रत्नागिरीत आर्ट सर्कलचा पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : ``परदेशातील लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा नव्हे सर्वच गोष्टींचा अभिमान असतो; मात्र आपल्याकडे छत्रपती
शिवाजी महाराजांचा आपण अत्तरासारखा वापर करतो; पण त्यांचे रक्त आपल्या शरीरात भिनले पाहिजे. शिवचरित्र हे एका व्यक्तीचे
चरित्र नव्हे राष्ट्रनिर्मितीची गाथा आहे. आज त्याची नितांत गरज आहे. चौऱ्याण्णवाव्या
वर्षीही मला ते जास्तीत जास्त लोकांर्पंत पोहोचवायचे आहे', असे प्रतिपादन महाराष्ट्रभूषण
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
आपल्यालाही महाराजांचा
यथार्थ सन्मान वाटला पाहिजे. मी इतिहासकार, विद्वान, पंडित नाही. बालवर्गात इतिहास शिकवणारा साधा शिक्षक आहे. महाराजांचे सर्वांत
जास्त प्रेम कोकणावर होते. त्यामुळेच सुकळवाड (मालवण, सिंधुदुर्ग) येथे जीजी
उपरकरांच्या मदतीने शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. मे २०१६ पर्यंत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
आर्ट सर्कल
आणि पुण्याच्या आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित पुलोत्सवास रत्नागिरीत
शनिवारपासून (ता. १२ डिसेंबर) स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. त्यावेळी
पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान केल्यावर प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. डॉ.
सागर देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आर्ट सर्कलचे
डॉ. रवींद्र गोंधळेकर यांनी बाबासाहेबांना मानपत्र सुपूर्द केले. लेखक अनिल
दांडेकर यांनी लिहिलेल्या या मानपत्राची त्यांच्याच आवाजातील ध्वनीफित ऐकवण्यात
आली. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी प्रास्ताविक व सौ. पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन
केले. स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रचंड गर्दीमध्ये हा कार्यक्रम झाला.
श्री.
पुरंदरे म्हणाले, "बकिंगहॅम पॅलेसमध्ये १९७८च्या दसऱ्याला गेलो असता तिथल्या तलवारीची आपट्याची पाने ठेवून
पूजा करून मुजरा केला. ज्युली हॉर्लंड या तिथल्या वस्तुपाल युवतीने माझ्याकडून
सर्व माहिती घेतली. इंग्रजांना स्वतःच्या देशाचा प्रचंड अभिमान असतो. आपल्याकडे
बोलण्यात अस्मिता भरपूर आहे; पण कृतीत दिसत नाही. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळली नाही, हा तर सर्वात मोठा
भ्रष्टाचार आहे, असे महाराज सांगत. त्यामुळे सद्यस्थितीतही वेळ पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे."
श्री. पुरंदरे
यांनी पुलंविषयी अनेक विनोदी आठवणी सांगितल्या. विद्यार्थी सहायक समितीच्या मदतीसाठी
आयोजित राजमाता या एकपात्री प्रयोगावेळी दाखवलेली शिस्त, गप्पांमधील अनेक किस्से त्यांनी ऐकवले. एका व्यक्तीने तुम्ही देशपांडे म्हणजे
देशस्थ की कायस्थ असे विचारता पुलंनी सांगितले त्रयस्थ असे सांगितले. असे काही
किस्से ऐकवले. स्वा. सावरकर, ज्ञानेश्वरीचेही काही संदर्भ सांगितले.
ते म्हणाले, "१० खंडांतील शिवचरित्र प्रसिद्ध
झाल्यानंतर १९५८ मध्ये पु. ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. मुंबई-दिल्ली प्रवासामध्ये
हे चरित्र वाचून काढले आणि तिथून पुढे पुलंचा व माझा परिचय झाला. पुल तथा भाई व
सुनीताबाई या शिस्तबद्ध दांपत्याशी परिचय वाढत गेला. एकदा इंग्लडच्या दौऱ्यावर जाताना
पुलंनी मला तिथली सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बँक पाहण्यास सांगितले. पुलंची
निरीक्षणशक्ती प्रभावी होती. विनोदी स्थायीभावामुळे त्यांचा विनोद उच्च दर्जाचा
होता, उथळ नव्हता. ते सहज सोपा विनोद करायचे. एकदा सिंहगडावर आम्ही पायी गेलो. गडावर
ते बसले आणि मला म्हणाले, आमच्या घरी संदेश पाठवा, आम्ही किल्ल्यावर सुखरूप
पोहोचलो.
कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्त
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमाकरिता स्वा. सावरकर नाट्यगृहात
चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता शहरातील रसिकांसह
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही
उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार कार्यक्रम ६.५९ ला सुरू झाला आणि ६.१९ वाजता बाबासाहेबांची मुलाखत सुरू झाली. याबद्दल
बाबासाहेब आणि डॉ. देशपांडे यांनी आर्ट सर्कलचे विशेष कौतुक केले.