Saturday 20 June 2015

नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा कौशल्यविकासाचा संकल्प

 वर्षारंभ समारंभ :  अभ्यासाबरोबरच सुलेखन, जलतरण, वृक्षलागवडीची दीक्षा
रत्नागिरी – नियमित शालेय अभ्यासाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करण्याचा संकल्प येथील अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आज (ता. 20) सोडला. वर्षभरात ही कौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची दीक्षा त्यांनी घेतली.
श्रीमती प्राजक्ता मुसळे यांनी अग्निहोत्र सिद्ध केले.
 येथील रा. भा. शिर्के प्रशालेअंतर्गत पंचकोशाधारित अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल चालविले जाते. तेथे दरवर्षी समारंभपूर्वक वर्षारंभ केला जातो. त्यानुसार आज गुरुकुल शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. शरद्चंद्र जोशी आणि गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रघुवीर भिडे यांच्या उपस्थितीत वर्षारंभ समारंभ झाला. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वविकासासाठी काही संकल्प केले. ते यशस्वी करण्यासाठी वर्षभर धडपडण्याची
मार्गदर्शन करताना डॉ. रघुवीर भिडे
प्रतिज्ञा घेतली. पाचवीपासून विद्याव्रत स्वीकारून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीला सुरवात केली. चांगले लेखन काढणे, उत्कृष्ट पोहता येणे, स्तोत्रपाठांतर, झाड लावून त्याची जोपासना करणे यासारखे संकल्प विद्यार्थ्यांनी केले.
 श्रीमती प्राजक्ता मुसळे यांनी सिद्ध केलेल्या अग्निहोत्रातील अग्नीला साक्षी ठेवून संकल्पाची दीक्षा विद्यार्थ्यांना दिली.

संकल्प ठरविण्याकरिता विद्यार्थ्यांनी गुरुकुलचे प्रमुख अध्यापक राजेश आयरे यांच्या नेतृत्वाखालील 
मार्गदर्शन करताना डॉ. शरद्चंद्र जोशी
अध्यापकवर्गाची मदत घेतली. ``विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात संकल्पाचे भरपूर योगदान आहे. संकल्प आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात``, असे यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले. अध्यक्ष डॉ. भिडे म्हणाले, ``संकल्प आपल्या मनाला घडवीत असतात. मनाला चांगल्या विचारांचे संस्कार करतात. मन चंचल असते. मनाला एकाग्र करणे व मनावर ताबा मिळविणे यासाठी संकल्पाचा योग्य उपयोग होतो.``

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी आंबर्डेकर यांनी केले, तर संध्या सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.
.........................

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपला संकल्प जाहीर केला.










No comments:

Post a Comment