Sunday 1 April 2018

समाज परिवर्तनामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे : सुरेश प्रभू



                रत्नागिरी : समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांचीही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांच्या हस्ते रत्नागिरीतील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक्सचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रभू यांनी बोलत होते.

                श्री. प्रभू म्हणाले की, कोकणाचा विकास अद्यापही अपूर्ण आहे. याचे कारण येथील महिला घराबाहेर पडत नाहीत. मात्र जेव्हा महिला घराबाहेर पडतात तेव्हा समाजाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते असा माझा विश्वास आहे. त्यातूनच १९९४-९५ च्या दरम्यान मानव साधन विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत महिला सबलीकरणाच्या निमित्ताने कोकणातील सुमारे ६० ते ७० हजार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी या संस्थेने दिली आहे. त्यातच पुढचे पाऊल म्हणून कोकणातील महिलांना सुमारे ४५ हजार रुपये किमतीची पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक देण्याचा प्रस्ताव हिरो ग्रुपचे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आमच्या मानव साधन विकास संस्थेकडे आणला. त्याचाच प्रारंभ आज होत आहे. कोकण विकासासाठी शासनासोबतच अशा सामाजिक संस्थांचीही सांगड घालणे गरजेचे आहे, असेही श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
                कार्यक्रमाला व्यासपीठावर सौ. उमा प्रभू यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, सौ. उल्का विश्वासराव आणि ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनचे अनिल शर्मा उपस्थित होते. महिला सबलीकरणासाठी मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे काम करीत असून याहीपुढे हे काम असेच सुरू राहील, असे सौ. उमा प्रभू यांनी सांगितले. अनिल शर्मा यांनीही ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जाणीव फाऊंडेशनच्या वतीने श्री. प्रभू यांच सत्कार करण्यात आला.
                मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांतर्गत अनेक उपक्रम २० वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाखापेक्षा जास्त महिलांना या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. येणाऱ्या काळात महिलांना स्वयंरोजगारासाठी व नोकरी व्यवसायासाठी वाहतुकीची कमी खर्चात व पर्यावरणपूरक व्यवस्था व्हावी,  या हेतूने इलेक्ट्रिक बाइक्स देण्यात आल्या आहेत. ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने महिलांच्या सबलीकरणाकरिता ५०० इलेक्ट्रिक बाइक्सचे वितरण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले जाणार आहे. त्यापैकी २५० सायकली रत्नागिरी जिल्ह्यात वितरित केल्या जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात रोहिता सहदेव पांचाळ (ताम्हाणे, राजापूर), मंदाकिनी महादेव माईंगडे (जाकादेवी, रत्नागिरी), योगिता योगेश पवार (कोसुंब, संगमेश्वर), शमिका संतोष रामाणी (मालगुंड, रत्नागिरी), प्रियांका प्रकाश जोशी (निवे, संगमेश्वर), दीपाली मनोज कुंभार (टेरव, चिपळूण), माधवी मंगेश किर्लोस्कर (उन्हाळे, राजापूर), साक्षी चंद्रकांत भुवड (वाकेड, लांजा) आणि रूपाली राहुल पवार (जावडे, लांजा) या महिलांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे.



No comments:

Post a Comment