Saturday 14 September 2019

मूर्तीबरोबरच भावभक्तीही समुद्रात अर्पण

कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव आता संपला आहे. तो अनेक आठवणी मागे ठेवून गेला आहे. समुद्रावर आणि वाहत्या नद्यांच्या काठावर एखादा फेरफटका मारला, तर या आठवणी मूर्त रूपात दिसू शकतील. मूर्ती आणि उत्सवाच्या आठवणी आहेतच, पण उत्सव संपला तरी ज्याचा उत्सव केला, त्या गणपतीच्या भग्नावस्थेतील मूर्ती आणि त्याला भावभक्तीने म्हणून जे काही अर्पण केले, ते सारे निर्माल्य समुद्राने आणि नद्यांनी आपापल्या काठावर आणून पुन्हा सोडले आहे. मोठ्या भावभक्तीने साजरा झालेला उत्सव या अशा आठवणी मागे ठेवून जात असेल, तर त्याला उत्सवाला भावभक्तीचा उत्सव म्हणावे का असाच प्रश्न पडतो. मुळातच अशा तऱ्हेचा उत्सव का साजरा केला जातो, हेच कळत नाही.
आपण ज्याची पूजा केली ती मूर्ती आणि त्याला जे काही मनोभावे अर्पण केले, त्याचे तयार झालेले निर्माल्य विसर्जनानंतर विकृत रूपात पुन्हा किनाऱ्यावर येणार असेल आणि नाइलाजाने पायदळी तुडवले जात असेल, तर त्या भक्तीला काहीच अर्थ उरत नाही. रत्नागिरीत भारतीय पर्यावरणशास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे निर्माल्याच्या संकलनाची व्यवस्था गेली काही वर्षे केली जात आहे. इतरही अनेक सामाजिक संस्था त्यासाठी आता पुढे येत आहेत. या निर्माल्यापासून खताची निर्मिती केली जाते. दरवर्षी असे निर्माल्य संकलित केल्याचे दिसत असूनही निर्माल्य टाकणाऱ्यांची  संख्या काही कमी झालेली नाही. त्यामुळे निर्माल्याच्या संकलनाची संकल्पना लोकांना समजलीच नाही, असा अर्थ निघतो. जिद्दी माउंटेनिअर्स संस्थेने गेली काही वर्षे आणखी एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. समुद्रामध्ये अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पुन्हा आलेल्या आलेल्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणे असा तो उपक्रम आहे. मातीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होते. मात्र सजावटीला उपयुक्त म्हणजेच दिखाऊ आणि वजनाने हलकी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणण्याकडेच लोकांचा कल असतो. अशी मूर्ती पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर करते, असे विविध माध्यमांमधून सातत्याने सांगितले गेले, तरी त्याकडे मूर्तिकार आणि मूर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होते. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी या मूर्ती भग्नावस्थेत पुन्हा किनार्यारवर येतात. प्लास्टिक आणि थर्माकोलला शासकीय बंदी असली, तरी सजावटीसाठी याच साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर अजूनही केला जातो आणि गणेशमूर्तींसोबतच विघटन न होणाऱ्या कचऱ्यात रूपांतर झालेले हे सजावटीचे साहित्य समुद्रात किंवा पाणवठ्यावर विसर्जित केले जाते. अशा तऱ्हेने सर्वसामान्य लोकांनी स्वच्छता आणि पर्यावरणाविषयीच्या नीतिनियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि पर्यायाने मूर्ती आणि निर्माल्यासोबतच तथाकथित भावभक्तीही समुद्राला अर्पण केल्यामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला काम करावे लागते, हाच मुळी नामुष्कीचा विषय आहे. गणेशोत्सवात कथा, प्रथा आणि परंपरांमधून गणेशाचे माहात्म्य सांगितले जाते. त्याच गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची अवहेलना गणपतीच्या भक्तांकडून सहन केली जाते, याचे आश्चार्य वाटते. म्हणूनच मूर्ती आणि निर्माल्यासोबतच हे भक्त भावभक्तीचेही विसर्जन करतात, असे म्हणण्याची वेळ येते. ती अर्पण केल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. उत्सव साजरा करून पुण्य मिळते, असे वाटत असेल, तर त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक पाप भक्तांच्या खात्यावर जमा होत असते आणि पर्यावरण प्रदूषणाच्या रूपाने ते आपल्या आणि पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागते. सामाजिक सुधारणांची शिकवण देणाऱ्या गणेशोत्सवाने तशी मानसिकता तयार व्हायला हवी.
- प्रमोद कोनकर
- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. १३ सप्टेंबर २०१९)


No comments:

Post a Comment