Monday 17 July 2017

रागार्पण नव्हे, अमृतानुभव!!!

      गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची कन्या सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या शिष्यांनी रविवारी (ता. १६ जुलै) रत्नागिरीत रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका रसिकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया.

      'शास्त्रीय संगीत हे गंभीर स्वभावाच्या आणि रागाचं ज्ञान असणाऱ्यानंच पहायचा कार्यक्रम' असं सर्वसामान्यांप्रमाणे माझंही मत होतं, पण माझी संकल्पना बदलून गेली ती सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या 'रागार्पण' या कार्यक्रमानं!!
सौ. मुग्धा भट-सामंत यांना शुभेच्छा अमित सामंत
   निमित्त होतं कै. गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहातील 'रागार्पण' कार्यक्रमाचं!! माझ्या परिचयाच्या एका सहावर्षीय बालिकेच्या ठाम आग्रहावरून खरं तर मी कार्यक्रमाला गेलो, अन्यथा मला गाण्यातल्या रागाचं फार ज्ञान नाही. गाणी ऐकायला मात्र आवडतात..
    तिथला माहोल म्हणजे निव्वळ तृप्ती!! अमृतानुभव होता. सहा ते साठ वर्षं वयाचे शिष्यगण असणाऱ्या मुग्धा भट-सामंत यांचं गाणं जरी मला एकता आलं नाही तरी त्यांच्या शिष्यानीं केलेली कमाल पाहण्याचं भाग्य मात्र लाभलं!! रागसमयचक्रावर (त्या त्या वेळी तो तो राग) आधारित कार्यक्रम, श्रोत्यांनी तुडुंब भरलेला हॉल, शेवटपर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून कार्यक्रमाचं यश लक्षात येतं.
   प्रत्येक शिष्याचा रियाजानं तयार झालेला सूर, प्रत्येक रागाची माहिती देणारं निवेदन आणि संयोजनातील शिस्त यामुळे कार्यक्रम नादमधुर बनला!! बाहेर भर जुलै महिन्यात आकाश कोरडं असताना हॉलमध्ये मात्र मधुरस्वरधारा अक्षरशः बरसत होत्या!! शेवटी ६-७ वर्षांच्या चिमुकल्यानी म्हटलेलं भैरवीतलं मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत तर कार्यक्रमाला चार चाँद लावून गेलं!!
  अप्रतिम वाद्यवृंद, वक्त्यांच्या बोलण्यातून समजलेला मुग्धाताईंचा प्रवास, त्यांचे परिश्रम, शिस्त आणि त्यांना मिळालेली त्यांचे पती योगेश सामंत यांची साथ हे सर्वच प्रेरणादायी आहे. (मुग्धताईंचे पती आपली डबल ड्युटी करून कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सहापासून ते कार्यक्रम सायंकाळी संपेपर्यंत अविश्रांत मेहनत घेत होते, ही माहितीही एका वक्त्यानं सांगितली.)
एकूणच गायनातलं समर्पण, गुरू-शिष्य परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयोग, पित्याविषयी कृतज्ञता आणि कुटुंबीयांची समर्थ साथ या सगळ्या पायावर उभा राहिलेला आणि शिष्यांच्या सुरेल गायनानं आणि श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादानं कळस गाठणारा 'रागार्पण' हा केवळ एक सांगीतिक कार्यक्रम न राहता अमृतानुभव बनला!!
-    अमित सामंत, रत्नागिरी

.............


सौ. मुग्धा भट-सामंत यांना आणखी एका रसिकाने कवितेतून दिलेली दाद

तू साक्षात गुरू...

स्वरांसारखी किती माणसं,
जवळ केली मुग्धा!
स्वर्गामधून कौतुक करत
असतील देवसुद्धा!

धाग्यामधे फुलं तशी,
माणसं ओवतेस स्वरात!
गंधर्वांचा वावर असेल,
नक्की तुझ्या घरात!

छप्पर सगळा पाऊस देतं,
ओंजळ भरून मातीत!
तुझं तेज उजळू लागतं,
शिष्यांच्याही वातीत!

हातचं राखल्याशिवाय जे
देणं ठेवतात सुरू!
त्यांना कसं माणूस म्हणू,
तूच साक्षात गुरू!

                     प्रमोद जोशी, देवगड

No comments:

Post a Comment