Monday 16 November 2015

अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

 
   रत्नागिरी : दाभोळ  (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यावर्षीचा विभागीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरीत येत्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीला पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ही घोषणा केली.
      सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार दिले जातात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १२ मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत यावर्षीच्याराज्यस्तरीय आणि विभागीय पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार कोकण विभागीय पुरस्कारासाठी १७ प्रस्ताव आले होते. निवड समितीने त्यामधून अण्णा शिरगावकर यांच्या नावाची शिफारस केली होती. प्रतिष्ठानने ती स्वीकारली असून श्री. शिरगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
        प्रतिष्ठानच्या पुणे येथील कृषी व सहकार व्यासपीठातर्फे कथा जोतिबा सावित्रीची या विषयावर राज्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लीलाधर मोहन कूड (शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर आणि विश्वनाथ बिले (चिपळूण) यांना अनुक्रमे द्वितीय (७५० रु.), तृतीय (५०० रु.) आणि उत्तेजनार्थ (३०० रु.) या रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहेत.
        प्रतिष्ठानने गेल्या ऑगस्टमध्ये गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्ताने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचे संकलन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, अण्णा शिरगावकर यांना तसेच शिक्षकांना द्यावयाच्या पुरस्कारांचे वितरण असे कार्यक्रम २५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार असल्याचे श्री. लिमये यांनी सांगितले.



        
    
      

1 comment:

  1. कोकणाला प्राचीन इतिहास नाही, असे म्हटले जात असताना 'कोकणाला प्राचीनचं नाही, तर अतिप्राचीन इतिहास आहे.' हे ज्यांच्या प्रयत्नांमुळे सिध्द झाले. असे थोर इतिहास संशोधक 'अण्णा शिरगावकर' यांची मुलाखत पहा. https://talukadapoli.com/dapoli-special/anna-shirgaonkar-konkan-historian/

    ReplyDelete