायला घालून हा बाविस्कर त्यांना टाचेखाली ठेवतो. त्याचं आगमन झालं, की साहेबाच्या खुर्चीत बसण्याचा मान त्याचा. पोलीस चौकीतल्या रेकॉर्ड रूममधली हवी ती फाइल शोधून एखादा कागद काढून फाडायला लावण्याएवढा त्याचा धाक. या सगळ्यात निर्ढावून गेलेला सोनावणे हा पोलीस सावकाराच्या विरोधात सबनीस बाई देत असलेली तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करतो. प्रामाणिक सेवेचं बक्षीसम्हणून या दूरच्या अडचणीच्या पाड्यात बदली झालेला हवालदार महाडिक यालाही या परिस्थितीची लागण होणं सुरू झालंय; पण त्याच्यातला माणूस अद्याप जिवंत आहे, संवेदनशीलता अगदीच झोपी गेली नाही; पण ही परिस्थिती बदलणार नाही हे उमजल्यानं आत्मविश्वास मात्र नाहीसा झालाय. आपले डोळे कायमचे बंद करू द्यायचे नसतील, तर तात्पुरते मिटावे लागतात,’ हा धडा तो शिकलाय.
      अशा वातावरणात पार्वतीला दिवस गेलेत. तिला मुलगा होणार या कल्पनेने तिचा नवरा किसन खूश आहे. तिचे लाड पुरवत आहे. मुलाचं नाव विजय ठेवायचं असं म्हणतोय. अन् मुलगी झाली तर नाव विजया ठेवायचं,’ असं पार्वतीनं सांगताच खवळून उठतोय. मुलीचा जन्म नको. मुलीला जन्म देणाऱ्या बाईला डाकीण ठरवून तिचा छळ केला जातो, अशा संस्कृतीत पुरता रुळून गेलाय हा किसन.
      एक दिवस आपला गर्भ लाथ मारून पाडायला आलेल्या नवऱ्याच्या डोक्यात धोंडा घालून पार्वती पोलीस चौकीत येते. तिथं एकटाच असलेला महाडिक भांबावून जातो. पार्वती तिथंच बाळाला जन्म देते. ते बाळ मुलगी असतं.
      आई होण्याची इच्छा पूर्ण झालीय. यापूर्वी तिला मुलगीच होणार या समजुतीनं गर्भातच तिचं बाळ दोन-तीनदा मारलं गेलंय इतक्यात किसन येतो. पार्वतीनं अंधारात दगड घातला तो किसनच्या बापाच्या डोक्यात. किसन आणखीच खवळलाय. परिस्थिती चिघळत जाते. पार्वतीला डाकीण ठरवलं जाणार हे स्पष्ट दिसतं. पुढे काय होणार याचा अंदाज आलेली पार्वती काळजावर दगड ठेवून आपल्या मुलीचा श्वास गुपचूप, कोणाला नकळत कायमचा बंद करते आणि डाकीणहोण्याच्या भवितव्यासाठी तयार होते.
      एव्हाना पोलीस चौकीत आलेली सबनीस बाई त्या नवजात मुलीला स्वतःसोबत न्यायला तयार होते; पण तुम्हाला गावाच्या वेशीबाहेर तरी जाता आलं पाहिजे ना,’ असं म्हणून महाडिक वास्तवाची जाणीव करून देतो.
इतक्यात गलका होतो. बाविस्कर गावकऱ्यांना घेऊन येतो. दोन पोलिसांना जुमानतो कोण? सोनावणेला ढकलून, महाडिकलाच लॉकअपमध्ये बंद करून ते सगळे मुलीचं कलेवर पोत्यात टाकून पार्वतीला घेऊन जातात. चणे खाऊन लाचार झालेल्या सोनावणेचे डोळे उघडतात; पण उशीर झालेला असतो!

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

No comments:

Post a Comment