Friday 20 November 2015

झाशीच्या राणीचा इतिहास तरुणांच्या मनावर ठसवायला हवा



डॉ. सच्चिदानंद शेवडे : सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत ही खंत

कोट (ता. लांजा) : झाशीच्या राणीचा प्रेरणादायी इतिहास आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत,’’ अशी खंत इतिहासाचे प्रगाढ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे व्यक्त केली.

     

झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. तिचा इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि तिचे स्मारक गावात उभारले जावे कोट आणि कोलधे ग्रामस्थांनी स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कोट येथे राणीची १८१ वी जयंती काल (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ``कोणत्याही व्यक्तीचे मूळ महत्त्वाचे असते. राणी लक्ष्मीबाई बालपणात या गावांमध्ये आली की नाही, याला महत्त्व नाही. त्यांचे मूळ गाव महत्त्वाचे आणि त्यांची आठवण ग्रामस्थांकडून ठेवली जाते, हे त्याहून महत्त्वाचे आहे. रणरागिणी लक्ष्मीबाईचा इतिहास तेजस्वी आहे. इतिहास शाईने नव्हे, तर क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो. राणीने १८५७ साली स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला आणि त्यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे सांगितले, शिकविले जाते. ते चुकीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे मागितल्यानंतर मिळणारे दान किंवा भीक नव्हे. ज्ञात-अज्ञात असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताने स्वातंत्र्य मिळविले आहे. तसेच सांगितले गेले पाहिजे. ते न सांगितले गेल्यामुळे आजच्या पिढीला स्वातंत्र्य सहज मिळाले, असे वाटते. त्यामुळे स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. म्हणूनच देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हायला तरुण मिळत नाहीत. प्रेरणादायी कविता, धडे अभ्यासातून काढून टाकले गेले. त्यामुळे प्रेरणादायी खरा इतिहास मुलांना समजतच नाही. देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखल्या जातात, चरख्याच्या सुताने नव्हेत, हे तरुणांना पटविणे आवश्यक आहे.``

राणी लक्ष्मीबाईचे शौर्य, तिचा संघर्षमय जीवनप्रवास, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, त्याबाबत ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या चुकीच्या नोंदी, चुकीचा इतिहास शिकविल्यामुळे झालेले नुकसान, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला मिठावरील कर, न्यायव्यवस्थेमुळे विश्वासाला गेलेला तडा इत्यादीविषयी शेवडे यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. त्यामुळे सभागृह भारावून गेले. संत आणि राष्ट्रपुरुष एखाद्या जातीसाठी, समाजासाठी नव्हे, तर देशासाठी कार्य करतात, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
प्रारंभी अंध कलाकार योगिता अरुण तांबे हिचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. अॅड. विलास कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाला पर्यटनस्थळाचा नव्हे, तर स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिनकर नेवाळकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला.
       समारंभाला आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..
.........

स्मारकासाठी २५ लाखाची तरतूद
``राणी लक्ष्मीबाईच्या कोट येथील नियोजित स्मारकासाठी जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल आणि समितीच्या येत्या बैठकीत त्याची नोंद घेतली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे``, अशी माहिती राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी आपणही प्रयत्नशील राहू आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. साळवी यांनी यावेळी दिले.



No comments:

Post a Comment