Wednesday 31 August 2016

राजापूरच्या गंगेचे आगमन

             
 रत्नागिरी : राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या राजापूरच्या गंगेचे आज (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी साडेपाच वाजण्याच्या आगमन झाले आहे. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा याठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहित झाली आहे.
             सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते, असे मानले जाते. प्रामुख्याने उन्हाळ्यात आणि दुष्काळस्थिती असताना गंगा अनेकदा आली आहे. गेली चार वर्षे मात्र साऱ्यांचे अंदाज चुकवत गंगा पावसाळ्यातही प्रकट होत आहे. तीन वर्षांचा नियमही बाजूला राहिला आहे. गेल्यावर्षी २७ जुलै रोजी गंगेचे आगमन झाले होते. सुमारे १०२ दिवस वास्तव्य केल्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी गंगा अंतर्धान पावली. त्यानंतर सुमारे आठच महिन्यांत पुन्हा एकदा गंगा आली आहे. गेल्या काही वर्षामध्ये गंगामाईच्या आगमनामध्ये अनेकदा बदल झाला आहे. गंगा दरवर्षीच येऊ लागली आहे. त्यामुळे गंगेच्या आगमनाच्या अफवाही अनेकदा पसरल्या. आज सकाळीही गंगा आल्याची बातमी सर्वदूर पसरताच सुरुवातीला अनेकांना ती अफवाच वाटली. त्यामुळे अनेकांनी गंगामाईच्या आगमनाची पाहणी करण्यासाठी गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली. तेथे गंगा आल्याचे पाहिल्यानंतर अनेकांनी पहिल्या स्नानाचीही पर्वणी साधली. सध्या गंगातीर्थक्षेत्री लोकांची गर्दी झाली नसली, तरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारे मुंबईकर गंगास्नानाची पर्वणी साधण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment