Saturday 19 December 2015

चेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम



प्रशिक्षकांची गरज : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यात हजार शाळांमध्ये राबवणार

रत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांतील पन्नास हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्याचे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरीत चेसमेन संघटनेतर्फे हा उपक्रम तीन वर्षे सुरू असून आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षकांची गरज आहे. याकरिता लवकरच ट्रेन द ट्रेनर्सद्वारे इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी   पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे आदी उपस्थित होते. बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक ङ्कायदे आहेत. बुद्धिबळ हा ङ्कक्त युद्धतंत्रावर आधारलेला एक खेळ नसून ती एक कला आहे व त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. विशेषतः लहान वयात बुद्धिबळाचे धडे गिरवल्यास मुलांना   संयम व एकाग्रता वाढवण्यास, निर्णयक्षमता व चुकलेल्या निर्णयांची स्वतः जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती,       लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात.
युरोप खंडातील अनेक देशांमध्ये बुद्धिबळ हा शालेय अभ्यासक्रमातला एक अनिवार्य विषय आहे. या धर्तीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने महाराष्ट्रात चेस इन स्कूल हा प्रोजेक्ट राबविला आहे. शालेय मुलांना बुद्धिबळाची तोंडओळख व प्राथमिक धडे देणे, त्यांच्या स्पर्धा भरविणे, बुद्धिबळ खेळण्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी चेस इन स्कूलला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. प्रथम वर्षात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मागील वर्षी राज्यातील २३५ शाळा व १२,५०० विद्यार्थी सहभागी झाले. २२ जिल्ह्यांमधील शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात एक हजार शाळांमध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उद्दिष्ट आहे. पहिली तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यंदाच्या वर्षापासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनरपदाची धुरा सांभाळली आहे.
रत्नागिरी जिल्हा पहिल्यापासून चेस इन स्कूलमध्ये सहभागी आहे. जीजीपीएस आणि (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सलग तीन वर्षे हा प्रकल्प राबवण्यात आला. या शैक्षणिक वर्षातही या शाळांमध्ये सुरू आहे. याशिवाय सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये दोन वर्षे प्रकल्प राबवला. जिल्ह्यात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी चेसमेनला बुद्धिबळ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळाचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. येत्या २६-२७ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये ट्रेन द ट्रेनर्समधून प्रशिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय पातळीवर बुद्धिबळ कसे शिकवावे, चेस इन स्कूलचा ३२ सत्रांचा अभ्यासक्रम, परीक्षा, शालेय स्पर्धा आदींची माहिती यात दिली जाते.
बुद्धिबळाची तोंडओळख, बुद्धिबळाचा मनोरंजक इतिहास, प्राथमिक धडे दिले जातात. किमान दहा व्यक्तींनी चेसमेन संस्थेशी संपर्क साधून प्रशिक्षण घेतल्यास हा प्रकल्प अधिक जोमाने राबवता येणार आहे. क्रीडा शिक्षकांनाही यात भाग घेता येईल. नव्या वर्षात आणखी तीन शाळांमध्ये उपक्रम सुरू होणार आहे.
चेस इन स्कूल उपक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्यासह परीक्षा, स्पर्धा भरवण्याचा समावेश आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे विशेष लक्ष या उपक्रमाकडे आहे. तसेच निरीक्षकही शाळांना भेट देऊन पाहणी करतात. त्याचे अहवाल केले जातात. ना नङ्का ना तोटा या तत्त्वार संघटना हे उपक्रम राबवत असून शाळांनी यात सहभागी व्हावे,  असे आवाहन चेसमेन संस्थेने केले आहे.

No comments:

Post a Comment