Saturday 24 March 2018

मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर कलशारोहणासाठी सज्ज


रत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा येत्या सोमवारी (दि. २६ मार्च) होणार आहे. संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव आजपासून सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. याच कालावधीत सोमवारी नूतन मंदिरावर करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कळस चढविला जाणार आहे.


      मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सहावा उत्सव आहे. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत दरवर्षी चैत्रोत्सव होतो. यंदा कलशारोहणामुळे हा उत्सव आज सप्तमीपासूनच सुरू झाला. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. यंदाच्या उत्सवात, २६ मार्च रोजी करवीर पीठाचे श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादी धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम या कालावधीत होणार आहेत. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. उद्या (दि. २५ मार्च) रात्री स्थानिक भक्तमंडळींचे भजन होणार असून, २७ मार्च रोजी रात्री वेदमूर्ती आचार्य गुरुजी आणि ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहेत. २६ ते ३१ मार्च या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.

      अखेरच्या दिवशी रोजी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा कार्यक्रम योगेश सोमण सादर करतील. त्यानंतर सुमंतबुवांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment